नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!
‘बंजारा विरासत वस्तुसंग्रहालया’चे उद्घाटन झाले. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च पदावर असलेल्या बड्या मंडळींच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. या समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांचे राजकीय वजन आणि वलय पाहता गर्दी जमविणे आवश्यकच होते. त्यासाठी तांड्यांना लक्ष्य केले गेले. तांडे हे गर्दीचे एकमेव स्रोत होते. कार्यकर्ते जिद्दीला पेटले होते. नेत्याच्या प्रतिष्ठेचा आणि राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्याला गर्दीनेच उत्तर देता येणार होते. त्यामुळे कार्यकर्ते गर्दीसाठी आसूसले होते. रात्रंदिवस एक करून तांडे पालथे घालत होते. एकतर सोयाबीन काढण्यासाठी तांड्यात धावधूप सुरू होती आणि त्याचवेळी नगाराभवनचाही धामधूम सुरू होता. तांड्यांकडे वेळ नव्हता. उन्हापावसात राबराब राबून काळेठिक्कर पडलेल्या त्या थकल्याभागल्या लोकांपुढे सुंदर सुंदर स्वप्ने अंथरली गेली. पोहरादेवीत प्रत्यक्ष प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि मोठमोठ्या खात्यांचे सगळे मंत्री येणार आणि आपल्या समाजाचे प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न सुटणार अशी प्रलोभने त्यांना दाखविली गेली. बंजारा समाजाचा आणि पोहरादेवीचा कायापालटच होणार असा आभास पसरवून तिथे गर्दी केली गेली.
लोकार्पण सोहळ्याच्या प्रास्ताविकात चार-दोन समस्यांचे पाढे वाचले गेले. लोकांच्या समाधानासाठी ते आवश्यकच होते. खरेतर कार्यक्रमाचा हेतू स्वच्छ असता तर प्रास्ताविक भाषणानंतरची भाषणे फरार झाली नसती. बंजारा समाजाच्या समस्या विचारात घेऊन नेतेमंडळी आपले विचार मांडतील या सम्यक अपेक्षेने लोकांनी गर्दी केली होती. एखाद्या ज्वलंत प्रश्नावर आज नक्कीच भरीव तोडगा निघेल या ठाम विश्वासने लोक एकत्र आले होते. पोहरादेवीमध्ये प्रत्यक्ष प्रधानमंत्रीच आले आहेत तर त्यांच्याकडून एखादी समाजहिताची घोषणा निश्चितच होईल या हेतूने हातची कामे टाकून लोकांनी गर्दी केली होती.
परंतु नेत्यांच्या अपेक्षा पूर्णतः वेगळ्या होत्या. गर्दीला मनुवादी सत्तेकडे खेचण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. त्या दिशेनेच त्यांची बौद्धिक झटापट सुरू होती. गर्दी आणि नेत्यांमधील विसंवाद स्पष्टच जाणवत होता. नेतेमंडळींना बंजारा जमातीच्या समस्यांसंबंधी काहीही कर्तव्य नव्हते. बंजारा ही विवंचनाग्रस्त आणि उपेक्षित जमात आहे असा वास्तववादी सूर एकाही नेत्याच्या भाषणातून उमटला नाही. नेतेमंडळींच्या आस्थेचा हा विषयच नव्हता. त्यामुळे लोक संभ्रमित झाले. कार्यक्रमाचे औचित्यच त्यांना कळेनासे झाले. कधी ती प्रधानमंत्र्याची गौरवसभा वाटत होती, तर कधी ती शिवसेना (एकनाथ शिंदे) बीजेपीची पूर्वनियोजित प्रचारसभा वाटत होती. परंतु काही केल्या बंजारा विरासत वस्तुसंग्रहालयाचा लोकार्पण सोहळा तो वाटत नव्हता. नगाराभवनचे निमित्त पुढे करून नेते आपल्या स्वयंघोषित (अजैविक) विकासपुरुषाचे पवाडेच गात होते. आपण बंजारा लोकसमुदायांपुढे बोलत आहोत, नाईक साहेबांच्या कार्यक्षेत्रात आहोत याचे कोणालाच भान नव्हते. पूर्वाश्रमीच्या संबंधांमुळे केवळ एकाच नेत्याला नाईक साहेबांचे आणि सुधाकरराव नाईकांचे स्मरण झाले. प्रधानमंत्र्यांसकट इतर कोणाच्याही भाषणात नाईक साहेबांच्या नावाचा साधा उल्लेखही झाला नाही. उलट प्रधानमंत्र्यांनी आपल्या पारंपरिक सूडबुद्धीच्या भावनेने काँग्रेसला शिव्याशाप देण्याचा सपाटाच सुरू केला. वेगवेगळे अतार्किक युक्तिवाद करून काँग्रेसने बंजारा समाजाला कसे प्रवाहाबाहेर फेकले आणि या समाजाचे ते स्वतः कसे मसीहा आहेत हे आपल्या भाषणातून पटवून देण्याचा आटापिटा करीत होते.
