प्रबोधनाचा नगारा मनुवाद्यांच्या जबड्यात.!
—————————————————
बंजारा ही या देशातील एक प्राचीन जमात आहे. या जमातीची एक स्वतंत्र जीवनशैली आहे. ही जीवनशैली सेक्युलर आहे. सेक्युलर जीवनशैली ही मूळ भारतीय जीवनशैली आहे. ही जीवनशैली जात, धर्म, ईश्वर, अध्यात्म, परलोक, पूर्वजन्म, पुनर्जन्म ह्या गोष्टी मानत नाही. ही जीवनशैली माणूसमयच आहे. बंजारा जमातीच्या मूळ जीवनशैलीत चैतन्यवाद सशक्त करणाऱ्या गोष्टींना अजिबातच थारा नाही. बंजारा जमातीचे प्रारूप इहवादीच होते. इहवाद, बुद्धिवाद आणि समाजवाद या मूल्यांच्या तात्त्विक अधिष्ठानावर या जमातीची मूळ जीवनशैली उभी आहे. इहवाद, बुद्धिवाद आणि समाजवाद ही मानवी मूल्ये होत. ही महान मानवी मूल्ये अत्यंत सन्मानपूर्वक भारताच्या संविधानात अंतर्भूत झालेली आहेत. सांविधानिक मूल्ये ही भारतीय मूल्ये होत. लोकशाही, समाजवाद आणि सामाजिक न्याय ही मूल्ये इथल्या आदिम लोकांच्या प्रारंभिक जीवनशैलीत होती. ही मूल्यसंस्कृती बंजारा लोक जगत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जगण्यातून भारत आणि भारतीयत्व हे नितांतसुंदर आविष्कार वजा करता येत नाही. भारत ही त्यांच्या जीवनशैलीची अभिव्यक्ती आहे, तर भारतीयत्व हा तिचा मुख्य आशय राहिला आहे. ही आशयाभिव्यक्ती मानवी मूल्यांचा गौरव करणारी आहे. त्यामुळे बंजारा जमातीच्या मूळ जीवनशैलीत भारतीयत्वाच्या एकसंधतेला जखमी करणारे मूलतत्त्ववादी विचार दिसत नाहीत.
बंजारा ही मुळात भटकी जमात आहे. ती भटकीही आहे आणि विमुक्तही आहे. या जमातीचे हे विमुक्त-भटकेपण नैसर्गिकच होते. ते जैविक गरजेतून आले होते. विमुक्त-भटकेपण ही या जमातीला दिली गेलेली शिक्षाही नव्हती आणि सक्तीही नव्हती. ही या जमातीची जैविक आणि नैसर्गिक गरजच होती. या जमातीला नैसर्गिक कार्यकारणभावाची जाण होती. नैसर्गिक कार्यकारणभाव हाच या जमातीचा सिद्धांत होता. या नैसर्गिक जीवनसिद्धांतात जातिधर्माचे आणि अध्यात्माचे आविष्कार बसत नाहीत. हा जीवनसिद्धांत इहलोकनिष्ठच आहे. त्याला पारलौकिक जीवनाचे थोतांड कधी मान्यच झाले नाही. हा सिद्धांत जीवनावर प्रेम करणारा आहे. माणूस हाच या सिद्धांताचा केंद्र आहे तर मानवतावाद हा त्याचा परीघ आहे. या असीम मानवतावादी विचाराला जातिधर्मांच्या, अध्यात्माच्या आणि परंपरांच्या चौकटींमध्ये डांबून ठेवता येत नाही. या सिद्धांताचे सर्वहितैषी असे एक संविधान आहे. त्यात मानवी जीवनाला सन्मानित करणारे अनुच्छेद अंतर्भूत झालेले आहेत. इहजीवनाची परमसुंदरता हीच या अनुच्छेदांची प्रतिज्ञा राहिली आहे. या प्रतिज्ञेचे सर्वहितकारी म्हणणे जनमानसापर्यंत पोहोचविण्यात नगाऱ्याने फार महत्त्वाचे योगदान दिले आहे.
