अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू ; मतदान केंद्रावर सोडला प्राण
बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे आज मतदानादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही दुर्दैवी घटना बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालय मतदान केंद्रावर घडली.
छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बाळासाहेब शिंदे मतदान केंद्रावर असताना त्यांना अचानक छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवू लागली. समर्थकांनी त्यांना थोडे पाणी पाजले आणि गर्दीपासून दूर एका मोकळ्या जागी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शिंदे यांच्या निधनाने कार्यकर्त्यांवर शोककळा
बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभेतील प्रभावशाली नेते मानले जात होते. त्यांच्या निधनाने समर्थक, कुटुंबीय आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. मतदानादरम्यान त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर अधिकृत माहिती समोर येईल.
मतदान प्रक्रिया आणि निवडणुकीवरील परिणाम
घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निवडणूक आयोगाने या घटनेची नोंद घेतली असून, बीड विधानसभा निवडणुकीबाबत पुढील निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 52 नुसार, निवडणुकीदरम्यान एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास संबंधित मतदारसंघातील मतदान पुढे ढकलले जाऊ शकते.
बाळासाहेब शिंदे यांच्या निधनाने बीड शहर आणि जिल्ह्यात दु:खाचे वातावरण आहे. त्यांच्या अचानक जाण्याने निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आला असून, निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष आहे.