आवतन
Contents
hide
चाल गड्या सवंगड्या
आज नदीवर जाऊ
गार वाह्यत्या धारित
आज संगमंग न्हाऊ !!
अंगा माखू देरे तुह्या
उटी चंदन साबण
पाठी घासू दे खरारा
साऱ्या अंगाचे मर्दन !!
चंद्रकोरी शिंग तुह्ये
जरा कोरू दे घासूं दे
खुरं झिजले घासले
पत्री मारू दे लावू दे !!
सजवीला रंगवीला
असा बैल माझा भोंडा
कैसा ऐटीत धावतो
पाठी शेपटीचा गोंडा !!
औत वाह्यता वाह्यता
झाली मानेची चाळणी
लोणी हळद चोळून
करा खांद्याची मळणी !!
मांगतो रे माफी तुझी
हातं दोन्ही मी जोडून
तुले टोचलं आंरून
कई मारलं कांठीन !
एक झाल्या तिन्ही सांजा
करा वृषभ पूजन
पंचारती ओवाळूनी
द्या पोळ्याचे आवतन !!
पुरणं ठोंबऱ्याचा बेत
उद्या पोळ्याचा रे सण
जेवावया येई देवा
आज देतो आवतन !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक
अकोला 9923488556.