लहान मुलांच्या भावविश्वात घेऊन जाणारी कलाकृती – “चांदणफुले”
नाशिकच्या कवयित्री मा. आरती डिंगोरे यांची बालकाव्य “चांदणफुले” ही कलाकृती नुकतीच वाचनात आली. या बालकाव्यसंग्रहाचे रविवार दि.१६ जून २०२४ रोजी नाशिकसारख्या पुण्यनगरीत प्रकाशन होत आहे याचा नाशिककरांना आनंद होत आहे. लहानमुलांच्या भावविश्वात घेऊन जाणारी ही कलाकृती . या कलाकृतीचे अत्यंत साधे मुखपृष्ठ पाहून लहानपण आठवले. शाळेत असतांना अशाच प्रकारचे चित्र काढायचो.. या चित्राकडे पाहून कवी भा.रा. तांबे यांची “या बालांनो यारे या, लवकर भरभर सारे या. मजा करा रे, मजा करा ! आज दिवस तुमचा समजा”. ही कविता आठवली. अतिशय चालबद्ध कविता शिकवत असतांना शिक्षक देखील लहान होत असे..
“चांदणफुले” या मुखपृष्ठावरचे खूप छान अर्थ मला दिसून आले.. या मुखपृष्ठात वर आभाळात जणू विविध रंगाच्या सात चांदण्या लुकलुक करत असल्याचे दाखवले आहे. तसेच काही विविध रंगी अकरा टिंब दाखवले आहे. त्याखाली पाच अक्षरी *चांदणफुले* शीर्षक आणि “आरती डिंगोरे” कवयित्रीचे नाव असून त्याखाली तीन लहान मुले हातात हात घालून उभे आहेत, दोन्ही बाजूने दोन फुले, त्या फुलाला दहा फुलांच्या पाकळ्या आणि ही मुले गवतावर खेळत असल्याचे दाखवले आहे. या चित्रातून काय संदेश दिला असावा हे पाहणे आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या कलाकृतीचे मुखपृष्ठ असे सामुहिक स्तरावर येते, तेव्हा त्याचा अभ्यास करणे गरजेचे असते. ज्या कवी, लेखकाने आपल्या कलाकृतीचे मुखपृष्ठ असे सजवलेले असते त्या चित्रामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. प्रत्येक वाचक आपापल्या लेखनीने कलाकृतीचे भरभरून कौतुक करतो, गुणदोष सांगतो, पण त्या कलाकृतीला ज्या मुखपृष्ठामुळे वाचक मिळाला त्या मुखपृष्ठाचे अर्थ देखील सांगणे गरजेचे आहे. आज आपण या मुखपृष्ठावर चर्चा करणार आहोत.
कवयित्री आरती डिंगोरे यांचा “चांदणफुले” हा बालकाव्यसंग्रह लहान मुलांसाठी प्रकाशित होत आहे, लहान मुलांचे आकर्षण म्हणून मुखपृष्ठावर लहान लहान मुले घेतली आहेत. चांदोबा चांदोबा भागलास का? निमोनीच्या झाडामागे लपलास का? असे अंगाई गीत म्हणून आई लहान मुलांना शांत करते हे आभाळातील चंद्र तारकांचे घनिष्ठ नाते म्हणूनच कधी आभाळातील चांदण्या, तर कधी चंद्र बाळाला दाखवून करमणूक करून आई बाळाचे लक्ष वेधून घेते हाच संदर्भ जोडून या मुखपृष्ठावर चांदण्या दाखवल्या आहेत की काय असे वाटते, तसेच *चांदणफुले* या शब्दात पाच अक्षरे दिले आहेत ही पाच अक्षरे आणि सात चांदण्या असे एकूण बारा संख्या जुळते यावरून माझ्या निरीक्षणानुसार असे दिसून येते की – लहानपणापासून आम्ही स्वतः शाळेत असतांना बाराखडी शिकलो, आजही प्राथमिक शाळेतून बाराखडी शिकवली जाते, ही बाराखडी म्हणजे शिक्षणाचा मूळ पाया आहे. अ, आ, इ, ई … पासून तर शेवट ओ, औ, अं अ: इथपर्यंत बाराखडीतील स्वर मुलांना लिहिता आणि वाचता आलीच पाहिजे. जर हा पायाच कच्चा असेल तर पुढे मुलाला लिहिता वाचता येत नाही आणि मग अशी मुले शाळेच्या बाहेर अडाणी राहतात. म्हणून या बाराखडीतल्या बारा स्वरासाठी या सात चांदण्यां आणि चांदणफुले शीर्षकातील पाच अक्षरे अशा स्वरुपात दाखवले आहे असे मला वाटते आणि पूर्वीपासून हे स्वर बाराच आहेत…आत्ता नवीन अभ्यासक्रमानुसार वाढले आहे परंतु तुम्ही आम्ही बाराखडी शिकूनच मोठे झालो आहोत आणि आजही त्याला बाराखडीच संबोधले जाते, त्यामुळे या मुखपृष्ठावर सात (७) विविध रंगाच्या चांदण्या आणि *चांदणफुले* या शब्दातील पाच अक्षरे असे एकूण बारा संदर्भ दाखवले आहेत असे मला वाटते.