हे वाचा – बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा
भारतीय सांस्कृतिक जीवनात नगाऱ्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. नगारा हे एक चर्मवाद्य आहे. या चर्मवाद्याला रणवाद्य असेही म्हणतात. युद्धप्रसंगी, संकटाच्या वेळी किंवा कुठल्याही आपत्तीजनक काळात नगारा वाजवून स्वकियांना सावधानतेचा इशारा दिला जात असे. प्रार्थना करताना, युद्धात सैनिकांची वीरवृत्ती जागृत करताना किंवा युद्ध जिंकल्याचा आनंद साजरा करताना नगारा वाजविला जात असे. तसेच विविध सण-उत्सवांच्या प्रसंगीही नगारा वाजविण्याची प्रथा होती. त्यामुळे भारतीय सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात नगाऱ्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
बंजारा जमातीचे नगाऱ्याशी भावनिक नाते आहेत. हे भावबंध आजही टिकून आहेत. बंजारा जमातीच्या भटक्या-विमुक्त अवस्थेपासूनच नगारा तिला सोबत देत आला आहे. त्यामुळे नगाऱ्याला वजा करून बंजारा जमातीच्या सांस्कृतिक जीवनाची कल्पना करताच येत नाही. बंजारा ही गानप्रिय जमात आहे. नगाऱ्याने बंजारा जमातीच्या गायनकलेचीच नव्हे, तर या जमातीचे लोकसाहित्य आणि लोककलेची जोपासना आणि समृद्धी करण्यात नगाऱ्याचा फार मोठा वाटा राहिला आहे. नगाऱ्याच्या पडघममध्येच बंजारा जमातीचे म्हणजे तांड्याचे सांस्कृतिक भावविश्व संस्कारित होत गेले. नगाऱ्याच्या निनादातच तांड्याचे रंजन आणि प्रबोधन होत गेले. नगाऱ्याच्या पडघमने तांड्याचे मनोबल उंचावले. नगाऱ्याने तांड्याला एक स्वतंत्र असा सांस्कृतिक चेहरा दिला. त्यामुळे नगारा हा केवळ वाद्यविशेष म्हणून महत्त्वाचा मानला जात नाही, तर तांड्याची एक सांस्कृतिक ओळख म्हणून त्याला विशेषच महत्त्व आहे. नगारा ही तांड्याची सांस्कृतिक अस्मिताच आहे. या अस्मितेचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्कार्य तांड्यातील शाहिरांनी केले आहे. तांड्याचा सांस्कृतिक वारसा अत्यंत निष्ठापूर्वक पुढील पिढ्यांच्या हाती नगाऱ्याच्या माध्यमातून शाहीर लोक देत आले आहेत. नगारा आणि शाहीर यांच्यातील स्नेहबंध प्राचीन काळापासून आहेत. या दोहोंच्या सहसंबंधातून तांड्याचे वैचारिक जीवन संपन्न होत गेले. त्याचे सांस्कृतिक सौंदर्य खुलत गेले. तांड्याचे हे प्रबोधनपर्वच होते. या प्रबोधनपर्वात खऱ्या अर्थाने भारतीय तांडा घडत होता. सेवालाल महाराजांना अपेक्षित असलेला तांडा साकार होत होता. हा तांडा सेक्युलरच होता. शाहिरांनी विज्ञानवादी भूमिकेतून आपली भजनकला विकसित केली आहे. त्यातून तांडा विचारप्रवण आणि प्रयोगशील होत गेला. तो आपली वैचारिक कूस बदलू लागला. तांड्याचे सांस्कृतिक पर्यावरण विचारसन्मुख करण्यात शाहीर मंडळींची भजने फार मोलाची ठरली आहेत. हे प्रबोधनाचे काम आजही सुरूच आहे. त्यामुळे भजनकला तांड्यात तग धरून आहे.
भजनकलेने तांड्याचे केवळ मनोरंजनच केले नाही, तर तांड्याला नैतिक मूल्यांची शिकवणही दिली. बरे-वाईट, नैतिक-अनैतिक, सत्यासत्य यांचा निर्वाळा करणारा सद्विवेकही दिला. सदाचार दिला. नीतिमत्ता दिली. ही नैतिक मूल्येच आहेत. शाहिरांनी (भजन्यांनी) अत्यंत निष्ठेने या नैतिक मूल्यांची तांड्यात पेरणी केली आहे. नगाऱ्याच्या ठेक्यावर त्यांनी आपली भजने रचली, लोकगीते तयार केली. तांड्याचे हे सृजनच होते. या काव्यमय सृजनशीलतेच्या प्रत्येकच टप्प्यांवर तांडा गतिशील विचाराची कास धरीत होता. माणुसकीचे मोल समजून घेत होता. नवतेचे बोट धरत आधुनिक जीवनाची वाट चालत होता. नवता आणि आधुनिकता ही मूल्ये आपल्या सांस्कृतिक जीवनात तांडा रुजवू पाहत होता. तांड्याच्या या सुंदर निर्मितीत नगाऱ्याची धून महत्त्वाची भूमिका अदा करीत होती. ही अदाकारी धून तांड्याला आपले सांस्कृतिक वेगळेपण पटवून देत होती. ही धून तांड्याला आधुनिकतेच्या जाणिवांनी सुसंपन्न करीत होती. या धूनमधून तांड्याचे इहवादी आणि समाजवादी प्रारूप पुढे येत होते. नगाऱ्याच्या पडघममधून इहवादी, समाजवादी आणि विज्ञानवादी मूल्यसंस्कृती तांड्यात नांदत होती. नगाऱ्याच्या धूनमधून या मूल्यसंस्कृतीचा सशक्त आविष्कार तांड्यात होत होता. हे सुंदर मूल्याविष्कार तांड्याला गतिशील विचाराशी संलग्न करणारेच होते. या प्रकारे तांड्याला आधुनिक विचाराची दीक्षा देऊन तांड्याचे प्रबोधन करण्यात नगाऱ्याची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे.
