एक आठवण
माझा उत्कट प्रतिपाळ करणारी आई कौसलबाई; जिला आम्ही सारे माय म्हणतो. जिने एकदाही मला शिळे खाऊ दिले नाही. हातची सारी कामे सोडून शाळेच्या वेळेवर ताजी भाकरी शेकून दिली. जिने माझ्या वाचनवेडाला कळत, नकळत हातभार लावला. स्वत: निरक्षर असूनही ! म्हणजे कसा ? तर माय रात्री उशिरापर्यंत घरातली कामे उरकत असायची. इतर सारे झोपून गेलेले असत. तिला हुरहूर (भीती) वाटायची. मी मात्र चिमणीच्या उजेडात वाचत असलेला.
तिच्यासोबत, तिच्यासाठी जागत बसलेला. मधेच ती विचारायची, ‘ बाबू अशोक, झोपला काय रे ? झालंच आता, थांब जराकसा, दोन-चारच भांडे राह्यले धुवाचे. मंग इतकी ओसरी झाडली का बस्स ! ’ मी पुस्तकाचे पुढचे पान उलटायचो. नंतर माय म्हणायची, ‘ चाल झोप आता. ’ माय थकल्याने लगेचच झोपी जायची. माझे वाचन (अभ्यास नव्हे ) सुरूच असायचे. नंतर माझ्यावरही हळूहळू झोपेचा अंमल चढू लागायचा. झोप लागते न लागते तोच जाग यायची. डावा पाय दुखू लागायचा. थोडे दुखणे कमी झाल्यावर उजवा पाय दुखायचा. मी आवाज न काढता रडत राहायचो. या कुशीवरून त्या कुशीवर.. कड बदलत तळमळत राहायचो. मायची माय ( आजी ) लुंगा बाई असली तर ती उठायची, पाय चेपून द्यायची. तेल चोळून द्यायची. मात्र आजी नसेल तेव्हा मी निमुटपणे सारे सोसत राहायचो. आपल्यासाठी उगाच कशाला मायला, तात्याजीला त्रास द्यायचा, कशाला झोपमोड करायची त्यांची ? असा विचार करत झोपण्याचा प्रयत्न करायचो. कुठूनतरी लांबून महादेवाच्या गाण्याचे आर्त स्वर कानावर पडत. तीच माझी अंगाई ! दिवसभरातले काही सुखद क्षण मला थोपटायचे. कधीतरी मग झोप लागायची. सकाळी सारे उठल्यावर, शेवटून खूप उशिरा मी उठायचो.(अजूनही दहा वाजताच उठतो.)
तात्याजी मायला सांगायचे, ‘ त्याला आताच उठवू नको, झोपू दे भरपूर. रात्री उशिरापर्यंत वाचत होता. ’ मायने घर सारवलेले. मी झोपलो होतो तेवढी जागा फक्त सारवायची राहून गेलेली. माझ्या दुखऱ्या आयुष्यग्रंथाचे मुखपृष्ठच जणू !
– अशोक विष्णुपंत थोरात.