वैश्विक अर्थ उलगडणारे मुखपृष्ठ – “लई नाही मागणं”
तुका म्हणे काही न मागी आणिक । तुझे पायीं सुख सर्व आहे– संत तुकाराम महाराज
नाशिक जिल्ह्याला साहित्याचा वारसा लाभलेला आहे, साहित्य, कला, क्रिडा, अभिनय, चित्रकारिता यात नाशिक जिल्ह्यातील कलावंतांनी, साहित्यिकांनी आपल्या नावाबरोबरच गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा डंका संपूर्ण राज्यात गाजवला आहे. अशाच कलावंतांपैकी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या मातीचा लेप अंगावर घेऊन ग्रामीण जीवन अनुभवलेला कलावंत म्हणजे विष्णू थोरे. कवी, लेखक, चित्रपट गीतकार, अभिनय, अशा विविध कलागुंणाना जपत एक शेतकरी म्हणूनही विष्णू थोरे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
नुकतेच फेसबुक चाळत असतांना विष्णू थोरे यांनी आपल्या कुंचल्याने साकारलेल्या एका कलाकृतीचे मुखपृष्ठ पहायला मिळाले. अतिशय देखणे, आणि पाहताक्षणी आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करावे असे हे मुखपृष्ठ. या मुखपृष्ठाचा बारकाईने अभ्यास केला असता यातून वैश्विक अर्थ मला जाणवला…
या मुखपृष्ठावर असे काय आहे ? जे आपल्याला पाहताक्षणी हात जोडून नमस्कार करावा असे वाटते. तर या मुखपृष्ठावर “लई नाही मागणं” हे शीर्षक अगदी वरच्या मोकळ्या जागेत टाकले आहे, त्याखाली लेखिकेचे नाव आहे, त्या नावाच्या खालीच पंढरीच्या पांडुरंगाचे चित्र आहे, पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट आहे, भाळावर टिळा आहे, डोळे झाकलेले आहेत, पांडुरंगाच्या गालापासून खाली छातीपर्यंत दोन शुभ्र स्तंभ आहेत, त्याच्याखाली एक प्रतिकात्मक व्यक्ती हात पसरून जणू काही मागणे मागत आहे असे भासमान चित्र आहे, त्याखाली लेखनीचे टोक खालच्या दिशेने दाखवले आहे आणि त्या पेनाच्या खाली उघडून ठेवलेली एक साहित्य कलाकृती दाखवली आहे आणि संपूर्ण मुखपृष्ठावर आजूबाजूला गडद रंगछटा दाखवल्या आहेत.
“लई नाही मागणं” श्रद्धा बेलसरे-खारकर यांची ललित लेखसंग्रह ही कलाकृती श्रीरामपूर जि अहमदनगर येथील शब्दालय या संस्थेकडून प्रकाशित होणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम मुखपृष्ठचित्रकार विष्णू थोरे यांनी आपल्या कल्पकतेने साकारलेल्या या मुखपृष्ठातील संदर्भांचा उलगडा करणार आहोत.
जगातील प्रत्येक अणुरेणूत, प्राणीमात्रात एका अद्भुत शक्तीचा वास असतो त्या अद्भुत शक्तीला आपण परमेश्वर, ईश्वर, देव, अल्लाह, प्रभू अशा विविध नावाने ओळखतो. या अद्भुत शक्तीला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. ही शक्ती म्हणजे काय तर आपल्या शरीराला, आत्म्याला शांती देणारी ताकद.. या अद्भुत शक्तीला आपण नेहमी स्मरण करून समाजात चांगले नाव मिळावे, जगाने आपले गुणगाण गावे, आपल्या भविष्यात काही कमी पडू नये यासाठी अखंड प्रयत्न होत असतात. हे प्रयत्न केवळ आणि केवळ आपल्याला सुख मिळावे म्हणून केले जातात. हे सुख मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट, करावे लागतात, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून परिस्थितीवर मात करत सुखासाठी झगडावे लागते. सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येकाची त्या विधात्याकडे एकच मागणी असते की, ‘माझ्या टीचभर पोटासाठी आज जे सुखाचे दोन घास मिळतील तेव्हढेच दे, मला जास्त काही नको, सुख असेल तर जगाशी सामना करण्यास ताकद मिळेल’. अशी आर्जव करीत प्रत्येक जण आभाळाकडे बघून त्या विधात्याला मागणी करत असतो त्याचेच प्रतिक म्हणून या मुखपृष्ठाचे शीर्षक “लई नाही मागणं” हे मुखपृष्ठाच्या सर्वात वरच्या बाजूला ठेवलेले असून जणू काही आकाशाकडे पाहून त्या विधात्याला आपले गाऱ्हाणे मांडून सांगत आहे की, “हे परमेश्वरा, मला काही नको, फक्त सुखाचे दोन घास लेकरांच्या पोटात जाऊ दे. मला तुझ्याकडून “लई नाही मागणं” फार काही अपेक्षा नाहीत. मी कष्ट करायला समर्थ आहे. फक्त अन्नाचे दोन घास सुखाने खाऊ दे, आणि हेच मागणे मागण्यासाठी एक प्रतिकात्मक व्यक्ती हात पसरून जणू काही हेच मागणे तर मागत नाही ना !” असा अर्थ मला यातून जाणवला आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी देखील आपल्या अभंगात म्हटले आहे “तुका म्हणे काही न मागी आणिक । तुझे पायीं सुख सर्व आहे” असा गर्भित अर्थ मला या शीर्षकातून जाणवला आहे.
