मराठी भाषेचे संवर्धन या पद्धतीने करता येईल…
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी.जागतिकीकरणाच्या रेट्यात मायमराठीच्या लेकरांचा स्वभाषेबाबतचा स्वाभिमान हरवल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आता ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसांनी, सरकारने, कोणकोणते प्रयत्न केले? किती प्रयत्न केले? या गोष्टीचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलीआहे.मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आता तरी मराठी भाषा जतन केली पाहिजे. कारण आज मराठी भाषा मराठी लोकांसाठीच परकी होत आहे.मराठी भाषेच्या दुरावस्थेला आपण मराठी बांधवच जबाबदार आहोत. सरकार,प्रशासन व मराठी जण माय मराठीचे मारेकरी आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करून किंवा अभिजात दर्जा मिळाला म्हणून मराठी भाषेचे जतन होणार नाही. मराठी भाषेचे जतन करायचे असेल तर ती कृतीतून यायला पाहिजे. मातृभाषेचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आईचे संगोपन जसे मुलं करतात. तसेच मातृभाषेचे संगोपन करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. मातृभाषा आपली आईच असते.या मातृभाषेचे संवर्धन आपणच केले पाहिजे असे मला वाटते.मुळात मराठी भाषा जतन करण्यापेक्षा समृद्ध केली पाहिजे.सर्वात महत्वाचे म्हणजे आपण वाचन संस्कृती जपली पाहिजे. मराठीत अनेक बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषा आज लोक पावत आहे त्याचे देखील जतन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात वैदर्भीय बोली, मराठवाडी बोली, कोकणातील बोली आणि उर्वरित महाराष्ट्रातील कोल्हापुरी, आगरी, पुणेरी, मालवणी, वऱ्हाडी, झाडीबोली, अहिराणी, डांगी, कोकणी या अशा अनेक बोलींचा मराठीत समावेश आहे. भाषा ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते. प्रत्येक भाषेचं वेगळं वैशिष्ट्य असतं. यामध्ये उपभाषा, पोटभाषा, बोलीभाषा, लिपी या सगळ्यांचा गोतावळा असतो.
परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचं कार्य भाषेच्या माध्यमातून केलं जातं. भाषेमुळेच संस्कृतीची देवाणघेवाण होते. पण एखादी भाषा किंवा त्यातील बोली लोप पावत असेल तर त्याचा दूरगामी परिणाम संस्कृतीवरही होतो. त्यामुळेच की काय, भाषा हा कोणत्याही संस्कृतीच्या अस्मितेचा विषय मानला गेला आहे.
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. गोवा गुजरात सारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गोव्यात मराठीला समृद्ध असा इतिहास आहे. महाराष्ट्राला देखील मराठी भाषेचा फार मोठा इतिहास आहे. मात्र आज मराठी भाषा परकी होत चालली..
परदेशी भाषांचे आक्रमण होत असताना आपली मायबोली मराठी भाषा लोप पावणार नाही, याची काळजी तरुणाईने घेण्याची गरज आहे. मराठीसोबत इंग्रजी, हिंदी अशा भाषांचा वापर वाढला आहे. मात्र, मराठीचा अभिमान बाळगत जास्तीत जास्त संवाद मराठी भाषेतूनच व्हावायला पाहिजे. मात्र परिस्थिती इतकी वाईट आहे की मराठी भाषिकच मराठी भाषेची उपेक्षा करतात..मराठी भाषेचा वापर करण्या ऐवजीं इंग्रजी व मध्येच हिंदी भाषेचा वापर करून मराठी भाषेला परकी करून टाकतात.शुद्ध भाषा बोलणे तर फार दूरची गोष्ट झाली आहे.चांगल्या मराठीसाठी सराव करणे गरजेचे ‘मराठी भाषा बोलताना आपण इंग्रजी, हिंदी शब्द वापरून मराठी भाषेची खिचडी केली आहे. मराठी जनांना अस्खलित मराठी बोलता न येणे ही शोकांतिका आहे. अस्खलित मराठी बोलणे किती अवघड आहे, याचा अनुभव जेव्हा आपण कोणताही इंग्रजी व हिंदी भाषेचा शब्द न वापरता, बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच येतो. आपल्याला अस्खलित मराठी बोलता येत नाही, ही शोकांतिका आहे.
पुणे ,मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरातील परप्रांतीय व्यवसायिक मराठी ग्राहकांशी वाद घालतात मराठी भाषा आम्हाला कळत नाही, मराठीतच बोलणे हा नियम आहे का? आम्ही मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा? असे म्हणत परप्रांतीय व्यवसायिक मराठी भाषेत संवाद साधणं नाकारतात.
महाराष्ट्राची मराठी ही अधिकृत भाषा असताना संवाद मराठी होत नाही शाळा ,कॉलेज सरकारी कार्यालय न्यायालय या ठिकाणी देखील मराठीची फार मोठी उपेक्षा होते.महाराष्ट्रात मराठी भाषेचा सार्वत्रिक वापर’ हा खरे तर एक सहज-स्वाभाविक विचार आहे. तसेच भाषिक अस्मिता, भाषेचा अभिमान व भाषेचे अस्तित्व या दृष्टीने हा विचार महत्वाचा आहे.
