मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!
या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक ‘सजीवाला’ भयमुक्त जगण्याचा ‘अधिकार’आहे. असा कोणता ‘जीव’ आहे की,ज्याला जगावसं वाटत नाही..? ज्यांना भावना आहेत, सुखदुःखाच्या संवेदना आहेत, त्या सर्व जीवाला कधीच ‘मरावसं’ वाटत नाही तर अधिका अधिक जगावसं वाटतं. हे ‘जगणं- मरण’ नैसर्गिक असतं. कधी ते देहामध्ये आलेल्या सयंत्र बिघाडा मुळे ‘तग’ धरू शकत नाही. म्हणून कुणाला निर्धारित वेळेपेक्षा ‘आधी’ जावं लागतं. ही वेळ कुणाच्या आयुष्यात ‘कधी’ येईल सांगता येत नाही. कधी तर जन्म घेतानांच कुणाकुणाच्या वाट्याला आधीच जाणं येतं. तर कुणी शंभरापेक्षाही जास्त वर्ष जगतं. दगडावर आपटून सुद्धा त्याला मरण येत नाही. अशी ही देहयष्टी आणि काळाची महिमा आहे. जन्म- मरण हे ‘निसर्गदत्त’ आहे. कुणी कुणाचं ‘जगणं’ कुणी मग का म्हणून हिसकावून घ्यावं ? का कुणाच्या जगण्याला खंडित करावं? कुणाच्या जीवनामध्ये अडथळा होऊन जगावं..? आध्यात्मिकतेच्या ध्यासात भावनाआणि प्रत्यक्ष जगण्यामध्ये ‘विरोधाभास’ का सारखा सारखा जाणवतो.? काही विक्षिप्त स्वभावाची माणसं परमात्म्याला साक्षी ठेवून, त्याच्या पूजेचं, अर्चनाचं बनावटी ‘रूप’ धारण करून इतरांना छळण्याचे काम का करतात, कळत नाही.? सृष्टीचा ‘निर्माता’ कोण ? याचा अजून पर्यंतही ‘शोध’ लागला नाही. किंबहुना तो शोध आणखी करोडो वर्ष संपायचा नाही, हे संशोधन चालूच राहणार आहे. या सर्व अनाकलनीय ‘परिसंस्थेचा’ शोध आणि ‘बोध’ न घेता एक दुसऱ्याचं जीवन ‘हराम’ करणारी प्रवृत्ती वाढीस का लागते? कळत नाही.
माणुसकीच्या आणि मानवतेच्या दृष्टीने विचार केल्यास प्रत्येक माणसाचं ‘जगणं’ सुकर व्हावं, यासाठी एक दुसऱ्याची काळजी घेणे आणि आपणही सुखानं जगणं आणि दुसऱ्यालाही सुखाने जगू देणे, यातच खरी जीवनाची ‘मजा’ आहे, माणुसकी आहे, याची अनुभूती का कुणाला येत नसावी? काही माणसे एक दुसऱ्याच्या मुळावर उठलेली आहेत, जीवावर उठलेली आहेत..? जाती, धर्म, वर्ण, पक्ष या सर्व घटकाच्या नावावर एकमेकांना ‘पाण्यात पाहून’ स्वतःही सुखाने जगत नाहीत आणि इतरांनाही सुखाने’ जगू’ देत नाहीत. अशी ही प्रवृत्ती सृष्टीच्या भरभराटीसाठी खरोखरच योग्य आहे काय.? एक जण ‘तुपाशी’ तर दुसरा ‘उपाशी’. कुणी कुणाचं जीवनच नाकारतोय, कुणी कुणाचं ‘जगणंच’ नाकारतोय.. त्याला ‘धार्मिक रंग’ देऊन त्याची स्वतःची आणि इतरांची ‘सकाळ’ ‘संध्याकाळ ‘खराब करून टाकतो. ही माणसाची ‘प्रवृत्ती’ पाप-पुण्याच्या परिभाषेत कुठलं ‘पुण्य’ करायला निघाली आहे.? समजत नाही.
विधिलिखित’ आणि ‘कर्माची फळे ‘या गुळगुळीत संकल्पनेत माणूस अक्षरशः नडवला जातो, अडवला जातो. त्याचं जगणं नाकारलं जातं. त्याला बहिष्कृत केल्या जातंय.. ही कुठली माणुसकी? हा कोणता धर्म?
