समाजाचे प्रतिबिंब ( अक्षरशिल्प )
एकाकी मनाला जेव्हा कुणाची तरी साथ हवी असते तेव्हा लेखणी ही मनाचा मोठा आधार होते. त्यासाठी साहित्याची आवड आणि वाचनाची गोडी निर्माण होणे गरजेचे आहे. ती गोडी निर्माण झाली, तसे भोवताली वातावरण मिळत गेले की मनात काव्यविचार आपोआप रुजत जाते आणि मग कवीचा जन्म होतो. मनाला त्यातूनच आनंद मिळते. पुढे तेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सावलीसारखे काव्यरुपातून कवीच्या सोबत राहतात.. अशाच काही कारणाने कवीचा झालेला जन्म आणि त्यांच्या विचारातून जन्माला आलेले अक्षरशिल्प वाचनीय असा कविता संग्रह.
अक्षरशिल्प कविता संग्रह हा कवीच्या अंतरंगाची ओळख करून देणारा सत्य आरसा आहे. त्यांच्या विचारातील शब्दसामर्थ्य आणि अनुभवलेले विश्व त्यामुळे साहित्यजगतातील ती जिवंत कलाकृती भासते. जेव्हा जेव्हा समाजात, अवतीभोवती काही विपरीत घटना घडतात तेव्हा त्यांचे मन विद्रोह करायला लागते.. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या लेखणीला सत्याची धार आहे. प्रगल्भ अनुभवाची साथ आहे. आणि सखोल वैचारिकतेची जोड आहे, म्हणूनच हा संग्रह समाज मनाचे भान जपणारा आहे. समाजात लोक ज्या प्रकारे मुखवटे लावून वावरतात ते बघून त्यांचे मन क्रंदन करते तर कधी मन आक्रोश करते आणि कधी मन प्रेमाने हळवे पण होते. आयुष्यातील सुख दुःखाचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या कसोटीवर सत्य रेखाटत आलेला शब्दप्रवाह म्हणजेच प्रा. कृष्णा कुंभारे यांचा “अक्षरशिल्प” काव्यसंग्रह. या संग्रहात एकूण १०७ कविता/ अभंग असून सर्वच कविता समकालीन काव्यप्रांतात एक स्वतंत्र वेगळा ठसा उटविणाऱ्या आहे. प्रस्तावना राम भोंडे ‘ शांतेय’ यांची असून, अभिप्राय ख्यातनाम समीक्षक डॉ द. भी कुलकर्णी आणि महाकवी सुधाकर गायधनी यांचा आहे.. तर शुभेच्छा प्रा. अरविंद तरार आणि प्रा. सुषमा सोळंके यांच्या आहे.
त्यांच्या संदर्भ या कवितेतून ते म्हणतात..
कोळ्या वाल्मिकीचे संदर्भ खूप झाले
पार्थिवा चोपडून डालडेही तूप झाले
आज समाजात चालू असणाऱ्या दांभिकतेवर प्रहार करतांना ते म्हणतात. हल्ली ज्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता, नीतिमत्ता नाही त्यांनाही विवेकाच्या पंगतीचा मान मिळतो. या आंधळ्या जगाला खऱ्या खोट्याचे भान राहिले नाही. श्रद्धा, शील, करुणा या अंतरंगी फक्त नावाला उरल्या. इथे नावासाठी लाचार होतात ही खंत त्यांनी कवितेतून व्यक्त केली..
पुढे याचे उदाहरण देताना “षडयंत्र” या अभंगात ते म्हणतात..
मुखी जनसेवा/मनी षडयंत्र
सोलण्याचे तंत्र/ बगलेत
आरतीने आता/ देशात काजळी
सूराच पाजळी/ भावनेत
जनसेवेचा झेंडा जरी हातात आहे तरी मनात सहकार्याचे, मदतीचे कुठलेही भाव नाही. असतो तो फक्त दिखावा. अशी लोक मनात एक आणि जनात एक अशी दोन रूप घेऊन फिरत असतात. मनात मानवजातिविषयी अनेक निर्दयी भाव मनाच्या आत घर करून असतात. दुसऱ्यांना दाखवायला खूप भक्ती करतात, पण स्वभावात भूतदया हा गुण अभाव असतो.
पुढे “रक्तविडा” या कवितेतून सर्वांचे रक्त एक असूनही धर्माधर्मात होणारी भांडणे कवी मनाला वेदना देवून जातात.
अकारण रक्तच इथे
रक्तासोबत भांडत आहे
पिसाळल्या मेंदुसवे
देशी रक्त संडात आहे
इथे लोकांच्या मेंदूला त्यांनी पिसाळल्याची उपमा दिली आहे. कारण ज्यांचा मेंदू कमी असतो तेच अशी कृत्य करतात. असे कवीला वाटत असावे..
