गौरव प्रकाशन कल्याण (प्रतिनिधी) : “निसर्ग नियम हा आहे की अन्यायाची परिसीमा होते, तेव्हा विद्रोहाचा जन्म होतो. पिचलेला शोषित माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठला. तो प्रश्न विचारू लागला. याचा परिपाक असा झाला की आंबेडकरी साहित्य अविष्कारले. लेखक त्यातून माणसाची संवेदना मांडू लागला. समताधिष्ठित समाज रचना घडविणे आणि समतेची चळवळ चालविणे हेच आंबेडकरी साहित्य होय” असे प्रतिपादन चौथ्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डाॅ चंद्रशेखर भारती यांनी केले.
प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, बुद्धभूमी फाउंडेशन, वालधुनी, कल्याणी येथे चौथे आंबेडकरी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सचिव डॉ. प्रदीप आगलावे होते. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक निरंजन पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अण्णासाहेब रोकडे, ॲड. प्रकाश जगताप हे विचार मंचावर उपस्थित होते.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
याप्रसंगी डीएमसीटी हॉस्पिटलचे डॉ. रविंद्र जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संमेलनाध्यक्ष निरंजन पाटील म्हणाले की, “नव्या प्रेरणा,नव्या जाणीवा, परिवर्तनशीलता, विज्ञाननिष्ठा, मानवांची गाणी गाणारी भूमिका ही आंबेडकरी साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. आंबेडकरी साहित्य आणि वैश्विक कुटुंबाला विचारांच्या आधारावर व्यवस्था परिवर्तनाशी जोडले आणि एका नव्या पुनर्रचनेच्या परिघावर उभे केले. तर उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले की, “आंबेडकरी तत्त्वज्ञान वैश्विक तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरी साहित्य मनोरंजनाचे साहित्य नाही तर, प्रबोधनाचा विचार माणसाच्या मेंदूत पेरणार हे साहित्य आहे. माणसाला माणूसपण मिळवून देणार हे तत्त्वज्ञान आहे.
या साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले, डी एल कांबळे, एन एस भालेराव, प्रा. आशालता कांबळे, कवी अरुण म्हात्रे, नवनाथ रणखांबे, गझलकार दत्ता जाधव, पाली भाषेचे विचारवंत अतुल भोसेकर, पत्रकार सुनील खोब्रागडे, डॉ. सुषमा बसवंत, प्रा. प्रेमरत्न चौकेकर, अरुण जावळे (सातारा) शाम भालेराव, डॉ. रेखा मेश्राम, डॉ. ग्रीष्म खोब्रागडे, किसन वराडे, मिलिंद जाधव, संदीप कांबळे,अक्षय भोईर, सुभाष आढाव, अनिल भालेराव, भटू जगदेव, प्रमोद बाविस्कर, प्रा. जगदीश घनघाव, वैभव काळखैर,उमेश गोटे, यशवंत बैसाणे, मनीषा मेश्राम, रविप्रकाश ठोंबरे आदी साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवला. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन कवियत्री शुभांगी भोसले यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार साहित्यिक प्रा. युवराज मेश्राम यांनी केले.