नगारा आणि तांडा यांच्यात एकजीवत्व आहे. नगाऱ्याने तांड्याचे रंजन आणि प्रबोधन तर केलेच; शिवाय तांड्यावर येणाऱ्या गंभीर संकटांचे तांड्याला इशारेही दिले. नगारा हे तांड्याचे वार्तापत्रच होते. त्या द्वारे तांड्याला सचेत केले जायचे. तांड्यावर आलेल्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीप्रसंगी विशिष्ट प्रकारे नगारा वाजवून तांड्याला सावध केले जायचे. तांड्यात घडणाऱ्या एखाद्या दुर्घटनेची माहितीदेखील सांकेतिक पद्धतीने नगारा वाजवून प्रसारित केली जायची. नगारा हे तांड्याचे एक अनोख्या प्रकारचे ध्वनिमाध्यमच होते. तांड्यात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांची माहिती या ध्वनिमाध्यमद्वारे तांड्यातील प्रत्येक घरी पोहोचवली जात असे.
नगारा आणि तांडा यांतील सलोख्याला एक भावनिक आणि वैचारिक वीण होती. परंतु कालौघात ती विस्कटत गेली. त्यात अंतर पडत गेले. इथे वैदिक संस्कृती आली आणि भक्तीचे भगवे वारे तांड्यात प्रवेशू लागले. तांडा आपल्या मूळ धाटी जीवनशैलीपासून दूर जाऊ लागला. भक्ती, मुक्ती, मोक्ष, स्वर्ग, पाप, पुण्य ही मनूची पिलावळे दबक्या पावलांनी तांड्यात फिरू लागली. बंजारा धाटीचा गजर करणाऱ्या नगाऱ्यातून हळुहळू चैतन्यवादाचे स्वर प्रसवू लागले. भक्तीची महिमा गाणाऱ्या या मूलतत्त्ववादी स्वरांना प्रखर बुद्धिवादी उत्तरे १८ व्या शतकात संत सेवालाल महाराजांनी दिली. सेवालाल महाराजांनी तांड्याच्या धाटी जीवनशैलीवर वैदिकांनी अत्यंत कपटनीतीने थापलेले शेंदरी थर आपल्या क्रांतिकारी विचाराने खरडून काढले. परंतु त्यांच्या हयातीनंतरच्या काळात वर्णवर्चस्ववाद्यांचा सर्वहिताचा तृष्णांध मनुवाद पुन्हा तांड्यात नेला गेला. तांड्यातील भोळ्याभाबड्या शाहिरांच्या माथ्यात पद्धतशीरपणे चमत्कार, स्वर्ग, मोक्ष आणि भक्तीमुक्तीची विषवल्ली टाकली गेली. या निरक्षर शाहिरांच्या माध्यमातून सेवालाल महाराजांच्या प्रखर विज्ञानवादी विचारांवर चमत्कारांचे मुलामे चढवून त्यांना देवपण दिले गेले. त्यामुळे नगाऱ्याच्या निनादाचे सूर बदलले आणि तांड्याचे वैचारिक प्रबोधन मावळतीच्या दिशेने सुरू झाले. इथल्या वर्णवर्चस्ववादी लोकांच्या सर्वहिताची आरती गाणाऱ्या वैदिक संस्कृतीने नगाऱ्यातून येणाऱ्या विज्ञानवादी धूनची गळचेपीच केली होती. हे सूडसत्र संविधानसंस्कृतीच्या उदयापर्यंत बिनबोभाटच सुरू होते.
