स्री मनाच्या भावना जपणारा कवितासंग्रह – चांदण फुले
पुण्यात स्थायिक असलेल्या कवयित्री सौ. सुलभा सत्तुरवार यांचा चांदणफुले हा कविता संग्रह नुकताच वाचनात आला. बालपणापासून ज्यांनी वाचनाची आवड रुजवली ते वडील स्व. पांडुरंग पेंडलवार आणि ज्यांच्या प्रोत्साहनामुळे कवयित्रीला वाचनाची गोडी जपता आली ते पती स्व. साईनाथ सत्तुरवर यांच्या स्मृतीची फुले ओंजळीत घेऊन कवयित्री सौ. सुलभा सत्तुरवार यांचा हा काव्यसंग्रह विविध विषयाला गवसणी घालणारा आहे. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ वाचतांना कवयित्रीच्या काही आठवणी यात गुंतलेल्या दिसून आल्या.
चांदण फुले या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठाचे निरीक्षण करीत असतांना कवयित्रीचे काही भावनिक ऋणानुबंध या मुखापृष्ठाशी जोडलेले दिसून आले. प्रातिनिधिक स्वरूपाचे घर, घराला घडवलेल्या दगडाच्या भिंती, त्याला सर्वबाजूने हवा खेळती राहील अशा खिडक्या, आणि घराजवळून जाणारा कच्चा रस्ता, या रस्त्यालगत पडलेली पांढरी सात फुले आणि रस्त्यावर झुकणारी नारळाची झाडे असे मुखपृष्ठ पाहून मुखपृष्ठचित्राची संकल्पना या काव्यसंग्रहासाठी खरोखर अर्थपूर्ण अशीच आहे. या मुखपृष्ठातून मला जाणवलेले काही अर्थ उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
चांदण फुले या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर प्रातिनिधिक स्वरूपाचे घर दाखवले आहे या घराला कवयित्रीने खूप भावनिकतेने जपले आहे. ज्या घरात कवयित्रीने आपल्या कविता जपल्या, रुजवल्या त्या घराला मुखपृष्ठावर दाखवावे असा आग्रह कवयित्रीने केलेला असावा. ज्या घरात आपण काही क्षण जपले आहेत, ते आज जरी जुने झाले तरीपण प्रत्येकाला आपल्या गतकाळाच्या आठवणी करून देत असते. ज्या घराच्या उंब-याला ठोकरा घेऊन घराबाहेर पडताना सावधपणे पाऊले टाकण्याचे संदेश दिले त्या घराला कोणीच विसरू शकत नाही म्हणून कवयित्रीने प्रातिनिधिक स्वरुपात घराला मुखपृष्ठावर घेतले असावे असे मला वाटते.
चांदण फुले या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर घराला घडवलेल्या दगडाच्या भिंती दाखविलेल्या आहेत. दगडाच्या भिंती मानवी जीवनात आदरयुक्त भीती, दबदबा, ठामपणा, आणि सुरक्षितता दर्शवतात. जोपर्यंत घरात बापाचा वावर आहे तोपर्यंत ते घर अभेद्य असते, कुणाची वाकडी नजर या घराकडे जात नाही. घराला दगडबंदी भिंती म्हणजे बापाची आदरयुक्त भीती आहे. याच घरात बापाने लहानपणापासून आपल्याला संस्काराने, सत्कर्म, चांगले बाईट, शिकवलेले असते, भिंतीला घडवलेले चिरे (दगडे) म्हणजेच चांगल्या संस्कारात घडलेल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधित्व आहे. कवयित्रीदेखील अशाच संस्कारातून घडलेल्या दिसून येतात इतका गर्भित अर्थ यातून मला जाणवला.
चांदण फुले या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावरील घराला सर्वबाजूने हवा खेळती राहील अशा खिडक्या आहेत, या खिडक्यामधून स्वच्छ आणि शुद्ध हवा ये जा करीत असते, यातून घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा स्वच्छ आणि शुद्धपणा लक्षात येतो. घराला असलेल्या खिडक्यातून वाहणारा वारा मानवी मनाच्या निर्मळ , शुद्ध आणि स्वच्छपणाचे प्रतिनिधित्व करतो.
कवयित्री सौ. सुलभा सत्तुरवार यांच्या चांदण फुले या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर घराजवळून जाणारा कच्चा रस्ता दाखवला आहे आणि रस्त्याच्या कडेला पांढरी सात फुले दाखवली आहेत. याचा कवयित्रीच्या प्रत्यक्ष जीवनाशी संदर्भ जोडला गेला आहे. ज्या रस्त्यावरून जाता येता कवयित्रीने अनेक अनुभव घेतले असतील, बालपणी माहेरात याच रस्त्यावर पाय मातीने माखले असतील ती माती आजही मनात घर करून आहे. ज्या मातीचा वास आजही मनाच्या कोपऱ्यात दरवळून आहे ती माती, तो रस्ता मुद्दाम कवयित्रीने दाखवला आहे. आज नोकरीनिमित्ताने अथवा व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून शहरी वस्तीत राहत असलो तरी गावाकडच्या मातीची बालपणाची ओढ मनात असून माहेराची वाट कवयित्रीला भुरळ घालत आहे असा गर्भित अर्थ मला यातून जाणवला आहे.
