निसर्ग संवर्धनाचा संदेश : ‘उद्याच्या श्वासासाठी’
निसर्ग संवर्धनाचा संदेश : ‘उद्याच्या श्वासासाठी’
नुकताच दि. २२ डिसेंबर ०२३ रोजी सायंकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पुण्याचे कवी आणि वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी रामदास पुजारी यांच्या “उद्याच्या श्वासासाठी” या काव्यसंग्रह कलाकृतीचे प्रकाशन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी “अध्यक्ष मा डॉ. श्रीपाल सबनीस” याच्या हस्ते पार पडले. निसर्गासंदर्भातील काव्यात्मक घोषणा संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सूचित करून चिंतन हे पुजारी यांच्या कवितेचे सूत्र आहे. समाज जगविणारा आणि जागविणारा विचार त्यांच्या काव्यातून दिसून येतो. माणसाच्या माणूसपणाला साद घालणारी त्यांची कविता आहे असे कौतुक करून डॉ श्रीपाल सबनीस यांनी या काव्यसंग्रहाची पाठराखण केली.
काव्यकलाकृतीचे साहित्यिक मूल्य जाणून घेण्यासाठी ही कलाकृती वाचणे गरजेचे आहे. या कलाकृतीच्या अंतर्रंगात फेरफटका मारण्यासाठी मुखपृष्ठ समजून घेणे गरजेचे आहे. कोणतीही कलाकृतीचे वाचन करण्याआधी त्या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरचे संदर्भ लक्षात घेतले पाहिजे. मुखपृष्ठ हा त्या कलाकृतीचा आत्मा असतो असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.
आई-वडिल आणि निसर्ग हे जिव्हाळ्याचे विषय असल्याचे सांगून लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना रामदास पुजारी म्हणाले: हवा,जल व जमीन सुरक्षित राहिली, लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन वृक्ष संवर्धन झाले तरच उद्याच्या पिढीला श्वास घेणे शक्य होणार आहे. उद्याच्या पिढीला श्वासासाठी प्राणवायू मिळण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व्हावे, निसर्गाशी संवाद वाढावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कवी रामदास पुजारी यांच्या “उद्याच्या श्वासासाठी” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर लिहण्यासारखे असे काय आहे? तर या मुखपृष्ठावर एक झाड आहे, या झाडाच्या फांद्यामधून जाळाचे लोळ दिसतात, झाडाच्या फांद्यांमधून शुभ्र आकाश दिसत आहे. वर झाडाच्या फांदीवर दोन चिमण्या बसलेल्या आहेत. एक चिमणी वर चोच करून दुसऱ्या चिमणीला काहीतरी सांगत आहे. तर एका कोपऱ्यात पाखराचा खोपा दिसतो त्या खोप्यात लहान पिल्ले दिसत आहेत. या झाडाच्या फांदीवर एक शाळेतील मुलगा टोपी घातलेली आणि झाडाच्या खोडावर पाय खाली सोडून बसला आहे.
या मुखपृष्ठाचे मी अतिशय बारकाईने निरीक्षण केले असता मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी या चित्राततून अतिशय प्रभावीपणे निसर्गसंवर्धनाचा मोलाचा संदेश दिला आहे. कवी रामदास पुजारी आणि प्रकाशक “साहित्यविश्व प्रकाशन” यांच्या संकल्पनेतून या मुखपृष्ठाला सजवण्यात आले आहे. आपण या मुखपृष्ठाचे वाचन करून यातून निसर्गाचे निरीक्षण करू. या मुखपृष्ठावर एक झाड आहे, झाडाच्या फांद्यावर जाळाचे लोळ दिसतात- याचा अर्थ असा आहे की, निसर्गाचा प्रकोप वाढला आहे, उन्हाच्या दाहकतेने झाडेवेली जळून खाक होत आहेत, ज्याप्रमाणे आग लागल्यावर आगीचे लोळ आसमंतांत उसळतात तशी दाहकता यातून दाखवली आहे. तसेच झाडाच्या फांद्यांमधून शुभ्र आकाश दिसत आहे याचा अर्थ असा की, वातावरणातील ओझोन वायूचा स्तर कमी झाल्याने प्रचंड ऊन्हाचा चटका जाणवतो आहे. निरभ्र आकाश हे वातावरणातील प्रखरता दर्शवते असे मला जाणवते.
झाडाच्या फांदीवर दोन चिमण्या बसलेल्या आहेत. एक चिमणी वर चोच करून दुसऱ्या चिमणीला काहीतरी सांगत आहे. याचा अर्थ असा आहे की, मानवाने निसर्गाचा -हास केल्यामुळे मुक्या जीवांचा आकांत चालू आहे. जणू काही एकमेकांना या -हासाची माहिती सांगून मानवाने कसे अतिक्रमण केले हे एक चिमणी दुसऱ्या चिमणीला सांगत असावी. कुठेच पाण्याची उपलब्धता दिसत नाही, भविष्यात या सृष्टीचे कसे होणार हा विचार तर या मुक्या पक्षांच्या मनात येत नसेल?
निसर्ग जर वाचवायचा असेल तर त्याला लहान मुलांसारखे जपावे लागते. ज्याप्रमाणे आपण आपल्या लहान लेकराला जपतो त्याचप्रमाणे या निसर्गाच्या प्रत्येक घटकाला जपले पाहिजे. तरच ही सृष्टी हसतखेळत राहिल हा महत्त्वाचा संदेश या मुखपृष्ठावरील बसलेल्या मुलाला माध्यमातून दिला असावा. झाडांची जोपासना केली तर वातावरणात गारवा राहिल आणि त्यामुळे आपले आरोग्य देखील मुखपृष्ठावरील मुलांसारखे निरोगी राहिल हा अर्थ यातून मला भावला आहे.
जगातील वाढती लोकसंख्या आणि प्रचंड वेगाने वाढणारे उद्योग यामुळे जंगले नष्ट होत आहेत. सिमेंटच्या जंगलाची वाढती समस्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
जागतिक पातळीवर निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. केंद्र सरकारकडून ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी दरवर्षी करोडो झाडे लावण्यासाठी वृक्षारोपण ही संकल्पना राबवीत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक जंगले कमी होऊन गगनचुंबी सिमेंटची जंगले वाढल्याने निसर्गाचा -हास झाला, पर्जन्यमान कमी झाले, भूजल पातळी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वातावरणातील ऑक्सिजनच्या प्रमाणात घट होत असून शुद्ध, नैसर्गिक हवा श्वास घेण्यासाठी मिळत नाही. वाढत्या वाहनांच्या धुरामुळे हवेचे प्रदुषण होऊन हवा दुषित झाली आहे, पशुपक्षी आणि मानवी आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊन जीवन धोक्यात आले आहे.
“उद्याच्या श्वासासाठी” आज निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही तर वृक्षतोड कमी करून वृक्षसंवर्धन करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. हा भविष्यासाठी मोलचा संदेश या मुखपृष्ठाच्या माध्यमातून दिला आहे. निश्चितच या कलाकृतीचे वाचक स्वागत करतील यात शंकाच नाही.
मुखपृष्ठ परिक्षण
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क -७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)