बाईची भाईगिरी- स्त्री जीवनाच्या दाहक कथा
स्विस लेखक जॉन डेव्हिड वायस लिखित ‘द स्विस फमिली रॉबिन्सन’ या साहस कादंबरीतील एलीझाबेद या प्रमुख व्यक्तिरेखेची आठवण मला लेखिका सौ. सुरेखा बोऱ्हाडे लिखित ‘बाईची भाईगिरी’ हा लेखसंग्र्ह वाचतांना प्रकर्षाने झाली. एका मोठ्या वादळामुळे एका निर्जन बेटावर आसरा घेणाऱ्या कुटुंबाची ही कथा जरी असली तरी काही दिवसानंतर एलीझाबेद पती विल्यम व मुले (फ्रीट्झ, अर्नेस्ट, जॅक आणि फ्रांझ) यांना सुरक्षित स्थळी राहण्यासाठी जागा शोधावयास सांगते व ते तिचे ऐकतात सुद्धा. याचप्रमाणे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या कुटुंबांमध्ये घरातील महिलेशी विचारविमर्श करूनच निर्णय घेतले जात असल्याचे सहज लक्षात येते, आणि ही बाब स्वागतार्ह आहे. एकूणच महिलांची भूमिका समाजात महत्वाची असते, हे नक्की. परंतु जर समाजाने स्त्रीची अवेहलना केली, तिच्यावर अन्याय, अत्याचार केला तर तीच स्त्री रणरागिणी बनून रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहत नाही.
परिस्थितीशी दोन हात करतांना पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री तिच्यावर होणाऱ्या जुलमामुळे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पेटून उठते. सहनशीलतेची परिसीमा गाठल्यावर वात्सल्याची प्रतिकृती असलेली स्त्री सूड घेण्यासाठी प्रसंगी टोकाचे पाउल उचलुन नकारात्मक वागू शकते. अशाच काही व्यक्तिरेखांचे चित्रण या लेखसंग्रहात लेखिकेने रेखाटले आहे, मांडले आहे.
स्त्रीयांना समाजात समानता, सन्मान याबरोबर स्वतःच्या जीवनाचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे तसेच मानव म्हणून जगण्याचा हक्क आहे. यासाठी आग्रही असणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब आणि त्यांच्या विचारांच्या सर्व स्त्रीयांना लेखिकेने हा लेखसंग्रह अर्पण करत आपली भूमिका सुरवातीलाच स्पष्ट केली आहे.
‘बाईची भाईगिरी’ हे नावच अंगावर काटा उभा करणारे आहे. एकेक कथा वाचत असतांना आपल्या मनपटलावर सत्य व वास्तव घटना उलगडत जाऊन त्यातील व्यक्तिरेखा मनाचा ठाव घेतात. डॉन हे नाव आपल्या वाचण्या-ऐकण्यात आल्यावर पुरुषाची प्रतिमा आठवते. परंतु स्रीयासुद्धा डॉनगिरी करू शकतात, दहशत पसरवून हुकुमत गाजू शकतात. हे सत्य हा लेखसंग्रहातील लेख वाचल्यावर सहज उमगते. खरं तर सर्वच लेख हे वास्तव आहेत. हे या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करावेसे वाटते.
काही वर्षांपूर्वी बैंडिट क्विन नावाचा चित्रपट पाहिलेला असल्याने या व्यक्तिरेखा समजण्यास, उमगण्यास अडचण आली नाही. गंगुबाई काठेवाली, डाकूंची राणी पुतळाबाई, जुर्म की हसीना, सेक्सरॅकेटची मल्लिका-सोनू पंजाबन, चतुर कारस्थानी जेनाबाई, महालक्ष्मी पापामणी, गॉड मदर – संतोकबेन जडेजा, चंबलची फुलनदेवी- बैंडिट क्विन, प्रेममूर्ती डाकुरानी, सपनाचे स्वप्न, पतीपरायण आशा अशा एकूण अकरा स्रीयांच्या कथा अर्थात लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत.
