“राखेमधला एक निखारा”
“कुठे उडाला दिसला नाही”
_______
श्रावण सरला कळला नाही
मनात माझ्या रुजला नाही
राखेमधला एक निखारा
कुठे उडाला दिसला नाही
आयुष्याची फरपट बघता
राग स्वतःचा सरला नाही
आनंदाची शिंपण असता
देव कधी तू स्मरला नाही
लेक मागता पुरवत गेला
बाप कधी तो थकला नाही
तुटून गेले पंख मनाचे
जीवनातून उठला नाही
पसरत गेल्या वाटा साऱ्या
साथी कोणी उरला नाही
जन्मानंतर मृत्यू येतो
शाप कुणाला चुकला नाही
फसवत गेला हसवत गेला
जोकर अव्वल ठरला नाही
मृणाल गिते
नाशिक
८६०६०२४३३३
नाशिकच्या गझलकारा मा मृणाल गीते यांची ही गझल वाचली. त्यातील एक शेर मनाला खूप भावला आणि त्यावर दोन चार ओळी लिहाव्यात असे मनात आले.
“राखेमधला एक निखारा”
“कुठे उडाला दिसला नाही”
खूपच छान पंक्ती. ८+८ अशी अक्षरगण मात्रावृत्तातील अत्यंत सुंदर असलेली गझल. यातील
प्रत्येक शब्दाला एक लाक्षणिक अर्थ आहे. तो माझ्या कुवतीप्रमाणे उकल करण्याचा प्रयत्न केला आहे
पहिलाच मिस-यात “राखेमधला एक निखारा” आलेल्या
या शब्दाला खूप अर्थ आहे.
या सृष्टीच्या वलयात प्रत्येक चल-अचल, सजिव -निर्जिवाला तीन अवस्थांमधून जावे लागते त्या म्हणजे उत्पत्ती -स्थिती-लय म्हणजेच जन्म – मृत्यु – मरण या अवस्थांमधून जावे लागते , हा जन्म आणि मृत्यूचा फेरा कुणालाच चुकला नाही. यापैकी फक्त शेवटची स्थिती लय म्हणजेच मरण ही या शेराला लागू होते. लय म्हणजे मृत्यु, शेवट, अंत. कोणत्याही चल अचल जीवाचा मृत्यु झाला की त्याला सजीवांना जाळतात तर काहींना पुरतात. ज्यांना जाळतात त्याची राख होते नंतर माती होते आणि ज्याला पुरतात त्याचीही माती होते. निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येकाची राख होते , माती होते. ही राख कधी होते, जेव्हा ती सजीव मृत पावते. यात झाडे देखील सजीव असतात त्यांनाही श्वास , अन्न, पाणी हवा लागते फक्त ते अचल, वाचाहीन असतात. त्यांनाही मरण टळलं नाही. अशा मृत झालेल्या व्यक्तीचे लाकडाच्या सरणावर दहन करण्यात येते आणि त्याची राख होते.
या राखेत प्रिय – अप्रिय, ज्ञात-अज्ञात असे अनेक जीव होते ज्यावर हा मानव समाज प्रेम करत असतो, त्या अनेकांमधला एक व्यक्ती /जीव असा होता जो कुणाला तरी प्रिय होता , समाजासाठी, परिवारासाठी, देशासाठी खास होता. पण त्याची किंमत तो जिवंत असेपर्यंत कुणाला कळली नाही. तो धगधगता निखारा होता. तो मनाच्या गाभाऱ्यात बंद होता, त्याच्या विषयीच्या भावना व्यक्त होत नव्हत्या पण तो एक खास होता.
जोवर दिसत होता तोवर त्याची किंमत कळली नाही, मेल्यावर त्याच्या राखेत त्याला शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. कधी कधी असे होते की ज्या व्यक्तीला आपण पसंत करतो ती व्यक्ती आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनते, आणि अचानक ती व्यक्ती या वलय पटलावरून अदृश्य होते तेव्हा आपण सहज बोलतो “आत्ता होता, पण कुठे गेला कळलेच नाही”.
मानवी जीवन हा पाण्यावरचा बुडबुडा आहे, कधी फुटेल सांगता येत नाही. फुटल्यावर तो बुडबुडा पाण्यात कुठे विरघळून जातो दिसत नाही तसे एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मेल्यानंतर देहाचे, अस्थिंचे लाकडांच्या राखेमध्ये रूपांतर होते त्याचे अस्तित्व कुठे मिसळून जाते कळत नाही. ती राख वा-याने उडून मातीत मिसळून जाते. त्या राखेतील प्रिय व्यक्तीचा अंश कोणता आणि लाकडांचा अंश कोणता हे कळत नाही, मानवी अस्थींचा तो अंश कुठे उडाला दिसत नाही. अशा अंशाला ओळखणे कठीण जाते. आणि आपण या प्रिय व्यक्तीला पारखा होतो.
मनुष्य जीवंत आहे तोवर त्याची काळजी घ्या, त्याला जीव लावा. मेल्यावर त्याची राख देखील कुठे मिसळते ते आपल्याला दिसत नाही , ती व्यक्ती पुन्हा आयुष्यात येत नाही. ईतका गहन अर्थ या शेरातून मला भावला आहे.
म्हणून गझलकारा मृणाल गीते आपल्या शेरात मांडतात की
“राखेमधला एक निखारा”
“कुठे उडाला दिसला नाही”
रसग्रहण
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)