सोशल मीडियाचा राक्षस.!
झोपायची वेळ झाली म्हणून फेसबुक बंद करून रमाने फोन बाजूला ठेवायची वेळ झाली आणि तितक्यात तिला फेसबुक वर एक मेसेज आला.तो मेसेज तिच्या बरोबर कॉलेजात शिकायला असणाऱ्या एका मित्राचा होता.तशी रमाच्या विवाहाला बरीच वर्ष झाली होती आणि तिची मुले ही विशीची होती.पण फक्त कॉलेज मध्ये सोबत असल्यामुळे त्या मित्राची व तिची ओळख आज ही होती.त्याचा मेसेज होता कि मला तुझ्या इतकी जवळची मैत्रीण कुणीच नाही ग.मेसेज वाचून रमा दचकली आणि आधी तिने आजूबाजूला पाहिले कि नवरा तर आसपास नाहीना.
तिने सर्व प्रथम तो मेसेज डिलिट केला.कारण या मित्राचा फ्लरटिंग करण्याचा खरा स्वभाव तिला माहीत होता.तिच्या मनात त्याच्या विषयी काहीच आकर्षण नव्हतं.पण हाच मेसेज जर चुकून तिच्या नवऱ्याने वाचला असता तर तिच्या सुखी संसारात संशय नावाच्या राक्षसाचा प्रवेश कधी झाला असता हे त्या कुटुंबाला कळलेही नसते.कारण असं म्हणतात कि -“संशय नावाचं काल्पनिक भूत मनाच्या ज्या दरवाजाने आत येतं, त्याच दरवाजाने विश्वास नावाचं पाखरू उडून जातं,परत कधीही न येण्यासाठी.”
हा प्रसंग वर्णन करण्याचं कारण म्हणजे नुकतीच पोलीस खात्याच्या भरोसा सेलची जिल्हयाची आकडेवारी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे.त्यात त्यांनी असं म्हटले आहे कि सोशल मीडिया मुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत.त्यांच्या अहवालानुसार या दहा महिन्यात एक हजार सहाशे चौदा तक्रारी परस्पर विरोधी दाखल करण्यात आलेल्या आहेत.सर्व तक्रारी या फेसबुक,व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम यावर जोडीदाराला तिसऱ्या वेगळ्या व्यक्तीकडून आलेल्या मेसेजमुळे झालेल्या भांडणाच्या आहेत.इतक्या मोठ्या प्रमाणात भरोसा सेलवर आलेल्या या तक्रारींची ही आकडेवारी विचार करण्याइतकी अधिकृत असली तरी इभ्रत जाईल या भीतीने दाखल न झालेल्या तक्रारी निश्चितच यापेक्षा ही जास्त असतील. हाताच्या बोटावर चालणारी सोशल मीडियची ही आयुधं माणसाला गवसली आणि खरंच एक युद्धच सुरू झालं असं म्हटले तर अजिबात वावगं ठरणार नाही.
काय बोलावं,कुठ बोलावं याचं भान नसणारे लोक समोरच्या व्यक्तिच्या आयुष्यावर आपल्या एका चुकीचा काय परिणाम होईल याचा कोणताही विचार न करता रात्री उशिरा सोशल मीडियावर चालू होतात.कदाचित बलवर्धक औषध पोटात गेल्याचा तो परिणाम असेल.समोरची व्यक्ति ही स्री आहे.तिला कुटुंब आहे.घरात इतर ही सदस्य असतील. आपला मेसेज घरातील दुसऱ्यांनी वाचला तर एक घर बरबाद होईल याची किंचितही परवा या अप प्रवृत्तींना नसते.
कुटुंबाचं जाऊ द्या,पण त्या महिलेच्या चांगल्या चाललेल्या आयुष्यात आपण मिठाचा खडा टाकतोय याचं ही काहीच शल्य यांना नसतं. महिलांनीही थोडासा विचार करायला हवा कि बाहेरचा माणूस आपल्या दुःखात खरी साथ देईल का ? आपले कुटुंबच आपले उत्तम पाठबळ असते.मग याचा विसर का पडावा ?
