भावऋतुंनी बहरलेली ‘अक्षरवेल’
नव्या जुन्या लिहित्या हातांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, नवोदितांमधील सुप्त गुणाला व्यक्त होण्याची संधी मिळावी, जाणत्या साहित्यिकांच्या प्रगल्भ मार्गदर्शनात त्यांना योग्य दिशा मिळावी; अशा अनेक उद्देशाने स्थापन झालेली ‘अक्षरक्रांती फाऊंडेशन’ ही साहित्य चळवळ गेल्या दीड दशकापासून साहित्यविषयक विविध उपक्रम राबवत आहे. मधे माणसाला माणसापासून दूर करणारा कोरोना काळ आला. परस्पर संपर्क ठेवणे अशक्य होऊन माणसे घराघरात बंद झाली. या काळात केवळ वाट्सअप माध्यमातून अक्षरक्रांती समूहाने जे विविध उपक्रम राबवले ते ‘अक्षर’स्वरूपाचे ठरले. काव्यस्पर्धा, अष्टाक्षरी काव्यलेखन कार्यशाळा, अभंग व गजल रचना लेखन कार्यशाळा, समूहातील कवींच्या कवितेचे रसग्रहण अशा कितीतरी उपक्रमांनी समूहातील सभासदांना कायम लिहिते ठेवले. त्यांच्यातल्या प्रातिभकल्पनेला आवाहन करीत, सृजनक्षमतेला जागृत ठेवत अवघड काळातील जगणे सुसह्य, सक्रिय तसेच सकारात्म केले. दिनांक ९ व १० फेब्रुवारी २०१९ मध्ये मृद्गंधचे १ ले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ताज आनंदाश्रम सावंगी तह. कळमेश्वर येथे संपन्न झाले होते. हे संमेलन या समूहाच्या परिश्रमाचे, जिद्दीचे, कार्यसिद्धीचे आणि यशस्वीतेचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येते. यात महाराष्ट्रातून अनेक साहित्यिक संमेलनातील विविध सत्रात सहभागी झालेले होते.
कविता व गझल कार्यशाळा, चर्चासत्रे, राष्ट्रीय कथा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय काव्यस्पर्धा, पुस्तक प्रकाशन अशा विविध उपक्रमातून कायम सक्रिय राहणाऱ्या अक्षरक्रांती फाउंडेशनने १०१ कवितांचा दर्जेदार असा *’अक्षरवेल’* प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करून काव्यप्रांतात आपल्या नावाची ठळक मोहोर उमटवली आहे. सचिन सुकलकर यांच्या ज्ञानपथ प्रकाशनाने ‘अक्षरवेल’ला अंतर्बाह्य देखण्या, नेटक्या, आकर्षक रुपात काव्यरसिकांच्या, अभ्यासकांच्या हाती सोपवले आहे.
कविता समाजमनाला आनंद देते. संस्कार, ऊर्जा, दिशा, विश्वास, जगण्यासाठी बळही कविता देत आली आहे. कविता समाज जीवनाचा आरसा असतो. कवीचा हुंकार असलेल्या कवितेत त्या त्या काळाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. ‘अक्षरवेल’ या प्रातिनिधिक संग्रहात समाविष्ट असलेल्या कविता विविधांगी आहेत. आशय, विषयाच्या मर्यादा पार करून जीवनातील सर्व अंगांना त्यांनी स्पर्श केला आहे. चिंतनाच्या पातळीवर जाऊन काही कवितांनी आत्मवेध घेतला, काहींनी गंभीरपणे जीवन तळाशी साचलेल्या दुःखानुभूतीला स्पर्श केला, सुखदुःखाच्या झुल्यावर झुलत ठेवणाऱ्या क्षणभंगुर आयुष्याला तर काही कवींनी जगण्याच्या न उलडणाऱ्या कोड्याला शब्द दिले. काही कविता कल्पनेच्या स्वच्छंदी अवकाशात मुक्तपणे विहार करतात, काही रसिकांनाही आपल्या शब्दपंखांवरुन फिरवून आणतात. आपापल्या अभिव्यक्ती कौशल्याने, आपल्यातल्या सृजन ऊर्मीने मनमोहक शब्दांची गुंफण करत साकारलेल्या सर्वच कविता मनाला आनंद देतात. तळहातावरून उडून गेलेल्या फुलपाखरांचे बोटाला चिकटलेले रंग तलमतेने या कवींनी रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली धडपड लक्षवेधी आहे.
