मतदारांना भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाकडून अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या एकूण 20 सार्वत्रिक तसेच एकूण 50 पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपैकी ज्या ग्रामपंचायतींमध्ये नामनिर्देशन पत्र अप्राप्त आहे तसेच ज्या ग्रामपंचायती अविरोध झालेल्या आहे अशा ग्रामपंचायती वगळून उर्वरित तालुकानिहाय ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान रविवार, दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी अशा मतदारांना उक्त नमूद केलेल्या मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी तथा विशेष सवलत देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे.
या निवडणूकी सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी रविवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, निवासी हॉटल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, इतर आस्थापना किंवा निवडणूक होणाऱ्या ज्या ग्रामपंचायतींच्या जगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) तसेच महानगरपालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत, अशा ठिकाणी नोकरीनिमित्त कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी अशा मतदारांना उक्त नमूद केलेल्या मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी तथा विशेष सवलत देण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिली. शहरी भागात किंवा निवडणूका नसलेल्या भागातील दुकाने, कंपन्या, वाणिज्यिक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही.