बुलबुलवाले युसुफभाई…
शहरात गतकाळात एक बँड ग्रुप चांगलाच फेमस होता. काळाच्या ओघात मागील दोन दशकांत लहान मोठे बँड मोठ्या संख्येत बंद पडले. यात कामाला असणाऱ्या कलाकारांपैकी अनेकांनी आपला व्यवसाय बदलला. त्यांना चरितार्थाची सोय जमली. मात्र ज्यांची उमर या पेशात ढळून गेली होती त्यांना परिवर्तन करण्याची संधी मिळाली नाही. मिळेल ते काम करत राहणे त्यांच्या नशिबी आलेलं. युसुफभाई त्यातलेच एक. ते अगदी उत्तमरित्या बुलबुल / बँजो वाजवत. काही वर्षापूर्वी त्यांचा बँड बंद पडला असला तरी त्यांची कला जिवंत होती. कुणीही बोलवलं तरी ते हजर होत! पैसे मिळाले नाही तरी चालेल मात्र आपला हात हलता राहिला पाहिजे ही त्या भल्या माणसाची विचारसरणी!
कालांतराने ते सद्यकालिन संगीताच्या मागे पडत गेले. त्यांना ज्या ट्यून्स यायच्या त्याची फर्माईश कुणीच करत नसे. नव्या पिढीच्या झिंगंत नाचणाऱ्या पोरांना जी गाणी आवडत ती त्यांना बँजोवर अवगत नव्हती. शरीर साथ देत नव्हते, बोटे शिथिल झाली होती; ती विजेची चपळाई राहिली नव्हती.
दैन्य पाचवीला पूजलेले. बायको अकाली आजारपणात गेली. चारही पोरं कशीबशी मोठी झाली मात्र त्यांनी बापाला सांभाळले नाही. आपापल्या तोडक्या मोडक्या संसारात जे ते दंग झाले. युसूफभाईंना त्याच्या मित्रांनी सांभाळले. त्यातले काही मित्रही मरण पावले. साठी पार केलेले युसुफभाई भकास नजरेने नुक्कडच्या टपरीपाशी दिसू लागले. त्यांची खाण्यापिण्याची आबाळ झाली. कुणावर आपला भार नको म्हणत वृद्धाश्रमात जायला नकार देऊन कुठे काही काम मिळाले तर त्यावर गुजराण करून जगता येईल म्हणून गुलबर्ग्याला त्यांच्या गावाकडं नातलगाकडे काही काळ राहून आले. हा बदल त्यांना मानवला नाही.
परमुलखात जाऊन म्हातारा वंगाळ होऊन परतला. अंगाची कातडी ढिली होऊन लोंबत होती. नजर कमजोर झाली होती. अंगात ताकद अशी काही उरली नव्हती. मरण येत नाही म्हणून ते जगत होते मात्र ते जगणं मरणाहून बदतर होतं. आज बऱ्याच दिवसांनी ते हैदराबाद नाक्यापाशी दिसले. जवळ जाऊन आवाज दिला तर त्यांनी मागे वळून पाहिले. त्यांना बरोबर ओळखल्याचा कोण आनंद झाला होता.
पूर्वी फावला वेळ बराच वेळ होता तेव्हा अशा लोकांचे सानिध्य लाभले होते. जेम्स ऑर्केस्ट्रा नावाचा एक स्थानिक म्युझिक ग्रुप होता त्यातही युसूफभाई होते. त्यामुळे ते पक्के लक्षात राहिलेले. उंचापुरा देह आणि करारी चेहरा आता लोप पावला असला तरी खर्जातल्या आवाजात ती चीज मौजूद होती.
या खेपेस त्यांच्या अंगावरचे कपडे जरा बरे होते. रोडलगतच्या कँटीनमध्ये गप्पा मारताना जुन्या आठवणींनी ते हळवे झाले. आवाज कापरा झाला. डोळे भरून आले. अंतःकरण गदगदून आलं. त्यांची देहबोली जराशी सकारात्मक वाटत होती. रहिमतपूरला एका आश्रमात राहतो हे सांगताना त्यांच्या खिन्न चेहऱ्यावर कमालीचे अपराध भाव होते. स्वाभिमान मोडून पडला की माणूस निम्मी लढाई हरतो!
‘काही पैसे देऊ का’ म्हटल्यावर म्हातारा अगदी कावराबावरा झाला, त्यांच्या डोळ्यातलं आभाळ किरमिजी झालं. त्यांच्या सायमाखल्या हातांनी माझे हात गच्च धरले. अगदी उष्म स्पर्श होता तो!
नंतर बराच वेळ ते काहीबाही सांगत होते. माझं लक्ष त्यांच्या सांगण्याकडे नव्हतंच! त्यांचा गतकाळ नि मधला हलाखीचा काळ आठवून पोटात कालवत होतं. त्यांच्या भेगाळलेल्या पायातल्या स्लीपर्स घासून घासून गुळगुळीत झाल्या होत्या. काही क्षणासाठी मला वडील आठवले!
बराच वेळ शांत बसून राहिल्यानंतर मी घराकडे निघालो. युसुफभाई दोन दिवसांसाठी त्यांच्या नातवाकडे जाणार होते. खूप काळापासून त्यांची एकच इच्छा राहिली होती जी दोनच दिवसांपूर्वी पूर्ण झाली होती. त्यांच्या पंतवंडाच्या जश्न शादीमध्ये त्यांना बँजो वाजवायचा होता! त्यांचं आवडतं ‘मन डोले मेरा तन डोले‘ हे त्यांनी वाजवलं तेव्हा रस्त्याच्या दुतर्फ़ा असणारे बघेदेखील मंत्रमुग्ध झाले होते.
परवा दिवशी ते आश्रमात परतणार होते. त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं की त्यांची नजर पैलतीराच्या दारावर तोरण बांधत होती. त्यांना स्वर्गस्था बेगमकडे जायचे होते. जगण्याची उर्मी लोप पावलेल्या माणसाला श्वासाचे निमित्तही नुरले की तो अजूनच हतबल होतो! हा म्हातारा असाच एखाद्या दिवशी मरण पावला तर त्याची अंतिम इच्छा काय असेल या प्रश्नाने मी घायाळ झालो!
माझा मोबाइल नंबर त्यांना दिलाय, जेव्हाही त्यांची मर्जी होईल तेव्हा बुलबुल वाजवू वाटल्यास ते मला ऐकवणार आहेत! त्या जर्जर देहास आवडतं वाद्य वाजवताना अखेर हवी होती! आयुष्यभर खस्ता खाऊनही आपल्या जित्या जागत्या जिवांचं प्रेम लाभलं नाही तर अशी व्यक्ती आवडत्या निर्जीव वस्तूवर जीवापाड प्रेम करते!
मी दुपारीच घरी परतलोय मात्र त्या थकलेल्या मखमली बोटांचा स्पर्श अजूनही बोटांवर नांदतो आहे. कीबोर्डमधून तो तुमच्यापर्यंत पोहोचला तर बोटांआधी डोळ्यांना आकळेल! काही पिकली पानं काळजात काहूर माजवून जातात, सुखातला जीव दुःखात लोटतात! आपलं घर डेरेदार झाडाच्या सावलीत असलं की आपण त्यात सुख मानून राहत असतो मात्र मध्येच हे असे जीवाची सतार छेडणारे कुणी आले की त्या सावलीच्या चटक्यांनी अंगांग पोळू लागतं!
– समीर गायकवाड