वास्तविक पाहता पोहरादेवीला येण्यापूर्वी त्यांनी थोडे गृहपाठ करायला हवे होते. बंजारा जमातीचे प्रारूप कसे आहे?, या जमातीच्या भावविश्वाच्या अजिंठ्यावर कोणत्या विचाराच्या सौंदर्यलेण्या कोरल्या गेलेल्या आहेत?, या जमातीची परमवंदनीय स्थाने कोणती आहेत?, या जमातीला भेडसावणारे प्रश्न कोणते आहेत? या प्रश्नांच्या उत्तरांचा त्यांनी शोध घ्यायला हवा होता. काँग्रेस आणि बंजारा यांतील नातेसंबंधांच्या मुळ्या तांड्यांच्या मातीत किती खोलवर रुजलेल्या आहेत याची पडताळणी करायला हवी होती. या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांनी पूर्वचिंतन केले असते तर नेहमीसारखी बेताल वक्तव्ये त्यांना टाळता आली असती. इतर राज्यात करतात तशी तर्कशून्य आक्रमक मुजोरी महाराष्ट्रात आणि त्यातही पोहरादेवीसारख्या बंजाराबहुल परिसरात त्यांनी केली नसती. त्यांना इथल्या सांस्कृतिक वास्तवाची गंभीर जाण असती तर त्यांच्या भाषणाने गर्दीचा हिरमोड झाला नसता. परंतु याची तमा बाळगण्याची त्यांना गरजच वाटली नाही. मनुवादाच्या कार्यशाळेत तयार झालेल्या त्यांच्यातील सत्तांध मनोवृत्तीने महाराष्ट्राला आधुनिक करणारे आविष्कार त्यांना दिसूच दिले नाही. मुद्दामहूनच या नितांतसुंदर आविष्कारांकडे ते डोळेझाक करीत आहेत हे लोकांच्या लक्षात आले आणि लोक त्यांच्या भाषणातून उठून जाऊ लागले.
खरेतर यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या नावांचा उच्चार न करता महाराष्ट्रात विकासाच्या गोष्टी करताच येत नाहीत. कारण ही नुसती राजकीय नावे नव्हेत, ही पुरोगामी जीवनदृष्टीची नावे होत. आधुनिक मूल्यांच्या धर्तीवर महाराष्ट्राची उभारणी करून या राज्याला विकासोन्मुख करण्यात या नावांनी दिलेले योगदान फार महत्त्वाचे राहिले आहे. परंतु या मालुक्यपुत्ताने जाणीवपूर्वकच ही सर्वांगसुंदर नावे दुर्लक्षित केली. काँग्रेसने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात येऊच दिले नाही हे सांगणे फार सोपे असते. परंतु विद्यमान सत्तेने मागील दहा वर्षांपासून बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणते प्रयत्न केले याचे उत्तर ही सत्ता देऊ शकत नाही. याचे उत्तर देणे म्हणजे सत्तेचे पितळ उघडे पडणेच होय. प्रधानमंत्र्यांकडे या प्रश्नाचे उत्तरच नव्हते. त्यामुळे काँग्रेसवर दोषारोपण करणे हाच त्यांच्याकडे एकमेव पर्याय होता. स्वतः काहीही करायचे नाही आणि ज्यांनी काहीतरी करून दाखविले आहे त्यांना दोष देत राहणे ही कर्तृत्वशून्यताच असते. कर्तृत्वशून्यतेचा काळ हा भूतकाळ असतो. निष्क्रीयता ही सतत भूतकाळातच रमत असते. भूतकाळातच आपले सावज ती हेरत असते. हा घुमजावच असतो. काँग्रेसने बंजारा समाजाल प्रवाहाबाहेर फेकले हे सांगण्याआधी स्वतःची कर्तृत्वे मोठी केली पाहिजे. परंतु वर्तमान सत्तेच्या खात्यात काँग्रेसला थिटी करणारी कर्तृत्वे दिसत नाहीत. अशावेळी हा देश भ्रष्ट सत्तेच्या नेतृत्वात कसा मागास होत गेला आणि या दहा वर्षांत पारदर्शक नेतृत्वात तो कसा प्रगत होत आहे हाच कित्ता सतत गिरवत राहावे लागते.
