आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक…!
देशात झपाट्याने बेरोजगारी वाढत आहे.शिक्षण महाग होऊन ते तकलादू ‘स्वरूपाचे’ दिल्या जात आहे. त्यातून बेरोजगाराची ‘फौज’ निर्माण होत आहे. यावर’ ब्र’ शब्दही न काढणारी तरुण युवक ‘मंडळी’ वेगळ्याच स्वाभिमानाच्या, रूढी परंपरेच्या नादी लागून त्यांचे भवितव्य आधीच ‘बरबाद’ होत असतांना माणसाला ‘तिसरा डोळा’ प्रदान करणारी जन्म झाल्यापासून पहिल्यांदाच ‘अ ब क ड’ शिकवून पाया पक्का करणारी आपल्या भाषेतील आपली मराठी सरकारी शाळा देणगीदाराच्या देणगीने ‘ठोक्याने’ देण्यात येत आहे. यातच ‘दारू’ विक्रीसाठी गावा गावात परवाना देण्याचं सुनियोजित करण्यात आलं आहे. हे सर्व ‘अचंबित’ करण्यासारखं वाटत असलं तरीही त्यावर तरुणाई ‘आवाज’ उठवत नाही. मागचे ‘इतिहास ‘उकरून काढून तरुणांमध्ये वेगळाच जातीय अभिमान पेरला जात आहे. ही बाब सर्वसमावेशक समतेच्या विचाराचं ‘खंडन’ करीत एका विशिष्ट विचाराचं ‘ध्रुवीकरण’ करून आजची पिढी ‘अंदाधुंद’ बनवण्याची विचारसरणी जोर धरू लागली आहे.
शिक्षण हे वाघिणीचे ‘दूध’ आहे ते पिल्यानंतर माणूस वाघासारखा गुरगुरतो… हे महामानव डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ‘लोकशाही मार्गाने ‘लोक आता जेव्हा चालू धोरणावर प्रश्न ‘विचारू’ लागलीत. तेव्हा कुणीच ‘प्रश्न’ विचारू नये, ‘फक्त ऐकत.. रहा बघत रहा’… अशी बघ्याची भूमिका घेत घेत डोळ्यावर ‘पट्टी’ बांधून आज समाज वावरत आहे. अजेंडा ठरवल्याप्रमाणे ‘बेरोजगार’ झालेली माणसे एकदा का व्यसनाधीन झाली, दारू पिऊन आपल्याच सुगलात ‘मश्गुल’ राहून गुंतून गेली की, प्रश्न विचारायची ‘शक्तीच’ त्यांच्यात उरत नाही. अशा अवस्थेत ‘सुशिक्षित बेरोजगार’ हताश होऊन, सांगेल त्याच्या मागे विचाराचं ‘ध्रुवीकरण’ करून’ डोळेझाक’ करून जात आहे. त्याची विवेकशील बुद्धी, त्याला विचार करण्याचं स्वातंत्र, विकसित होऊ नये.. म्हणून त्याला विविध मार्गाने व्यसनाधीन करून त्याच्या जगण्याचं स्वातंत्र्य, सर्वस्व, लुटल्या जात आहे. व्यसनाधीनतेची ‘झळ’ पूर्वी आर्थिक दृष्ट्या दुर्बळ, शैक्षणिक दृष्ट्या दुर्बळ, आणि इतर मागासवर्गीय लोकांना लागली होती. त्यांचे अनेकांचे ‘संसार ‘बरबाद’ झाले होते. श्रीमंताची दारू आणि गरीबाची ‘दारू’ असाही वैचारिक दृष्ट्या भेद बघितल्या जात होता. यात ‘श्रीमंताची दारू’ म्हणजे उच्च प्रतीची दारू, या दारूची कानकून, शेजाऱ्याला सुद्धा लागत नव्हती. रोज-मजुरी ने काम धंद्यावर जाणाऱ्या व्यक्तीला शिनभाग येऊ नये म्हणून, किंवा अर्थार्जनाच्या सगळ्याच वाटा कशा बिकट आहेत..’ याबाबतीत विचार करत ‘चिंतन’करत मनावर आलेला ‘ताण’ थोडा दूर करण्याच्या बहाण्याने घेतल्या गेलेली ही दारू’ पिता पिता’ त्या दारूनेच त्याला अक्षरशः पिऊन टाकलं. हा ‘सर्वश्रुत’ इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. यावर अनेक समाजसुधारकांनी जसे की संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज ,संत निपट निरंजन महाराज यांनी या व्यसनाधीनतेवर अनेक शाब्दिक प्रहार केलेत. संतांनी अतिशय मार्मिक भाषेमध्ये यावर अभंग लिहिलेत, दोहे’ लिहिलेत.. तरीही पिणाराच्या परिस्थितीत ‘फारसा बदल’ होत गेला नाही. कुणी एक संत व्यसनाधीनते बाबतीत चिडून म्हणतो की,
‘ भांग मांगे भुंगडा/गांजा मांगे घी
शराब मांगे जुतीया/ पिना है तो पी..