सुप्रसिद्ध कादंबरीकार व लेखक अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या ‘नाठाळाचे अभंग’ रचनेने या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची सुरुवात झालेली आहे.
मंबाजीची रूपे। पाहिली अनंत।।
तुझा भगवंत। दिसेच ना
संत तुकोबांनी समाजातील दांभिक वृत्तीवर प्रहार केले. भोळ्या-भाबड्या जन-लोकांच्या मनातील अंधश्रद्धेची जळमटं दूर करण्यासाठी जिवाचे रान केले. आजही हे चित्र फारसे बदललेले दिसत नाही. संवेदनशील कवी मनाला खऱ्या- खोट्याशी सामना करताना वैताग येतो; तेव्हा सज्जनांच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी, नाठाळांच्या माथी काठी घालण्यासाठी तुझ्या भगवंताने यावे, अशी या अभंगातील आर्त साद अस्वस्थ करून जाते. वऱ्हाड मातीशी, वऱ्हाडी बोलीशी निष्ठा राखणारे विदर्भातील आघाडीचे कवी विठ्ठल वाघ यांची ‘भूकंप किल्लारी’ नावाची कविता भूकंपानंतरचे भीषण चित्र रेखाटते. मृत्यू अटळ आहे, निसर्ग नियतीपुढे मानव किती थिटा आहे हे सांगताना,
मृत्युच्या या तांडवाचा, खेळ सांगे आंधळा
चंद्रलोका जिंकणाऱ्या, मानवा तू पांगळा
हे वास्तव कवी मांडून जातात. बबन सराडकरांची अल्पाक्षरी रचना जगण्याचे लौकिक भान प्रकट करते. उजेडाची आशा करताच अंधाराने जगणे व्यापून टाकावे, सुखाचा वारा येतो न येतो तोच दुःखाने वेढून घ्यावे.
कंदीलाच्या खाली । अंधाराचे व्रण ।।
तसे घरपण । काळोखले
अशा चपखल शब्दांतून कवीने स्वप्न आणि वास्तवाची सीमा उलगडून दाखवली आहे. या प्रातिनिधिक काव्यसंग्रहातील आरंभीच्या कवितांमधील जीवनचिंतन लक्षणीय आहे.
एकीकडे बुफेच्या नावावर होणारी अन्नाची नासाडी तर दुसरीकडे अन्नाच्या कणासाठी मोताद असलेली उपाशी पोटं यातील विसंगती मांडत कविश्रेष्ठ लोकनाथ यशवंत यांची कविता जीवनाचा वास्तव चेहरा दाखवते. प्रताप वाघमारे यांची ‘सांजपक्षी’ कविता मनाला वेगळ्या विश्वात घेऊन जाते-
मी रेखत असता मूक, आभाळावर चांदणनक्षी
मनात विहरत असतो, आठवांचा सांजपक्षी
अशा ओळी वाचत जाताना तरल भाव, कल्पना, सौंदर्य यांच्यात नकळत मन गुंतून पडतं.
ग्रंथ धर्मग्रंथ, पोथ्यापुराणं वारूळ
साचलीत भोवती आपण अंध
सटवीने कशाला ? आपणच लिहिली ही अक्षरं आपली जखडले बंध
असा वास्तववादी सुर आळवणारी वसंत वाहोकर यांची रचना युगायुगापासून आपल्या मेंदूत भरवलेल्या खुळचट कल्पनांना बाहेर काढण्याचा इशारा करते, सजगतेचे भान देते. समकालीन आघाडीचे कवी गणेश भाकरे यांची वास्तवाला भिडणारी ‘जीव भूतकाळी खुळा’ ही रचना आशय, आकृतीबंधाच्या दृष्टीने अंतर्बाह्य सुंदर आहे. झाली की माय बापांच्या कष्टाचा, प्रेमाचा त्यांना विसर पडतो. ‘कसा विसरला लेक गाव वेशीच्या मातीला’ गाव शहरातील ही विदारक स्थिती कमालीच्या पोटतिडकीने कवीने मांडली आहे.