“आत्माराम” या अभंगातून कवी स्वच्छंद झालेल्या आणि स्वैराचाराकडे झुकलेल्या मनाची अवस्था मांडतांना दिसते. समाजात जो काही उन्माद माजलेला आहे त्यामुळे त्यांचे मन सैरभैर होतांना दिसते. त्या पार्श्वभूमीवर ते लिहतात.
पंचभूता हाती/ कैवल्याचा दीप
बोकाळला लूप/ घरीदारी!
पुढे “कर्पुरदान” या कवितेत कवी म्हणतो ज्या देशात बाळ रागतांना पसायदान शिकविले जाते. आणि प्रत्येक घरातून अभंग बोलले जातात प्रभू नामाची अवीट गोड कर्पुरदानात सांगितली जाते. त्याच स्वदेशी ढोल वाजविणाऱ्या देशात विदेशाची बोली प्रत्येक तरुण मुलगा बोलतो. ही खंत व्यक्त करतांना कवी लिहितो!
मर्द मराठी माय माऊली हिरव्या रानात
ढोल स्वदेशी बोल विदेशी तरण्या कानात
सध्या जी शिक्षण देण्याची पद्धत आहे, त्यात मुले काय शिकतात त्यांना काय शिकविले पाहिजे त्यापेक्षा मुले शाळेत आली पाहिजे म्हणून त्यांना गुंतवून ठेवणारी यंत्रणा अधिक प्रभावी ठरत आहे. ही व्यवस्था कवीला अस्वस्थ करते त्यातूनच ते “मेवा” या अभंगात लिहितात..
अक्षरांचा दीप / जळो अखंडित
न व्हावा खंडित/ खिचडीत!
पुढे
खिचडी परीस/ शब्दार्थी द्या मेवा
ऐका गुरुदेवा / माझी मात!
“लोक ‘ स्व- तंत्र’ या कवितेत कवी म्हणतात एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या, कुटील नीती आणि जीवघेणे षडयंत्र रचणाऱ्या समाजात खरोखर मानवी विकास झाला की हे षडयंत्र आहे हा प्रश्न कवी मनाला पडलेला आहे. म्हणूनच कवी लिहितो..
नव्या युगाचा नवाच मंत्र
घाव अघोरी प्रसवे यंत्र
हे षडयंत्र की लोक स्व-तंत्र
रक्तफुलांच्या वेदि-वरती
रक्त पिसासू कुटील मंत्र
कसा म्हणू मी या लोक स्वतंत्र
पुढे “आंधळी जाणिव” या अभंगात लिहितात
बोकाळला भोंदू/ आतंकीत मेंदू
सांग कुठे गोंदू/ लोकशाही
आणि याचसाठी “भाविक मायदेशा” या कवितेत देशाला विनवणी करतांना दिसतात.
पांघरू नकोस देशा
हे वेड शांत हाती
निष्पाप ठार होता
उठाव क्रंदना घे!
“पाखरांनो सावध” या कवितेत वर्तमानाची स्थिती कवी मनाला अस्वस्थ करते तरुणींनी फुलपाखरा सारखे अल्लड न राहता आता सावध व्हायला पाहिजे, कारण चालतांना प्रत्येक वाटेवर धोका आहे. कुठे जीव घशात येईल सांगता येत नाही ही अनामिक भिती व्यक्त करतांना कवी लिहितात.
वर्तमानाच्या भुताटकी वाड्यात
जिवंत प्रेत बहरतील अन्
स्मशान वितळतील
तेव्हा पाखरांनो सावध
पुढे
ज्ञान शिखरावर झेप घेतांना
नाक्यावर भेटतील
अंगठा मागणारे द्रोणाचार्य
तेव्हा पाखरांनो सावध
समाजाची मानसिकता रेखाटतांना कवी मन उदास होते, तेव्हा मानवी स्वभावातील त्रुटी “बेनूर उजेड” या कवितेतून ते विषद करतात.
तेजाळता भूक सारी कवाडेच बंद त्यांची
आज धुंद तेरविला फराळी अंगुर होता
जेव्हा जिवंत असतांना त्या जिवंत जिवाला अन्नाची गरज होती तेव्हा ते द्यायला मनाची सर्व दारे बंद करून घेतली, पण त्याच व्यक्तीची तेरवी करतांना नानाविध पक्वांनाचा वास सर्वत्र फिरत होता.. या मानसिकतेवर आपल्या कवितेतून कविने प्रहार केलेला आहे.
व्यथाफुले माळता ती घातली ना साद कोणी
पेटत्या पिंजऱ्यात गाव किर्तनी चूर होता
मानवी मनाचे दुःख जाणून घ्यायला कुणी साद घातली नाही , पण त्याच गावातील लोक एकीकडे मानवाला आधार न देता, कीर्तनात दंग होतात.. या जगात लोकांची लोकांप्रतिची वागणूक आणि देवप्रती आस्था या विसंगत विचारांची सांगड घातलेली आहे.