कोमल हृदयाची मातृवत्सल स्री वेळप्रसंगी पाषाणासमान कठोर होऊन सहजपणे गोळ्या चालवून जीव घेते किंवा सेक्स रॅकेट चालवून आपल्यासारख्याच इतर स्त्रीयांचे आयुष्य उध्वस्त करते, हे सहज न उलगडणारं कोडं आहे. परंतु असे असले तरी हे सारं का घडतंय ? याचं उत्तर म्हणजे त्यावेळची तिची आपबिती तसेच तिला तसे वागायला लावणारे समाजातील घटक होय. या लेखसंग्रहातील व्यक्तिरेखा आपल्या परिचयाच्या आहेत, हे महत्वाचे आहे, उदाहरणच द्यायचे झाले तर अरुण गवळीची पत्नी, बैंडिट क्विन- फूलनदेवी, हसीना पारकर इत्यादी. वाचक दृकश्राव्य माध्यमांतून त्यांच्याविषयी जाणून आहेत.
एखाद्या भोळ्या भाबड्या मुलीला एखादा ठग फूस लावून, लग्नाची आशा दाखवून फसवतो आणि चक्क तिला वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना विकतो, किती भयंकर आहे हे ? अशा नराधमांमुळे त्या मुलीचे आयुष्य बरबाद होते. मग समाज किंवा घरातील मंडळी, कुटुंबीय तिला स्वीकारत नाही. शेवटी तिला पर्याय नसतो. आणि ती त्याच दलदलीत फसत जाते, ती कायमची, जीवनभर. ही फार मोठी चिंतनीय बाब आहे. क्रूर समाजव्यवस्था, पुरुषांची भोगलालसा, वासना अशा बिकट परिस्थतीत फसल्यावर अशा स्त्रीपुढे सर्व मार्ग बंद झाल्याने अखेर ती आक्रमक बनत भाईगिरीकडे वळत डॉन बनते. हे सत्य नाकारून चालणार नाही.
बंदूक हाती घेऊन किंवा हिंसा करून असे प्रश्न कायमचे मिटत नाहीत तसेच समाज सुधारत नाही, त्यासाठी कडक कायदे व तेवढीच कडक अमलबजावणी आवश्यक आहे. आक्रमक होऊन, डॉन बनून काही दिवस सत्ता, झगमगाट अनुभवल्यावर मागे उरतो तो केवळ अंधार आणि अंधार. ‘गंगुबाई काठेवाली’ या लेखातील शेवटच्या परिच्छेद वाचल्यावर ते लक्षात येते; ‘आज गंगूबाईचे कामाठीपुऱ्यातले साम्राज्य संपून पन्नास वर्षे होत आले आहेत. तिच्या काळात कामाठीपुऱ्यात असणारा झगमगाट आता विझला आहे. पूर्वी कुंटणखान्यात अंबेसिडर, मर्सिडीज, बेंटली यासारख्या आलिशान गाड्यांची वर्दळ असे. तिथे आता फक्त उरल्या आहेत उदास, सुन्या कामाठीपुऱ्याच्या गल्या’ … (पृष्ठ क्रमांक २६)
स्री परिथितीशी दोन हात करते. तिलाही सर्वसामान्य जीवन जगावं वाटत असेलच परंतु तिला मागे वळून पाहणं अशक्य असते. मग ती पुढे पुढे जात राहते. ‘डाकूंची राणी पुतळाबाई’ हा लेख वाचल्यावर तसेच लेखिकेने समारोप करतांना केलेले निवेदन वाचून याची पक्की खात्री पटते. ‘पायात घुंगरू बांधून सुरेल आवाजाने आणि सुंदर रूपाने सर्वांना मोहित करणारी गोहर आणि बंदूक घेऊन एका हाताने गोळ्या झाडत सर्वांच्या मनात दहशत निर्माण करणारी पुतळाबाई ही दोन्ही रूपे एकाच स्त्रीची. यातून तिच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची ओळख मिळते. स्त्री ही सौंदर्याची मूर्तिमंत मूर्ती असते. परंतु संतापली की रणचंडीकेचेही रूप धरण करते हे पुतळीबाईच्या कहाणीवरून लक्षात येते’ (पृष्ठ क्रमांक ३२,३३)
हे सर्व असे असले तरीही गुन्ह्याला माफी नाही. अशा महिला वा त्यांची कृती यांचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही, हेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे समाजाला लागलेल्या अशा किडीचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे, त्यासाठी गरज आहे ती समाजाच्या सक्रीय सह्भागाबरोबरच राजकीय इच्छाशक्तीची. या परिस्थितीला काही अंशी स्त्रियाही तितक्याच जबाबदार आहेत. त्यांच्यावर अत्याचार, अन्याय करणाऱ्या पुरुषांइतकाच त्यांचाही दोष आहेच, हे नाकारून चालणार नाही.