आणि या ‘दारू’ ने अनेकांना चपलां, बुटांचा महाप्रसाद खाऊ घातला तरीही, ती सहजासहजी सुटली नाही. म्हणून आता नागरिकांनीच विशेषता ‘महिलांनी’ पुढाकार घेऊन, ही व्यसनाधीनता संपुष्टात आणण्यासाठी, आपला’ संसार व्यसनाधींच्या’ आहारी जाऊ नये , यासाठी ‘संघटित’ होऊन, पोलिसात ‘निवेदन’ देऊन कुठलाही ‘समाज’ असो त्या समाजातील व्यक्तीला..या व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यासाठी ‘प्रयत्न ‘करावे लागणार आहेत. अनेक ठिकाणी महिलांनी,व अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘दारूबंदीची आंदोलने’ चालवली आहेत. मात्र काही काळापूरती.. या आंदोलनाची दखल घेतल्या जाते. नंतर मात्र प्रशासनाची ढीलाई, शासनाचे दुर्लक्ष, वा अन्य स्वार्थाच्या कारणामुळे ,या ‘दारूबंदीचे’ नंतर काय झाले? याबाबत कोणालाही त्याचे प्रश्नच पडत नाही.
सरकारला ‘दारू’.. मधून मिळणारा महसूल अधिक मिळतो म्हणून कदाचित सर्वसामान्यांच्या संसाराच्या ‘राख-रांगोळी’ कडे दुर्लक्ष केल्या जात आहे… मात्र आता ही ‘झळ’ सगळ्यांच्याच घराला लागली असल्यामुळे सर्वच स्तरावरून यासाठी ‘विरोध’ होऊ लागल्याचा दिसून येत आहे.
खरंतर प्रत्येक गावांनी अशा अनेक प्रकारच्या ‘व्यसनाधीनतेवर’ लोकांच्या विचारातून, एकत्रीकरणातून सर्वधर्मसमभावाच्या हितकारक निर्णयातून ‘दारूबंदी’ घडवून आणली पाहिजे. असे न होता गावातीलच काही अहितकारक मंडळी ‘मला काय त्याचे..? या अविर्भावात काना-डोळा करून आपलं बरं चाललंय ना..! दुसऱ्याचं काही असो..! अशा भूमिकेतून वाटचाल करीत आहेत. अशा आंदोलनाला फार थोड्या ‘घटकांचा’ आतून पाठिंबा असतो मात्र ऊजागरपणे रस्त्यावर उतरण्यासाठी ती ‘फारशी’ धजत नाहीत.
‘खरंतर ‘गाव ‘हे ‘गाव’ असतं..
त्या गावाच्या ग्रामपंचायतीत
आपलं नाव असतं…
आपल्या जन्माची ‘नोंद’ असते
गावच आपली ‘ओळख’ असते..
