गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा..? सांगणारी एक अप्रतिम कादंबरी …वचपा.!
प्रतिभावंत ज्येष्ठ साहित्यिक एम.आर.राठोड (से. नि. गटशिक्षणाधिकारी ) लिखित वचपा कादंबरी दमाळ प्रकाशन संस्थेमार्फत विकत घेऊन वाचून काढलो.सदर कादंबरी वीस भागात विभालेली असून एकूण 213 पृष्ठात सामावलेली आहे.सात दिवसांत कादंबरी वाचून काढली. कादंबरी संदर्भात दोन शब्द लिहावं अशी माझी इच्छा झाली. एम.आर.राठोड साहेबांना सुध्दा माझ्याकडून हीच अपेक्षा होती.खर तर साहित्य समृद्धीच्या अनुषंगाने साहित्याची समीक्षा होत राहण गरजेचे असते.साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांकडून समिक्षा झाली पाहिजे अशी बहुतांश लेखकाची इच्छा असते.माझं तर साहित्य क्षेत्रात आता कुठ पदार्पण आहे; तरी देखिल एम.आर.राठोड सरांनी मला कादंबरीविषयी दोन शब्द लिहशिल असं सांगणं खरोखरच माझ्या छोट्याशा साहित्य प्रवासातला हा एक प्रेरक तसेच आव्हानात्मक अनुभव आहे.आता नुकतेच सदर वचपा कादंबरीची समीक्षा ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक याडीकार पंजाब चव्हाण सरांनी केलेली आहे.एखाद्या उल्लेखनीय कादंबरीविषयी दोन शब्द व्यक्त करण्यात समीक्षक आणि वाचकांनी कधीच कंजुषी करू नये वाटते.
मराठी साहित्यात आजवर विमुक्त भटक्या समाजाचे चित्रण अनेकांनी केले आहे.उपरा नावाची कादंबरी सन 2009- 2010 मध्ये मला वाचायला मिळाली होती आणि याच कालावधीत शिवाजी पार्क मुंबई येथे बणजारा क्रांती दलाच्या मोर्चात मला माझ्या डिएडच्या सहकारी मित्रांसोबत सहभागी होता आलं होतं.खऱ्या अर्थाने इथूनच मला विमुक्त जमातीची थोडीफार माहिती मिळायला सुरुवात झाली होती.डिटीएड (Diploma In Teacher Education) ची इंटरशिफ चालू असताना एकमत दैनिक वृत्तपत्रात बणजारा समाजाला रेणके आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत या शीर्षकाखाली लिहिलेला माझा पहिलाचं लेख प्रकाशित झाला होता.मागील पंधरा वर्षांपासून विमुक्त जमातींच भावविश्व समजून घेण्याचं प्रयत्न करत आहे.काही मोजक्या जमातीपर्यंतच मला आतापर्यंत जाता आले आहे.राहिलेल्या जमातीपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांच्या सुखदुःखाशी समरस होण्याच प्रयत्न करत आहे.
एम.आर.राठोड साहेब हे एक इंग्रजी विषयाचे हाडामासाचे माध्यमिक शिक्षक होते.गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर पुर्णवेळ लिखाण आणि प्रबोधनासाठी देत आहे.मुलांना इंग्रजी विषय कसे शिकवावे?यासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांच्या शेकडो प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केलेले आहेत.लहानपनापासून नोकरी मिळेपर्यंत गरीबीचे अनेक चटके एम आर राठोड साहेबांना सहन करावा लागले होते.नोकरी करत असताना आलेले अनुभव आणि लहानपणीच्या आठवणीं निवृत्तीनंतर लेखकाला स्वस्थ बसू देत नव्हत्या.एके दिवशी माधव जाधव नावाचे सरांचे विद्यार्थी सरांना आत्मचरित्र लिहिण्याची विनंती केली.सरांनी आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली.सदर कादंबरीची उचित आणि न्यायी पाठराखण मा.डॉ.वासुदेव मुलाटे (अध्यक्ष,18 वे विद्रोही साहित्य संमेलन, अमळनेर) यांनी केली आहे.
