करजगावची गुजरी अन् गावकरी
चोहीबाजूने डोंगरपायथ्याशी वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील अंदाजे 4000 हजार लोकसंख्या असलेले करजगांव. गावातील पाटील, बौद्ध, बंजारा व इतर समाज येथे गुण्यागोविंदाने नांदतात. आजपर्यंत कोणत्याही दोन गटात वाद पेटल्याचे ऐकिवात नाही. किरकोळ वाद असतातच ! तसा इथला वर्ग शेती, शेतमजुरी करून आपली गुजरान करतो. गावात पूर्वी कोणत्याही प्रकारची प्रवासाची आधुनिक सोय नसल्याने बोदेगांव पर्यंतचा प्रवास हा बैलगाडी, अथवा पायदळ किंवा वरुडखेड येथून शकुंतला रेल्वेने असायचा. आता तर शकुंतला पण बंद पडली आहे. सुमारे 1990 च्या दशकात दारव्हा-तेलगव्हाण ही बससेवा सुरु झाली. सुरुवातीपासूनच गावकर्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दोन तीन किलोमिटरचा पाणी प्रवास हा जीवघेणा वाटतो…!
गावातील मुली लग्नानंतर सासरी भरपूर प्रमाणात पाणी असणार्या गावात गेल्यावर स्वत:ला खुप सुखी समजायच्या तर नव्याने येणार्या सुना मात्र नाक मुरडायच्या सहाजिकच त्यांना पाणी टंचाईचा मुकाबला करावा लागत असे. गावी पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी खुप सारे प्रयत्न करूनही गावाला काही यश आले नाही असेच म्हणावे लागेल ! गावात छोट्या मोठ्या विहिरी होत्या पण उन्हाळ्यात मात्र शेवटच्या घटका मोजायच्या..! त्याकाळी नथ्थु पाटील यांच्या शेतात एक विहिर होती तिला मात्र उन्हाळ्यात बहुतांश पाणी असायचे पण ती विहिर बौद्ध समाजाचा पाणवठा होती. इतर विहिरीची पाणी पुरवठा करण्याची क्षमता नसल्याने शासनाने तिच विहिर सार्वजनिक पाणीपुरवठा करिता अधिग्रहित केली व संपूर्ण गावाला त्याच विहिरीवरून पाणीपुरवठा व्हायचा..! या विहिरीचे सार्वजनिक पाणी पुरवठ्या संदर्भात कंत्राटदार रोहना मांडवा येथील श्री. मनवर ठेकेदार हे होते. त्यांची टिम श्री आडे बंधू यांच्या घरी राहायचे. आता या विहिरीची पाणी पातळी खोलवर गेल्याने ती आता पुरेशी ठरत नाही..!
सुरुवातीला गावात एकदा विज गेली समजा दोन तीन दिवस काही केल्या यायची नाही. अशावेळी आम्हास दळण दळायला मानकोपरा, तेलगव्हाण, वरुड, रामगांव रामेश्वर येथे पायदळ डोक्यावर दळणाचे गाठोडे घेवून जावे लागे. गावातील बस्तरवार (बृहस्पतीवार) हा आवडीचा दिवस होता या दिवशी गावात गुजरी असायची खायला गोडधोड मिळायचे तर भातक्याला पैसे सुद्धा..! याच गुजरीतून आम्ही शाळेला लेखन, पेन्सील, वह्या, पुस्तके कंपास घेत होतो. म्हणून या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहात असू तर घरातील मोठ्या मंडळीना हा दिवस मात्र वैतागाचा राहायचा कारण त्यादिवशी त्यांच्यामागे पैशाचे व्यवहार, पैशाच्या कटकटी कधीकधी तर पैशासाठी छोटे मोठे भांडणं पण व्हायची..! गुजरीत जंगल्यामामाचे भजे, शंकर डवले, भगवान डवले भांडेगांववाले यांचे भातके, नाजीमभाई यांचे मसाल्याचे दुकान, कटलरीची, रहिमभाई यांचे कपड्याची दुकाने आम्हास आनंद देवून जायचे. याच दिवशी काही शौकीन मोठ्या मंडळीस कचरू खाटीक व नंतर ज्ञानेश्वर खाटकाची हमखास आठवण व्हायची…! तांड्यात काही ठिकाणी मटनाचे हिस्से पडायचे तेव्हा सळोईचा बार उडवायला मजा वाटत होती. शाळेचे दप्तर मात्र मोठे कामी पडायचे तेच शाळेला व तेच गुजरीला (बाजाराला) असायचे.
सुमारे 1990 च्या दशकात गावात भोयर गुरुजी व ढगे गुरुजी यांचेकडे गावात असे दोनच ब्लॅक अॅन्ड व्हाईट टिव्ही होते. त्यावेळी रामायण चालायचे रामायण पाहाण्यास सारे गाव उत्सुक असायचे बसायला जागा सुद्धा कमी पडत होती. मनोरंजनाची दुसरी कोणतीही सुविधा नसल्याने काही तरुण मंडळी व्हिडीओ व्हिसीआर भाड्याने आणायचे ते 1 रुपया 2 रुपया तिकिटाने दाखवून आपल्या गावातील लोकांचे मनोरंजन करायचे. मात्र या मनोरंजनापेक्षाही गावकर्यांना कलापथक, नाटके, दंडारी, गवळण, भजन खुप आवडायच्या कारण ही कला त्यांना जिवंत दर्शन घडवून द्यायची. करजगावचे गंगासागर, मोगनपारव्हा येथील आप्पास्वामी नाट्यमंडळ प्रसिद्ध होते.
गावात दिवाळी, दसरा, पोळा, बंजारा बांधवांचा तिज उत्सव इत्यादी सण उत्सहाने साजरे व्हायचे. गावातील नोकरदार वर्ग नागपंचमीच्या सणाला न चुकता दर्शनाला येण्याचा प्रयत्न करीत होता. गावातील सुशिक्षीत वर्ग नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगांव असला तरीही आपल्या गावाशी नाळ जोडून आज कायम आहे याचा मनस्वी आनंद होतांना दिसून येतो. गावातील उच्च प्राथमिक शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, आठवणीतील करजगाव समूह, आम्ही सारे करजगांवकर समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कधीतरी आजी माजी विद्यार्थी मेळावा घेवून, आयोजन करून हितगुज केल्यास आपल्या शाळेची होत असलेली अनास्था रोखता येईल ..? याच्यावर सुद्धा विचार होईल असे वाटते सोबतच गावचा ज्वलंत पाणी टंचाईचा प्रश्न रेन वॉटर हार्वेस्टींग करून वा इतर माध्यमातून सोडविता येईल का…? तसेच तरूणांकरीता एखादे स्पर्धा परीक्षा सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करून दिल्यास कित्येक तरूण नोकरीत लागतील नाही का…? गावचे असंख्य प्रश्न आहेत आपण सर्व मिळून एकत्र येवून एकदिलानं, एकमतानं काम केल्यास गाव नक्कीच नावारुपास येईल यात शंका नाही…!
– बंडूकुमार धवणे
(छाया : शेषराव चव्हाण)