भाई केशवरावजी धोंडगे
मी नुकतच मनोविकास माध्यमिक विद्यालय कंधार येथे रुजू झालो होतो.ते वर्ष होतं १९८४.मला फारशा ओळखी झालेल्या नव्हत्या;पण शाळेतील मुलं मात्र माझ्या खोलीवर येत.शाळा सुटल्यानंतर बराच वेळ माझ्याबरोबर राहात.खोलीवर मी एकटाच.माझी खोली म्हणजे अंधारी कोठडी.त्याला एकही खिडकी नव्हती.त्यात फरशी केलेली नव्हती.मी घरुन दोन जुन्या मळक्या गोंधड्या घेवून आलो होतो.खोली पांढऱ्या मातीने सारवलेली.मळकट असलेली गोधडी पुन्हा मळकट झालेली असायची.धूतलं तरी मळकटच दिसायची.
खोलीवर मी एकटाच.लग्न झालेलं नव्हतं.मनोविकास शाळेतील इयता आठवी, नववी,दहावीचे विद्यार्थी सतत माझ्यासोबत असायचे.मी कंधारला आल्यावर भाई केशवरावजी धोंडगे यांना भेटायचं ठरवलं.भेटण्यासाठी काहीतरी निमित्य असावं लागतं.खरं तर बालपणापासूनच धोंडगेसाहेब माझे आवडते व्यक्ति,आवडते नेते होते.मी आश्रमशाळेत शिकत असताना ते सप्ताह निमित्याने आडमाळवाडीला येत.तेथे ते भाषण करत.त्यांचं भाषणात नेहमीच हास्यांचे,विनोदाचे फवारे असत.विरोधकांना चिमटे काढत.ते नेहमीच विरोधकांच्या विचारांची चिरफाड करत.विरोधक त्यांच्या विचारासमोर हैरण होत असत.सडेतोड बाण्याचे भाई कोणाचाही मुलाहीजा न बाळगता बोलत असत.गरीबांच्या प्रश्नसाठी,समस्यासाठी ते नेहमी संघर्ष करत राहीले.ते मराठवाडयाची मुलूख मैदानी तोफ होते.मराठवाडयाच्या विकासासाठी सतत प्रश्न ते विधानसभेत व विधानसभेबाहेर मांडत राहीले.गोरगरीबाच्या शिक्षणासाठी गाव, वाडी,तांडयात त्यांनी शिक्षणाची गंगा आणली.या बाबतीत कंधार लोहा तालुका त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होवू शकत नाही.
कंधारला येवून पाच सहा महिने झाले असतील.मी माझ्या वडील भावाची काही समस्या होत्या ते भाईसाहेबांना सांगावयाचे म्हणून त्यांच्यासोबत गेलो.साहेब तेव्हा बहादरपुऱ्यात जुन्या घरात राहत होते.मुख्य दाराच्यावर ‘जयक्रांती ‘असं लिहीलेलं होतं.परवानगी घेवून त्यांच्याकडे गेलो.गेल्याबरोबर भाईनी आम्हा दोघांही भावाच्या हाताला सुंगधीत अतर लावुन हाताचे चूंबन घेतले.त्यांच्यासमोर आम्ही बसलोत. भावानी बोलण्यास सुरवात केली.त्यांची समस्या व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला.भाईनी समस्या त्याचे प्रश्न ऐकून घेवून माझ्याकडे कटाक्ष टाकले व म्हणाले, ” शुटबूट फुट फॅन्ट घालून आलास शिकलेला दिसतोस. काय केलास भावासाठी.भावावर अन्याय होतो हे तुला कळत नाही का? ” मी काहीही बोललो नाही.भाईही थोडावेळ शांत राहीले.माझ्या दादाकडे पहात म्हणाले उद्याच लावतो त्या अन्याय करणाऱ्या अधिकारऱ्याची वाट.पण,तुम्ही सुध्दा अन्याय सहन करू नका.अन्याय विरूध्द लढायला शिका.मी भाईकडे पहात होतो माझ्याकडे पहात म्हणाले केवळ इन शर्ट करुन बुट वापरून टाकटीक करत चालण्यात अर्थ नाही. शिकलेल्यांनी समाजासाठी काम करा.थोडंवेळ बसून आम्ही त्यांच्या घराबाहेर पडलो.तेथून दादा मुखेडला गेले व मी परत माझ्या खोलीवर आलो येताना भाईनी बोलल्या गोष्टी त्यांचे विचार माझ्या मनात सारखे रेंगाळत होते.ते वरून कडक बोलायचे पण आतुन प्रेमळ होते.