काँग्रेसने बंजारा समाजासाठी काय केले, हे प्रधानमंत्र्यांनी सांगण्याची गरज नाही. काँग्रेसने दीर्घ काळ नाईक साहेबांच्या आणि सुधाकररावांच्या रूपाने महाराष्ट्राचे नायकत्व बंजारा समाजाला दिले. त्यामुळे तांड्याचे नायक महाराष्ट्राचे महानायक झाले. काँग्रेस आणि बंजारा यांचे राजकीय संबंध मैत्रीपूर्णच होते. हे सहसंबंध भारताच्या राजकारणाने पाहिले आहे. या सहसंबंधात द्वेष नव्हता. ते द्वेषाचे राजकरण नव्हते. महाराष्ट्राच्या सर्वकल्याणाचेच ते राजकारण होते. ते संविधानाच्या सन्मानाचेच राजकारण होते. काँग्रेसने नाईक साहेबांकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवून त्यांच्या कर्तबगारीचा, नेतृत्वगुणांचा आणि दूरदृष्टीचा गौरवच केला आहे. काँग्रेसने बंजारा समाजाला दिलेली ती शाबासकीच होती. नाईक साहेबांच्या रूपाने बंजारा समाजाला राजकीय प्रतिनिधित्व (आरक्षण) देऊन काँग्रेसने संविधानाचा सन्मानच केला आहे.
परंतु विद्यमान सत्तेला या देशात संविधानाच्या सदिच्छांचे राजकारण करताच आले नाही. मागील दशकापासून या देशात संविधानाची पायमल्ली करणारे राजकारण सुरू झाले आहे. संविधानाला गौरव वाटेल अशी धोरणे या देशात राबविलीच गेली नाहीत. सत्तेचे हे संविधानद्रोहाचेच दशक ठरले. ज्या लोकसमूहांच्या सर्वकल्याणसाठी संविधान जन्माला आले त्यांच्याच हातून हा द्रोह केला जातो आहे. भारताच्या संविधानाने इथल्या तमाम साधनवंचित लोकसमूहांना साधनसंपन्न करण्याची प्रतिज्ञाच केली आहे. परंतु या प्रतिज्ञेचे मर्म इथल्या विवंचनाग्रस्त लोकसमूहांनी समजून घेतले नाही. खरेतर या लोकसमूहांसाठी हा अग्निपरीक्षेचाच काळ आहे. अशा अवघड काळात या लोकसमूहांनी आपण सूर्यकुळाचे लोक आहोत याचे भान अधिक प्रखर करायला हवे. इथल्या अभावग्रस्त लोकसमूहांना आपल्या सांस्कृतिक पूर्ववैभवाचे गंभीर भान असते तर नगाऱ्यांच्या पडघममधून संविधानाचे बुलंद स्वर आज कानावर पडले असते. नगाऱ्यांवर मनुवाद्यांची थापच पडली नसती.