“तुळस भांगात” या कवितेत एका विराणीची व्यथा मांडतांना दिसतात. जिला श्रीरंग ओल्या श्रावणातही उदास भासतो. खिन्न मनाने आपले नशीब मांडतांना कवीच्या शब्दातून, पुढील ओळी..
तुझ्या पदरात नक्षी
माझ्या लक्तरात काठ
तुझ्या अधरात गीत
मी तो पाझरता माठ
स्वधर्माचे पालन करतांना, जीवनाचे तत्त्वज्ञान समजणारे कवी सत्य स्वीकारून आचरणात पण आणतात. आणि ते त्यांच्या पुढील “सावली” या कवितेतून दिसून येते. कवी म्हणतात.
लाखात एक माझी सावली सोबतीला
केले कधीच ना मी स्वप्नात दूर तिला
पुढे
गुंतता हात हाती धर्मास जागलो मी
सत्यास पेरतांना केव्हाच त्यागलो मी
कवीला कविता जेव्हा भेटायला येते तेव्हा ती त्यांना ती सुखाचं लेण असणारी सखी वाटते. सखी या कवितेत कवितेशी असलेले नाते ते विषद करतात.
सखे तुझ्या हाती
सुखाचं लेणं होतं
दान, आयुष्याचं
मलाही देणं होतं
जन्माजन्माचं हे नातं
खूप खूप जुनं होतं
शेवटी शेतकऱ्यांची व्यथा माडतांना कवी सरकारला वेठीस धरतो. पावसाचा कुठलाही भरवसा नसतांना कर्ज काढून शेती पिकविली जाते.. आणि निसर्गाने घात केला तर शेतकरी हवालदिल होतो. ही परिस्थिती कवी मनाने जवळून बघितली आहे म्हणूनच शेतकरी व्यथा मांडण्यास त्यांची कविता यशस्वी झाली..
मरण येत नाही तरी मरावेच लागते
बँकेचे व्याज दादा भरावेच लागते
पुढे
सरकारी जलस्याची योजना जाते बळी
बेहोशित शेतकरी पेटवतो होळी
सरणाले विझवून पांगावचं लागते
स्वार्थासाठी मानवतेला काळीमा फासणाऱ्या विकृत मानसिकतेवर लिहितांना कवी ज्यांच्या मुळे स्वराज्य मिळाले त्याच बापूला कवितेतून संदेश पाठवतात.
ऐका, बापू मन संदेश
रक्त थारोळी बुडतो देश
आतंकीत या पिडा देऊनी
कळ्या चिरडण्या उत्सुक वेस
समाजातील, देशातील, सध्य स्थिती पाहता बोकाळलेला स्वार्थ आणि ज्यांच्यामुळे आज स्वातंत्र्य उपभोगतो ज्यांनी देशासाठी प्राण दिले ज्यांनी यातना सहन केल्या त्यांचा पडलेला विसर पाहून कवी लिहितात..
अमर वीरांनो, तुमच्या रुधिराचा रक्तीमा
उधळतो आम्ही, मदमस्तपणे पश्चिम क्षितिजावर
तेव्हा विसर पडतो अमर ज्योतीचा
आणि शेवटी आयुष्य देणारी जन्मदात्री यांच्या बद्दल लिहितांना कवी म्हणातो.
आईसारखी असते आई
गोरी असो वा काळी
आईसारखा धरणीवर या
अनमोल खजिना नाही
प्रा. कुंभारे सरांचा “अक्षरशिल्प” हा काव्यसंग्रह समाजमनाचे प्रतिबिंब आहे. काव्यप्रांतातील एक अनुभवी, गूढ आकलनाची शब्दसामर्थ्य घेऊन आलेली वाचनीय अभिव्यक्ती आहे. शब्दावर प्रभुत्व असले आणि जाणिवांची हृदयाला पीळ असली की अक्षरशिल्प जन्माला येतो. शब्दमांडणी, आशयघनता, विविधता, परत परत वाचायला भाग पाडणारी अभ्यासक जोड, सकस आणि समृद्ध असा वेगळ्या धाटणीचा काव्यसंग्रह म्हणजे “अक्षरशिल्प” प्रत्येकाने वाचून त्यातील विविध विषयांच्या कवितांना अभ्यासावे. पुस्तक संग्रही ठेवावे. प्रा. कुंभारे सरांच्या साहित्यकृतीला खूप खूप शुभेच्छा देते! अक्षरशिल्प मला वाचायला मिळाला, त्यावर लिहिण्याची संधी प्रा. कुंभारे सरांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते.
कवी:- प्रा. कृष्णा कुंभारे
प्रकाशक :- नाथे पब्लिकेशन लिमिटेड, नागपूर
पुस्तक परिचय
सौ निशा खापरे
नागपूर
7057075745