बिब्बा समर्पन सोहळा…
ज्या वावरान
मया सहित ब्रम्हांडाच्या पोटाले दोन वक्ताची भाकर देली…
अंगावर असलेल्या लक्तराले मलमल केलं,
ज्या सगरान मायन अन आमी दोघा भावान पोटाची आग इजवा साठी आग येचली…त्या पाऊल वाटीच्या अध्यक्षे खाली
ज्या मातीवर मी लोळलो, खेळलो त्या वावराले साक्षी ठेवून
#बिब्बा हे मा वाला काव्य संग्रह समर्पित करत हाव…
जगातल हे सर्वात मोठ समर्पन असन…
गाय, बैलं, सांड्या, गोरे,मशी, वगारी, कारोडी, वासरं…
गवाण, खुटा, दावं, मटाटी, डवर, दुंड, बंडाटी, सरत, रुमण, शिवळ, बैलगाडी, छकडा, डमनी, खुटल, आक, चाक, वंगन, बेड्डी…
इळा, इळत, कुराड, पटास, कुदळ, कुशा, फावड, पुरानी,डाले, दाताळं, जानकुड…
आभाय, झाड, येल, पानं, रान-फुल,
बोरं, बाभळी, ढोर-बाबळी, चिलाटी…
आघाडा, केना, लव्हाळी, लालगांडी, काटेकुरण, चिक्टा, दुधी, काटे, कुपाटे…
घार, घुबड, कावळा, कोकिळा, मिठू, राघु, मैना,पारवा…
परड, नाग, मन्यार, डोम्या, फुप्रुड, मातीखाया… शेड्डूक्या, इचू-इंगळी
किर्रकिरा…
गांडूळ, शेन, गौरी, गोमुत्र…
नत्र, स्पुरद, पालाश…
सुश्म अती-शुश्म जीव-जंतू…
बांध राखनारे, बांध कोरनारे असले नसले…
आज या समर्पन सोहळ्याले
झाडून पुसून चिक्कार गर्दी करत हाजर होते…
वावरातल्या मातीच्या प्रमुख उपस्थितीत,
धुर्याच्या साक्षिन,
अन वावराच्या मालकाच्या हस्ते हा भव्य दिव्य समर्पन सोहळा अत्यंत उत्साहपुर्ण पार पडला…
अति उत्साही वातावरनात बसाले जागा न भेटल्यान
भिंगोट्या, चिलट, डासं, फकड्या,फुल पाखरं, चिक्टा… यायन हवेत उडत या समर्पन सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला…
झाडाच्या प्रत्तेक पानान टाळ्याचा सळसळता आवाज करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली…
वान्नेरं, रानडुकर, रोही, उंदरं, कौल्हे, लांडगे, यायन कार्यक्रमात व्यतेय आनू नये म्हणून…त्यांच्यावर जमावबंदीचा आदेश लागू करन्यात आला होता…
वावरातली हिर, दोर-बाल्टी, ड्रिप, स्प्रिकल, पायपं, गोना, गोणपाट, ताडपत्री…हे पाव्हन्यायची आव भगत करण्यात व्यस्त होते…
प्रमुख पाहुणा मणून ढगोबा आपल्या मनोगतात अश्वासन देवून गेला…
की माणव जात कितीबी कोपली निसर्गावर, शेती, माती, शेतकर्यावर तरी पन जमलेल्या माझ्या तमाम शेती मातीशी नाळ असलेल्या अणूरेनू पासून तर पशु पक्षाले किड्या मुंग्या पासून त सार्या सार्यायले कवाच उपाशी मरू देनार नाही….
थोडा फार उशिर पाशिर होयन पन नक्कीच अशा दैदिप्यमान सोहळ्याले सदैव हाकेच्या अंतरावर मी हजर राहिन…
आभार प्रदर्शन दस्तुर खुद्द कवी न केलं, त्यात त्यान असल्या नसल्या शेती मातीशी नाळ असलेल्याचे आभार मानले…
कोणाच इसरून पासरून चुकीन नाव घ्याच राहून गेल त दिलगिरी व्यक्त केली…
अन अशा परकारे हा दैदिप्यमान सोहळा संपन्न झाला…
#बिब्बा लागला त 9689854100 याच्यावर 180 ₹ पाठोजा…
बिब्बा घरपोच भेटून जाईन…
विजय ढाले