परंतु इथले विवंचनाग्रस्त लोकसमूह मनुवाद्यांनी दिलेल्या अज्ञानाने भारावून गेलेले आहेत. इतके, की मनुवादी शोषणसत्तेचे विश्वासू आणि निष्ठावंत रक्षकच ते बनले आहेत. परिवर्तनाचे उगम नष्ट करण्यासाठी या वेठबिगार लोकांचा वापर केला जातो आहे. ब्राह्मण धर्माच्या आदेशानुसार या वेठबिगारांनीच पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना संपविण्याचे काम केले आहे. अज्ञानाच्या अफूचाच हा प्रताप आहे. हेच अज्ञानवीर कोडबिलाच्या विरोधात होते. महाडच्या आणि काळाराम मंदिराच्या आंदोलनांना याच लोकांनी विरोध केला होता. परिवर्तनाचा उजेड वाटणाऱ्या आबाचा खून त्याचेच लोक करतात. अज्ञान माणसांना विचार करूच देत नाही. आपले मित्र कोण आणि शत्रू कोण या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत त्यांना जाऊच देत नाही. या लोकांना अज्ञानाच्या अहंकारात गुंग करून इथले मनुवादी लोक सत्तास्वामी झाले आहेत. त्यामुळे प्रबोधनाचे सर्वच नगारे आता शरणागती पत्करत आहेत. या नगाऱ्यांच्या तोंडांची सर्जरी करून त्यात मनूच्या जिभेचे प्रत्यारोपण केले जात आहे. हे सांस्कृतिक ऱ्हासपर्वच आहे. स्वाभिमानाचा विसर पडला की सांस्कृतिक ऱ्हासपर्वाला गती येते. मागील दहा वर्षांपासून इथे हेच सुरू आहे. त्यामुळे इथले अल्पसंख्य लोक आणखीच अल्प होत चाललेले आहेत. अल्पसंख्य लोक अल्प होत जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने अल्पसंख्य असलेल्या अभिजनांना बहुसंख्य करणे होय. अभिजन बहुसंख्य होणे म्हणजे शोषणसत्ताकांचे हात बळकट करणेच होय. शोषकांचे हात सशक्त होणे म्हणजे संविधानाच्या ध्येयातील भारत अशक्त करणेच होय. नगाराभवनच्या लोकार्पण सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेले भाषण हे याचेच प्रतीक होय. बहुजनांचे विघटीकरण करणे हाच त्यांच्या भाषणाचा इत्यर्थ होता. बहुजनांचे विघटन हे शोषकांचे सामर्थ्यच असते. शोषणसत्ता बलदंड व्हावी यासाठी बहुजनांना परस्परविरोधी अस्मितांमध्ये विघटित केले जाते. भारतीयत्व या एकसंधतेला सुरुंग लावणाराच हा प्रकार असतो. मागील दशकभराच्या काळात इथल्या राजकीय सत्तेने आणि सत्तेतील धर्मांध नेत्यांनी केलेली भाषणे ही जमातवादाला शक्तिशाली करणारीच आहेत.
जमातवादी प्रवृत्ती ही राष्ट्रद्रोहीच असते. राष्ट्रद्रोह आणि संविधानद्रोह ह्या दोन वेगळ्या गोष्टी नव्हेत. भारताच्या संविधानाला मनुस्मृतीचा पर्याय देण्यासाठी इथल्या शोषणसत्तेने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या शोषणजीवी धर्मांध सत्तेचे गौडबंगाल हा देश मागील दहा वर्षांपासून पाहत आला आहे. तरीदेखील अभावग्रस्त लोकसमूहातील काही सत्तांध नेते आपल्या समूहांना शोषणसत्तेच्या दावणीला बांधण्याचा कट रचत आहेत. अशा धूर्त नेत्यांपासून साधनवंचित लोकसमूहांनी आता सावध झाले पाहिजे. जमातवाद आणि समाजवाद यात परस्परविरोधच असतो. तांडा समाजवादी जीवन जगणारा लोकसमूह आहे, तर धर्मांध शोषणसत्ता जमातवादाचा पुरस्कार करणारी आहे. साधनवंचितांचे शोषण करणे हाच जमातवादाचा हेतू राहिला आहे. हा हेतू संत सेवालाल महाराजांनी ओळखला होता. हा दुष्ट