१९५० साली स्वतंत्र भारताने संविधानसंस्कृती स्वीकारली आणि या देशात आधुनिक विचारांना गती आली. संविधानाच्या उजेडामुळे अज्ञान-अंधश्रद्धांच्या काळोखात दडलेली मनुवाद्यांची षडयंत्रे उघड्यावर पडली. ही धूर्त षडयंत्रे समाजवादाचा खोटा चेहरा धारण करून इथल्या साधनवंचित लोकसमूहांची मती भक्तीच्या गुंगीत गर्क करीत होती. परंतु भारताच्या संविधानाने मनुवाद्यांचा कावेबाजपणा ओळखला होता. संविधानाने मनुवादी लोकांच्या अनिर्बंध तृष्णेला कायद्याच्या चौकटीत बंदिस्त केले. हा क्षण नगाऱ्याचा आणि मनूच्या चरकात पिळल्या गेलेल्या सर्वच ध्येयवादी स्वरांचा बंधमुक्तीचा क्षण होता. या क्रांतिकारी क्षणाचे पडसाद तांड्यावर उमटत होते. या अभूतपूर्व क्षणाने नगाऱ्याची धून पुन्हा प्रबोधनकेंद्री झाली. अर्थात याला काही अपवाद जरूर होते; पण संविधानक्रांतीनेच तांड्यात प्रबोधनाचे नवे पर्व सुरू झाले. आता नगाऱ्याने समाजक्रांतीच्या दिशेने आपला निनाद सुरू केला आणि तांड्यात परिवर्तनाची पहाट उगवू लागली. नगाऱ्याच्या पडघममधून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा उद्घोष सुरू झाला.
संविधानसंस्कृतीने तांड्यांना आणि सर्वच अभावग्रस्त लोकसमूहांना उजेडसन्मुख करण्याची प्रतिज्ञाच घेतली होती. परंतु त्याचवेळी संविधानाने गाडून टाकलेला मनू इथले मूलतत्त्ववादी लोक जिवंत करीत राहिले. मनूच्या कबरीचे उत्खनन करून मनूला अधिक विध्वंसक रूपात पुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याहीवेळी सत्तेतल्या अनेक लोकांवर मनुवादाचा प्रभाव होताच. त्यामुळे मनुवादाचे फावत गेले आणि मनुवाद या देशात बळकट होत गेला. मागील दशकापासून तर तो अधिकच गतिमान, मुजोर आणि खतरनाक झाला आहे. मनुवादी सत्ताधाऱ्यांनी दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी या सर्वच लोकसमूहांची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मिता पुसून काढण्याचा चंगच बांधला आहे. मनुवादी सत्तांधांनी हेतुतः निर्माण केलेल्या या धर्मांध गोंधळाच्या बजबजपुरीपासून तांड्याला फार काळ अलिप्त राहता आले नाही. बंजारा समाजातील काही म्होरक्या मंडळींच्या फितुरीमुळे मनुवाद तांड्यात पोहोचला आणि तांडा मनुवादाने प्रभावित झाला. लक्षचंडी महायज्ञ, गोर धर्मपीठ, कुंभमेळा असे धर्मांध उपक्रम तांड्यात सुरू झाले. असे जहरी उपक्रम प्रबोधनकारी नगाऱ्याच्या पडघममधून यापूर्वी कधीच बाहेर पडले नव्हते. हे विषारी उपक्रम मनुवादी मानसिकतेतून राबविले जात आहेत. ही मानसिकता महत्त्वाकांक्षीच आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेने ती प्रेरित झालेली आहे. या मानसिकतेने धर्मांधतेशी हस्तांदोलन केले आणि तांड्यात राजकारण आणि धर्मकारण यांची युती झाली. या अभद्र युतीने तांड्याला मनोरुग्ण करण्याचा निर्धारच केलेला आहे. हा निर्धार मनुवादाचे हस्तक असलेल्या स्वार्थी पुढाऱ्यांच्या कावेबाज डोक्यातून प्रसृत झाला आहे.
राजकीय महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या तांड्यातील धर्मांध प्रवृत्तीच्या राजकारण्यांनी नगाऱ्याचा मूळ क्रांतिकारी बाणा नष्ट करण्याची जणू प्रतिज्ञाच केलेली आहे. ही प्रतिज्ञा मनुवादी सत्ताधाऱ्यांची बाजू बळकट करणारी आहे. ही प्रतिज्ञा करणारे लोक संविधानाचे लाभार्थी लोक आहेत. लाभ संविधानाचा घ्यायचा आणि लोभ मनुवाद्यांचा करायचा हा दुटप्पीपणा फारच घातक आहे. अशा अंतर्विरोधी लोकांमुळेच संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी विचार हे लोकविचार होऊ शकले नाही. फुले-शाहू-आंबेडकरांचे आणि नाईक साहेबांचे विचार वंचित-उपेक्षितांच्या वस्त्यांमध्ये पोहोचू शकले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की इथले साधनवंचित लोक विचारविन्मुख होत गेले. संविधानाने दिलेला सद्विवेकच ते गमावून बसले. या सद्विवेकाअभावी मनुवादाचा सर्वविनाशी टारफुला तांड्याच्या प्रबोधनकारी भूमीत रुजविण्यात मनुवादी यशस्वी होत आहेत. अशा सत्तांध लोकांमुळे तांड्याची क्रांतिभूमी आता प्रतिक्रांतीची पाठराखण करणारी धर्मभूमी होत आहे. तांड्याच्या क्रांतिभूमीत प्रतिक्रांतीची निवडुंगे रुजविली गेल्यामुळे ही भूमी मनुवादाला पोषक ठरत आहे. नगाराभवन हे त्याचेच प्रतीक आहे.