जगतांना त्याचं ‘वास्तव्य’ धोक्यात आणलं जातं. त्याला वेशी बाहेर बहिष्कृत ‘ठेवलं जाते. त्याला पिण्याच्या ‘पाण्यासाठी’ अडवलं जातं. त्याला सार्वजनिक स्थळी ‘अटकाव’ केला जातो.. पाणवठा नाकारला जातो. त्यांनी ‘दगडं ‘फोडावीत. डोक्यावर’ विष्टा’ वाहून न्यावी. संडास साफ करावेत, साफसफाई करावी. घाम गाळावा पण सुखाचा ‘घास’ खाऊ नये. यासाठी सर्वतोपरी दंड,भेदाभेद निर्माण करावेत. आणि असंच हजारो ‘वर्ष’ चालत आलं आणि अजूनही ते चालूच राहावं. अशी विचार करणारी एक मानसिकता, एक ‘विचारधारा’ जी देश पोखरून काढत आहे. समतामुलक तत्वांशी,असहमत आणि ‘अस्विकाराह्य’ भूमिकेत वावरू पाहते आहे. ही बाब एकमेकांमधील बंधुभाव, एकमेकांमधली सहिष्णुता, आणि आपापल्या समाज समुदायांमध्ये असलेली अधिष्ठानाची उपासना , आराधना, करण्याचे ‘स्वातंत्र्य’ बाधित करू इच्छिते. अशी ‘विचारधारा’ कधीच मानवीय दृष्टिकोनातून वैश्विक स्तरावर ‘समर्थनीय’ राहू शकत नाही…
अशा ,अवैज्ञानिक, अपरिपक्व उथळ विचाराची ‘पेरणी’होऊ घातलेली आहे. नक्कीच उद्याचं उगवणारं ‘पीक ‘हे कुठल्याच गुणवत्तेने सकस विचाराचं नसणार आहे.
ज्या मागे’ तर्कशुद्धता’, विवेक, नसतो असा ‘विचार’ घेऊन चालणारे प्रांत, राज्य,हे विचाराचा ज्वालामुखी’ होऊन, जनतेचा उद्रेक होऊन कधीतरी ‘नष्ट’ होत असतात. इतिहास ‘साक्षी’ आहे. जगात अनेक ‘क्रांत्या’ झाल्यात. त्यात ‘रक्तरंजित’ क्रांतीच जास्त झालेल्या दिसतात…
मेंदूत जसं पेरलं, तसंच येणारी पिढी ‘पिक’ होऊन उगवते.
ज्यांनी हजारो वर्ष आपली जिंदगी ‘गुलामीत’ काढली. त्या माणसांनी यापुढेही सन्मानाने स्वाभिमानाने जगायचं ‘नाही’ का? रिप्रेझेंटेटिव्ह ‘डेमोक्रसी’ म्हणजेच प्रत्येक घटक समूहामधला एक ‘प्रतिनिधी’ हा त्या समाजातील, समुदायातील, प्रश्नांच्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रतिनिधी म्हणून ‘असावा’ म्हणजे तो त्या समुदायाला न्याय देऊ शकेल. या आधारावर ‘गणतंत्र’ राज्यांमध्ये त्याचं ‘प्रतिनिधित्व’ असणे आवश्यक नाही का ? हजारो वर्षाचा त्रास सहन करीत असह्य ‘जीवन’ जगत हजार वर्षाचा प्रवास करत करत नुकतेच जेमतेम ‘मुख्यधारेत’ संविधानाच्या माध्यमातून पोहोचलेली माणसं, त्यांचं अस्तित्व, त्यांचे ‘प्रतिनिधित्व’ जेमतेम पन्नास वर्षाच्या काळामध्येच ‘का’ नकोसं वाटायला लागलं ? ही बाब विचार करण्याजोगी नसावी का ? हजारो वर्षाचा थकून भागून प्रवास करत आलेली, दुर्लक्षित झालेली बहिष्कृत समजल्या गेलेली ही मानव वंशामधली आपल्याच सारखी दिसणारी, बोलणारी, चालणारी ‘मेंदू असणारी माणसं’ आपणच माणसांनी का ज्ञानापासून, सुखसोईपासून ‘हजारो वर्ष’ वंचित ठेवली असावीत? याचा थोडा तरी विचार केला जातो का? प्रत्येक दृष्टिकोनातून बघितलं तर, असं लक्षात येईल की, सुख आणि दुःख, रडणे आणि हसणे’ या सगळ्या ‘भावना’ संवेदना जाणवत असलेल्या, ज्यांच्या शरीरातून केवळ ‘लालच रक्त’ इजा झाली तर, बाहेर निघते, आपल्यासारखंच त्यांनाही ‘दुःख’ होतं. त्यांचाही ‘जीव’ घाबरतो, गुदमरतो, जगण्यासाठी तडफडतो, ह्याच सगळ्या भावना प्रत्येकाच्या ‘ठाई’ असतात. असा मानवी विचार केला तर प्रत्येकालाच हे ‘दुःख’, ते घाव, तो मार सहन करण्याचं ‘दूर्भाग्य’ त्यांच्याच वाट्याला का यावं ? असा हा साहजिक ‘प्रश्न’ कुणाच्याच मनाला कसा पडत नसावा.?अनेक जण आपल्या पोकळ अधिष्ठानाच्या आणि जात अभिमानाच्या, व्यर्थ गर्वात गुरफटून इतरांना निर्जीवच समजत असतात. आणि मुद्दामून त्यांच्याशी ‘निर्लज्ज’ आणि अमाणूष ‘व्यवहार’ करत असतात. ही बाब माणूस म्हणून कोणाला शोभण्यासारखी आहे का..? द्वेष पेरलेल्या रानात द्वैषाशिवाय आणखी काय उगवणार आहे? ‘देह’हा पाण्याचा बुडबुडा.. म्हणणारी माणसं इतरांच्या घरावर हल्ला करायला जातात, आया बहिणीच्या इज्जतीवर हात घालतात, हा उन्माद खरोखरच समर्थनीय आहे काय..?
