नवरात्र आणि रंग
नेहमीप्रमाणेच कार्यालयात जेवणाच्या सुट्टीत आमच्या गप्पागोष्टी चालल्या असताना एकसारख्या साड्या घेण्याचा विषय निघाला. साडी म्हणजे प्रत्येकीचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय. मग काय विचारता साड्यांचे अनेक प्रकार आहेत. मग कोणता प्रकार,कोणता रंग , घ्यायचा याबाबत चर्चेला उधाण आले. नवरात्रीतील नवरंगाच्या साड्यापर्यंत चर्चा येऊन थांबली.
नवरात्रीला त्याच रंगाच्या साड्या का घालायच्या? याच्यामागे काय कारण आहे? कुणी ठरवले हे रंग ? याच्यामागे काही अध्यात्मिक कारण आहे का ? याचा विचार न करता आपण एखादी गोष्ट किती सहजपणे अध्यात्माशी जोडतो आणि नकळतच त्याचे पालन करू लागतो. त्या गोष्टीसाठी किती आग्रही होतो याचा कुठे विचार होत नसल्याचे दिसून येते.
एका दैनिकाने खप वाढविण्यासाठी 2003 मध्ये त्यांनी वापरलेली ही एक मार्केटिंग स्ट्रेटजी होती. यासाठी त्यांनी श्रीकृष्णनीतीचा अवलंब केला. श्रीकृष्णाने जशी स्त्रीशक्ती ओळखून क्रांती घडवून आणली त्याप्रमाणे त्यांनी मध्यमवर्गीय नोकरदार महिला वाचकांना समोर ठेवून मार्केटिंग स्ट्रेटजी तयार केली. व ते धोरण अंमलात आणले. नऊ दिवस नऊ रंग असे नियोजन करून त्यानुसार ऑफिसमधील सर्व महिला वर्गाच्या छान फोटोजचे आवाहन करण्यात आले. ते फोटो पेपरमध्ये रोज येऊ लागले. रस्ते, रेल्वे, शाळा, बँका, कार्यालये यामध्ये ठराविक दिवशी ठराविक रंग बघून छान वाटू लागले. ही कल्पना कमालीची यशस्वी ठरली. सहज म्हणून सुचलेली ही कल्पना आज 21 वर्षे झाले तरीदेखील चालू आहे. सद्य:स्थितीला नोकरदार महिला वर्गच नव्हे तर घरकामाला जाणाऱ्या महिला, महाविद्यालयात जाणा-या मुली, इतकेच नव्हे तर पुरुष वर्ग देखील त्याच रंगांचे पोशाख या नवरात्रीत परिधान करू लागला. मात्र नकळतच ठराविक रंग ठराविक दिवशी घालणे हे धर्मशास्त्र असल्यासारखे मानले जाऊ लागले. तसे न केल्यास देवीचा कोप होईल की काय? अशा अंधश्रद्धेसही खतपाणी मिळू लागले. ससर्वांचीच आर्थिक परिस्थिती ही सारखी नसते. मग त्याच रंगाची साडी नसली की महिला नवऱ्याकडे त्या रंगाची साडी घेण्यासाठी हट्ट करू लागल्या किंवा येन केन प्रकारेन त्या रंगाची साडी आपल्याकडे असायलाच हवी यासाठी दुराग्रही होऊ लागल्या.
विविध रंग हे नेहमीच मानवी मनाला आकर्षित करत असतात. एका रंगाच्या, एक सारख्या साड्या घालणे किंवा पोशाख करणे यामधून नक्कीच एकजूट दिसते. ऐक्याची भावना वाढीस लागते. रोजच्या दैनंदिन रहाटगाड्यातून थोडी उसंत मिळून चैतन्यदायी, आनंददायी वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे तसे करण्यास कुणाचीही ना नाही परंतु त्याच्या मागची कारणेही आपणास माहित असली पाहिजे किंबहुना ती शोधता आली पाहिजे कारण नसताना आपण अंधानुकरण तर करत नाही ना ? याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे.
नवरात्र उत्सव हा आदिशक्तीचा उत्सव. शारदीय नवरात्रीचे दिवस हे अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात. नऊ दिवसात उपासना, साधना यांच्या माध्यमातून आंतरिक शक्तीस्थाने ओळखून त्यांच्यावर विधायक संस्कार करणे, त्यांना योग्य शिक्षण देणे म्हणजे नवरात्रीचा उत्सव होय.या काळात शक्तीला आवाहन करून तिचे पूजन करायचे असते. ज्यामुळे शक्ती,ज्ञान,सुख,समृद्धी समाधान, आनंद, सन्मान, कीर्ती, यश,वैभवाची प्राप्ती होऊ शकेल. नऊ दिवसातील नवरंग आणि नवरात्री यांचा काडीमात्र संबंध नाही. तुम्ही कोणत्याही रंगांचे कपडे घाला जगतजननीला तर तुमची भक्तीच प्रिय आहे.
शेवटी चर्चअेंती नवरात्रीला साड्या घालायच्याच परंतु जो रंग असेल त्या रंगाची नव्हे तर कुठल्याही रंगाची साडी घालण्याचे एकमताने ठरले.
आरती डिंगोरे