गावाकडचा मित्र
प्रिय मित्रा,
गोट्या खेळायच्या वयात
गोट्या खेळताना…
आपल्या वितभर फाटलेल्या चड्ड्या म्हणजे
नव्याने रिलीज होणारे
सिनेमेच की रे…,,,
ह्याचा त्याचा सिनेमा बघत
एकमेकांना चिडवत साल्या
आपण मोठे होत गेलो
कदाचित हे विसरला असशील गड्या….
एका लायनीत बांधावर उभं राहून धार मारायची स्पर्धा…
अन् गावापासून लांब जावून
खाल्लेला गायछाप जर्दा…
माळामाळांन पळवून हानलेलं कुत्रं…
चुना लावलेल्या दगडाखाली
दडवलेलं तिचं गोड गुलाबी पत्र…
हेच खेळ खेळत मोठे झालो
कदाचित् हे विसरला असशील गड्या…
माझ्या घराजवळची सुमन
तिनं चोरलेलं तुझं काळीज
साल्या माझ्या घरात शोधायला यायचास…
आणि दे ना लावून सेटींग
म्हणून
सिनेमाचं माझंही तिकीट तुच
काढायचास…
हेच धंदे करत आपण मोठे झालो…
कदाचित हे ही तु विसरला असशील गड्या….
गणिताचा मास्तर तर
आपल्याला तुडवायलाच ठेवलेला शाळेनं…
आपण तसंच राहीलो मठ्ठ
किस पडला आपला खरा
पण कंटाळून तेही रिटायर झालं…
असंच शिकत मोठे झालो आपण
कदाचित हे ही तु विसरला
असशील गड्या….
सजा मावशीच्या कोंबड्या
चोरुन तालमीत शिजवल्या
रात्रभर सोलून सोलून
खाल्ल्या…
अन् सकाळ व्हायची ती
सजामावशीच्या शिव्या घेऊनच…
एकमेकांचं थोबाड बघत
डोळ्यांनं खुनवत
कानात बोटं घालून
तिलाच आधार देत देत
तिच्याच डरमातलं पाणी
घेवून धावत पळत गाठलेली
हागणदारी…
अशाच शिव्या खात आपण मोठे झालो…
कदाचित् हे ही तु विसरला असशील गड्या….
खोल विहिरीतल्या उड्या
आपण मारत होतो वेड्या
किती सांगाव्या त्या खोड्या.
वगळीला सोडलेल्या होड्या
हे ही तु विसरला असशील भाड्या…
एकमेकांना भाड्याच म्हणत
मोठे झालो आपण
हेही तु विसरला असशील
गड्या…
शहरात अशा खोड्या
नको रे करु वेड्या
एकटा आहेस तिथे
सांभाळून राहा भाड्या
एवढंतरी शहाणपण आलं असेल आत्ता…
पण गावाचचं नाव घेत जा
सांगत असताना पत्ता…
आपली माती आपली माणसं
अंगणात वाळवलेली कणसं
हंगामानंतर भरल आत्ता जत्रा
वाट पाहतोय…. नक्की ये मित्रा
तशीच आहेत माणसं अजून
गावही तसाच आहे दोस्ता
गावाकडे येणारा तोच रस्ता
तुझ्या पावलासाठी खात आहे खस्ता
बरं वाईट कळवत जा
वेळेवर जेवत जा
तुला सहन होत नाही भूक
हीच असते मनात धाकधूक
धुरळा उडवत जेव्हा
फाट्यावर येते गाडी
तेव्हा धावतात तिकडे पाय
पण नुसताच तो भास
तुझ्याशिवाय गोड लागत नाही
आत्ता… पितळीमधला घास
अधूनमधून विचारते माय
तु कधी येणार हाय
काय सांगावं तिला तुच सांग
खरं काय खोटं काय?
शहरात रमला आहेस खरा
पण मनात राहू दे गाव प्यारा
नातं जपणारा तोच धागा यारा…
जिव्हाळ्याचा जिवंत झरा
फाट्यावरती थांबलो आहे
पण रिकाम्याच येतात गाड्या…
तुझीच वाट पाहतोय भाड्या
हे मात्र कधीच विसरु नकोस
गड्या…
फारच लांबत आहे पत्र.
संपत आली रात्र.
तुझाच गावाकडचा मित्र
– नितिन सुभाष चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ.
जि.सांगली.
व्हाट्सअप नंबर 070209 09521