भाषिक अस्मिता ठळक होण्यासाठी, भाषेच्या अस्तित्वासह प्रगतीसाठी व भाषेच्या अभिमानाची भावना नागरिकांच्या मनात कायम आणि योग्य त्या प्रखरतेने राहण्यासाठी भाषेचा सर्वांगीण वापर (सर्वांकडून, सर्व ठिकाणी वापर) हा मुद्दा अतिशय महत्वाचा ठरतो. तसेच मातृभाषा परिपूर्णतेने पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्यासाठी देखील सार्वजनिक क्षेत्रात ‘परिपूर्ण भाषा वापर’ आवश्यक आहे.
कोणत्याही प्रकारचा शासकीय-अशासकीय अर्ज भरणे… इत्यादी कृतींमधून भाषेचा वापर हळूहळू कमी होत जाणे, हे भाषाभिमान कमी होत जाण्याचे, लोकांचे भाषेवरील प्रेम संपत चालल्याचे लक्षण असते. तसेच यामुळे भाषेचा विकास खुंटतो, थांबतो. महाराष्ट्रात आज हेच चित्र दिसत आहे. याला शासन आणि मराठी भाषिक जनताही कारणीभूत आहे.मराठी ही राजभाषा आहे. पण महाराष्ट्रातल्या सार्वजनिक जीवनात मराठीचा परिपूर्णतेने वापर होत नाही, ही एक महत्वाची समस्या आहे. यामुळे मराठी भाषेची प्रगती थांबली आहे, याची जाणीवच शासन, राजकीय पक्ष, सामाजिक व सांस्कृतिक संस्था आणि महाराष्ट्रीय जनता यांना नाही. हीच मूळ व महत्वाची समस्या आहे.
मराठी ही महाराष्ट्राची भाषा असली तरी महाराष्ट्रात जन्म-मृत्यू दाखल्यापासून ते एस. टी. मधील तिकीटांपर्यंत अनेक क्षेत्रांतील – विभागांतील कागदपत्रे संपूर्णपणे मराठीतून देण्यात येत नाहीत. दुकानांच्या पाट्या मराठीत नसतात, उपहारगृहातील खाद्यपदार्थांची यादीही मराठीत नसते आणि आरामबसमध्ये मोफत म्हणून दिले जाणारे वृत्तपत्रही इंग्रजी असते. मराठीच्या दैनंदिन वापरात अनावश्यक इंग्रजी, हिंदी शब्दांचा वापर भरमसाठ वाढतो आहे. “वाईफ सिवियरली इन्जर्ड झाल्याने तिला अर्जंटली हॉस्पिटलाइज करावं लागलं” अशी वाक्य सहज वाटू लागली आहेत. याउलट “बायकोला मोठी दुखापत झाल्याने तातडीने रुग्णालयात ठेवावं लागलं” हे वाक्य परकं वाटू लागलं आहे. वृत्तपत्र, दृक-श्राव्य प्रसारमाध्यमे यांना मराठी मथळे सुचेनासे झाले आहेत. निव्वळ मराठी बोलण्या-लिहिण्याचा प्रयत्न हा स्वभाषकांनाही शुद्धीवादी, प्रतिगामी, हटवादी वाटू लागला आहे. मराठीतच नवे शब्द घडवण्याचा, वापरण्याचा कंटाळा वाढतो आहे. शब्द घडवलेच, तर ते संस्कृतप्रचुर आणि क्लिष्ट घडवले जात आहेत. ही मराठीला खड्ड्यात घालणारी व मराठी भाषिकांचा आत्मविश्वास कमी करणारी परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे.
राज्यातील केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये मराठीचा वापर अतिशय कमी प्रमाणात केला जातो. उदा. रेल्वे विभाग, प्राप्तिकर विभाग, पोस्ट खाते इत्यादी. माहिती तंत्रज्ञान क्रांतीच्या काळात पोस्टाचे महत्त्व अजून कमी झालेले नाही. संपर्काच्या साधनासह बचतीचे चांगले माध्यम म्हणून लोक पोस्टाकडे पाहतात. महाराष्ट्रात लाखो नागरिक पोस्टाद्वारे व्यवहार करत असतात. पोस्टाच्या महाराष्ट्रातील कार्यालयांत त्रिभाषासूत्राकडे दुर्लक्ष करुन प्रामुख्याने हिंदी व इंग्रजी भाषेचाच वापर केला जातो. पोस्टातील पाट्या, विविध अर्ज-प्रपत्रे-पावत्या, विविध बचत प्रमाणपत्रे या सर्व बाबतीत ही दुर्देवी परिस्थिती दिसते.खुद्द महाराष्ट्रातील राज्य स्तरावरील अनेक शासकीय कार्यालयांत मराठी भाषेचा वापर परिपूर्णतेने होत नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांना वेगवेगळे अर्ज इंग्रजी भाषेतूनच भरावे लागतात. वाहनाचे स्मार्ट कार्ड (वाहन नोंदणी प्रमाणपत्र), वाहन परवाना व प्रदूषण चाचणी प्रमाणपत्र या गोष्टी इंग्रजी भाषेतूनच नागरिकांना दिल्या जातात.
– प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६