अर्जुनबानो शेख यांची ‘हे मायमाती..’ ही कविता विशेष पसंतीस उतरली. आशयगर्भता, सहजसुंदर शब्दांची मांडणी, रचनेचा डौल सांभाळणारी मुक्तछंदातील ही कविता नितांत सुंदर आहे. अस्मानी-सुलतानी संकटाच्या झळा, कुरूप होत चाललेल्या व्यवहारी जगातील होरपळ, ऐन हातातोंडाशी आलेला घास पळवून नेणारा निसर्ग या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी ‘मायमाती’कडे
कवयित्रीने केलेली आळवणी अतिशय हृद्य आहे.
वऱ्हाडी बाजाच्या कवितेसाठी आणि सादरीकरणासाठी लौकिक असलेले खुशाल गुल्हाने यांची ‘मोल घामाचं’ ही कविता कृषी जीवनातील वास्तवता सांगून जाते.
भर दांड लुगड्याले सांगे थिगय लावजो
शालू हिरवा जरीचा, साली म्होरल्या पायजो
शेती व्यवसायावर आधारित ग्रामजीवनातील दुखरी कळ कवीने नेमकी टिपली आहे.
वाचकांना आपल्या अलवार शब्दकळांनी प्रेमात पाडणारी,आशय सौंदर्याने नटलेली सरोज गाजरे यांची ‘आलं उधाण आभाळी’ ही कविता निसर्गाची चित्रलिपी साकारते.
‘सारं नाचतं शिवार, गर्भ मृत्तिकेच्या पोटी
शीण विसरून बळी, गाणं भलरीचं ओठी’
कवयित्रीच्या प्रतिभेला आलेले उधाण रसिक मनातही आनंदाचे उधाण आणते.
लीलाधर दवंडे यांच्या ‘पाऊस’ कवितेतील,
फिटे पारणे डोळ्यांचे, दृश्य मनोहर दिसे
माझ्या तरुण मनास, लागे पावसाने पिसे
या सहजसुंदर ओळी मनाला भावतात. पावसाने तृप्त झालेली धरा हिरवाईचा नवा साज लेते तसे कवीच्या प्रातिभकल्पनेला नवसर्जनाचे अंकुर फुटू लागतात. पावसाची विविध रूपं, श्रावण, ऋतू, प्रहर, माती अशा निसर्ग घटकांवरील कवितांनी संग्रहात रंग भरला. सर्वात श्रेष्ठ धर्म माणूसपण! स्वार्थापायी माणूस आपला धर्म विसरत एकमेकांपासून दूर चाललेला आहे. अजिजखान पठाण यांची गझल एकेका शेरातून मानवतेचे दर्शन घडवते.
‘अंतरी जपावी, प्रेम दया शांती
घडवावी क्रांती नव्यासाठी’
असा सकारात्मक भाव मनामनात रुजवणारी चरणदास वैरागडे यांची अभंग रचना अभिव्यक्ती आणि बंध दोन्ही दृष्टीने समृद्ध आहे.
मातीच्या कुशीत धान्य
अन् बाईच्या कुशीत जीव
लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची जातकुळी एकच बाई आणि मातीची…
असा सृजनसोहळा प्रा. मीनल येवले यांच्या लेखणीने रसिकांच्या नजरेत आणून दिला आहे.
ज्या मातीत खेळलो, लहानाचे मोठे झालो, संस्काराचे बाळकडू ज्या गावमातीने पाजले; तिच्याबद्दलच्या उमाळ्याविषयी-
कुठेही असो अन्न पाणी, कुठेही मिळो ठाव
मनाच्या कप्प्यात असतो, गड्या आपला गाव
असा भाव गोविंद सालपे यांनी व्यक्त केला.
साऱ्या जगताला जगवणाऱ्या ‘मायमाऊली’चे उपकार जाणणारी सुचित्रा कुनघटकर यांची रचना तसेच
जल सांडते
हे जगत भांडते
वर्षानुवर्षे,
हे वास्तव सांगणारे एकनाथ गायकवाड यांचे हायकू सकस व समृद्ध आहेत .
अनेक कवींनी आईपणाच्या अवकाशाला जिव्हाळ्याचे शब्द देण्याचा प्रयत्न केला. रसिका येळवटकर यांनी मायलेकीच्या नात्याची घट्ट वीण उलगडत नेली. विद्या निनावे यांनी लेकरांचे भविष्य घडवण्यासाठी मायबाप खस्ता खातात. त्यांना त्यांचीच लेकरं वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात; ही खंत व्यक्त केली.