खरेतर नगाराभवनला कोणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. नगारा हे तांड्याचे सांस्कृतिक प्रतीक होय. या सांस्कृतिक प्रतीकाची भव्य प्रतिकृती निर्माण होणे ही आनंददायीच घटना आहे. परंतु ही घटना ज्या मानसिकतेतून घडली ती मानसिकता गोरगरिबांच्या हिताची कधीच नव्हती. या मानसिकतेचा इतिहास दुनियेला माहीत आहे. इतिहासभर ही मानसिकता इथल्या साधनवंचित लोकसमूहांचा छळवादच मांडत आली आहे. या मानसिकतेने आज विवंचनाग्रस्त लोकसमूहांचे नानाविध पद्धतीने शोषण करण्यात उच्चांकच गाठलेला आहे. या मानसिकतेच्या मदतीने नगाराभवन होत आहे ही घटना एका फार मोठ्या दुर्घटनेला जन्म देणारी आहे. त्यामुळे जाणकार लोक नगाराभवन निर्मात्याच्या विरोधात उभे झाले आहेत.
नगाऱ्याचा इतिहास हा तांड्याच्या क्रांतिकारी प्रबोधनाचाच इतिहास आहे. नगाऱ्याद्वारे शाहिरांनी केलेले प्रबोधन हे क्रांतिकारीच आहे. या प्रबोधनाने तांड्याचे उद्बोधन केले आहे. परंतु अलीकडे मनुवादाचे प्रचारक तांड्यात तयार केले गेले आणि आतापर्यंत दबा धरून बसलेली मनूची ठोळी नगाऱ्यावर प्रहार करण्यास सज्ज झाली. नगाऱ्याचे स्वरतंत्रच तिला बदलवून टाकायचे आहे. नगाऱ्याच्या क्रांतिकारी धूनमधून भक्तीचे परलोकवादी स्वर तिला ऐकायचे आहेत. नगाऱ्याची वीरता भक्तीरसाच्या डोहात तिला समरस करायची आहे. हा समरसतावादच आहे. समरस होणे म्हणजे मिसळून जाणे. आपली स्वतंत्र ओळख पुसून टाकणे म्हणजे समरस होणे होय. नगाऱ्याच्या समतेला समरसतेच्या मृदगांत दंग करणे म्हणजे समरस होणे होय. समरस होणे म्हणजे मूलतत्त्ववाद्यांच्या गोटात सामील होणे होय. समरस होणे म्हणजे विलीन होणे. तांड्याची समतावादी धाटी विषमतावादी वैदिक संस्कृतीत विलीन व्हावी यासाठी नगाऱ्याच्या पडघमचे क्रांतिकारी बोल प्रतिक्रांतीच्या तालावर नाचविले जात आहेत. मनुवादी शोषणसत्तेचे हे षडयंत्रच राहिले आहे. या षडयंत्राला तांड्यातील स्वार्थांध नेते बळी पडत आहेत. मनुवादाचे हे दुष्ट कारस्थान तांड्याच्या राजकारणाला ओळखता आले नाही. तांड्याच्या राजकारणाकडे डोळे आहेत, पण दृष्टी नाही आणि दृष्टिकोनही नाही. ही दृष्टी नाईक साहेबांकडे होती. त्यामुळे मनुवाद्यांच्या मैफलीत ते सामील झाले नाही. तांड्यात मनुवाद्यांचा प्रादुर्भावही त्यांनी होऊ दिला नाही. विज्ञानवादाचे धडे देणारी ही माणसे काळाच्या पडद्याआड निघून गेली आणि तांडा जीवनशैलीत मनुवाद्यांची ढवळाढवळ सुरू झाली. नगाराभवनच्या रूपाने हे आता स्पष्टच झाले आहे.
नाईक साहेबांचा तांड्याकडे पाहण्याचा एक विशिष्ट असा दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन निखळ विज्ञानवादीच होता. या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी मनुवाद्यांचे मनसुबे हेरले होते. त्यामुळे त्यांच्या हयातीत मनुवाद्यांचे तांड्याच्या धाटीत हस्तक्षेप करण्याचे धाडस झाले नाही. संत सेवालाल महाराजांकडेही हाच दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन चिकित्सकच होता. हा चिकित्सक दृष्टिकोन घेऊन तांड्यात वैचारिक क्रांती त्यांनी घडवून आणली होती. त्यामुळे तांड्याच्या समतास्वभावी धाटी जीवनशैलीवर परलोकवाद्यांना मनुवादी विचाराचे संस्कार करता आले नाही.