लेखकांनी आतापर्यंत मराठीतून “आठवणीचं गाठोडं,गोरमाटी लोकजीवन:काल आणि आज” या दोन दर्जेदार पुस्तकाचे लेखन केलेले आहे.शिवाय एक गाव बारा भानगडी ही त्यांची आगामी साहित्यकृती प्रकाशनाच्या वाटेवर आहे.विविध नियतकालिकांतून व वृत्तपत्रांतून सातत्याने ते मार्मिक लेखन करत असतात.त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल आतापर्यंत त्यांना अक्षरोदय राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार , राज्यस्तरीय उज्ज्वल साहित्य पुरस्कार, राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार, पद्मगंधा प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार,बन प्रतिष्ठान नांदेड:ग्रंथगौरव पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
वचपा ही एम.आर.राठोड साहेब यांच्या सर्जनशील लेखणीतून साकारलेली दखलपात्र कादंबरी आहे. मराठवाड्याच्या मुखेड, देगलूर परिसरातील बोलीचा संवेदनशील वापर करून लिहिलेली ही कादंबरी मराठी भाषा आणि वाड्मयाबद्दल आत्मियता असणाऱ्या प्रत्येकाने एकदा वाचावी व संग्रहित ठेवावी अशी ही कादंबरी आहे.मराठी साहित्याचं दालन समृद्ध करण्यात तिच खारीचा वाटा राहणार आहे यात शंका नाही.वचपा कादंबरीविषयी दोन शब्द लिहायचे आहे हे विचार करत असताना आजपर्यंत किती कादंबरीचं वाचन केलेलो आहे आठवत होतो. दहावीपासूनच मला वर्तमान पत्र,अवांतर पुस्तके वाचण्याचा छंद जडलेल होतं. काही वाचलेल्या कादंबरी माझ्या डोळ्यासमोर येत गेल्या.उपरा,क्रांती 2020,धूणी तपे तीर, तंट्या, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ,निजाम हैदराबाद (भाग्यनगर का कैदी) अशा काही मोजक्या कादंबरी आगोदर वाचलेल्या होत्या.
वचपा कादंबरी ही विमुक्त जमातीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण दस्तऐवज राहणार आहे.कादंबरीच्या मुखपृष्ठावर रुबाबदार शरीरयष्टी असणारी गंभीराची चित्ररेखा रेखाटलेली आहे.सायास पब्लिकेशन नांदेड इथून ही वचपा कादंबरी प्रकाशित झाली आहे.सदर कादंबरी लेखकांनी आपल्या आईवडिलांना आणि दादा -वहिनींना अर्पण केली आहे.सरंजामशाहीत विमुक्तांच्या मजबुरीचा फायदा प्रस्थापितांनी कशा पद्धतीने उचलला होता हे समजण्यासाठी ही कादंबरी खुप महत्वाची आहे.ब्रिटिशांनी ज्या जमातींना जन्मजात चोर गुन्हेगार घोषित केले होते.अशा जमातीच्या लोकांचा वापर इथल्या प्रस्थापितांनी चोरी करण्यासाठी कशा पद्धतीने करून घेतला हे जळजळीत वास्तव गुन्हेगार गंभीरा नावाच्या कादंबरीच्या माध्यमातून पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.चोरी करणारे बदनाम होत गेले.मलिदा खाणारे मात्र वतनदार, जमिनदार म्हणून मिरवत राहिले.कादंबरीतील सर्वच पात्र अगदी हुबेहूब रेखाटण्यात लेखकाची लेखणी कमालीची यशस्वी झालेली आहे.
गंभीरा मुखेड तालुक्यातील सकनुर तांड्याचा एक देखना, रूबाबदार, मजबूत बांध्याचा असलेला तरूण चोरी, वाटमारीकडे कसा झुकला जातो याची ही एक चित्तथरारक आणि तितकीच गंभीर कहाणी आहे.आईवडीलाची गरीब परिस्थिती होती तरी देखील आईवडिलांनी गंभीरा शाळा शिकावं म्हणून प्रयत्न केले.गंभीराचं मन मात्र शिक्षणात कधी रमलच नाही.आई वडील,शिक्षकांच्या बोलण्याकडे गंभीरानं कधी गांभीर्याने लक्ष दिलं नाही.
गंभीराचे जसे वय वाढू लागले तसा तो वाईट लोकांच्या संगतीत बसू उठू लागला.मुलांवर पहिलं संस्कार घरातूनच होते.घरात नेहमी कलह होत असेल तर घरातील मुलं स्वतःला असुरक्षित समजू लागतात.अशी मुले पुढे चालून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.लहान असतानापासूनच माय बापांनी मुलांकडे चांगलं लक्ष देणे गरजेचे असते.आपला मुलगा कोणासोबत राहतो? काय करतो याकडे पालकांचं बारीक लक्ष असण गरजेच आहे.कधी कधी घरची अत्यंत बिकट परिस्थितीमुळे पालकांना पोट भरण्याचीच चिंता सतावत असते.काही पालकांना गरीबीमुळे म्हणा किंवा अज्ञानामुळे मुलांकडे पाहिजे तसं लक्ष देता येत नाही.गंभिरा बाबतीत सुद्धा तेच घडलं होतं.
