श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण
वयाच्या तेविसाव्या वर्षी पहिली गझल लिहिणारे मराठी गझल साहित्यातील प्रख्यात श्रेष्ठ नामवंत गझलकार आदरणीय राऊत सरांची देवप्रिया / कालगंगा अक्षर गण वृत्तातली ही गझल मला खूप आवडल्याने मी ह्या गझलेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे.
गझल
ओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल
हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझल
त्या खळीच्या भोवऱ्याने जीव माझा घेतला
बोलताना मोकळे ती हासली गाली गझल
तू लिही नशिबात माझ्या संकटांची शृंखला
फक्त त्यांच्या सोबतीने तू लिही भाली गझल
हिंडतो का जागजागी तू अनाथासारखा
भंगलेल्या माणसांची ती खरी वाली गझल
जन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे
एक प्याला अंगुराचा, एक ही साली गझल
पोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी
एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल
– श्रीकृष्ण राऊत
आदरणीय राऊत सरांच्या ह्या गझलेचा मतलाच एवढा सुंदर नि नवयुवती समान आकर्षक आहे की वाचताक्षणीच त्या मतल्याच्या प्रेमात पडावे. सरांनी गझलेला प्रेयसीची उपमा दिलीय तो मतलाच बघा:-
ओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल
हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझल
गझलकाराने गझल रचनेची तुलना प्रेमिकेशी केली आहे. प्रेमीयुगलात ओठाचे चुंबन घेतले जाते त्याचप्रमाणे गझलेच्या शेरांचे शब्द गझलकाराच्या ओठावर अलगद जणू चुंबन घेण्यास येतात आणि गझलकार मतल्याच्या सानीत सांगतात की, जसे प्रेमवीर व प्रेमिका एकमेकांच्या भेटीत एकमेकांचे हात हाती घेतात तशीच गझल ही गझलकाराची प्रेयसी होऊन हात कुरवाळत असते.
प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांवर आकर्षित होतात.त्यांच्या दुनियेत ती दोघेच मस्त असतात. तसेच गझलकार प्रियकर व त्यांची गझल-प्रेयसी दोघेही आपल्याच दुनियेत आहेत. दोघेही नितांत प्रेमात पडलेत. गझलकार गझलेशिवाय राहू शकत नाही आणि गझल व तिचे शेर एकसारखे गझलकाराशीच घुटमळत आहेत.
गझलेत प्रभूत्व मिळवायचे असेल तर गझलेच्या प्रेमात पडायलाच हवे. मनात,हृदयात गझल एके गझलच असायला हवी. प्रेमिकेसारखे एकसारखे गझलेतच रमायला हवे असेच गझलकार मतल्यात सांगतात असे मला वाटते.
आता हा सरांचा दुसरा शेर बघा:-
त्या खळीच्या भोवऱ्याने जीव माझा घेतला
बोलताना मोकळे ती हासली गाली गझल
दोन नद्यांचा संगमामुळे पाण्याच्या प्रवाहात भोवरा निर्माण होतो त्याला ‘जलकुंभ ‘ असे म्हटले जाते. तसेच समुद्राच्या लाटांमुळे सुद्धा पाण्यात कधी कधी भोवरे येतात (Cyclones) आणि अशा भोवऱ्यात नाव अथवा नावाडी पडला तर त्याचा जीव वाचणे कठीणच असते. त्या भोवऱ्यात तो गुरफटून जातो. तसाच प्रकार गझलकाराच्या बाबतीत प्रेयसीच्या गालावर पडलेल्या खळीच्या भोवऱ्यात पडल्याने झालेला आहे.
तरुण मुलगी सुंदरच दिसतेच अन् त्या युवतीच्या गालावर जर खळी पडत असली तर ती खळीही तिच्या सौदर्यात आणखी भर घालणारी बाब असते. गालावरच्या खळीमुळे तिचे हास्य कुणालाही मोहित करते. अशी युवती बोलताना सुद्धा खूप सुंदर दिसते. गालावरच्या खळीनेच बोलताना तिचे हास्य खुलत असते. तसे गझलकाराला इथे सांगायचे की त्यांची गझल, खळी गालावर असलेल्या युवती समान बोलतानाही गझल फुलवत खुलून हसते.
गझलकारास त्यांची प्रेयसी असलेली गझल नवयुवतीच्या गालावरच्या खळीप्रमाणेच भासत आहे. आणि त्यामुळेच गझलेचे सौदर्य त्यांना भारावून टाकत आहे. गझल आपली प्रेयसी म्हणूनच तिच्याकडे पाहिले तर कधी ना कधी ती मोहित होऊन वश होईलच, असा संदेश गझलकार वाचकांस देत आहे असे मला वाटते.
