मनाच्या गाभाऱ्यात ज्ञानाचा दीप सतत तेवत ठेवणारी कलाकृती- शब्दांच्या गाभाऱ्यात
जुन्नर, जि पुणे येथील कवयित्री सरिता म्हेत्रे- कलढोणे यांचा – “शब्दांच्या गाभाऱ्यात” हा काव्यसंग्रह नुकताच वाचण्यात आला. अतिशय कल्पकतेने कवितेतील आशय, विषय समाजातील विविध विषयाला स्पर्श करणारे निवडले आहे. मनाच्या देवळीत ज्ञानाचा दीप सतत तेवत ठेवून समाजाला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाणारा हा काव्यसंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरणारा आहे. या काव्य संग्रहाचे साहित्यिक मूल्य, त्यातील समाजोपयोगी संदेश याची थोडक्यात माहिती आजच्या परीक्षणात करणार आहोत.
“शब्दांच्या गाभाऱ्यात” या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर अतिशय आशयपूर्ण असे संदर्भ चित्रित केले आहे. भिंतीच्या आत देवळीत काही पुस्तके ठेवली आहेत, त्याच्या शेजारी काचेचा कंदील दाखवला आहे, काचेच्या आत मंद प्रकाशात वात तेवत आहे असे चित्र या मुखपृष्ठावर असून कलाकृतीच्या शीर्षकातील शब्द वेगळ्या ढंगात घेतले आहे. यावरून या कलाकृतीच्या अंतर्मनाच्या भावना समजून येतात.
काही आठवणी अशा असतात की, त्या हृदयाच्या गाभाऱ्यात सतत जपून ठेवाव्या लागतात. बाहेरच्या कंदिलाच्या काचेसारख्या अत्यंत नाजूक मनाने त्यांना सांभाळावे लागते. आतील ज्ञानाचा दिवा तेवत ठेवून जगला त्यांचा उजेड देत राहिले पाहिजे. ज्ञान वाढविण्यासाठी पुस्तके देखील वाचली पाहिजेत तरच आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला होऊ शकतो इतक्या गर्भित अर्थाने या मुखपृष्ठावर वरील संदर्भ आलेले आहेत.
ज्याच्या तर्जनीला धरून चालायला शिकलो, ज्याचे अस्तित्व जरी संपले तरी आठवणीचा सुवासिक दरवळ मनाच्या देवळीत सतत तेवत ठेवून आपल्या बापच्या स्मृती जपून कवयित्री सरिता म्हेत्रे- कलढोणे यांनी ही कलाकृती आपल्या वडिलांना अर्पण करून समाजातील तमाम पित्यांना समर्पित केल्याची जाणीव झाली. वडिलांच्या आठवणींचा नंदादीप मनाच्या देव्हाऱ्यात सतत तेवत ठेवून जीवनातील अंधार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या दिशेन वाटचाल करण्याचा संदेश
“शब्दांच्या गाभाऱ्यात” या कविता संग्रहातील प्रत्येक कविता ही अंतर्मनाला स्पर्श करणारी आहे. या संग्रहातील कवितेची सुरुवात “लेक वाचवा लेक शिकवा” या सामाजिक, कौटुंबिक अर्थ असणाऱ्या कवितेने केली आहे. प्रत्येकाला वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा असतो, त्यामुळे मुलीला गर्भातच मारले जाते, मुलीचा जन्म बऱ्याच कुटुंबाला नकोसा असतो, त्यामुळे स्रीभृण हत्यासारखे महापातक काही परिवारातील मंडळी करीत असते. स्रीभृणहत्याची समाजात मोठी दरी निर्माण झाली आहे अशा समाजाला जागृत करण्यासाठी कवयित्री आपल्या “हितगुज तुझं – माझं” या कवितेत म्हणतात की,
गुंफून नव्या नात्यांचा बंध,
भाग्य कन्यादानाचे उरी,
लौकिक वाढवीन वंशाचा
मिटू दे स्रीभृण हत्येची दरी.
स्रीच्या आयुष्यातून जीवनाचा जोडीदार निघून गेल्यावर ज्या वेदना, जे दुःख होते ते विचारांच्या पलीकडचे असते. विरहवेदने मन व्याकूळ होते . देशसेवेत प्राण गमावलेल्या सैनिकाच्या पत्नीच्या विरहवेदना कवयित्रीने अत्यंत भावपूर्ण शब्दात आपल्या कवितेतून व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या “अंगार” कवितेते म्हणतात की – पुसले कुंकू , फुटल्या बांगड्या , विरून गेली सौभाग्य लेणी
कायमची ही विरहवेदना , निःशब्द होत जाते वाणी.
निःस्वार्थ भाव, कर्तव्यदक्ष, देशासाठी केले प्राणार्पण
ऋणातून तुझ्या मुक्ती कधी? व्यर्थ न जावो जीवार्पण
“शब्दांच्या गाभाऱ्यात” या कविता संग्रहातील कविता सामाजिक, कौटुंबिक आशयाच्या असून कवयित्रीने स्वानुभवातून , सहज मनातून आल्या तशा कगदावर उतरवल्या आहेत. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत वडिलांच्या निधनानंतर टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टाने प्रपंचाचा भार सांभाळत कवयित्रीने स्वाभिमानाने जगण्याचा संदेश आपल्या “ स्वाभिमान” या कवितेतून दिला आहे. या कवितेत त्या लिहतात की –
असलं जरी गरिबीचं जीणं , पसरला नाही कुणापुढे हात
भाकरीची भूक भागवाया, कष्टाची सोडली नाही साथ .
“शब्दांच्या गाभाऱ्यात” या संग्रहातील ती, कोंदण, शोध, बाप लेक, जाणीव, हरवलेली माणसे, माणुसकीचा जपूया गंध, माणुसकीचा दीप, माय, वंशाचा दिवा या कविता सामाजिक, कौटुंबिक आशय व्यक्त करतात. पसायदान, सावित्री तू होतीस म्हणून,तिरंगा माझा महान, क्रांतिसूर्य जोतिबा आणि क्रांतीज्योती सावित्री, जयजय महाराष्ट्र माझा या कविता कवयित्रीच्या मनातील देशभक्ती प्रकट करतात.
“शब्दांच्या गाभाऱ्यात” कविता संग्रहाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ७९ वे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लाभली हे या संग्रहाचे भाग्य आहे. यशोदीप पब्लिकेशनच्या रुपाली अवचरे यांनी या कलाकृतीचे प्रकाशन केले असून प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी आपल्या कल्पकतेने या कलाकृतीच्या मुखपृष्ठाला सजवले आहे. आपल्या कवितांमधून प्रेम , सामाजिक, कौटुंबिक, निसर्गसंवर्धन , देशभक्तीच्या विचारांची पेरणी करणाऱ्या कवयित्री सरिता म्हेत्रे- कलढोणे यांना पुढील दर्जेदार साहित्य कलाकृती निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा
परीक्षण-
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परीचय :
कलाकृतीचे नाव- शब्दांच्या गाभाऱ्यात
साहित्य प्रकार – कवितासंग्रह
कवयित्री – सरिता म्हेत्रे- कलढोणे,जुन्नर, पुणे
कवीचा संपर्क क्र. ९६८९९१४८३४
प्रकाशक – यशोदीप पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठचित्रकार – अरविंद शेलार, कोपरगाव