बाप बाप असतो..
बाप गेला त्याला आज 8 वर्षे होतायत. कुठलाच शाश्वत उत्पन्नाचा आधार नसताना चौघा मुलांना शिकवण्याची किमया त्यानं केली.
कोराटीच्या फोकापासून कणग्या, डाले, टोपले व ताटवे विणने हा त्याचा ‘स्वयंरोजगार’ होता. गावापासून दूर जंगलातून बाप कोराटीचा मोठा भारा डोक्यावर आणायचा तेव्हा त्याचा चेहरा आणि कपडे पूर्णपणे घामाने ओले झालेले असायचे. त्यानंतर बाप त्या फोकाना साळायचा, काटे काढायचा. नंतर त्यांना वाकवून, पिरगाळून कणग्या व डाले तयार करायचा. हे साळून वाळलेले शेंडे, कोराटीचे तुकडे माय जळतन म्हणून चुलीत टाकायची. टीनाचं 8 पत्राचं घर होतं आमचं. त्यातही काही फूटलेले. पाऊस सुरु झाला की आमची धांदल उडायची. घरातली भांडीकुंडी आम्ही गळणाऱ्या जागी ठेवायचो.
प्रस्थापित कवींना पाऊस सुरु झाल्यावर भले प्रेयसीची आठवण येत असेल, मला मात्र त्या गळणाऱ्या टीनाची आठवण येते. त्या रात्री मायनं ओल्या जळतणावर धूर फुकत केलेल्या सैपाकाची आठवण येते. बापाच्या कष्टाला साथ देणारी माय आठवते.
आयुष्यभर कष्टाचे पहाड पार करत आमचं जगणं सुंदर करणाऱ्या बापाला मी माझं ‘आंबेडकरी चळवळ आणि आर्थिक प्रश्न’ हे पुस्तक अर्पण केलं आहे. दोन वर्षांपासून ‘सूर्यभान साळवे परिवर्तन साहित्य पुरस्कार’ सुरु केला आहे. बापाच्या ऋणातून कोणताच ल्योक उतराई होऊ शकत नाही. बाप बाप असतो..त्याची आठवण रोज येते..तीच या कवितेत मी मांडली आहे.
…
चालत राहणे एवढेच त्याला माहीत होते फक्त
भल्या पहाटे बाप माझा
अंथरुणावर जागायचा
एकटक विचार करत तो
छपराकडं बघायचा
फुटकंच आयुष्य त्याचं
फुटकी घराची पत्र,
धो धो पावसात भिजतांना
नव्हतं कुणाचं छत्र
रक्ताळला हात कधी
रूतला कधी काटा,
खाचखळग्यांचा प्रवास त्याचा
भेगाळलेल्या वाटा.
निथळला घाम त्याचा
सुकून गेले रक्त,
चालत राहने एवढेच त्याला
माहीत होते फक्त
फोकांना बाक देतांना
बाप माझा स्वप्न बघायचा,
पृथ्वीएवढंच ओझं
तो आपल्या डोक्यावर वाहायचा
चुलीत काटक्या टाकून त्यानं
केला मोठा जाळ,
माहीत होतं त्याला
बदलत असतो कधी काळ..
– रवींद्र सूर्यभान साळवे