चांदण फुले या कलाकृतीच्या मुखपृष्ठाची संकल्पना कवयित्री यांच्या कन्या सौ स्नेहा यांची असल्याने यांच्या कल्पकतेला सलाम आहे त्यांनी कवयित्रीच्या भाव भावनांचा संदर्भ या मुखपृष्ठावर चितारला आहे. अत्यंत भावनिक तितकाच अलवार संदर्भ घेऊन या मुखापृष्ठातून कवयित्रीच्या अंतर्मनाला साद घातली आहे. ज्याप्रमाणे दगडाच्या भिंतीतून बापाच्या खंबीर, ठाम, धाक या स्वभावाचे प्रतिक त्याचप्रमाणे आईच्याही संस्काराचे काही मूल्य यातून अधोरेखित होते. मुलगी लहानाची मोठी झाली की तिचे लग्न करून द्यावे लागते , आईकडून मुलीकडे काही संस्कार संक्रमित होतात हे संस्कार मुलीने पुढे तिच्या मुलीला द्यायचे असतात. पहिला संस्कार म्हणजे मुलीने आपले चारित्र्य जपले पाहिजे, आपल्या आईबापाला समाजात ताठ मानेने जगता आले पाहिजे असे चारित्र्य असावे, दुसरा संस्कार म्हणजे मुलीने आपल्या शीलाचे रक्षण केले पाहिजे, समाजात वावरतांना आपल्याकडे पाहतांना प्रत्येकाची नजर चांगली असावी इतकी सुशीलता अंगी असावी. लग्नानंतर पतीसोबत एकनिष्ठ राहून संसाराला हातभार लावला पाहिजे, सासरी प्रत्येकाची मानमर्यादा ठेवून वागले पाहिजे, अपत्य प्राप्तीनंतर त्याला मातृत्वाच्या भावनेने जतन करून संस्कारक्षम बनवले पाहिजे आणि शेवटी पुन्हा पुढच्या पिढीतील मुलीला हेच संस्कारमूल्य शिक्षण देवून संस्कारित केले पाहिजे. चारित्र्य, शिल, सुशीलता, एकनिष्ठता, मानमर्यादा , मातृत्व आणि संस्कारमूल्य शिक्षण अशा आईकडून आलेल्या सात कोमल , अलवार आणि भावनिक संस्काराचे संदर्भ या मुखपृष्ठारील रस्त्यावर ठेवलेल्या सात नाजूक फुलातून जाणवले आहे. आणि म्हणूनच ही संस्काराची सुगंधी सात फुले रस्त्यावर ठेवली आहे, हा रस्ता आहे, यावरून ये जा करणाऱ्या प्रत्येक मुलीला ही संस्काराची मुल्ये जपता यावीत म्हणूनच ती रस्त्याच्या कडेला दाखवली असावी इतका गहन अर्थ यातून दिसून येतो. कवयित्री सौ सुलभा सत्तुरवार यांच्या या संग्रहातील – लेक आली माहेराला, अबोली, अन्न हे पूर्णब्रह्म, सखी, परी राणी, सुगरण, अहो ! ऐकलंत का? , सखा सोबती, नाद पैंजणाचा, मायबाप, मुलगी, गुंफण नात्याची, गृहिणी , आई या आणि अशा अनेक कवितांमधून वरील सर्व संदर्भ पाझरताना दिसून येतात आणि हे सर्व संदर्भ ओळखून अत्यंत नाजूक, अलवार, भावनिक संदर्भ मुखपृष्ठावर अधोरेखित केले आहेत.
चांदण फुले या कवितासंग्रहाच्या आतील पानावर कवयित्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर उभे राहून हात जोडून असलेले छायाचित्र टाकले आहे यातून आराध्य दैवताचे स्मरण रहावे , ज्याच्यामुळे समाजात वावरतांना अंगात चैतन्य रहावे, मूर्तीकडे पाहून सतत जगण्याचे धाडस निर्माण होते अशा भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयस्थानी आतल्या पानावर घेतले आहे असा अर्थ जाणवला आहे.
चांदण फुले या कवितासंग्रहातील कविता वाचनीय असून या संग्रहाला मा राजन लाखे यांची प्रस्तावना लाभली आहे तर डॉ श्रीकांत वामन चोरघडे , श्री. विजयराज बोधनकर, डॉ. चित्रा सोहोनी आणि सौ. सीमा गांधी यांच्या शुभेच्छा आणि पाठराखण लाभली आहे. पुणे येथील स्नेहवर्धन प्रकाशनच्या प्रकाशक डॉ स्नेहल तावरे यांनी प्रकाशन केले असून सौ. स्नेहा यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार संतोष घोंगडे यांनी या कवितासंग्रहासाठी मुखपृष्ठ रेखाटले आहे. कवयित्री सौ सुलभा सत्तुरवार यांना पुढील साहित्य कलाकृतीनिर्मितीस हार्दिक शुभेच्छा.
परीक्षण- प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परीचय :
कलाकृतीचे नाव- चांदण फुले
साहित्य प्रकार – कवितासंग्रह
कवयित्री – सौ. सुलभा सत्तुरवार, पुणे
कवयित्रीचा संपर्क क्र. ९३२६९२९९१२
प्रकाशक – स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठचित्रकार – संतोष घोंगडे