सर्वच लेखांची भाषा ओघवती, संक्षेपी व वाचकांना सहज समजणारी आहे. मोजक्या व प्रभावी शब्दात त्यांनी आपले लेख वाचकांना उपलब्ध करून दिलेले आहेत.
लेखिका सौ. सुरेखा बोऱ्हाडे या एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका असून साहित्य क्षेत्रात त्यांची चौफेर मासाफिरी आहे. यापूर्वी त्यांचे अंतरीचे रंग, साद, शामली (या पुस्तकातून सामाजिक व पर्यावरण जागृतीसाठी लेखन), बालक-पालक, लाडकी लेक, काव्य रेखा (कवितासंग्रह), इत्यादी पुस्तके विविध प्रकाशकांनी प्रकाशित केलेली असून रसिक वाचक व साहित्यिकांनी त्यांच्या सर्वच पुस्तकांची दखल घेवून भरभरून स्वागत केले आहे. अनेक दिवाळी अंक, शैक्षणिक मासिकात लेखन यासह त्यांचा शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यात सहभाग असतो.
पुस्तक हातात पडताच सर्वप्रथम पुस्तकाची मांडणी भावली, एखादं क्लासिक बुक अशीच मांडणी या पुस्तकाची केलेली आहे. उगाचच फॉण्ट मोठा ठेवून किंवा पृष्ठांच्या वर, खाली, दोन्ही बाजूला जास्त जागा सोडून पृष्ठांची संख्या वाढवलेली दिसली नाही. त्यासाठी प्रकाशकाचे विशेष अभिनंदन. तसेही चपराक प्रकाशनाने अल्पावधीत आपला नावलौकिक आपल्या दर्जेदार कार्यशैलीमुळे मिळवला आहेच.
या लेखसंग्रहास संतोष घोंगडे यांनी रेखाटलेले मुखप्रुष्ठ अतिशय समर्पक आणि बोलके असून वाचकाला पाने पालटून लेख वाचायला प्रेरित करणारे आहे. लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर हातात बंदूक धरलेली महिला, टोलेजंग इमारती आणि सर्वात खाली WANTED असे इंग्रजीत नाव, अशी ही मुखपृष्ठावर मांडणी करून, रेखाटून या पुस्तकात आत काय दडले आहे याचा सहज अंदाज येतो. तसेच सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री सौ. रेखा बैजल यांची अतिशय थोडक्यात पण समर्पक प्रस्तावना या लेखसंग्रहाला लाभली असून सुप्रसिद्ध प्रकाशक, लेखक आणि संपादक घनश्याम पाटील यांच्या पाठराखणीमुळे पुस्तकाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या शुभेच्छा ! हे या पुस्तकाचे खास आकर्षण म्हणावे लागेल.
हा उहापोह करण्याचे दुसरे कारण म्हणजे शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी हुतात्मा स्मारकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात ‘बाईची भाईगिरी’ या लेखिका सौ. सुरेखा बोऱ्हाडे यांच्या लेखसंग्रहावर/पुस्तकावर ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिक वाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च २०२४ ते दि. २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दर मंगळवारी व दर शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
यापुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत राहवी. साहित्याची सेवा घडावी. काव्य, कादंबरी, कथा, आत्मकथन वाचकांना वाचायला मिळावे. हिच सदिच्छा! सन्माननीय सौ. सुरेखा बोऱ्हाडे मॅडम यांना गिरणा गौरव प्रतिष्टान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!!!
पुस्तकाचे नाव :- बाईची भाईगिरी
लेखिका :- सौ. सुरेखा बोऱ्हाडे, संवाद क्र. ९१५८७७४२४४/ ८७८८४९१६१७
प्रकाशक :- चपराक प्रकाशन, पुणे
ISBN :- 978-93-86421-63-0
प्रस्तावना : सौ. रेखा बैजल
पाठराखण :- घनश्याम पाटील
शुभेच्छा :- लीना बनसोड
स्वागत मूल्य :- ₹ १५०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
आस्वादक: सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.
@followers @highlight #marathipoems #followers #pandharpur #vitthalrakhumai #poetry #aashadhiekadashi #highlightseveryone #marathipoems