बापू तुमच्या देशात
बापू तुमच्या देशात
काय काय चाललय ?
खुळ जाती धर्माचच
घरोघरी वाढलय !!
अहिंसा मंत्राच बापू
काय सांगू मी तुम्हाले
बलात्कार करुनीया
मारल्या जाते लेकीले !!
बापू तुमच्या सत्याचा
सारा सत्यानास झाला
खोटं बोल रेटून बोल
आहे खोट्याचा बोलबाला !!
विकून त्यांनी विद्यामंदिर
बांधले मंदिर रामाचे
दीन दलित सेवेसाठी
खुलले मंदिर मदीरेचे!!
नेते झाले भ्रष्टाचारी
लाचखोर अधिकारी
डोईजड झाले सारे
हीच आमची लाचारी !!
बनियाची नफेखोरी
दलालांची बेईमानी
जनता झाली सैरभैर
शासनाची मनमानी !!
सत्तेचा जुगार खेळती
नेते राजरोस येथे
स्वातंत्र्याची ऐसीतैसी
होते रोज रोज येथे !!
आजचे राजकारण
बापू झाला गोरखं धंदा
धन्य धन्य ती कोठेवाली
करते प्रामाणिक धंदा !!
हतबल बळीराजा
करतोय आत्महत्या
दिवसाढवळ्या होई
लोकशाहीची हो हत्या !!
पारतंत्र्यात आम्हांस
होते परकीयांनी छळले
स्वकी्यांनी आम्हांस
बापू ऊसापरी पीळले !!
जय, अटल, लाल, बापू
नका धाय धाय रडू
पुन्हा आम्ही सारे आता
खरया स्वातंत्र्यास्तव लढू !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556