आता सरांच्या गझलेतला तिसरा शेर पहा:-
तू लिही नशिबात माझ्या संकटांची शृंखला
फक्त त्यांच्या सोबतीने तू लिही भाली गझल
गझलकाराला गझल किती प्रिय आहे आणि त्याच गझलचा एखाद्या शस्त्रा समान ते उपयोग करू इच्छितात असे सांगणारा हा शेर आहे.
माणसाच्या ललाटरेषेत चढ- उतार असतातच. काहींच्या बाबतीत ते कमी जास्त प्रमाणात असतात. गझलकार ह्या शेरात परमेश्वराला सांगू इच्छितो की, त्यांच्या ललाटरेषेत संकटांची शृंखला असली तरी काही हरकत नाही. एकानंतर एक येणाऱ्या संकटांना ते निर्भयपणे सामना करू शकणार आहेत, फक्त त्या संकटांच्या शृंखलेबरोबर त्यांच्या ललाटी गझल लेखनाची कलाही असू दे. त्या गझलेच्या ताकदीने आलेल्या प्रत्येक संकटांचा ते गझलेच्या ताकदीने पार धुव्वाउडवून देतील.अशी जबरदस्त गझल ही भाळी द्यावी अशी परमेश्वराला ते विनंती करतात.
हिंडतो का जागजागी तू अनाथासारखा
भंगलेल्या माणसांची ती खरी वाली गझल
हा शेर खूपच छान आहे. गझलकाराच्या जीवनात गझलेला अतिशय महत्त्व आहे. तिच्यात एवढी ताकद नि बळ आहे की, माणसाचे निराशपण, एकटेपण, अनाथपण, नाही कुणी वाली असे म्हणायची वेळच येत नाही.
बेवारशी, अनाथ जागोजागी भटकण्याची निराशवादी वृत्ती बाळगायची मुळीच गरज नाही. शेजारी-पाजारी, नातेवाईक, भाऊबंध कुणीही नसले तर अजिबात पर्वा करायची गरज नाही जेव्हा गझलकारा सोबत त्याची प्रिया ‘गझल ‘ असते. गझलेमध्ये एवढी शक्ती आहे की ती गझलकाराचा सगळा भार वाहू शकते. गझलच त्याची खरीखुरी वाली असल्यावर त्याला भीती कशाची असेच गझलकाराला ह्या शेरात सांगायचे असेल.
जन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे
एक प्याला अंगुराचा, एक ही साली गझल
व्वाह! व्वाह! किती धुंद करणारा शेर!
गझलकाराला गझलेचे वेड हे एखाद्या नशेप्रमाणेच असते हे व्यक्त करणारा हा शेर आहे.
माणसाला सहसा नशा दारूची चढते. आणि त्या नशेमुळे तो झिंगत असतो. त्याला कशाचीच शुध्द नसते. दारूमुळे तो वेगळ्याच दुनियेत वावरत असतो. गझलकार इथे सांगू इच्छितो की त्याचा जन्म झिंगण्यासाठी झालाय. त्याची दोन कारणे आहेत. अंगुराच्या प्याल्याने सरसकट सगळ्यांनाच झिंग येत असतेच पण गझलकाराला तेवढ्यावर भागलेले नाही कारण अंगुराच्या प्याला एवढीच मदहोश करणारी त्यांची प्रियतमा ( साली ) गझल ही आहे. गझलेच्या नशेने ते धुंदीत झिंगत आहेत. एवढे अप्रतिम गझलेवरचे प्रेम गझलकार ह्या शेरात व्यक्त करत आहे असे मला वाटते.
पोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी
एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल
क्याबात है!अप्रतिम शेर !
गझलकार गझलेने ठार वेडाच झालाय असे दर्शवणारा हा शेर.
जीवनभर गझलेच्याच सहवासात राहून गझल एके गझलच करत राहिला. गझला लिहिल्या. आयुष्य संपले, मरून स्वर्गात गेला तरी अंतरात एक खंत राहिलेली आहे. तर ती कोणती ? अजून एक आवडीची गझल लिहायची बाकी राहिली.
गझलेच्या धुंदीत असणारा, सतत दिवस-रात्र गझलेच्या शेरांच्या वेगवेगळ्या खयालांच्या विचारात मग्न असतो. नवीन नवीन खयालांच्या शोधात, चिंतनात वावरत असतो. रोजच गझल लिहिल्या शिवाय अशा गझल -प्रेमिकाला चैन पडत नाही. किती ही लिहिल्या तरी अजून अजून लिहाव्या असेच वाटत असल्याने आवडीची एक गझल खाली राहिली असे गझलकार म्हणतात.
जसजसा गझलेचा सराव होतो तसतशी गझलेत सुधारणा होत जाते. गझल सहसा कुणाला वश होत नाही आणि एकदा का ती वश झाली तर ती तिच्या प्रेमात जखडून ठेवल्या शिवाय राहत नाही. असाच भाव व्यक्त करणारा हा शेर मला खूपच भावला.
धन्यवाद.!
शोभा वागळे
मुंबई.
8850466717