मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या !
* ऐन हंगामात वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना ‘झटके’ !
* शासनाच्या उदासीन धोरणामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी संकटात !
गौरव प्रकाशन
मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : दुष्काळग्रस्त ड्राय झोन असलेल्या मोर्शी तालुक्यामध्ये यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात मान्सून बरसला नसल्यामुळे व परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात मुबलक भाव मिळत नसल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला.
अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत एकदाचा खरीप हंगाम संपला, आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बी पिकांचे उत्पन्न चांगले व्हावे यासाठी रात्री बेरात्री शेतकरी धडपड करीत आहे. कारखान्यांना ज्याप्रमाणे वीज वितरण कंपनी चोविस तास वीज पुरवठा करते त्याप्रमाणे जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना सलग वीज पुरवठा करण्यात यावा. ज्यांना चोवीस तास वीज मिळते त्यांच्या प्रमाणेच शेतकऱ्यांनाही जीव आहे त्यालाही रात्री बेरात्री शेतात काम करताना भीती वाटते. मात्र याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. पिकांच्या हंगामात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा मंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटिल, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ऐन ओलिताच्या हंगामात भारनियमनातील बदल, भारनियमनाच्या वेळा वाढविणे, त्याचबरोबर कृषिपंपासह घरगुती विजेची वाढीव बिले, यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. वीजबिल भरले नाही तर वीज तोडली जाईल, त्यामुळे पाण्याअभावी पिके डोळ्यासमोर जळण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांजवळ पैसे असो किंवा नसो तरीही वीजबिल भरण्याशिवाय पर्याय नाही. निवडणुकीच्या काळात जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना २४ तास वीज देऊ असे आश्वासन देणारे सरकार सत्तेत आले. पण शेतकऱ्यांना २४ तास वीज देणे सोडाच उलट भारनियमनाच्या आहे त्या कालवधीत वाढ केली जात आहे. शेतकरी कर्जात अडकले असतानाही वाढीव वीजबिल देऊन शेतकऱ्यांना अजून अडचणीत आणले जात आहे. वीजबिलात सातत्याने वेगवेगळे आकार लावून बिले वाढवली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांना कशाची बिले वाढवली ते समजतही नाही. मात्र वीज खंडीत होऊ नये या भीतीने चुकीची येणारी बिले भरावी लागत आहेत. वर्षातून एक ते दोन वेळा अनामत रक्कमेची बिले येत आहेत.
शेतकऱ्यांची वीज खंडीत केली जाऊ नये यासाठी पैसे भरल्याशिवाय शेतकऱ्यांपुढे गत्यंतर नाही. वीजबिलात येणार स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क, इतर आकार यासारख्या बाबी वाढवत बिले कशी वाढवून देता येतील ऐवढेच वीज वितरण कंपनी बघत असते. त्याकडे सरकार सोयीने कानाडोळा करत आहे. आजही कृषिपंपाचे मीटर ‘शोपीस’ ठरत आहेत. कधीही या मीटरचे रीडिंग घेतले जात नाही. यामुळे विजेचा कमी वापर असला तरी शेतकऱ्यांना वीज बिल मात्र सरासरी येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
कृषीपंपांना फक्त आठ तास वीज मिळते !
कृषीपंपांना फक्त आठ तास वीज मिळते, त्यातही तांत्रिक घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना जास्त वीज वापरता येत नसल्याने मीटर रीडिंग घेतले जात नसावे असे वाटत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा हा सध्याचा गंभीर प्रश्न आहे. कमी वीजदाबात कृषी पंप चालविण्यामुळे पंप जळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून झालेल्या नुकसानीची कधीही भरपाई दिली जात नाही. शासनाला शेतकऱ्यांना खरंच सुखी करायचं असेल तर वीज हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे.
– रुपेश वाळके
उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.