दुसऱ्यांना अकारण छळण्यासाठी आणि आपल्या उदरनिर्वाह ,प्रपंचासाठी उभे केलेले बिन बुडाचे, धर्म-सिद्धांत आणि ‘नानाविध’ खेळ, डावपेच हे ‘जगा आणि जगू द्या.’. या मानवतावादी ‘सिद्धांताला’ फाटा देणारी नाहीत का.. याचा विचार कधी करायचा? प्रश्न आपल्याला का पडत नसावा. याचं नवल वाटते.
कित्येक वर्ष दुःख दैना भोगलेल्यांनी प्रतिनिधिक लोकशाहीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व स्वीकारून या देशातील राजकीय व्यवस्थेचा शैक्षणिक व्यवस्थेचा आर्थिक व्यवस्थेचा भाग व्हावं.. आणि हे काही काळातच परंपरा वाद्यांना खटकावं.. या मागचं कारण काय असावं? त्यांना जगू द्यायचं नाही का.. त्यांना मानसन्मान नको का? ती माणसं नाहीत का..? हजारो वर्षानंतर मिळालेल्या संधीचं सोनं करत ती जगत असतील तर एका विशेष सवलतीने त्यांना पुढे येऊ देणं… हे मानवतावादी दृष्टिकोनातून योग्य नाही का? खितपत पडलेल्यांना नवजीवन मिळतंय याबद्दल आनंद व्यक्त करण्याऐवजी खदखद व्यक्त करणे, हे माणूस म्हणून प्रदर्शित करणे कितपत योग्य आहे?
माणसांनीच माणूस द्वैषापोटी निर्माण केलेले धर्म, नियम हे माणसांना छळण्यासाठी अवलंबनात आणणे कितपत योग्य आहे ? याचा सारासार विचार का केला जात नाही? जनावरा पेक्षा, साप, विंचू पेक्षा माणूस विषारी आणि खूंखार बनत चाललाय.. हे कशासाठी? चार दिवसाचा मिळालेला जन्म एकमेकाला छळण्यात वाया गमावणे. हा चार दिवसाचा भरलेला बाजार प्रत्येकाला एक एकट्याने खाली करायचा आहे.. एक दिवस जायचं आहे.. मग माणसाला त्रास देऊन, दुसऱ्याच्या जीवनामध्ये विघ्न आणून संकट आणून त्यांचे प्राण त्यांची सुपारी घेऊन जगण्यात कुठला परमार्थ आणि ईश्वर आपण बघत आहोत..? कळत नाही. एकदा गेलेले परत आले नाहीत. त्यांचा पुनर्जन्म ही नाही.
आत्मा, परमात्मा ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आपणच पसरवून इतरांच्या घरांना आगी लावत, त्यांच्या जीवनात काटे पसरत आहोत… एकमेकांना द्वेष मूलक नजरेने बघत आहोत. यात कुठला पुरुषार्थ आहे? कळत नाही. म्हणून माणसाने बंधूभावाने, एकमेकांशी सहकार्याने, आल्या जीवनात आनंदाने स्वतः जगलं पाहिजेत आणि जगू दिले पाहिजेत. यातच खरा जीवनाचा अर्थ आणि आनंद सामावलेला आहे. समता, समानता, बंधुता, न्याय, ही मुलतत्वे सर्वांचं कल्याण करणारी आहेत. म्हणूनच ती घटनाकाराने आपल्या देशाच्या संविधानात अंतर्भूत करून सर्व पातळीवरील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तो जगतमान्य झाला आहे. या संविधानिक मांडणीचा सर्व जगभर सकारात्मक दृष्टीने आणि गौरवास्पद गवगवा सुद्धा आहे. ही बाब नजरेआड करण्याजोगी नसून आपल्या सर्व देशवासीयांसाठी अभिमानाची आहे. तेव्हा या समानतेच्या लेखणीचा सन्मानच होणे तुमच्या आमच्या सर्वहितांचं ठरणार आहे. म्हणून आपण माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हे अपेक्षिले आहे. आपण मानवतावादी विचाराचे पुरस्कर्ते झालो पाहिजे. मानवतावादाचे पाईक झालो पाहिजे. या जगण्यातला आनंद एकमेकांना वाटण्यातच आपले ‘सौख्य’ सामावले आहे. यासाठीच हा लेखन प्रपंच… चला माणूस बनू या…!
-प्रा.नंदू वानखडे
मुंगळा ता.मालेगांव जि.वाशिम
9423650468
ReplyForward |