परंतु काळाच्या ओघात तांडा बदलत गेला. हा बदल तसा विघातकच आहे. सेवालाल महाराजांनी तांड्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला होता. पुढे नाईक साहेबांनी आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात हा दृष्टिकोन रुजविणारे प्रकल्प उभे केले होते. तांड्यात आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर या देशात पुरोगामी विचार रुजावा या उदात्त हेतूने ते सतत प्रयोगशील होत होते. हे प्रयोगशील मन घेऊन तांड्यात पुरोगामी विचाराच्या कार्यशाळाच त्यांनी उभ्या केल्या होत्या. त्यातून तांडा घडत होता. तांड्याची वैचारिक भूमी परिपक्व होत होती. याच भूमीतून रामसिंगजी भानावतसारखे द्रष्टे नेते तयार झाले. आत्माराम कनीराम राठोड सारखे प्रतिभावंत साहित्यिक निर्माण झाले. हा समृद्ध वैचारिक वारसा घेऊन तांड्यात अनेक साहित्यिक आज लिहिते झाले आहेत. परंतु नाईक साहेबानंतर तांड्यात उदयास आलेल्या छोट्यामोठ्या नेत्यांनी नाईक साहेबांपासून केवळच राजकीय प्रेरणा घेतली. या नेत्यांना परिवर्तनवादी विचाराचे मोलच फारसे कळले नाही. त्यांना केवळ सोयीचेच राजकारण कळले. असे स्वहिताचे राजकारण हे समाजहिताचे राजकारण असू शकत नाही. या नेत्यांना नाईक साहेबांच्या विचारातील क्रांतिकारकत्व कळले असते तर त्यांच्यापासून समाजहिताच्या राजकारणाची प्रेरणा ते घेऊ शकले असते. म. फुल्यांनी इथल्या शोषणाविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचे अन्वयार्थ त्यांनी जाणले असते. परंतु या नेत्यांकडे ती दृष्टी आणि तो कळवळा नसल्यामुळे त्यांचे राजकारण व्यक्तिकेंद्री बनले. असे घडून येण्याला तांड्याचे राजकीय क्षेत्रातील अज्ञान आणि तांड्यात उदयास आलेले उथळ राजकीय नेतृत्व सर्वार्थाने कारणीभूत ठरले आहे. या नेत्यांनी नाईक साहेबांपासून सांस्कृतिक प्रेरणा घेतली नाही. त्यांनी तांड्याची धाटी आणि तिचे तात्त्विक अधिष्ठान समजूनच घेतले नाही. त्याची गरजच त्यांना वाटली नाही. या गोष्टींची गंभीर जाण त्यांना असती तर आज तांड्यावर नगाराभवनच्या रूपात मनुवादाचे सावट आले नसते. मनुवादाचे काळे ढग तांड्यावर घिरट्या मारीत आज राहिले नसते. परंतु तांड्यातील तकलादू नेत्यांकडे ही चिकित्सादृष्टी नसल्यामुळे तांड्याचा प्रबोधनकारी नगारा आज मनुवादाच्या जबड्यात सापडला आहे. हे सांस्कृतिक पांगळेपण तांड्यातील धूर्त नेत्यांच्या तृष्णांधतेतून आले आहे. या अतिरेकी तृष्णांधतेमुळे या नेत्यांचे राजकारण व्यक्तीकेंद्री बनले. व्यक्तीकेंद्री राजकारण हे केवळच स्वहिताचे राजकारण असते. स्वहिताचे राजकारण हे देखाव्याचे राजकारण असते. असे राजकारण करणारे लोक भयंकरच चतुर असतात. समाजहिताचे मुखवटे धारण करून आपले स्वहितच ते साधत असतात. त्यांच्या वागण्यात आणि जगण्यातही अंतर्विरोधच असतो. ही अंतर्विरोधग्रस्तता समाजहिताला भयंकरच घातक असते. समाजातील प्रश्नांना सतत जळते ठेवणे हाच या लोकांचा अंतिम हेतू असतो. मनुवादाचाही हाच हेतू होता. मनुवादाचा हा दुष्ट हेतू नाईक साहेबांनी ओळखला होता. त्यामुळे त्यांच्या हयातीत तांड्यात मनुवादी बांडगुळांची पैदास होऊ शकली नाही.