नागरी संस्कृतीत दळणवळण आणि शेती उदीम व्यवस्था ही तांड्याच्या अधिन होती.मग तांड्यातले लोक जन्मजात गुन्हेगार कसे झाले? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.मुघलांच्या काळात राजेरजवाड्यांना रसद ,हत्यारे पुरविण्याचे काम गोरमाटी करायचे याला लदेणी म्हणतात.बैलाच्या पाठीवर सामान लादून ते देशाच्या विविध भागात फिरून सामान सुद्धा विकायचे ‘ ‘रंजन का पाणी छप्पर का घास ,दिन के तीन खून माफ। जहॉं असफखॉं के घोडे खडे ,वहॉं जंगी भंगी के बैल खड़े।’ असा ताम्रपट जंगी भंगी नायकांना शहाजहानच्या काळात मिळालं होतं.
मुघलांनी जेव्हा शीख गुरूंचा शिरच्छेद केला तेव्हा गोरमाटीनी शिखांना मोठ्या प्रमाणात मदत केली.शेकडो गोरमाटीनी शीख इतिहासात माणुसकी जिवंत राहावी म्हणून कुर्बाणी दिलेली आहे.इंग्रजांनी प्लासीच्या लढाईतून भारतात आपल्या साम्राज्याचा पाया रचला.शंभर वर्षांनी 1857 च्या उठावाच्या वेळी हजारो देशवासीयांना तोफेच्या तोंडी दिले,कित्येकांना रसीने झाडावर फाशी दिले.अनेकांना बंदुकीच्या गोळीचे शिकार बनविले.वल्लीउल्ला विचारांनी प्रभावित झालेले हजारो मुस्लिम बांधव, ब्रिटिशांच्या फौजेतील काही भारतीय सैनिकांच्या पलटणी ,ज्यांची संस्थाने खालसा केली गेली ते असंतुष्ट संस्थानिक, शेतकरी आणि आदिवासी विमुक्त जमातींनी 1857 च्या उठावात भारताच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.1853 नंतर देशात रेल्वेचे जाळे हळूहळू पसरू लागले होते.
विमुक्त-आदिवासीचें स्वातंत्र्यपूर्व उठाव,1857 च्या उठावातील सहभाग आणि रेल्वे कामासाठी मजूर मिळावे या हेतूने 1871 साली ब्रिटिश सरकारने बॉम्बे प्रसेडन्सी अंतर्गत विमुक्त जमातीसाठी जन्मजात गुन्हेगार म्हणून छळणारा कायदा (Criminal Tribes Act -1871 ) पास केला.या कायद्याने अनेक जाचक बंधने विमुक्त जमातीवर लादली गेली.
ऑल इंडिया जेल कमिटीने पुनर्वसनाच्या नावाखाली विमुक्त जमातीसाठी संपूर्ण भारतात सेटलमेंट सेंटर उभी करण्याची शिफारस केली.या शिफारशीच्या अनुषंगाने दिल्ली,मध्य प्रदेश,बंगाल , तामिळनाडू,मद्रास, अहमदाबाद,झाबुआ, हैदराबाद, गुलबर्गा आणि महाराष्ट्रात सोलापूर, अंबरनाथ,गोकाक येथे वसाहती निर्माण केल्या.
सेटलमेंट कायदा 1924 नुसार तीन तारेच्या कुंपणात जनावरांसारखे विमुक्त जमातींच्या लोकांना कोंडण्यात येऊ लागले.या वसाहतीतील बाया,मुल आणि पुरूषांना मजूर बनवून रेल्वे ट्रॅकच्या कामावर,सुत गिरण्या,कापड गिरण्यावर वेठबिगारी करायला लावू लागले.व्यवस्थापकाने एक विशिष्ट प्रकारचा पास (चिठ्ठी )विमुक्त जमातींना सोबत बाळगण्यासाठी दिले होते.कामावर जाताना सदर पास(रादारी) स्थानिक पोलीस पाटलाला दाखवावा लागायचा.परत येताना सदर पास पाटलाकडून घेऊन येणे बंधनकारक होते.