हेतू पुढे म. फुल्यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नाईक साहेबांनीही ओळखला होता. जमातवाद आपल्या जहरी सुळेदातांचा डंख गोरगरिबांच्या वस्त्यांना मारणार नाहीत याची तजवीज भारताच्या संविधानात करण्यात आली आहे. परंतु आपले संधीसाधू नेते संविधानाच्या विरोधात गेले आणि जमातवाद गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये घेऊन आले. गावातांड्यात जमातवादाचा शिरकाव झाल्यामुळे तिथे जातीयतेची विषारी निवडुंगे फोफावू लागली आणि त्यांच्यातील बंधुभाव ओसरू लागला. त्यांच्या सहसंबंधात परस्परद्वेषाचे टोकदार भाले उभे झाले. नगाराभवनचा लोकार्पण सोहळा हा याच मनोवृत्तीतून मनुवादी सत्तेने केलेला एक प्रयोग आहे. या प्रयोगाची रसायने संघभूमीत तयार झाली. संघभूमीच्या प्रयोगशाळेत ती तयार केली गेली आणि त्याचे प्रात्यक्षिक नगाराभवनच्या निमित्ताने तांड्यात झाले. लोकार्पण सोहळ्याचा मूळ हेतूच हा होता. त्यामुळे अत्यंत जाणीवपूर्वक सेवालाल महाराज आणि नाईक साहेब हे क्रांतिकारी आविष्कार दूर ठेवले गेले. प्रधानमंत्र्यांनी सेवालाल महाराजांचे नाव घेणे ही त्यांची मजबुरी होती, तर नाईक साहेबांचे नाव न घेणे हे त्यांची राजकीय खेळी होती. काँग्रेसवर मुक्तपणे आगपाखड करता यावी यासाठी आखलेला हा राजकीय डाव होता.
खरे पाहता काँग्रेसवर आगपाखड करण्याची ती जागाच नव्हती. तो राजकीय स्टेजही नव्हता आणि ती विधानसभेच्या निवडणुकीची प्रचारसभाही नव्हती. तो नगाराभवन या बंजारा विरासतीचा उद्घाटन सोहळा होता. या सोहळ्याचे औचित्यच मुळात वेगळे होते. त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या भाषणाकडून तांड्यांना फार वेगळ्या अपेक्षा होत्या. प्रधानमंत्र्यांचे भाषण हेच त्या सोहळ्याचे एकमेव आकर्षण होते. प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणातून तांड्यातील प्रश्नांचा वेध घेऊन त्यांना विकासाची शाश्वती द्यायला हवी होती. तसा आश्वासक शब्द द्यायला हवा होता. या शब्दासाठी तांड्यांनी तिथे तळ ठोकला होता. प्रधानमंत्री हा देशाचा असतो. तो कुठल्याही एका पक्षाचा वा कुठल्या गटातटाचा नसतो. त्याची ध्येयधोरणे ही केवळच पक्षहिताची नसतात, तर ती देशहिताचीच असतात. ती लोककल्याणकारीच असतात. लोकांचे सर्वहित साधण्यासाठीच लोकांचे पालकत्व त्याने स्वीकारलेले असते. देशातील लोक समान स्तरावर नसतात. त्यांना समस्तर करण्याची मुख्य जबाबदारी ही प्रधानमंत्र्यांची असते. त्यासाठीच त्याचे पालकपण असते. देशात काही कुपोषित लोक असतात, काही उपाशी असतात, काही अर्धपोटी असतात, काही गरीब असतात, काही मध्यमवर्गीय असतात, तर काही श्रीमंतही असतात. या विषमतोलाला समतोल करणे हे प्रधानमंत्र्यांचे आद्य सांविधानिक कर्तव्य असते. याचे गंभीर भान ठेवून प्रधानमंत्र्यांनी तांड्यांना आश्वासक करायला हवे होते. ही आश्वासकता त्यांच्या भाषणात दिसली असती तर तांड्यांची मने ते जिंकू शकले असते. परंतु तसे त्यांनी न केल्यामुळे नगाराभवनने तांड्यांना काय दिले, या प्रश्नाचे उत्तर तांडे देऊ शकणार नाहीत. हा प्रश्न सत्तेला आणि तांड्यांनाही निरुत्तर करणाराच आहे.