नाईक साहेबांचे राजकारण हे समाजकेंद्री होते. त्यांनी राजकारणासाठी राजकारण कधीच केले नाही. त्यांचे राजकारण समाजकारणासाठी होते. आपल्या राजकीय कारकीर्दीत समाजकेंद्री राजकारणाचा एक आदर्श नमुनाच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापुढे सादर केला होता. समाजकेंद्री राजकारण हे मानवतावादी विचाराचे राजकारण असते. नाईक साहेबांनी मानवतावादाचे धडे संत सेवालाल महाराजांपासून घेतले होते. म. फुल्यांना ते आपले गुरू मानत असत. त्यामुळे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि कार्यशैलीवर फुल्यांचा प्रभाव होता. नाईक साहेबांच्या काळातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मानवमुक्तीची आंदोलने जोरात सुरू होती. मानवी जीवनाच्या संपूर्ण शोषणमुक्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथल्या शोषणव्यवस्थेच्या विरोधात रान पेटवत होते. त्या ज्वालांचे अन्वयार्थ नाईक साहेबांना कळून चुकले होते. बाबासाहेब हे मानवतावादी विचाराचे खंदे पुरस्कर्ते होते. फुले-शाहू-आंबेडकरांनी भारतीय सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात पुकारलेला एल्गार नाईक साहेबांनी अभ्यासला होता. नाईक साहेबांवर असलेल्या या वैचारिक प्रभावामुळे त्यांच्या राजकारणात सामान्य माणूस हा केंद्रस्थानी राहिला आहे. नाईक साहेब हे जीवनवादी विचाराचे नेते होते. जीवनवाद हाच त्यांच्या राजकारणाचा इत्यर्थ होता. जीवनवादी दृष्टिकोनातूनच त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावर आपल्या राजकीय मुद्रा कोरल्या आहेत. त्यामुळे जीवनाची बेअब्रू करणारे राजकारण त्यांनी कधीच केले नाही. त्यांचे राजकारण हे मानवी जीवनाच्या सन्मानाचेच राजकारण राहिले आहे.
भारतीय क्रांतिपरंपरा ही मानवी जीवनाला समतल आणि सन्मानित करणारी परंपरा आहे. संत सेवालाल महाराज हे या परंपरेचे आश्वासक शिलेदार होते. आधुनिक काळात फुले, शाहू, आंबेडकर आणि महानायक वसंतराव नाईक यांनी या क्रांतिपरंपरेचे अत्यंत समर्थपणे नेतृत्व केले आहे. या प्रखर विद्रोही नेतृत्वांनी इथल्या सबंध साधनवंचित लोकसमूहांना मनुवादाच्या जहरी जबड्यातून बाहेर काढण्याचा संकल्पच केला होता. इतकेच नव्हे तर या देशातील अभावग्रस्त लोक मनुवादाच्या खाईत पुन्हा ढकलले जाणार नाहीत याचीही तजवीज त्यांनी करून ठेवलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या तमाम विवंचनाग्रस्त लोकसमूहांच्या सर्वकल्याणाचा विचार करून प्रत्येक भारतीय नागरिकांना दर्जाची व संधीची समानता देणारे संविधान या देशाला समर्पित केले. त्यात सर्वांना मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. लिंग, जाति, वर्ग, वर्ण, प्रांत, पंथ, भाषा यांवरून केले जाणारे भेदाभेद नष्ट करून सर्वांना विकासाची समान संधी दिली. संविधानाने दिलेल्या या सर्वहितकारी दृष्टीचे जन्मस्रोत इथल्या क्रांतिपरंपरेत आहे. या क्रांतिपरंपरेच्या ध्येयवादाची मर्मे जाणून घेणारी दृष्टी असल्याशिवाय मनुवाद्यांचे धूर्त डावपेच लक्षातच येत नाहीत.