गावाने दिलेल्या प्रोत्साहनातच माणूस मोठा होत असतो…!”
त्या गावासाठी ‘आपण ‘काहीतरी देणं लागतो. ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये जर तयार झाली आणि जातिभेदाचा ‘कंकर’ मनातून काढून टाकला की, अशा गावाची ‘सहिष्णुता’ माणूस जन्माला आला आणि चांगल्या पद्धतीने जगून गेला याची ‘अनुभूती’ देणारी असते. नाही तरी एक ना एक दिवस हे जग आपल्याला सोडून जावे लागणार आहे. अनेक ‘माणसे’ या पृथ्वीवर जन्माला आली. ‘भेदाभेद’ करून मरूनही गेलीत. त्यांची ‘राख ही डोळ्यांनी दिसत नाही. त्यांना जाळलेल्या ‘जागेवर’ त्याने केलेल्या पाप पुण्याचा, कोणताच ‘वटवृक्ष’ आपसूकच उगवला नाही. मग का ही ‘गर्वाची भाषा ? का हा ‘उन्माद ?हा कशाचा ‘जयघोष’ करत चाललोय आपण..? एके दिवशी मरायचं आहे तर, आपणही ‘जगा’ आणि दुसऱ्यांनाही जगू द्या.. हल्ली ही भावना ‘दुरापास्त’ होत आहे.
अशातच जास्त प्रमाणात वाढलेला हा व्यसनाधीनतेचा प्रकार, ही ‘ढाब्यावरची चंगळ, दारूपायी माणसाने विकून खाल्लेली लोकशाही..!’ हे उद्या येणाऱ्या पिढीच्या सर्वनाशाचेच ‘ध्योतक’ आहे. म्हणून, आता गावागावात खऱ्या जीवन-मार्गासाठी ‘जागृती’ होणे महत्त्वाचे आहे. अनेक ‘उत्सवाची तोरणे बांधून, त्या उत्सवाखाली जोपासली जाणारी ‘व्यसनाधीनता,’ चंगळ पार्टी’ ही तरुणांना दिशाहीन करणारी ‘बरबाद- क्रांती’ आहे..!
‘कौन कहता है की,
देश बदल रहा है,
देश तो अंधा धुंद होकर
उलटे पाव चल रहा है..!’
हे या देशाचं’ चित्र ‘बदलायचं असेल तर ‘हाताची घडी’ आणि ‘डोळ्यावरची पट्टी ‘काढून ‘व्यसनाधीन’ झालेल्या पिढीचे सुजलेले चेहरे, नीट बघावे लागतील. त्यांच्यासाठी स्वयंरोजगार,आणि देशाच्या शासन प्रशासनातील ‘हक्काचे’ रोजगार ‘उपलब्ध’ कसे होतील यासाठी प्रयत्न करावे लागतील…
आमची ‘व्यसनाधीनता’ आणि तोंडावर ‘पट्टी’ बांधून बसलेले आम्ही भारताचे लोक..या व्यसनाधीनतेमुळे’ ऊद्या’ हताश होऊन असेच राहीलो तर पुढची बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही….याचे ‘भान’ ठेवून डोक्यात भरलेला व्यक्ती भेद काढून ‘निर्व्यसनी समाज’ निर्मिती साठी सज्ज असले पाहिजे ..
‘व्यसनमुक्त गाव’.. निर्मितीसाठी ग्रामसभेमध्ये तसा ‘ठराव’ घेऊन ‘दारूबंदी ‘करण्यासाठी जागरूक नागरिकांनी आणि ग्रामपंचायत स्तरावर तसे’ निर्बंध ‘ लावून गाव व्यसनमुक्त करता येईल… त्यासाठी सर्वांचा पुढाकार अत्यंत गरजेचा आहे… चांगला ‘माणूस’ घडवू या.. निर्व्यसनी समाज निर्माण करू या…
तूर्तास इतकेच….
– प्रा.नंदू वानखडे
मुंगळा जि.वाशिम-9423650468