१९८५ विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू होती.मी आता कंधारमध्ये चांगलाच रुळलो होतो.मी नेहमीच विद्यार्थी व मित्रांच्या गराडयात वावरत होतो.भाई निवडणूकीची तयारी करत होते.निडणूक प्रचारासाठी त्यांची कंधारमध्ये छ.शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ जाहिर सभा होती.आज त्याचं भाषण होतं ते माझ्यासाठी एक पर्वणीच होती. रात्रीचे सात साडेसात वाजले असतील.खेडेगावातून लोक वाजतगाजत छत्रपतीच्या पुतळ्याजवळ जमा होत होते.तेथे कंधारच्या आसपासचे खेडूत येत होते.भाईचं जयजयकार करत होते.भाईवर त्यांचं किती अतुट,अजोड प्रेम होतं हे मी पहात होतो.त्यांच्या भावना माझ्या हृदयात मनाच्या एका कोप-यात साठवत होतो.
थोडयावेळाने भाई येथे आले.सभेसाठी आलेल्या जनतेनी घोषणांनी परिससर दानाणून सोडलं.भाई दोन्ही हात जोडत स्मितहस्य करत मंचावर बसले.त्यांच्या अगोदर एक दोघांनी भाषण दिले.मग भाई उठले.सभेतून लोक गर्जना झाली.किती प्रेम करायची कंधारची जनता ! आपल्या नेत्यावर एवढं प्रेम करणारी जनता मी दुसरीकडे कुठही पाहिलेलो नाही.भाई उठले. बोलायला सुरवात केली.ते अजानबाहू होते. हजरजबाबी होते.बोलता बोलता पाहिलवानसारखं दंड व मांडया थोपटून बोलायला लागले.माझ्या मन्याड खोऱ्यातील बहादर जनता हे वाक्य उच्चारले की जनतेनी टाळ्याचां गडगडाट केला.मग भाई वेगवेगळ्या विकास कामावर वेगवेगळ्या राजकीय बाबीवर बोलले.बोलता बोलता ते बोलले माझी ही सातवी वेळ आहे.मी आता तुम्हाला आवडतो की आवडत नाही हा प्रश्न कसं विचारू बरं ?चला यासाठी तुम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
भाईनी गोष्ट सांगण्यास सुरवात केली ऐका माझ्या मन्याड खोऱ्यातील बहादर जनतानो: एका गावात एक माणूस राहत होता.त्याच्या लग्न होवून चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले होते.त्याला सात मुले होती.एकवेळ गर्भपात झाला होता.तरी बायको नवऱ्याला नेहमी म्हणायची धनी तुमचं माझ्यावर प्रेमच नाही.नवरा गरीब होता ;पण प्रेमळ होता.बायकोवर जीवापाड प्रेम करायचा.तो म्हणाला आगं तू वेडी का खूळी.माझं तूझ्यावर प्रेम नाही तर सात मुलं कशी जन्माला आली?यावर बायको हट्ट करत म्हणाली मला माहित नाही आज मला खरं खोटं करावयाचं आहे.माझ्यावर तुमचं प्रेम आहे किंवा नाही हे पहावयाचं आहे.नवरा म्हणाला आगं घरात लेकरं आहेत. बायको म्हणाली त्यांना बाहेर पाठवा.नवऱ्याने मुलांना बाहेर जाण्यास सांगितले;पण घराबाहेर जाण्यास कोणीही तयार नव्हते.बायको सारखी तगादा लावली होती की मला सांगा माझ्यावर तुमचं प्रेम आहे की नाही.शेवटी नवऱ्याने त्याच्या एका मुलाला बोलावून दुकानातून फुटाने मागविले.मग तो मुलांना घराबाहेर घेवून आला व आंगणात फुटाने विखरून टाकला व म्हणाला प्रत्येकांनी फक्त एक एक फुटाना खायाचं,एकाच वेळी दोन फुटाने कोणी खाल्ल तर तुमच्या आईला मी मारणार.असं म्हणून तो घरात निघून गेला व आतून दार लावून घेतलं.तशी बायको म्हणाली माझ्या गळ्यावर हात ठेवून सांगा तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही.तिने नवऱ्याचं हात धरलं व स्वतःच्या गळयावर ठेवलं.तेवढयात एक बेरकी बेणं मुलगा कवाड़ाच्या फटीतून आत पाहिलं व तो जोरात ओरडला आरे !अबे ! एकावेळी दोन फुटाने कुणी खाल्लं रं.बाबा घरात आईचं गळा दाबालेत. कवाड़ाच्या फटीतून आत पाहिलं व तो जोरात ओरडला आरे !अबे ! एकावेळी दोन फुटाने कुणी खाल्लं रं.बाबा घरात आईचं गळा दाबालेत.शेवटी भाई म्हणाले मला सांगा मायबाप हो सात लेकरं झालेल्या बाईनीं जसं विचारलं तसं मी तुम्हाला विचारू का? माझं तुमच्यावर तुमचं माझ्यावर प्रेम आहे कुठेही सिद्ध करण्याची गरज नाही.