सांभाळते ती मर्यादा, दोन कुळांची उत्तम
आदर्शाने तिच्या होई दूर जीवनाचा तम
हा भाव व्यक्त करणारी सुलोचना लडवे यांची सहज साधी रचना आहे. संगीता मसराम यांची ‘आई’, विक्रम गांगुर्डे यांची ‘माहेर झालं सुनं’ या रचना याच आशयाच्या आहेत.
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा वावर असून घरदार सांभाळत तिच्या कार्यकक्षा विस्तारल्या आहेत. दुहेरी भूमिका निभावताना होणारी तिची दमछाक काही कवितांनी नेमकी टिपली आहे.
‘बाईपन मिरवनं भाऊ लै कठीण हाय रं’, हे सांगत विजय वासडे यांनी विविध नात्यातील स्त्रीरूपाचे उत्कट दर्शन घडवले. ठिगळाच्या संसारातही ताठ मानेने जगणारी माय शारदा गणोरकर यांनी उभी केली. रक्ताचे पाणी करून लेकरांना सुखात ठेवणारी निशा काळे यांच्या कवितेतील माय मनाला भावते. आज चूलमूल सांभाळून तिच्या मनात अशा आकांक्षाचे अश्व धावू लागले आहेत. नवनव्या दिशा तिला खुणावू लागल्या; त्यामुळे स्त्रीची गगन भरारी कौतुकास्पद आहे; असा भाव कीर्ती लंगडे यांच्या कवितेत आहे. माहेर सोडून सासर आपलंसं करणारी, प्रसवकळा साहून लाभलेल्या मातृत्वासाठी आयुष्यभर झिजणारी स्त्री वंदना घोरसे यांना वंदनीय वाटते तर आयुष्याचे रेशमी, तलम पान नाजूक हाताने रंगवत जावे, सुखदुःख आले तरीही समतोल राखावा; असा सहज व साधा संदेश देणारी अर्चना धानोरकरांची रचना मनाला भावते. बाईपणाची थोरवी देविदास हनुमंत यांनी आपल्या रचनेतून गायली आहे.
कवितेला कुठलाच विषय वर्ज्य नाही. आपल्या आयुष्यातील सुखदुःख, आशा- निराशा, चढ-उतार त्या त्या मनस्थितीतून मांडत कवी शब्दातून मोकळा होत असतो. त्याचे व्यक्त होणे प्रातिनिधिक स्वरूपाचे असते. संकटं आली की माणसाचा धीर सुटतो. कौटुंबिक समस्यांनी मनाचा तोल जातो; पण आलेल्या परिस्थितीशी धीराने सामना केला तर हळूहळू अवघड काळ निघून जातो. राजेश्वर शेळके यांनी ‘होता येईल तेवढं’ ह्या कवितेतून दिलेला संदेश सामान्य माणसाच्या मनाला धीर देतो. असाच आशय व्यक्त करणारी ‘डोंबाऱ्याचा खेळ’ ही मंजुषा कऊटकरांची रचना जीवन प्रवाहाला पुढे नेण्यासाठी ऊर्जावती होते. नशेपायी घरादाराचे, बायका-लेकरांचे होणारे हाल ‘नशापाणी’ कवितेतून श्याम ठक मांडून जातात; तर मानवी जीवन सुंदर आहे. संपत्तीचा अती मोह न धरता येणारा दिवस सुखाने जगून घ्यावा, द्वेष मत्सराने क्षण वाया घालवू नये; असा निमा बोडखे यांच्या रचनेतील भाव एक सुंदर संदेश देऊन जातो.
प्रेम ही जगातील चिरंतन, जिवंत आणि नितांत सुंदर गोष्ट. तिला मिळवण्यासाठी, मिळाल्यावर टिकवण्यासाठी व्यक्तीसापेक्ष आटापिटा सुरू असतो. या प्रेमातच विरहभाव, प्रतिक्षा, समर्पण असं बरंच काही दडून असतं.