नगाराभवनचे उद्घाटन हा केवळ गर्दीसाठी केलेला देखावा होता. नगाराभवन हा भावनिक मुद्दा पुढे करून लोकांची गर्दी करणे आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करणे हेच या सोहळ्याचे खरे अंतरंग होते. हा सोहळा राजकीय शक्तीप्रदर्शनासाठी होता. तांड्यापाड्यांमध्ये मनुवाद रुजावा आणि शोषणध्येयी केंद्रसत्ता अधिक बलवान व्हावी हाच या सोहळ्याचा मूळ उद्देश होता. देशाची राजकीय सत्ता आज मनुवाद्यांच्या हाती केंद्रित झालेली आहे. देशातल्या प्रत्येकच राज्यात मनुवाद प्रस्थापित व्हावा यासाठी केंद्रसत्तेची धडपड सुरू आहे. ही धडपड अर्थातच संविधानाला छेद देणारीच आहे. लोकशाहीने आणि संविधानाने दिलेली मूल्ये भारतीय सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनातून बाद व्हावीत यासाठी संविधानाला मनुस्मृतीचा पर्याय दिला जातो आहे. समतावादी संविधानसंस्कृतीच्या ऐवजी विषमतावादी मनुसंस्कृती इथे सुप्रतिष्ठित व्हावी यासाठी केंद्रसत्ता मूर्त्यांना, वस्तूंना वा त्या त्या लोकसमूहांच्या आस्थास्थानांना श्रेष्ठत्व देत आली आहे. साधनवंचित लोकांची मती भक्तीमुक्तीच्या आणि अध्यात्माच्या कैफात बेधुंद व्हावी यासाठी देशात वस्तूंची वा स्थानमहात्म्यांची आरती गायिली जात आहे. इथले साधनवंचित लोक भक्तिमय बनले की कोणत्याही नगाऱ्यातून प्रबोधनाचे पडघम ऐकताच येणार नाही. विचाराचे सामर्थ्य संपुष्टात यावे याच हेतूने हा गाजावाजा करण्यात येत आहे. तसे नसते तर नगाराभवनच्या नावाने मनुवादी चेहऱ्याची बंजारा विरासत आज उभी झाली नसती.
नगारा ही वस्तू आहे, व्यक्ती नाही. नगाऱ्याने माणूस तयार केला नाही, तर माणसाने नगारा तयार केला. व्यक्तीची निर्मिती वस्तू करीत नसते. परंतु वस्तूचा निर्माता हा व्यक्तीच असतो. त्यामुळे माणसाने निर्मिलेली कोणतीही वस्तू ही व्यक्तीहून श्रेष्ठ ठरू शकत नाही. वस्तूला व्यक्तीहून श्रेष्ठ मानणारा शब्द हा सद्विवेकाच्या कोशात दुय्यमच असतो. जीवनाच्या या शब्दकोशात माणूसच प्रधान असतो. संत सेवालाल महाराज, महानायक वसंतराव नाईक आणि पद्मश्री रामसिंगजी भानावतसारखी उत्तुंग प्रतिभेची आणि अफाट कर्तृत्वाची माणसे बंजारा जमातीत असतानाही वस्तूचे उदात्तीकरण का करण्यात आले, याचे अन्वयार्थ तांड्यांनाच नव्हे तर इथल्या तमाम अभावग्रस्तांना लावता आले पाहिजे.
