बफेलो पंगत
काय सांगू नामा तुले
शयरातली गंमत
मोठ्याय संग जेवलो
गड्या बफेलो पंगत !!
नवरदेवाचं घोडं
नीरा नाचतच बसलं
साळेदहाचं लगीन
दोन वाजता लागलं !!
वऱ्हाडाच्या पोटात
हळे करत कावकाव
भर गर्मीत सुटली
साऱ्यायले खावखाव !!
सावधान सावधान
जसा भटबुवा बोल्ला
साऱ्या वऱ्हाडाण केला
भटारखान्यावर हल्ला !!
भटारखाण्यात होती
गड्या बफेलो पंगत
ताट घेऊन पयत
लोकं एकमेकासंगत !!
अधाशा सारखे घेत
ताट भरून भरून
गुलाबजाम गेलेत
राज्या लगेच सरून !!
पनीर मसाला भाजी
पनीर खात येचून
भांड्यामंदी रस्सा रस्सा
दिसत होता साचून !!
हे जेऊ का ते खाऊ
ताटात सारं भरत
उचल्या वानी पाह्यत
बकरी वानी चरत !!
ढकलून अन्न आता
जात नव्हतं पोटात
धायधाय रडे माय
अन्नपूर्णा ताटात !!
दो डोळ्यांनी पाहावेना
उष्टावळीचा ढीगारा
शहरी शायन्यापरी
असे भिकारी रे बरा !!
पोटभर घासासाठी
बाप राबतो रानात
नको वाया तू घालवू
उष्ट अन्न तू ताटात !!
तेवढंच अन्न घ्यावं
गड्या आपल्या ताटात
जेवढं बसेल तुमच्या
त्या टिचभर पोटात !!
अशी बफेलो पंगत
असते अशी रंगत
चांगली आहे आपली
गावं खेड्यातली पंगत !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि )
अकोला 9923488556