काय द्यावे काय घ्यावे का म्हणावे प्रेम याला
तू मला अन् मी तुला का आठवावे या क्षणाला
मंजुषा चौगावकर यांनी प्रेमभाव फुलवत नेतांना प्रेमासोबत आलेली विरहवेदनाही मांडली आहे; तर
तू तर निवळ मुक्तछंद
मी गझल होऊ कि रुबाई
तू किशोरचा नखरेल स्वर
मी बिस्मिल्लाकी शहनाई…
धनश्री पाटील यांच्या ह्या कवितेतील प्रेम, समर्पणभाव अनेक प्रतिमांतून अधोरेखित झालेला आहे.
‘कांचनाचा रेशीम देह, धुपात धुंदलेला गंध’ अशा तरल, सुंदर प्रतिमांनी नटलेली व प्रेमभावनेने तृप्त झालेली विकास गजापुरे यांची शब्दकळा अतिशय लाघवी आणि नितांत सुंदर आहे. ज्ञानेश्वर गायके यांच्या कवितेनं काही अपेक्षा बाळगलेल्या आहेत. तिने डोळे उघडून जगाकडे बघावे, राजहंसापरी पाण्यातून दुध वेगळं करावे, सत्यासत्याचा विवेक जपावा; ह्या बाबी निश्चितच सार्थकी आहेत.
रक्तदान, मैत्री, आग पोटाची, उरल्या त्या आठवणी, प्रकाश, गुरुमहिमा, मनाचा आक्रोश, हुंडा, आताशा, गुंतता हृदय हे!; अशा अनेक सुंदर कविता ‘अक्षरवेल’मध्ये आहेत. दशरथपंथ अतकरी यांची ‘रंग कैरीचा’ ही मराठमोळी लावणी तरूण मनाला हुरहुर लावते.
‘नील’ नावाने काव्य लेखन करणारे सुनील बावणे यांची,
गेला भरून अख्खा कर्जानं सातबारा
मांगू कितीक उसना आता बिया खताले
ही झाडीबोलीतील कविता जनमानसाच्या सुखदुःखांना वाचा देते. चोर सोडून संन्याशाला फाशी देणारी वर्तमान सत्यस्थिती प्रकाश पाटील यांनी ‘जुलमी राजनीती’ कवितेतून मांडली.
वैशाली भोयर यांनी ‘पोशिंदा’ कवितेतून आमच्या शेतकरी बापाला कधी न्याय मिळेल? म्हणून सवाल केला आहे तर मोहन सोमलकर यांची अभंग वृत्तातील रचना शेतकऱ्यांचे जीवन चित्रित करते. शेतक-यांच्या दुर्दशेची कहाणी सांगणा-या कविता संवेदनशील हृदयाला पीळ पाडून जातात.
भीमरायामुळे जीवनाला आकार आला, जगण्यालाच दिशा मिळाली, गुलामीला नकार देता आला; हे प्रा.राजेंद्र कांबळे आत्मविश्वासाने सांगतात. हैदराबाद येथील ज्येष्ठ कवयित्री, लेखिका मीना खोंड यांनी विठुरायाच्या सावळ्या रूपाचा ध्यास घेतलेला आहे. आभाळात जमलेल्या काळ्या- निळ्या ढगातून, टरारून आलेल्या कोंबातून एकूणच चराचरात त्यांना विठ्ठलाचा भास होतो. ‘मुक्तविहारी’ यांची ‘तुझ्याविना’ ही रचना चराचरातील गुढ शक्तीचा वेध घेते.
मनाचे खेळ अगम्य आहेत. त्याचा थांगपत्ता लागत नाही. ‘मन मना जुमानत नाही’ अशा कवितेने मनात शिरण्याचा प्रयत्न केला; तर रंगहीन, वासहीन, स्पर्शहीन, चंचल मनाच्या खेळाचे राजेश गिरे यांनी वर्णन केले आहे. डॉ. लीना निकम यांनी मायमराठीची थोरवी गात ‘पेटून घ्या नव्या दमाने’ म्हणून मराठी मनात प्राण भरला आहे. याच आशयाची भावना गंगमवार यांची ‘लावण्यवती मराठी’ रचना संग्रहात आहे.