वसाहतीत सकाळ, संध्याकाळ हजेरी घेतली जात होती.पोलीसांना काही संशय वाटला तर रात्री बेरात्री कधीही येऊन वसाहतीतील लोकांची गिणती करून जायचे. वसाहतीच्या आसपास राहणाऱ्या विमुक्त जमातींच्या लोकांना कधीही पोलीस ठाण्यात वर्दी देण्यासाठी बोलाविले जायचे.गुलबर्गा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सिताराम नायकांना मला गेल्यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भेटण्याचा योग आला.पोलीस लोक संध्याकाळ,सकाळ कधीही मनात येईल तेव्हा गोरमाटींना हजेरीसाठी नाक्यावर बोलावून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कामासाठी इंग्रजांना येथील प्रस्थापितच सहकार्य करायचे आणि सल्ले द्यायचे असे देखील पुढे बोलताना सांगितले.
कंपनी सरकार आणि ब्रिटिश सरकारच्या अनेक जाचक कायद्यामुळे व रेल्वे सुरू झाल्यामुळे गोरमाटींच्या पारंपरिक लदेणी व्यवसायाला उतरती कळा लागली होती.लदेणी व्यवसाय ठप्प पडल्यावर काही गोरमाटी शेती ,पशूपालन करु लागले.जंगल कायद्यामुळे जंगलातील वस्तू आणता येत नव्हते.जगण्याचे साधन हिरावून घेऊ लागल्यामुळे नाईलाजाने काही जमातीच्या लोकांना पोटापाण्यासाठी चोरी कराव लागत होते.
गंभिराचे वडील भिमला सकनूरच्या जीवनराव पाटलाकडे सालगडी म्हणून काम करत होता.गंभीराला कामात गुंतवून ठेवावे म्हणून भीमला आणि भुरीनी मुक्रामाबादच्या बाजारातून दोन शेळ्या आणून दिल्या.गंभीरा दोन चार दिवस शेळी चारायला गेला पण नंतर तो शेळी चारायच सोडून दिला.
जीवनरावांनी एकेदिवशी भिमलाला घरी बोलविले.गंभीराला माझ्याकडे पाठवून द्या म्हटले.जीवनराव गंभीराला कशासाठी पाठवून द्या म्हणत असेल हे भीमलाला कळालं नव्हतं.गंभीरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जीवनराव पाटलांनी खुराक लावली.पहिलवानाकडून कसरत करवून घेतली. जीवनरावाच्या पाठिंब्यावर गंभिरा छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लागला. गंभीराला लोक टरकून वागू लागले. सकनूर ग्रामपंचायतीवर जीवनराव पाटलाच वर्चस्व प्रस्थापित झाले.गंभीरामुळे हे सर्व शक्य झालं होत.गंभीरा आणि त्याचे सहकारी चोरी करुन आणलेला माल ते जीवनराव पाटलाच्या वाड्यात घेऊन जायचे.
सतरा आठरा वर्षाचा झाल्यावर गंभीराची सोयरीक तिच्या आत्याची मुलगी वनमालाशी झाली.थोड्याच दिवसात वनमाला व गंभिराचं लग्न झालं.लग्न झालं की तो चांगला वागेल ,चोरी करणे सोडून देईल असं भीमला आणि भुरीला वाटत होते; पण त्यांची मनीषा आगीत जळाली होती.त्यांची ही भोळी आशा मनातून दूर पळून गेली होती.गंभीरा बार्हाळी सर्कलमध्ये सराईत अट्टल चोर म्हणून गाजत होता.चोरीची माहिती पोलिसांना भेटली की पोलिस गंभीरा आणि त्याच्या साथीदारांना पकडून पोलीस ठाण्यात न्यायचे.जीवनराव पाटील पोलिसांशी बोलून गंभीराला सोडवून आणायचा. ठाणेदाराला थोडं फार पैसे देऊन जीवनराव पाटील खुश करायचे.
गंभिरा आता कर्नाटक, आंध्र प्रदेश (तेलंगणा) भागात जावून इकडचा माल तिकडं आणि तिकडचा माल इकडे खपवू लागला.तो आणि त्याचे साथीदार कुणाच्या बैलजोडी, कुणाची गाय तर कुणाच्या म्हशी ते आता चोरु लागले .बाब्या,शिवला,जिवला व गंभीरा हे चौघेही सख्खे चुलत भाऊ होते.ते आता आंतरराज्यीय चोरी टोळीचे सदस्य झाले होते.आणलेला माल जीवनराव पाटलाच्या घरात जाऊ लागला.त्यातील काही भाग ठाणेदार यांच्या घरी पोहोचला जायचा.
