प्रा.नंदू वानखडे हे एक हरहुन्नरी,उत्साही आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.ते केवळ कवी,लेखकच नाहीत तर उत्तम चित्रकार,गीत, संगीतकारही आहेत. शिवाय स्वतः आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते देखील आहेत.नुकतेच त्यांच्या चवथा कवितासंग्रह, ‘अंतर्मनातील आंदोलने’ आणि सोबत ‘ ज्याला नाही माय’ हा एक कथासंग्रह या दोन्हीचे एकत्र प्रकाशन प्रस्तुत लेखकाच्या हस्तेच गोंदिया येथे झाले.
या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान त्यांच्या कुटुंबवत्सलतेचाही परिचय घडला.त्यांचे वडीलही विचारपीठावर होते.सूनेकडून त्यांनी सत्कार स्वीकारला. मुलाने लहानपणी काढलेल्या उत्तम रेखचित्रांचे प्रदर्शन देखील यावेळी लावले गेले होते.
सूत्रसंचालन त्यांची मुलगी जुही करत होती.एकूण त्यांचे पूर्ण कुटुंब समरसून यात सहभागी होते.
ते स्वतः कृषी अधिकारी आहेत.पाहुण्यांचे स्वागतही त्यांनी त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष असल्याने पाच वेगवेगळ्या धान्याच्या छोट्या छोट्या पुरचुंड्यांची टोपली देऊन केले. एकूणच अभिनव असा हा कार्यक्रम होता.
‘कथा’ त्यांनी लिहिल्या आहेत मात्र कथा हा काही त्यांचा लेखनाचा घाट नव्हे.त्यांनी तो प्रयत्न करून बघितला आहे. कविता मात्र त्यांची उत्तम आहे. अर्थात् ती आंबेडकरी प्रभावाची अभिव्यक्ती आहेच. पण कवी म्हणून नंदू वानखडे यांची काही जाणवणारी वैशिष्ट्ये आहेत.ती इथे नोंदवली पाहिजेत.
‘ अंतर्मनातील आंदोलने’ असे या कवितासंग्रहाचे’ शीर्षक ‘असले तरी ही आंदोलने मुळात समाजमनाची आहेत.कारण या कवीचे ‘अंतर्मन हे मुळात शोषणमुक्त समाजरचनेसाठी धडपडणाऱ्या कवीचे मन आहे, पर्यायाने ते जनमानस आहे.ही आंदोलने ही त्यामुळे जनमानसाची आंदोलने,त्याची अभिव्यक्ती झालेली आहे.
कवीचे अंतर्मन,त्याचा स्व यांची घडणच समकालीन वास्तवाचे सखोल, सार्थक असे निरीक्षण, विश्लेषण व त्यावर चिंतन करत झाली असल्याचे या कवितासंग्रहातील कवितांवरून दिसते. या कविता वास्तवाचे नुसते चित्रण नसून त्यावरचे त्या कवीचे भाष्य देखील आहेत.
मुळात हे भाष्य जनहितैषी आहे.ज्या काळात ते ही कविता लिहित आहेत तो काळ हा विद्रोहाचा एकेकाळी पेटलेल्या पाण्याचा थंडगार,गोठलेला बर्फ झालेला काळ आहे.परिवर्तनाच्या विझलेल्या आशांची राख देखील झालेला काळ आहे,समतेसाठीच्या त्या राज्यघटनेच्या क्रांतीचे प्रतिक्रांतीमध्ये रूपांतर झालेला काळ आहे.
अशा काळात जिथे धग दिसेल तिथे तिला फुंकर घालून पेटवण्याचा प्रयत्न ही कविता करतांना दिसते. परिवर्तनाच्या लढाईत परिवर्तवाद्यांचा दारुण पराभव झालेल्या काळात ज्या निष्ठेने हा कवी ही समतेच्या संवादाची कविता लिहितो आहे ती नवभारताची उभारणी करण्याचे जे घटनात्मक मूल्याधारित काम स्थगित केले गेले आहे. त्याला चालना देणारी कविता हा कवी लिहितो आहे.
ज.वि.पवार यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे विज्ञानवादी वैचारिक संस्कार लाभलेल्या कवीची ही सडेतोड कविता आहे. जोवर वळ उमटवणारी,झळ पोहचवणारी,मळ जपणारी सामाजिक व्यवस्था कायम आहे तोवर आरक्षण कायम राहील हे ठाम उत्तर ती देते. अजूनही जर समाज अंधश्रद्धच राहणार असेल तर ‘विज्ञानाच्या पदव्या कोणत्या अग्निकुंडात जाळायच्या असा थेट प्रश्न ती विचारते.स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही भाकरीचाच प्रश्न अजून पाठलाग सोडत नाही, ही स्थिती कवीला अस्वस्थ करते.देश म्हणजे काय कुणी लावलेला सेल आहे? का असा प्रश्न ती उपस्थित करते.
एवढ्या नैराश्यातही विवेकाचे दिवे पेटवण्याचे आवाहन करणे ती सोडत नाही आणि परिवर्तनासाठी शब्द हेच शस्त्र मानत,शब्दशक्तीवरचा व त्याच्या आवाहनक्षमतेवरचा आपला लोकशाही विश्वास ती ढळू देत नाही. जीवन सुंदरच आहे मात्र वाढत्या अपेक्षा हे त्याला असुंदर करण्याचे कारण आहे हा बुद्धाचा मार्ग ती अधोरेखित करते.
उजेड लेऊन येतील कष्ट आणि काळोखाला त्यामुळे खोडून काढू हा श्रमप्रतिष्ठेवरचा दुर्दम्य आत्मविश्वास ती व्यक्त करते. यापुढे कोणताही अवतार होणार नाही आहे,तर आपल्यातल्या प्रत्येकालाच सूर्य व्हावे लागणार आहे.हे तिला कळलेले आहे,हीच आजची नेमकी गरज आहे.
जीवनाचा अर्थ समजून घेणारा ही कविता हा एक दीर्घ संवादच होत जाते. भाकरीला आग लागूनही पेटून न उठणाऱ्या, विझलेल्या समाजाला चेतवण्याचे व्रत घेतलेली कविता नंदू वानखडे लिहित आहेत.ज्या काळात ते हे काम करत आहेत त्या काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही कविता एकूणच परिवर्तनवादी कवितेच्या परंपरेत अतिशय ठाम पावले टाकत आली आहे हेच तिचे महत्त्व आणि वैशिष्ट्य.