आईबापाच्या कर्तव्याची, थोरपणाची जाणीव करून देणारी कलाकृती – जगणे इथेच संपत नाही
उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळे सारख्या ग्रामीण भागातील कवी हणमंत पडवळ यांची “जगणे इथेच संपत नाही” ही काव्यकलाकृती नुकतीच वाचनात आली. कवीच्या कर्तृत्वावर नितांत विश्वास ठेवणारी त्यांची आई कै. शेषाबाई आणि ज्यांना आदर्श मानले असे वडील कै. सोपान काका यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण केलेली ही कलाकृती वाचकाला आईबापाच्या कर्तव्याची आणि थोरपणाची जाणीव करून देणारी आहे. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या कल्पकतेतून साकारलेली ही कलाकृती माणसाच्या वास्तव परिस्थितीची जाणीव करून देते.
भावनांचा कल्लोळ दाटल्यावर आणि वेदनेची कळ काळजाला टोचल्यावर मला कविता सुचते असे वास्तववादी जीवन भोगलेले कवी हणमंत पडवळ यांच्या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील संदर्भ पाहिले की आयुष्याच्या सर्व भौतिक अपेक्षा कुठेतरी उंच कड्यावरून कडेलोट कराव्यात, किंवा कुठेतरी खोल समुद्रात नेऊन बुडवाव्यात असे मनाला वाटते. अत्यंत भावूक करणारे मुखपृष्ठ माणसाला विचार करायला लावणारे आहे.
“जगणे इथेच संपत नाही” या शीर्षकातच समाजातील तळागाळातील, वंचित, उपेक्षित घटकाच्या वेदना, हालअपेष्ठा दिसून येतात. मुखपृष्ठावरील चित्र पाहिले आणि दिवंगत कवी नारायण सुर्वें यांच्या भाकरीचा चंद्र कवितेची आठवण झाली. त्यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे की, –
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले.
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे.
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली,
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली.
गरिबीला लाज नसते असे आजोबा नेहमी म्हणत असे त्यांच्या वाक्याची आज आठवण येते. माणसाचे जगणे हे केवळ देखावा आहे, पोटाची भूक जेव्हा माणसाला जगायला शिकवते तेव्हा कळते जगणे काय असते. आणि हे जगणे म्हणजे एकवेळ मरणे सोपे असे कधी कधी वाटत असते. अतिशय विदारक चित्र मुखपृष्ठचित्रकाराने चितारले आहे.
“जगणे इथेच संपत नाही” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर झाडाचे अर्धे खोड उभे आहे, या खोडाला हिरवीगार एक पालवी फुटलेली दिसत आहे. त्यावर एक मुलगा उघडाच बसलेला दाखवला आहे, त्याच्या चेहऱ्यावरील भाव गहिरे,गंभीर,व्याकूळ आहेत. त्याच्या शेजारी एक चिमणी आहे तर पाठीमागे कातरवेळेला सूर्य अस्ताला कललेला दिसत आहे. या मुखपृष्ठाच्या शीर्षकाचा आकार भयभीत झाल्यासारखा, अंगाचा थरकाप झाल्यासारखा दिसत आहे, या सर्व संदर्भांचा बारीक विचार केला तर खूप गर्भित भाव यातून मला जाणवले आहेत. यातील प्रत्येक संदर्भाचा इथे अभ्यास करायला हवा. मुखपृष्ठाचा आणि लेखक अथवा कवीच्या भावजीवनाशी काहीतरी संदर्भ आलेला असतो तो संदर्भ त्यांच्या साहित्यातून प्रकट होत असतो.
“जगणे इथेच संपत नाही” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर झाडाचे अर्धे खोड उभे आहे, त्यावर एक मुलगा उघडाच बसलेला दाखवला आहे, याचा अर्थ असा आहे की, ज्या आईबापाने मुलाला जन्म दिला, तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाला वाढवले, ज्या वटवृक्षाच्या छायेखाली लहानाचा मोठा झालो तो वटवृक्ष म्हणजे आईबाप, त्या आईबापाची छाया आता डोक्यावर नाही. जाणत्या अजाणत्या वयात आईबाप सोडून गेल्यावर या जीवनाला काहीच अर्थ नाही, आईबाप आपली सावली सोडून हा वटवृक्ष बोडखा करून गेले त्यांच्या स्मृती म्हणजे हे अर्धवट राहिलेले खोड मुखपृष्ठचित्रकाराने चितारले असावे असे मला वाटते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशी अवस्था असेल तर हे जगणे आता नको वाटते, जगावे की मरावे अशा व्दिधा मनस्थितीत असलेला हा मुलगा आईबापाच्या स्मृतींना कवटाळून उन्मळून पडावे अशा अवस्थेत मनाने उन्मळून पडला आहे, म्हणून या मुलाच्या चेहऱ्यावर गंभीर, गहिरे, व्याकूळ भाव दिसत आहेत.
● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!
आयुष्यात कितीही लोकांची कामे करा, पण त्याला कोणी कौतुकाची थाप देत नाही, आपल्या कष्टाला मोल मिळत नाही, एक म्हणतो मी केले तर दुसरा म्हणतो मी केले , प्रत्येकजण काम झाल्यावर स्वतःच श्रेय घेण्यासाठी धडपडत असतो. पण ज्याने काम केले तो नेहमीच उपेक्षितच राहिला आहे. आणि म्हणूनच कवी हनमंत पडवळ यांनी आयुष्यात उपेक्षित राहिलेला प्रतिकात्मक मुलगा “जगणे इथेच संपत नाही” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर दाखवला आहे असे मला वाटते.
“जगणे इथेच संपत नाही” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील झाडाच्या खोडाला एक नवी पालवी फुटलेली दिसत आहे यावरून असे लक्षात येते की , चित्रकाराने आपल्या चित्रातून असा संदेश दिला आहे की, जरी आईबापाविना अनाथ झालो तरी त्यांनी दिलेल्या शिकवणीतून, त्यांच्या संस्कारातून मनाला नवचेतनेची , नव्या उमेदीची पालवी फुटून जीवन आनंदाने जगण्याची कला शिकावी. नाउमेद होऊन जीवन जगण्यापेक्षा उमेदीने पुन्हा नव्याने जीवनाचा आनंद घ्यायला हवा, चिमणी पक्षासारखे स्वच्छंदी जीवन जगावे असा गर्भित अर्थ मला यातून जाणवला.
“जगणे इथेच संपत नाही” या काव्यकलाकृतीचे कवी हणमंत पडवळ यांनी महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या कवितेतून समाजाला परिस्थितीचे वास्तव दर्शन करून दिले आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहात एकूण ८१ कविता असून सर्वच कविता वाचनीय आहेत. या संग्रहाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव मा डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे यांची पाठराखण लाभली आहे तर प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या कुंचल्याने संग्रहाला नवी ओळख करून दिली असून या संग्रहाचे प्रकाशन पुण्याचे परीस पब्लिकेशन यांनी केले आहे. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचून आपल्या संग्रही ठेवावा असाच आहे. कवी हणमंत पडवळ यांना पुढील काव्यसंग्रह निर्मितीस हार्दिक शुभेच्छा.!
परीक्षण-
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परीचय :
कलाकृतीचे नाव- जगणे इथेच संपत नाही
साहित्य प्रकार – काव्यसंग्रह
कवी – हणमंत पडवळ, उस्मानाबाद
कवीचा संपर्क क्र. ८६९८०६७५६६
प्रकाशन – परीस पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठचित्रकार – अरविंद शेलार, कोपरगाव