या दृष्टीने मला प्रिया तेंडुलकर यांची लग्न ही कथा आठवते.त्या असं म्हणतात कि लग्न झालेले काही पुरुष समाजात सज्जन म्हणून वावरतात.पण प्रत्यक्षात ते मेणाच्या घरातले चिमणे असतात.ज्यांची नजर कायम शेणाच्या घरातल्या कावळीवर असते. ते तिच्या परिस्थितीचा फायदा कधी घेता येईल या संधीची वाट पाहत असतात.तर काही महिला हायफाय आणि भौतिक रेलचेलीत राहण्यासाठी आणि मौजमजेसाठी सोशल मीडियातून पुरुषांच्या संपर्कात वेगळ्या प्रकारे राहतात. प्रिया तेंडुलकर त्यांच्या लग्न या कथेत पुढं असं म्हणतात कि अशी महिला म्हणजे त्या सज्जन विवाहित चिमण्याची सुखवस्तू चिमणी असते.असे झाल्यामुळे समाजातील बाकीच्या चांगल्या महिलांना ही लोक तसेच समजायला लागतात.
वास्तविक पाहता गडद अंधार असतांना ही कडकडणारी वीज पूर्ण तेजाने चमकत असते. तशाच काही महिला आपले स्वत्व आणि आपली तत्व घेऊन संकटाच्या अंधारात ही तळपत असतात.तुम्ही म्हणाल कि व्यक्ती स्वातंत्र्य नावाची काही गोष्ट आहे की नाही? हो आहे ना.पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. नैतिकता म्हणून स्वतःची स्वतःवर काही बंधने असणे आवश्यक आहे.सुखी संसाराची स्वप्न पाहत लग्नाच्या बोहल्यावर उभं राहून संसार सुरू झाल्यावर
असे मानव निर्मित अडथळे मध्ये येत असतील तर दोघांनी ही बसून त्यावर विचार विनिमय करायला हवा.
घरातल्या जोडीदाराबरोबर तोंड फुगवून मैलो दूर असणाऱ्या अनोळखी माणसाशी गट्टी करायची आणि मग वाटोळं झालं की दुःखाच्या भावसागरात बुडायचं.बाहेरच्या परक्या व्यक्तीसाठी आपल्या जिवाच्या जोडीदाराबरोबर प्रतारणा करायची आणि मग तो जेव्हा त्याचं खरं स्वरूप दाखवतो तेव्हा मग रडायला माणूस राहत नाही.चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते तसे सोशल मीडियावर प्रेमाने बोलणारा माणूस तुमच्या वर खरं प्रेम करेलच याची खात्री नसते.घरात बायकोला मारहाण करून सोशल मीडिया वर महिलांवर शाब्दिक प्रेम उधळणारी जात काही कमी नाही.
आजची तरुण पिढी बरी, अशी थोडं वय झालेल्या बाबतीतील लोकांची तऱ्हा आहे.विशेष म्हणजे आजकालचे लोक सुशिक्षित असून ही असे वागतात.पूर्वीची लोकं निरक्षर होती. पण मनाने शुद्ध होती.माणुसकीचा झरा त्यांच्या अंतरात सतत वाहता असे.आजकाल कोणाचा फायदा कसा घेता येईल याची माणसे वाट पाहत असतात.मग प्रश्न असा पडतो कि – “तंत्रज्ञानाच्या प्रगतीने नेमके आम्हाला असे काय दिले,कि जे हाती येताच आम्ही आमचे मूल्य,निष्ठा आणि संस्कार गमावले.” यावरून एक उर्दू शेर आठवतो तो असा-
वो अंधेरेही भले थे,कदम सलामत थे,
रोशनी लायी है मंजिल से बहोत दूर हमे.
जास्त दूर पाहायच्या नादात माणसं जवळचं गमावतात. सोशल मीडिया च्या नादात असं होऊ नये इतकंच….
-सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
8421426337