जगातील कान्याकोप-यातील वैष्णवांचे माहेरघर म्हणून पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे बघितले जाते. वर्षातून दोन वेळा पंढरपूरला भेटण्यासाठी हा वैष्णवांचा मेळा भरत असतो. लाखोंच्या संख्येने येथे भाविक येत असतात… आपल्या लाडक्या परमेश्वराची भेट घेण्यासाठी भक्त तहानेले झालेले असतात, पांडुरंगाला भेटण्यासाठी रात्रंदिवस वाट पाहत असतात संत तुकाराम महाराज म्हणतात की “भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी”. “तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा”. आणि म्हणूनच की काय त्या पांडुरंगाचे दर्शन व्हावे, त्याच्या चरणी नतमस्तक व्हावे म्हणून पांडुरंगाचा फोटो या मुखपृष्ठावर घेतला असावा आणि याच पांडुरंगाच्या दर्शनासाठी विविध जातीधर्माचा विविध प्रांताचा, विविध वैष्णव समुदाय गोळा झालेला आहे असा अर्थ या मुखपृष्ठावर आजूबाजूला गडद रंगछटा दाखवल्या आहेत त्यातून मला जाणवला आहे.
“लई नाही मागणं” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर पांडुरंगाच्या भाळावर टिळा दाखवला आहे याचा अर्थ असा की, माणसाने जर परमेश्वराला मिळवायचे असेल, (परमेश्वर मिळवणे म्हणजे मोक्ष मिळविणे या अर्थाने) तर त्यासाठी साधना लागते, तप लागते, सातत्य लागते, एकाग्रता लागते. परमेश्वर प्राप्तीसाठी “डोळे मिटून” ध्यानस्थ व्हावे लागते. आपल्या मनाच्या अंतःचक्षुने बाह्यचक्षुवर म्हणजेच भाळावरच्या केंद्र्बिंदुवर लक्ष केंद्रित करून जर एकाग्रतेने ध्यान केले तर परमेश्वर प्राप्तीचा मार्ग गवसतो.. भाळावरचा मध्यबिंदू हा ध्यानधारणेचे मुख्य केंद्रबिंदू मानले जाते म्हणून पांडुरंगाच्या भाळावर विशिष्ट आकाराचा टिळा अधोरेखित केला आहे….
“लई नाही मागणं” या मुखपृष्ठावर लेखनीचे टोक खालच्या दिशेने दाखवले आहे आणि त्या लेखनीच्या खाली उघडून ठेवलेली एक साहित्य कलाकृती दाखवली आहे. याचा अर्थ असा की, आपण जर आपल्या समाजाचे, परिस्थितीचे, इतर विविध साहित्य कलाकृतीचे, सूक्ष्म निरीक्षण केले, भाळावरचा मध्यबिंदूने ध्यान केले, म्हणजेच चिंतन, मनन केले तर सुंदर, आशयसंपन्न अशी कलाकृती लिहू शकता. “लई नाही मागणं” ही कलाकृती देखील अशीच एकाग्रता, चिंतन, मनन करून निर्माण केलेली असावी असा अर्थ मला येथे जाणवला आहे. श्रद्धा बेलसरे-खारकर यांच्या “लई नाही मागणं” या कलाकृतीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने, शब्दालय प्रकाशन, मुखपृष्ठचित्रकार विष्णू थोरे यांना खूप खूप शुभेच्छा
मुखपृष्ठ परीक्षण
-प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० *(तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)*