भाईच्या तशा बऱ्याच आठवणी आहेत माझ्याकडे ;पण मी ते येथे सर्व सांगणार नाही. शेवटची एक आठवण सांगतोय.मी कंधारला गट शिक्षण अधिकारी म्हणून रुजू झालो.तेथे रुजु होण्यास फारशा अडचणी नव्हत्याच कारण माझ्या नोकरीची सुरवातच कंधारमधून झाली होती. त्यामुळे कंधारच्या नेते मंडळीच्या ओळखी होत्या. माझे विद्यार्थी मित्र होते.माझ्या आजूळचं तालुका असल्यामुळे भरपूर नातलग होते.मी तेथील पदभार स्विकारत असतानाच कार्यालयातील एक बाबू पळतच माझ्याकडे आला व म्हणाला साहेब धोंडगे साहेब इंथ कार्यालयात यायलेत.मी म्हणालो मला फोन लावून दे मी बोलतो साहेबांना.मग मी साहेबांना बोललो व विनंती केली बाबा मी स्वतः आपल्याकडे दहा ते पंधरा मिनिटात पोहचतो. तुम्ही येथे येण्याचे कष्ठ घेवू नका.समोरून खणखणीत आवाज आला.मी वाट पहातोय लवकर या नाही तर मी कार्यालयात येतो.
मी कार्यालयातील एका बाबूला सोबत घेतलो व बहादरपूरा गाठलो.भाईजवळ जावून त्यांच्यासमोर आदरपूर्वक नतमस्तक झालो.नव्वदीपार केलेले भाईच्या चेह-यावर पूर्वीचीच चमक होती.चेहऱ्यावरचं तेच तेज होतं. चिरतरुण दिसत होते.हसत हसत त्यानी माझ्या हातावर सुंगधीत तेल लावलं.कडाडून मिठठी मारली.गालगुच्या घेतल्या.थोडावेळ जवळ बसवून छान गप्पा केल्या.मग शाल,हिरवंकच्च श्रीफळ देवून माझा सत्कार केला.माझ्या आवडत्या नेत्याकडून माझं सत्कार झालं हे माझ्यासाठी आनंदाचे क्षण होते.अविस्मरणीय क्षण आहेत.निघता निघता भाई मला म्हणाले हातात जोडा घेवून कारभार करायचं कोणालाही भियायचं नाही.चुकीचं काम करायचं नाही.कोणी चुकीचं काम करा म्हणून दबाव टाकत असेल तर मला सांगा मी समोरच्याला सरळ करेण.ह्या गोष्टी सांगत असताना त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरत होता.मी आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे त्यांच्यासमोर नतमस्तक होवून थांबलो होतो.
थोडयावेळाने मी त्यांचा निरोप घेवून कार्यालय गाठलो.मनात एकच विचार येत होता. नव्वदीपार केलेला माणुस तरी चेहऱ्यावरील तेज, जीवनातील एवढं हुरुप,जोम,उत्साह, टवटवीतपणा,तरतरीतणा,आवाजातीत रूबाब कसं टिकवलं असेल ?आज ते आपल्या बरोबर नाहीत.पण त्यांच्या कार्याने ते अजरामर आहेत.
राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपूरी , नांदेड -६