गरिबीत स्वतःला सिध्द करून दाखविणारी कलाकृती – वेदनेचे काटे
नाशिकचे कवी सोमनाथ आवडाजी पगार यांचा नुकताच “वेदनेचे काटे” हा कवितासंग्रह वाचनात आला. सोमनाथ पगार हे गेली अनेक वर्षापासून कवितेच्या प्रांतात मुशाफिर करीत आहेत, त्यांच्या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून अनुदान मिळाले असून कवी सोमनाथ पगार यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. गुलाबाच्या झाडाची काटेरी फांदी या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर दाखवली आहे , या गुलाबाच्या फांदीला अतिशय गर्भित अर्थ आहे. आपण या कलाकृतीचा साहित्यिक अंगाने विचार करणार आहोत.
माणसाचे जीवन अतिशय सुंदर आहे, आयुष्य गुलाबाच्या फुलासारखे सुंदर जरूर असते, त्याला कष्टाचे पाणी घालावे लागते, नाहीतर जीवनरूपी गुलाबाचे फुल सुकून जाते, कोमेजून जाते. गुलाबाचे फुल काट्यात उमलते, मात्र इतरांच्या जीवनात सुखाची, प्रेमाची अनुभूती देत असते. प्रेमाचे प्रतिक म्हणून गुलाबाच्या फुलाला मानले जाते. कवी सोमनाथ पगार यांच्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरील गुलाबाची काटेरी फांदी हेच सांगते की, या कवितासंग्रहातील कविता अशाच काट्यातून फुलून आलेल्या आहेत.
कवी सोमनाथ पगार यांनी जीवनात अतिशय कष्ट सोसले आहेत, परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या परिवाराला गुलाबाच्या फुलासारखे ठेवले आहे. जगाच्या पसाऱ्यात आपण कितीही संपत्ती मिळवली तरी या सुखाच्या संपत्तीला पहायला जर आईबाप नसतील तर त्यासारखा गरीब कोणी नाही. आईबाप ही सुखाची पाटी असते, आपल्या लेकराच्या सुखात त्यांना आनंद असतो. बाप नसल्यावर लेकरं कशी असतात त्याचे अतिशय विदारक चित्र “मासाविण ढोरं” या कवितेत मांडले आहे. कवी म्हणतात की-
मासाविण ढोरं, तशी आम्ही पोरं,
बापाविन घोर, दिनराती I
ज्याप्रमाणे एखादे जनावर कुपोषित दिसते, त्याच्या अंगावर मांस दिसत नाही, त्याप्रमाणे बापाविना दिनरात मनाला घोर लागून शरीराची जीर्ण अवस्था झाली आहे. यातून कवीने बापाचे जीवनातील महत्व अधोरेखित केले आहे
कवी सोमनाथ पगार यांनी लहानपणापासून गरिबीत जीवन काढले आहे, स्वतःच्या बळावर जिद्दीने शिकून आज समाजात काहीतरी मिळविले आहे याचे सर्व श्रेय त्याकाळच्या परिस्थितीला जाते. परिस्थितीने जगण्याची कला शिकवली, समाजात कसे वागावे याचे ज्ञान दिले, अतिशय दारिद्र्यात जीवन जगून कवीने स्वतःला सिद्ध केले आहे, म्हणून कवी “मशागत” या कवितेत म्हणतात की –
काळ्या पाटीला काळी माती,
पेनाला नांगर समजून,
कच्च्या कोऱ्या माझ्या मेंदूची,
मशागत करतोय
मी दारिद्र्य नागरून” गरीबीचे अतिशय भयाण चित्र या कवितेतून कवी सोमनाथ पगार यांनी उभे केले आहे. पेनाला नांगर समजून दारिद्र्य नांगरून मशागत केली याचा अर्थ शिक्षण घेऊन दारिद्र्य घालविण्यासाठी प्रचंड मेहनत केली..
समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम संतांपासून ते आजच्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांपर्यंत अनेकानी केले आहे. देव आहे किंवा नाही याबाबत अनेक मतमतांतरे झालीत, पण सिध्द अजून कोणी केले नाही. मात्र असे असूनही अंधश्रद्धेपोटी करोडे रुपयाचे दान एखाद्या मंदिरातील देवाच्या दान पेटीत टाकून समाज परमेश्वराकडे सुख मिळण्यासाठी विंनती करीत असतो. हेच दान पेटीत टाकलेले करोडो रुपयाचे दान चोर चोरून नेतो तरीही देव त्याला काही शिक्षा करीत नाही आणि जो याचक दररोज मंदिराच्या दारात बसून परमेश्वराकडे सुखाची भीक मागतो त्याच्या झोळीत काहीच टाकत नाही, तो याचक सुखी होत नाही हा विरोधाभास दाखविण्यासाठी कवी सोमनाथ पगार आपल्या “देव कुलपात बंद” या कवितेते म्हणतात की –
दानपेटीची देवाच्या, होते राजरोस चोरी
देवा व्दारीचा याचक, सुखी होईना भिकारी
कवी सोमनाथ पगार यांचा वेदनेचे काटे हा पहिलाच कविता संग्रह असल्याने कवीला जसे सुचत गेले तसे शब्द कवितेत पेरले आहेत. त्यामुळे नवागताचे नवखेपण दिसून येते. या कवितासंग्रहातील आभार पत्र आणि अर्पण पत्रिकादेखील कवीने काव्यातच गुंफली आहे हे या संग्रहाचे विशेष आहे. या संग्रहातील प्रार्थना, मशागत, आई आमची मराठी, काळाचं औषध, दुरून डोंगर साजरे, येठण, खुरपं, भगदाड, देवा तुज व्दारी या कविता वेगळी अनुभूती देतात.
वेदनेचे काटे या कवितासंग्रहाचे प्रकाशन अनघा प्रकाशन, ठाणे यांनी केलेले असून मुखपृष्ठचित्रकार महेश कोळी यांनी या कलाकृतीला आपल्या कुंचल्याने सजवले आहे. कवी सोमनाथ पगार यांना पुढील दर्जेदार साहित्य कलाकृती निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा.
मुखपृष्ठ परीक्षण :
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृती – वेदनेचे काटे
साहित्य प्रकार – कवितासंग्रह
कवी – सोमनाथ पगार
कवीचा संपर्क – ९२७३३ ५७१५९
मुखपृष्ठचित्रकार – महेश कोळी
प्रकाशक- अनघा प्रकाशन