स्वत:ची स्वतंत्र पाऊलवाट निर्माण करणारा बालसाहित्यिक- विवेक उगलमुगले
एवढ्यात भरपूर बालसाहित्य वाचून काढलं. बालकुमारांसाठी लिहिणं ही सोपी गोष्ट आहे; असं जे काही आपण समजत होतो तर ते बिलकूल खरं नाही. हेही प्रकर्षानं जाणवले की बरेचसे बालसाहित्यिक एकसारखेच लिहित आहेत. कवितेखालचे कवीचे नाव फक्त वेगळे आहे. कविता मात्र त्याच त्याच आहे. या भाऊगर्दीत अचानक काही बालकविता माझ्याहाती लागल्या की आपल्याला ज्या बालकवितेची भूक लागली होती. ती बालकविता हीच! असं ठामपणे म्हणायला कारणीभूत ठरली ती कवी उगलमुगले यांची बालकविता. कवी विवेक उगलमगले यांचे एकदम चार कविता संग्रह वेगवेगळ्या काळात आलेले. ‘दाट सायीचे गाव’ आणि ‘हॅपी होम’ हे २००६ सालात प्रकाशित झालेले. ’रोजनिशी एका चिमुरडीची’ हा २००८ सालात आलेला, आणि महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण बाल वाड्मय पुरस्कार प्राप्त ‘ओन्ली फॉर चिल्ड्रन’ हा २०२१ सालात आलेला आहे. सलग सोळा वर्ष बालकुमार साहित्याची निर्मिती कवी विवेक उगलमुगले यांनी केलेली आहे. ही कविता बालकुमारांवर संस्कार करता करता त्यांची जीवनाविषयीची समज वाढविणारी आहे. त्याच्या ज्ञानात भर घालणारी आहे. अगदी पहिला बालकविता संग्रह ‘हॅपी होम’ जर पाहिला तर त्यामध्ये जवळजवळ तेवीस कविता आहेत. त्यातली एकच उदाहरणादाखल समोर ठेवतो-
आजी,
तू सांगितलेली
स्वातंत्र्याची संपूर्ण गोष्ट
मला खूप म्हणजे खूप आवडली हं
हे बघ अंगावर
कसे रोमांच उभे राहिले ते..
अन डोळ्यात अश्रूही!
आजे
मग आपल्या पिंजऱ्यातला
पोपट तेवढा सोडून दे ना ग..आत्ताच
म्हणजे त्यालाही हवंच असेल ना स्वातंत्र्य?
तुझ्या गोष्टीसारखं
हा संपूर्ण कवितासंग्रहच अशा सकस विचारांच्या कवितांनी भरला आहे. आणि एक विशेष पुन्हा असा आहे की मुक्तछंदात हा अनुभव कवीला मांडावसा वाटणं हाच प्रयोग मला वाटतो आहे. मुलांची समज खूप पुढे गेलीय त्या मुलांच्या भावविश्वाला कवी विवेक उगलमुगले बरोबर आपल्या शब्दांत पकडलं आहे. नव्हे मुलांची समज वाढलीय. याची बरोबर नोंद त्यांनी घेतलीय. ‘दाट सायीचे गाव’ या संग्रहातील कविता छंदात आहे. इथेही उगलमुगले यांच्यातील कवी रूढ बालकवितेपेक्षा पुन्हा काही नवं देऊन जातो. जे फार मोलाचं आहे. ही कविता बघा
जंगलातलं माकड
मोठ्या शहरात आलं
गर्दी गोंधळ पाहून
खूपच घाबरून गेलं
भरधाव डांबरी रस्ते
नि मुर्दाड मने
कडी-कुलपात बंद
उंच सिमेंटची वने
आजपर्यंत ‘माकड’ मला जवळ जवळ सर्वच बालकवितांतून भेटलं. विंदा करंदीकरांनी त्यास दवाखाना टाकून दिला तो अजूनही बऱ्याच कवितांतून चालूच आहे. म्हणूनच विवेक उगलमुगले वेगळे ठरतात. त्यांच्यावर जराही प्रभाव जाणवत नाही.
‘रोजनिशी: एका चिमुरडीची’ हाही एक सर्वांग सुंदर बालकविता संग्रह आहे. अगदी चार ओळीची कविता पण आशय मात्र भला मोठा
ए आजी
सांग ना ग गोष्ट
आणि मरूदे त्यातला
राक्षस दुष्ट
किंवा
पाटीवर काढलेल्या चिमण्या
चक्क अंगणात आल्या
दाणे टिपून भुर्रकन
बघा उडूनही गेल्या
या कवीने अजूनही आपल्यातलं लहान मूल जपून ठेवलंय. ते जपून ठेवल्यामुळेच तो त्याचे विभ्रम त्यांचं मन समजून घेऊ शकला. शिवाय त्याची म्हणून भूमिका आहे. जी मला फार महत्वाची वाटते. आयत्या मळलेल्या गुळगुळीत किंवा निसरड्या रस्त्यांपेक्षा वेगळी, स्वत:ची अशी पाऊलवाट मुलांनी आवर्जून चोखाळावी! त्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करणं, प्रेरणा-प्रोत्साहन देणं! हा या कविता लेखनाचा माझा उद्देश आहे. अशी ठोस भूमिका ज्या कवीची असेल तो बालसाहित्याची स्वत:ची स्वतंत्र पाऊलवाट का निर्माण करणार नाही!
कवी विवेक उगलमुगले यांच्यातील बालकवीने आपली स्वतंत्र पाऊलवाट २००६ सालातच निर्माण केली आहे. या पाऊलवाटेवर शिक्कामोर्तब झालं ते २०२२ सालात शासनाच्या पुरस्काराच्या रूपाने. काहीही असो खूप चांगली बालकविता वाचण्याचं समाधान या बालकवितेनं मला दिलं. नव्हे, माझीही समज वाढण्यास ही बालकविता कारणीभूत ठरली. एवढं सांगण्यासाठीच हा लेखन प्रपंच.
प्रा. ऐश्वर्य पाटेकर
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक-कवी