खडतर वाटेकडे डोळसपणे पाहाण्याची दीव्य द्रुष्टी देणारा ‘ हिरवे’
खडतर वाटेकडे डोळसपणे पाहाण्याची दीव्य द्रुष्टी देणारा ‘ हिरवे’ अंध असूनही आयुष्याच्या खडतर वाटेकडे डोळसपणे पाहाण्याची दीव्य द्रुष्टी देणारा”पान हिरवे या मनाचे” गझल संग्रह : विद्रोही कवी साहेबराव मोरे
‘पान हिरवे या मनाचे’ हा मराठी गझल संग्रह कवी काशिनाथ महाजनांनी समीक्षणार्थ स्नेहपूर्वक पोहच केला.
वयाच्या बाराव्या वर्षी अंधत्वाचा घोर आघात वाट्याला आलेले महाजन तिमिरातून चिवट झुंज देत तेजाकडे झेपावले . आयुष्याचा आलेख ‘काळोखातील प्रकाशवाट’ या आत्मकथनात मांडला तसेच ५ काव्यसंग्रह प्रसिद्ध करून हा पहिला वाहिला गझल संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला
“जीवनात आला अंधार
तरी सोडणार नाही निर्धार
कविताच देतील मला आधार
आणि दिव्यत्वाचा साक्षात्कार ” या अर्थी त्यांनी कवितेचा आंतरिक उमाळा परिश्रमाने जपला व काशिनाथ महाजन कवी म्हणून नावारूपास आले
गझल काव्य प्रकार अवघड आहे ,ती तंत्रबद्ध, वृत्तात गुंफणे सोपे नाही
कवीने गझल कार्यशाळेत तंत्र आत्मसात करून विविध वृतांतला हा अनोखा नजराणा काव्य रसिकांना भेट दिला आहे
पान हिरवे या मनाचे हा संग्रह “जे न देखे रवी ते देखे कवी”
या उक्तीप्ल्याडची अनुभूती देणारा आहे.अंध कवीच्या प्रतिभेला,व प्रतिमेला सलाम.ब्रेनलिपीची मर्यादा लंघून प्रज्ञाचक्षूच्या सामर्थ्याने आपला अमीट ठसा महाजनांनी काव्य क्षेत्रात उमटविला आहे
डोळस व्यक्तीलाही लाजविणारा आशावाद व सकारात्मकतेची अनुभूती वाचकांना येईल एवढी सशक्त कसदार मांडणी केली आहे
गोफ गझलेत
“यशाचा गोफ गुंफता आला मजला
किती तोडले प्रतिकुलतेने तुटलो नाही” जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन उदात्त असून सकारात्मक आहे.आयुष्यात आलेल्या संकटांचा निग्रहाने, आनंदाने सामना करण्याचा परिपाठ गझल संग्रहात युनिक दिसतो
पान हिरवे या मनाचे ही मेनका वृतातील गझल संग्रहाचे शीर्षक आहे
माणूस चिरतरुण असतो मनाने. महाजनांचे पानच हिरवं नसून आख्खा माणूसच हिरवाईत भिजलेला आहे
प्रेम देवता, जगावेगळी रीत,एक, प्रेम धन, आठवणींचा सागर,प्रेमाची जीत अशा अनेक प्रणय जगतातील उणे-दुणे, तुझे- माझे प्रेम गुंजन लडिवाळतेने शब्दबद्ध केलेल्या रंचना रसिकांना मंत्रमुग्ध करतात.प्रेमाची ताकद सांगताना कवी ,
“किती शस्त्र अस्त्रे असो जिंकण्या
मने जिंकण्या प्रेम भारी असे
प्रेमास निंदणारे शत्रू अनेक दिसले
पण प्रेम थांबले ना इतिहास साक्षआहे”
एवढेच नव्हे तर प्रेमाने जग जिंकता येते यावर कवी ठाम आहे
जीवनाप्रवासात मनाचा हिरवेपणा रूजविणारा हा दिलरुबा माणूस आहे याची साक्ष देणार्या गझला संग्रहात प्रकर्षाने भेटतात
ग्लोबलायझेशन ही वाढती चिंतेची बाब त्यावर कवी लक्ष वेधून घेतात
“का वृक्ष तोड करती दररोज लोक काही
या क्रूर माणसांची स्वार्थी जमात आहे”
“जंगल सिमेंट चे अगदी भकास वाटे
नाही खुशी, जरी हा पैसा खिशात आहे ”
काॅंक्रिटिकरणामुळे , शहरातील वाढत्या चंगळवादी संस्कृती ची ओढ लागल्याने खेडी ओस पडताहेत गो बॅक टू व्हीलेज ची गरज निर्माण झाली आहे
“का राहू या शहरी, इथे काय आहे
जातो मी गावाला तिथे माय आहे”
“प्यावे लागते दुध पिशवीचे शहरी
माझ्या दारी गावी उभी गाय आहे” साध्या सरळ भाषेत सांगायचे तंत्र ही अवगत आहे
“माणसाचे देह आहे देवघर
धाम सुंदर शाश्वताचे साजरे”
माणसात देव शोधणारा शेर गझलकाराची मानवतावादी विशाल वृत्ती वृद्धिंगत करतो
सामाजिक वावरात मुखवटे घालून फिरणाऱ्या माणसांच्या धबडग्यात निर्धार गझलेतील संकल्प
भरकटलेल्या समाजाला दिशा दर्शक आहे
“धर्मात व्यर्थ सांगा स्पर्धा हवी कशाला?
ह्रदयात प्रेम सार्या मी पेरणार आहे”
“बुद्धास माणतो मी,पण युद्ध ही प्रसंगी
योजून सर्वकाही हे जग सोडणार आहे ”
बौध्द तत्वांचा प्रभाव नजरेत भरतो
धर्म भेद, हिंसक वृत्ती, स्वैराचारा विरूद्ध लढण्याची तयारी एक दिव्यांग व्यक्ती आपल्या प्रज्ञाचक्षू प्रतिभेने दर्शविते
गावगाडा,शेतीशिवार, महिला सुरक्षा, नातीगोती आदी विविध विषयांना स्पर्श करताना मानवी स्वभावातील बहुरंगी स्पंदने लक्षवेधक ठरली आहेत
स्वयं प्रकाशनाने हा गझल संग्रह प्रकाशित केला आहे
चित्रकार विष्णू थोरे यांचे समर्पक तितकेच आशयघन मुखपृष्ठ उंची वाढविते.उर्मिला बांदवडेकर यांची व्यासंगी, विषयानुरूप आकलन सुकर करणारी प्रस्तावना हि जमेची बाजू म्हणता येईल . एकंदर अंधअसुनही आयुष्यातील अडचणींकडे डोळसपणे पाहाण्याची दीव्यद्रुष्टी देणारा हा संग्रह आहे
काशिनाथ महाजनांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
“जखम दिसता कुणाचीही जिव्हाळा दाटून येतो
तिच्यावर घालूनी फुंकर
सुखावणारी गझल आहे”
गझलकारांच्या अंतिम शेरा तील गझलेच्या उज्ज्वल
भविष्यासाठी रसिक साहित्यिक, वाचकांनी मराठी गझल संग्रहाचे मनापासून स्वागत करावे ही आर्त हाक.
समीक्षक-
विद्रोही कवी साहेबराव मोरे
पान हिरवे या मनाचे -गझलसंग्रह
काशिनाथ महाजन, नाशिक
प्रकाशक-स्वंय प्रकाशन
मूल्य -२००₹
विद्रोही कवी साहेबराव मोरे चाळीसगाव
शब्द संवाद:९४०४०४८६०१