झाकलेली मुठ केवळ तुझ्यासाठी..
तुझी जात काढू का ?
माझी काष्ट काढू का ?
माझ्या तुझ्या मधली
आतली गोष्ट काढू का ?
वर्गामदी तू अधीक मी
आभासी बाकड्यावर
भरजरी गणवेश तुझा
मी साध्याच कपड्यावर
वहीतली पिंपळपानं
फास्ट फास्ट काढू का ?
माझ्या तुझ्या मधली
आतली गोष्ट काढू का ?
तुझ्या माझ्या भेटी गाठी
होत गेल्या लुप्त लुप्त
आजही तुझा अन् माझा
आत्मा अतृप्त अतृप्त
तुझ्यामधली हडळ अन्
माझा घोष्ट काढू का ?
माझ्या तुझ्या मधली
आतली गोष्ट काढू का ?
आता असतेस म्हणं
ऑनलाईन फेसबुकवर
खूप लाईक येतात म्हणं ?
तुझ्या एका लुकवर
तू कार्डामदी धाडलेली
जुनी पोस्ट काढू का ?
माझ्या तुझ्या मधली
आतली गोष्ट काढू का ?
तुझा धर्मच वेगळा
माझी काष्टच वेगळी
जाती धर्मामधीच
सगळी दुनिया भोंगळी
एकदाचच आखरीचं
लास्ट लास्ट काढू का ?
माझ्या तुझ्या मधली
आतली गोष्ट काढू का ?
– संतोष नारायणकर