ॲड. प्रकाश हेडाऊ यांनी ‘अस्तित्व’ कवितेतून संपूर्ण मानव मात्राच्या कल्याणासाठीचे मागितलेले पसायदान नितांत सुंदर आहे. विज्ञान तंत्रज्ञानाने किती प्रगती केली तरी त्याला निश्चितच काही मर्यादा आहेत. प्रयोगाने रक्त निघत नाही, सज्जनाच्या मनातील पाप एक्सरेने दिसू शकत नाही; हे वास्तव सांगत
शरीर पंढरी । आत्मा पांडुरंग ।।
जीवन अभंग । ज्ञानाचाच
या अभंग रचनेतून शंकर घोरसे यांनी केलेली गुंफण चिंतनीय आहे. अत्यल्प शब्दांतून मोठा आशय सांगणारी प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांची,
मान तू!
शान तू!
उन्मुखी
रान तू!
ही तडीत वृत्तातील ‘गझल’ विशेष लक्ष वेधून घेते. अल्पाक्षरत्व हे तिचे खास वैशिष्ट्य आहे! हे प्रत्यक्षात उतरवत तांडेकरांच्या रचनेतील आशय, मांडणीतील कौशल्य, नावीन्यता उल्लेखनीय ठरते.
सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री व समीक्षक डॉ. शोभा इं. रोकडे यांची अतिशय समर्पक, अभ्यासपूर्ण प्रस्तावना ‘अक्षरवेल’चे सौंदर्य वाढवणारी आहे. प्रस्तावनेत त्या लिहितात की, ‘एक मोठा पल्ला या संग्रहाने गाठला असून विसोत्तरी मराठी कवितेचा जेव्हा विचार होईल, तेव्हा या संग्रहाची दखल निश्चितच वरच्या स्तरावर घेतली जाईल. या संग्रहावर गंभीर चर्चा होईल कारण या संग्रहातील कवी व कविता कमालीच्या सरस आहेत.’ या विधानाशी मी पूर्णतः सहमत आहे.
अनेक प्रातिनिधिक कवितासंग्रहाची कवितेच्या दालनात भर पडत असते. साहित्यसेवा, वाङ्मयप्रतिष्ठा व रसिकनिष्ठा जपण्याच्या उद्देशाने ‘अक्षरक्रांती फाउंडेशन’ने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. आंतरिक तळमळीतून चालवलेले कार्य फळाला आल्याच्या सुवर्णक्षणाचे आपण साक्षीदार आहोत. कवितांशी तडजोड न करता संपादक मा. शंकर घोरसे व कार्यकारी संपादक मा. प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांनी अतिशय सजगतेने, निष्ठेने, जिद्दीने *’अक्षरवेल’* गगनापर्यंत नेण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच विविधांगी कविता ‘अक्षरवेल’च्या रूपाने एकत्रितपणे आपल्यासमोर आल्या.
कविता ही त्या त्या कवीची स्वतंत्र अभिव्यक्ती असते. ती आशयार्थ घेऊन येताना स्वतःचा एक रूपबंध साकारत जाते. या संग्रहात अभंग, मुक्तछंद, भावगीत, अष्टाक्षरी, गझल, हायकू, लावणी अशा विविध रचनाबंधाच्या, विविध आशयाच्या रचना आहेत. भक्तीभाव, प्रेम, मातृत्व, स्त्रीत्वाचे विविध पदर, शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना, निसर्ग, पाऊस, ऋतू, प्रहर, सौंदर्यभाव, महात्म्यांचे गुणगान, मायमाती, मायबोली, देशप्रेम, रक्तदान, भूक, मैत्री, उपेक्षितांचे जगणे, माणूसपण, सामाजिक समस्या अशा जगण्याची निगडित सर्वच विषयांना या कवितांनी स्पर्श केलेला आहे. वर्तमान समाजजीवनाचे, त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून जगणाऱ्या कवींच्या भावविश्वाचे प्रतिबिंब या संग्रहात पडल्याने ‘अक्षरवेल’ वर्तमान समाजजीवनाचा काव्यप्रांतातील एक लखलखीत आरसा आहे. संग्रहात समाविष्ट असलेल्या सर्वच कवींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
– प्रा.मीनल येवले
42,विज्ञान नगर,मानेवाडा
नागपूर
(मो.7774003877)
□अक्षरवेल (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)
□संपादक- शंकर घोरसे
□कार्य.संपादक- प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’
□ज्ञानपथ पब्लिकेशन, नागपूर
□किंमत- 250/-
□पृष्ठसंख्या- 126
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