“चांदणफुले” या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर चांदण्यांच्यामध्ये विविध रंगी अकरा (११) बिंदू , तीन (३) मुले तसेच मुलांच्या दोन्ही बाजूने दोन (२) फुले आणि फुलांच्या (५+५) पाच+पाच पाकळ्या दाखवल्या आहेत. या दहा पाकळ्या + अकरा बिंदू + तीन मुले + दोन फुले असे मिळून एकूण २६ (सव्वीस) संदर्भ मुखपृष्ठावर बिंबवले आहेत यावरून असा अर्थ अभिप्रेत होतो की, हल्ली प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत दाखल करीत आहेत. केजी, जुनियर के.जी पासून आपल्या पाल्यांना इंग्रजी अस्खलित लिहिता यावे म्हणून पालक मुलांना इंग्रजीतून शिक्षण देतांना दिसून येतात. हे इंग्रजी प्राथमिक शिक्षण देतांना इंग्रजी वर्णमालेतील A B C D ते W X Y Z पर्यंत असे शब्द शिकवले जातात हेच एकूण २६ (सव्वीस) संदर्भ या मुखपृष्ठात वरीलप्रमाणे दाखवले असल्याचे मला भासले आहे. माझा असाही अंदाज आहे की मुखपृष्ठ निर्मितीकाराने म्हणजेच कवयित्री यांच्या पारिवारिक सदस्याने आपल्या वयाचा पुरावा म्हणून २६ (सव्वीस) ही संख्या अधोरेखित केली असावी इतका गहन अर्थ मला यातून जाणवला आहे.
“चांदणफुले” या मुखपृष्ठावर दोन मुली आणि एक मुलगा हातात हात घेत हसतमुखाने दाखवले आहेत. याचा अर्थ असा की, कवयित्रीने सर्व शिक्षा अभियानांतर्गत मुलींना शिक्षण मिळावे, मुलींच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना मुखपृष्ठावर दाखवले आहे. हल्ली मुली शिक्षणात मुलांच्या मागे न राहता सोबत शिक्षण घेत आहेत किंबहुना मुलांच्या पुढे निघून गेल्या आहेत. “लेक वाचवा, लेक शिकवा” हा मूलमंत्र जपून मुलींना प्रत्येक क्षेत्रात प्राधान्य मिळावे म्हणून मुखपृष्ठावर मुलींना प्राधान्याने घेतले असावे असा गर्भित अर्थ मला यातून जाणवला.
“चांदणफुले” या मुखपृष्ठावर मुले गवतावर बागडताना दिसत आहे, गवतावरील वाऱ्याने डुलणारी फुले पाहून कवयित्री इंदिरा संत यांची गवतफुला कविता आठवली “रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा” ही कविता मुलांच्या भावविश्वात रमणारी असून “चांदणफुले” मुखपृष्ठाला आणि शीर्षकाला साजेसी वाटते.
“चांदणफुले” या मुखपृष्ठावर शीर्षकाच्याखाली “आरती डिंगोरे” या दोन शब्दातील सहा अक्षरे लाटांप्रमाणे वरखाली हेलकावे घेतांना दाखवली आहेत, याचा अर्थ असा की, कवयित्री स्वच्छंदी मनाच्या आहेत, लहानमुलांसोबत त्यांच्यानुरूप होऊन त्यांच्यासोबत खेळतांना हाताचे हेलकावे घेऊन मुलांच्या आनंदात मिसळून जातात, त्यांच्या सोबत तल्लीन होऊन जातात असा अर्थ मला जाणवला आहे.
“चांदणफुले” या बाल काव्यसंग्रहात एकूण ४५ कविता असून सर्व कविता बालकांना आवडतील अशाच आहेत. सुरुवातीलाच ‘अभिनय गीत’ यातून “झाडू बाई झाडू, घर झाडू, देईल आई मग हातात लाडू” या पंक्तीतून स्वच्छतेचा संदेश दिला असून घरात आईला कामात मदत करावी असाही संदेश दिला आहे. काम या कवितेतून “लगबग लगबग अशी चालते, वारुळाकडे ती मुंगी जाते” या पंक्तीतील मुंगी हे अविरत कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीचे प्रतीकात्मक वर्णन केलेले दिसून येते. या संग्रहातील पाऊस, काम, आई गं आई, पांढरा गोल, चांदणफुले, चिंगी, हार, मोबाईल या कविता मुलांना विशेष आकर्षित करणाऱ्या वाटल्या.
रविवार दि. १६ जून २०२४ रोजी प्रकाशित होत असलेल्या “चांदणफुले” कलाकृतीचे प्रकाशक खुद्द कवयित्री आरती डिंगोरे यांचे सुपुत्र पियुष डिंगोरे असून या कलाकृतीच्या मुखपृष्ठाला नुपूर रहाणे आणि पियुष डिंगोरे यांनी आपल्या कुंचल्याने सजवले आहे तर आतील रेखाचित्र सचिन पगारे यांनी रेखाटली आहेत. या कलाकृतीला “साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी मा. एकनाथजी आव्हाड” यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत हे या कलाकृतीचे भाग्य म्हणावे लागेल. अशा अर्थपूर्ण कलाकृतीचे वाचक स्वागत करतील आणि लहान मुलांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी ही कलाकृती नक्कीच यशस्वी होईल असे वाटते. कवयित्री आरती डिंगोरे यांना कलाकृती प्रकाशनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा..!
मुखपृष्ठ परीक्षक –
इ
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कवयित्रीचे नाव : आरती डिंगोरे
संपर्क- 94046 87729
साहित्य कलाकृती : चांदणफुले (बाल कविता संग्रह)
प्रकाशक – पियुष डिंगोरे
मुखपृष्ठचित्रकार – पियुष डिंगोरे / नुपूर रहाणे
रेखाचित्र : सचिन प्रभाकर पगारे
किंमत – रु.१००