सेवालाल महाराज हे पुरोगामी विचाराचे संत होते. त्यांनी चैतन्यवाद नाकारला. धर्म, अध्यात्म आणि कर्मकांड नाकारले. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नाकारले. मोक्ष-स्वर्गादि थोतांड नाकारले. माणसाची महानता हेच त्यांच्या विचाराचे सारतत्त्व होते. पुढे विसाव्या शतकात नाईक साहेबांनी याच विचाराचे अनुयायित्व पत्करले होते. हे विचार मानवतावादीच होते. हे विचार विज्ञानवादाच्या अधिष्ठानावर उभे होते. बुद्धिवादाची पायाभरणी करणारे विचार हे शोषणसत्ताकांना सुरुंग लावणारे विचार असतात. शोषणसत्ताके ही प्रतिगामी विचारावर स्वार झालेली असतात. बुद्ध, संत सेवालाल महाराज, म. फुले, छ. शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाईक साहेबांसारख्या प्रखर बुद्धिवाद्यांनी ज्या गोष्टी नाकारल्या त्या गोष्टींचा वापर करून ह्या सत्ता गोरगरिबांचे शोषण करीत असतात. जातिभेद, वर्गभेद, वर्णभेद, धर्मभेद, लिंगभेद ही भेदाभेदग्रस्त संरचनाच शोषणसत्तेची खरी ताकद असते. त्यामुळे नाईक साहेब हे काँग्रेसचे नेते होते आणि प्रधानमंत्र्यांना काँग्रेसवर मुक्ताफळे उधळायची होती या एकाच कारणावरून त्यांनी नाईक साहेबांचा नामोल्लेख केला नाही, असे मानणे अविवेकाचे ठरेल. या देशात जातकेंद्री, धर्मकेंद्री आणि ईश्वरकेंद्री शोषणसत्ता चिरकाळ टिकून राहावी, या देशाच्या परिप्रेक्ष्यातून विचारसत्ता कायम हद्दपार व्हावी आणि मनुवादाची अविचारसत्ता सतत बोकाळत राहावी या कावेबाज हेतूनेच अशी षडयंत्रे रचली जात आहेत. याच हेतूने मनुवाद सतत प्रयत्नशील राहिला आहे. व्यक्तींना बगल देऊन वस्तूचे उदात्तीकरण का करण्यात आले? याचे उत्तरच इथे आहे.
बंजारा जमातीमध्ये मनुवादी राजकीय सत्तेचे सुस्थापन व्हावे हाच या सोहळ्याचा खरा अंत:स्थ हेतू होता. या सोहळ्याची जन्मसूत्रेच मनुवादात आहेत. त्यामुळे मुद्दामच सत्तेच्या विरोधात असलेल्या लोकप्रतिनिधींना या सोहळ्यापासून दूर ठेवले गेले. मनुवाद्यांची कपटकारस्थाने या देशाला माहीत आहेत. वाणीत विकास, करणीत समरसता आणि डोक्यात मनूचे विष घेऊन हे लोक या देशाला पिंजून काढत आहेत. राजकीय द्वेष आणि जातीय विषमतेची विध्वंसक स्फोटके वाटत ते देशभर धुमाकूळ घालत आहेत. त्यांचे बुवाबाबा, संतमहात्मे, महंत या विघातक सामग्रीचा प्रचारप्रसार करण्यात मशगूल झाले आहेत. प्रधानमंत्रांच्या तोंडूनही हीच विनाशकता बाहेर पडत होती. त्यांच्या प्रत्येकच शब्दांमधून सत्तास्वामित्वाचा अहंकार ओसंडून वाहत होता. त्यामुळे तांड्यातला समाजवाद उदासला आणि सभामंडपातून उठून तो तांड्यात निघून गेला.
आदिम समाजवाद हा प्रचंडच आशावादी आहे. त्याच्यावर अनेक संकटे आलीत. वैदिकांनी तर आदिम समाजवाद नष्ट करण्याचा निर्धारच केला होता. परंतु अशा असंख्य संकटांमधून वाट काढत तो इथवर आला आणि अत्यंत सन्मानपूर्वक संविधानाच्या उद्देशिकेत प्रवेशित झाला. त्याच्या डोळ्यादेखत नगाराभवनचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. नगाऱ्याच्या प्रतिकृतीला मनुवाद्यांची विरासत करण्याचा धूर्त डाव खेळला गेला. आदिम समाजवाद आता स्वस्थ बसणार नाही. नगाऱ्याचे पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेला तो निश्चितच गतिमान करेल. ही अर्थांतराचीच प्रक्रिया असते. माणसाची बुद्धी ती सुरू करू शकते. ही प्रक्रिया माणसाच्या डोक्यातूनच उगवत असते. नगाऱ्याला संविधान हा शब्द उच्चारता यायला हवा. संत सेवालाल महाराज आणि नाईक साहेब हे संविधानमयच आहेत. त्यामुळे नगाऱ्याला संविधान या क्रांतिशब्दाचा उच्चार निश्चितच करता येईल. असे झाले तर नगाराभवन ही तांड्याची संसदभवन बनेल आणि तांड्याच्या डोक्यातून संविधानाचा कधीही अस्त न होणारा सूर्य उगवेल.
डॉ. प्रकाश राठोड,
नागपूर