नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
गौरव प्रकाशन
अमरावती,(प्रतिनिधी) : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविल्या जातो. आज दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित करून यंदाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम आज दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे.
दि. 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण-तरूणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल, मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या-त्या तारखेला पूर्ण करण्यात येईल.
सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन श्री. कटियार यांनी केले.