कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टर
मंगरूळपीर तालुक्यातील अश्विनीची यशोगाथा
खरं म्हणजे आजकाल अत्रतत्र सर्वत्र स्पर्धा परीक्षा जे डबल इ नीट या परीक्षांचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होत आहे. मुलांची धाव कोचिंग क्लासकडे आहे. पण विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कोणताही क्लास न लावता कलेक्टर झालेली आहे. त्या मुलीचे नाव आहे अश्विनी धामणकर.
अश्विनीने आपल्या आजोबाचे स्वप्न आय ए एस होऊन पूर्ण केले आहे. आपल्या नातीने आयएएस व्हावे असे आजोबांना वाटत होते. आणि त्यांचे जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनीने जीवाचे रान केले. तिचे शिक्षण वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथेच नाथ विद्यालयात झाले. पुढे बारावी करण्यासाठी ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा महात्मा गांधी विद्यालय मध्ये गेली .तिथे तिने बारावी केली. पदवी परीक्षा पास केल्यानंतर तिने आयएएसच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि तिसऱ्या प्रयत्नमध्ये हे यश तिने संपादन केले.
आज दिनांक 23 एप्रिल रोजी आयएएसचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही वाशिम जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यातील तिचे श्रीकृपा कॉलनी मधील घरी गेलो. तिचे वडील अध्यापक आहेत .तर आई गृहिणी. तिच्याकडे काल निकाल लागल्यानंतर इतके लोक अभिनंदन करण्यासाठी आले की त्यांनी आणलेल्या बुके आणि सप्रेम भेट यामुळे तिची पाव खोली भरून गेली होती. आम्ही सन्मानपत्र व पुस्तके देऊन तिचा गौरव केला. तिची मुलाखत घेतली. युट्युब ला आणि फेसबुकला टाकली. अश्विनी म्हनाली सर मी सहा सात तास अभ्यास करायचे. फार अभ्यास केला नाही .पण जो अभ्यास केला तो मनापासून केला. आणि हे खरेच आहे की जो मुलगा दहावी बारावी पर्यंतचा अभ्यास काळजीपूर्वक करतो तो आयएएस ही परीक्षा लवकर उत्तीर्ण होऊ शकतो. अश्विनीला दहावीला आणि बारावीला 90% च्या वर गुण पडले आहेत.
अश्विनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईंना वडिलांना व बहिणीला देते .त्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे व केलेल्या मदतीमुळे ती आय ए एस होऊ शकली. तिचे शेजारी डॉक्टर प्रमोद दामोदर देवके सांगत होते की सर आज यांचे घर खूप चांगले आहे .परंतु जेव्हा अश्विनी शिकत होते तेव्हा परिस्थिती जेमतेमच होती .या जेमतेम परिस्थितीतून तिने वाट काढत अभ्यास करून सातत्याने आपले ध्येय गाठण्यासाठी जो प्रयत्न केला तो निश्चितच दिशा देणारा आहे.
तिचे वडील संजय धामणकर हे अध्यापक असल्यामुळे ते वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना सर्वश्री विश्वास नांगरे पाटील भारत आंधळे यांच्या मुलाखती दाखवायचे आणि त्यांना प्रोत्साहित करायचे .ते म्हणाले की मी अश्विनीला फार मदत केली नाही .ती उपजतच गुणवंत विद्यार्थिनी आहे .फक्त मी एकच केले. तिला अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र खोली बांधून दिली .ती वरच्या मजल्यावर आहे .
अश्विनी सांगत होती की सर मी मोबाईलचा उपयोग केला नाही .अनेक वेळा मी रिचार्ज पण करीत नव्हते. वायफाय वर अभ्यास करीत होते. लग्न समारंभ वाढदिवस यावर मी पूर्णतः बहिष्कार टाकला होता. अभ्यास आणि मी असे समीकरण मी केले होते त्यामुळे मला हे यश लवकर प्राप्त झाले. आम्ही जेव्हा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे हरिकृपा कॉलनी मध्ये पोहोचलो तेव्हा तिचे वडील संजय आई प्रणाली बहीण अनिशा हे तर उपस्थित होतेच पण तिचे अभिनंदन करायला तिच्या गावातील डॉक्टर प्रमोद देवके प्रतिभा देवके सीमा मलमकार ललित मलमकार प्राजक्ता तमाखे आशिष तमाके प्रमोद अभ्यंकर रवींद्र धावमणकर अर्चना धामणकर आणि संस्कृती धामणकर हे देखील आले होते. मी100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्याअमरावती वरून अगदी उन्हाच्या तडाख्यात तिचे अभिनंदन करायला आलो त्यामुळे तिला गहिवरून आले. तरुण पिढीला संदेश देताना ती एवढेच म्हणाले की मुलांनी मोबाईलचा छंद सोडला पाहिजे आणि प्रामाणिकपणे निष्ठेने सातत्याने अभ्यास आणि अभ्यासच केला पाहिजे. आम्ही तिला खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी तिचा दोन मे रोजी सायंकाळी सात वाजता अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सत्काराचे निमंत्रण दिले आणि ते तिने स्वीकारले त्याचबरोबर अकोला जवाहर नवोदय विद्यालय अकोला बाबूजी देशमुख वाचनालय तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूल या तीनही निमंत्रण तिने स्वीकारले. ती म्हणाली सर मी प्रशिक्षणाला जाईपर्यंत गावोगावी फिरणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे .कारण माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला पाहिजे. त्यासाठी मी हे प्रोत्साहन पर व्याख्याने देणार आहे.
अश्विनी आज तू ग्रामीण भागातून येऊन पुण्याला न जाता दिल्लीला न जाता मुंबईला न जाता हैदराबादला न जाता वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर सारख्या तालुक्याच्या गावात राहून अभ्यास करून आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे हे निश्चितच अभिनंदनास पात्र आहेस. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खचून न जाता अश्विनीचा आदर्श आपला डोळ्यासमोर ठेवावा व प्रामाणिकपणे सातत्याने अभ्यास करून यशाकडे वाटचाल करावी असे यावेळी व्यक्त करावेसे वाटते.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003