क्षणोक्षणी जागृत करणारा कवितासंग्रह…अलर्ट..!
कवी प्रशांत ढोले देवळी जि.वर्धा यांचा 2016 ला अलर्ट हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या कवितासंग्रहाला बळकट बळ देण्याचे कार्य केले ते संजय ओरके यांच्या कुंचल्यातून रेखाटलेल्या मुखपृष्ठांनी, सुधीर प्रकाशन वर्धा येथून हा देखना कवितासंग्रह प्रकाशित झाला. आंबेडकरी चळवळीतील सच्च्या कार्यकर्त्यास अर्पण केलेला हा कवितासंग्रह हातात पडताच वाचायची तिव्रता वाढत नसेल तर नवलच!
दबलेल्या मनातील वेदना गहिरी होत जाते, देहाला छेदून ह्रृद्याची ठसठस ठळकपणे शब्दांत मांडते ती कविता, हरल्यानंतर जिंकण्यासाठी जगण्याचे उमदं बळ देते ती कविता.सामान्य माणसाचा असामान्य प्रवास म्हणजे कविता. प्रा.डाॅ.मंगेश बनसोड मुंबई यांनी आपल्या प्रास्तावना मध्ये सांगितले आहे की प्रखर सामाजिक भान असणारी कविता म्हणजे अलर्ट. अगदी समर्पक शब्दांत त्यांनी सांगितले आहे.पाठराखण भाऊ गावंडे नागपूर यांनी केली आहे. प्रकाशक सुधीर गवळी यांच्या दोन शब्दात प्रशांत ढोले यांचा जीवनपट सांगून गेले आहे.एकुण ४९ कवितांचा नजराणा घेवून कवी,समीक्षक, ललित लेखक, शिक्षक आपल्यासमोर मोठ्या दिमाखात उभे आहे.कवितासंग्रह व कविचे तेवढ्याच ताकदीने स्वागत.
● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!
कवी प्रशांत ढोले यांनी आपल्या कविता लिखाणासाठी वेगवेगळे काव्यप्रकार वापरलेले आहेत.अभंग, मुक्तछंद, गझल सदृष्य कविता इत्यादी.
कवी ला वास्तविकतेची जाण आहे तो भविष्याच्या स्वप्नात रममाण होत नाही तर येणार संकट कधीही काळासारखं उभं राहू शकते , म्हणून आपल्या प्राणप्रिय सखीला कवी
कसा आत्मबळ देवून अलर्ट करतो.
प्रिये,
मी मेल्यावर माझ्या प्रेमावर
अश्रू ढाळू नकोस,
येणाऱ्या संकटांना सामोरी जा
आणि लढ एकटीच
जीवनासोबत…
लढणे असते महत्वाचे
हरणे किंवा जिंकणे नाही
तुला हे जीवन युद्ध लढायचे आहे. जीवनयुद्ध
सामाजिक भान ठेवून जागृत दृष्टी ठेवून कविता लिहिणारा कवी अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत मानवी समाजाच्या कल्याणासाठी क्षणोक्षणी अलर्ट राहणे फार गरजेचे आहे असे आपले मत ठामपणे मांडणारा हा कवी समाजाला सावधान करत राहतो.
आपण सावध असले पाहिजे
ते कोणत्याही कारणाने
करू शकतात ‘गर्भपात’
आपण रात्रंदिवस
असले पाहिजे अलर्ट. अलर्ट
कवी प्रशांत ढोले यांनी प्रेम म्हणजे काय? या कवितेत वैचारिकतेचा उच्चांक गाठला आहे.
प्रेम असते पंचशील ग्रहण
प्रेम असते शुध्द आचरण |
या कवितासंग्रहात पावसाच्या बऱ्याच कविता आलेल्या आहेत.पावसाचे वेगवेगळे रुप कवितेत दाखविले असले तरीही त्याऐवजी वेगळे विषय हाताळाला हवे होते याची रुखरुख लागून राहते.