तांड्यातील राजकीय नेतृत्वांकडे या मर्मदृष्टीचा अभावच आहे. त्यामुळे सत्तेकडे काय मागावे हे त्यांना कळले नाही. त्यांच्या स्वार्थांधतेने हे त्यांना कळूच दिले नाही. खरेतर बंजारा जमातीचा उद्धार नॉन क्रिमिलिअरची अन्यायी अट रद्द होण्यात आहे. तिसऱ्या अनुसूचीत या जमातीचा समाविष्ट होण्यात आहे. तांडा तिथे ग्रंथालय आणि वाचनालय, वसंतराव नाईक महामंडळाला निधी उपलब्ध करून देणे, पदोन्नतीतील आरक्षण, बोगस घुसखोरी, जातिनिहाय जनगणना, एसआयटी, तांडा सुधार योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना, तांड्यांना महसुलीचा दर्जा प्राप्त करून देणे; ह्या आणि अशा अनेक मागण्यांचा पाठपुरावा मागील सत्तर-पंच्याहत्तर वर्षांपासून बंजारा समाजातील संघटना करीत आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यात बंजारा समाजाचे हित आहे की मनुवादी सत्ताधाऱ्यांच्या कृपेने नगाराभवन उभारण्यात आहे?, मनुवादी सत्तास्वामींच्या आर्थिक सहकार्याने नगाराभवनची उभारणी झाली तर त्याचे बंजारा समाजावर कोणते दूरगामी परिणाम होतील?, सत्ताधारी लोकांनी इतर असंख्य ज्वलंत मागण्यांकडे दुर्लक्ष करून नगाराभवनलाच त्यांनी का निधी द्यावा ?, त्यामागे त्यांचे कोणते हेतू असावेत ?, सत्ताजीवी लोक साधनवंचित लोकसमूहांच्या धार्मिक भावनांना का गोंजारत सुटले आहेत? या प्रश्नांची चिकित्सा करणारी विवेकदृष्टीच या नेत्यांकडे नाही. अशा विवेकशून्यतेमुळे स्वतःच्या स्वार्थापलीकडे या नेत्यांना आजवर काहीच सुचले नाही. या स्वार्थी वृत्तीनेच त्यांना मनुवादाचे मांडलिकत्व पत्करण्यास भाग पाडले आहे. मनुवादाचे अंकित असलेले हे नेते तांड्याच्या विज्ञानवादी धाटीला मनुवादी सत्तेच्या धर्मांध छावणीत समरस करीत आहेत. स्वतःचा सत्तास्वार्थ साधण्यासाठी आणि मनुवादी सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी हे सत्तांध नेते तांड्याच्या श्रद्धास्थानाची मस्करीच करीत आहेत. बंजारा जमातीचे भावनिक अपहरण करून तांड्यांना विवेकहीन करणारेच हे प्रकार आहेत. ‘एक दन समाजेसारू नंगारा घोरावा’, ‘व्हेगो नंगारा, चालो पोहरा’, ‘एक दन सेवालाल बापू सारू’ अशी घोषवाक्ये प्रसारित करून लोकांना भावनिक साद घालण्याचा सपाटा आज सुरू आहे. लोकांची गर्दी जमविणे आणि आपली प्रतिमा नव्याने उजळ करून सत्तेत जाण्याचा मार्ग मोकळा करणे या हेतूने पोहरागड येथे नगाराभवनची उभारणी केली गेली हे उघडच आहे.
खरेतर ‘एक दन समाजेसारू नंगारा घोरावा’ किंवा ‘एक दन सेवालाल बापू सारू’ ही घोषवाक्ये फसवीच आहेत. एक दिवस समाजासाठी किंवा एक दिवस सेवालाल बापूसाठी ही तांड्याची दिशाभूल करणारी घोषवाक्ये आहेत. ‘एक दिवस’ या शब्दांमधील भावार्थ समजून घेण्यासारखा आहे. पण ज्या कारणांसाठी गर्दी केली जात आहे त्या कारणांचे लक्ष्यार्थ मात्र फारच गंभीर आहेत. त्यामुळे समाजाने अंतर्मुख होण्याची गरज आहे. ‘एक दिवस’ या शब्दांचे अंतर्मन समाजाने जाणले पाहिजे. एक दिवस दिल्याने नेत्यांचे प्रश्न कदाचित सुटू शकतील. त्यांच्या बाजूने लोकमत वळविण्यासाठी एक दिवस सेवालाल महाराजांचे नाव घेणे पुरेसेही ठरू शकेल. परंतु हजारो वर्षांपासून जीवघेण्या समस्यांच्या दलदलित अडकून पडलेला बंजारा समाजाचा गाडा एका दिवसाच्या प्रयत्नाने बाहेर पडू शकणार नाही. एक दिवस मनुवाद रुजविण्यासाठी पुरेसा आहे. एकाच दिवसात प्रबोधनाच्या नगाऱ्याला अंधश्रद्धेचा ढिगारा करता येतो. एकाच दिवसात प्रबोधनाच्या नगाऱ्यातून मनुवादाचा गजर ऐकता येतो. एका दिवसात केवळच विघातकतेची प्राणप्रतिष्ठा करता येते, विधायकतेची नाही. एक दिवस विघातकतेसाठी पुरेसा असतो. परंतु समाजविघातक गोष्टींचे निर्मूलन करण्यासाठी इथली क्रांतिपरंपरा हजारो वर्षांपासून नेटाने संघर्ष करीत आलेली आहे. एकाच दिवसात त्या संघर्षाची मोडतोड करता येते. एकाच दिवसाच्या प्रयत्नाने नगाऱ्याच्या प्रबोधनकारी धूनमधून मनुवाद्यांची स्तोत्रे ऐकता येतात. नगाऱ्यामधून परिवर्तनाचे पडघम ऐकायचे की मनुवादाची सनई ऐकायची याचा बंजारा जमातीने अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची आज गरज आहे..!
– डॉ. प्रकाश राठोड,
नागपूर