पावसात आता, पाऊस प्राण सखा, पाऊस,पाऊस म्हणजे,
आजी,भाकर आणि पाऊस, पाणी:काल आणि आज, असा पडतो पाऊस अशा पावसाच्या कविता आलेल्या आहेत.
भ्रष्टाचार, विषमता, जातीभेद, अन्याय, अत्याचार, अनिष्ट रूढी परंपरा या सर्वाविषयी कविच्या मनात चिड आहे.
गढूळ असलेली ही व्यवस्था शुध्द करायची असेल तर फुले, बुध्द, बाबासाहेब यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे असे कवीला आंतरिक वाटते.
कुंपणच शेत खात आहे आज
मानवांनो! तुम्ही व्हा ढाल आता |. भ्रष्टाचार
न्याय, समतेचे प्रश्न आहे अनुत्तरित
भाकरीसाठीच झगडावे कितीवेळा ! कितीवेळा
व्यवस्थेबद्दल चीड व्यक्त केली आहे.सामाजिक जाणीवांच्या कविता आहेत त्यात क्रांती बीजे रुजविण्याचे कार्य कवीने सजगपणे केले आहे.
येथे प्रकाशांनो, समाज, प्रकाशपर्व, झंझावात, लोकशाही, दहशतवाद, भीमा, स्वातंत्र्य , भीमराव या कविता सामाजिक जागृती साठी प्रभावीपणे घेतलेल्या आहेत.
माय बापावर कविता लिहित नाही तो कवीच नव्हे हे कविला चांगल्याप्रकारे ज्ञात आहे. आई बाबांची महती सांगताना कवी म्हणतो
जीवन धडे देणारी माऊली तू!
पाखरांना उब देणारी सावली तू! आई
रोज तीळ तीळ मरतो….
तरी पुरून उरतो बाप |. बाप
जीवनात अनेक अडीअडचणीला समोर जावे लागते व दुःखाचा डोंगर चढावा लागतो त्यावेळी कुणीही साथ देत नाही, अशावेळी हरून न जाता तरुन कसे जायचे हे कवीने मोठ्या शिताफीने काही कवितेतून सांगितले आहे.
सुख,येथे, भेटलेला तो, आजवर, मी ज्यावेळी,धडे, असे नाही, माझ्या शब्दांनो, विचार, पाहिले मी,आजचे जगणे, कालची जखम अशा एकापेक्षा एक सरस कवितेतून दिसून येते.
तू कवितेत न सामावणारा विषय
“मेकिंग ऑफ युनिव्हर्सल”
तू घडविलेस…. रमाई
या कवितेने तर कविच्या प्रतिभेचा आविष्कार केलेला दिसून येतो.
तृष्णेने कितीही केले प्रहार
धम्मगाथेने शोभून असते मैत्री | मैत्री
मैत्री हा तथागतांनी दिलेला मौल्यवान अलंकार कसा जपून ठेवावा हे कविने मैत्री भावनेने सांगितले आहे.
रोहित वेमुला व भुजंग मेश्राम हे बाबासाहेबांचे खरे वारसदार आहेत. तसेच शेतकरी या कवितेत शेतकऱ्यांची तळमळ व्यक्त केली आहे.
अशाप्रकारे कवी, समीक्षक, ललित लेखक प्रशांत ढोले यांचा हा पहिलाच कवितासंग्रह विद्रोहाचे चटके घेऊन आला आहे. क्षणोक्षणी अलर्ट करणारा कवितासंग्रह सर्वांना हवाहवासा वाटतो.कविला मनापासून शुभेच्छा,कविचा दुसरा संग्रह यापेक्षाही स्फोटक व विद्रोही असावा अशी आशा घेवून थांबते.
– रत्ना यशवंत मनवरे
देविज हेवन्स अपार्टमेंट
फ्लॅट नंबर 501 डि विंग
कठोरा नाका,पोटे पाटील रोड
अमरावती.
7350592336.