चोरी करणे चांगले नाही असं भीमला,भुरी,वनमाला सतत गंभिराला समजावून सांगत राहायचे.गंभीरा चोरी करायचं सोडत नाही दिसून आल होतं.शेवटी वनमाला गंभीराला वचन मागते की चोरी करताना कधी घरातील बायांना हात लावायचा नाही.तिच्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही.गंभीरा आणि त्याचे इतर सहकारी आता मध्यस्थी शिवाय सरळ ठाणेदाराला हाप्ते देऊ लागले.गंभीराची चर्चा आसपासच्या परिसरात लोक करु लागले.कोणाचं भांडण झाले किंवा पोरगी नांदवत नसेल तर लोक गंभीराला बोलवून आणीन म्हणून सांगू लागले.गंभिराचा मुलगा सकनुरच्या सरकारी शाळेत शिकत होता.वनमाला पूर्णवेळ मुलासाठी झटत होती.सासूबाईची काळजी घेत होती.राबराब राबत होती.तिनं एकच ठरवलं होतं.मुलाला खूप शिकवायचं. बापासारखा होणार नाही,याची काळजी घेत होती.
बार्हाळी सर्कलमध्ये गाई, म्हशी,बैल,शेळ्या चोरी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.हजारो तक्रारी मुक्रमाबादच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत होत्या.पोलीस चौकशी करत होते.अहवाल जमा करत होते.गंभिराला पकडून न्यायचे.एक दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवायचे.पोलीस गंभिराकडून मलिदा घेत होते.ते गंभिराला सोडून देत होते.तेथून आला की पुन्हा तो चोरीचं काम सुरू करायचा.काही मुलं गरीब परिस्थितीतून शिकून अधिकारी होतात ; परंतु नंतर ते आपली परिस्थिती विसरून जातात.झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अवैध मार्गाने पैसे कमवू लागतात.एखाद्या दिवशी भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या माध्यमातून रंगेहाथ पकडले जातात.आपलं नाव तर बदनाम करून घेतातच; परंतु आईवडीलांना सुध्दा खाली मान घालायला लावतात.मेहनतीनं कमवलेल्या पैशात जेवढा आनंद आहे तेवढं आनंद गैरमार्गाने कमावलेल्या पैशात नसतो.
गंभिराची बार्हाळी सर्कलमध्ये एवढी दहशत बसली होती की,सामान्य माणूस हाय खाल्ले होते.दिवसा जरी त्याने वाटमारी केली तरी पोलीस लोक त्याचेच होते.म्हणून त्या सर्कलमधील लोक बार्हाळीच्या देशपांडेकडे तक्रार करु लागले.बार्हाळीचे देशपांडे म्हणजे मुखेड तालुक्यातील एक मोठी आसामी.त्यांचा लोकांवर दरारा होता.जास्तीतजास्त लोक त्यांच्या सरंजामशाही थाटाला भीत.निजामशाहीत काही जमीनदाराकडे स्वतःची खाजगी सैन्य व्यवस्था होती.जमिनदारांचे आजुबाजूच्या गावावर हुकूमत असायची.लोक जमिनदाराला फार घाबरायचे.
वनमाला गंभीराला चोरी करायचं सोडू दे सांगत होती.सुरूवातीसच तो गरीब लोकांना त्रास दिला होता.मात्र नंतरच्या वीस-पंचवीस वर्षांपासून तो श्रीमंताचं लुटून गरिबाला दान करत होता.गंभिरा चोर होता.निर्दयी होता.क्रूर होता;पण गरिबाला त्रास देत नव्हता.गरिबाच्या मुलींच्या लग्नात तो मदत करत होता.पहिले चार-पाच वर्षे घाबरून वागणारे,चोर म्हणून हिणवणारे लोक गंभिराला आपला हितचिंतक मानू लागले होते.आता ते गंभिराला घरात सहारा द्यायचे.गंभिरा आता बार्हाळी सर्कलचा रॉबिनहूड तंट्या मामा बनला होता.
मुलगा कायद्याची पदवी घेऊन देगलूरला गेला.अल्पावधीतच एक हुशार वकील म्हणून जीवन मुखेड,देगलूर,बिलोली तालुक्यांत प्रसिद्ध झाला.चोराची बायको म्हणून हिणवणारे वकिलाची आई म्हणून वनमालाचा गौरव करत होते.मुलं चांगली निघाली तर मायबापाचं कौतुक होत असतं.मुल वाईट निघाली तर मात्र आईवडीलांची जिथं तिथे थू थू होत असते.आईवडील चांगले असेल तर मुलं पण संस्कारी निघतात. ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी !’
गंभीरा कर्नाटक, तेलंगणात चोऱ्या करण्यासाठी जात नव्हता.आता तो घरीच राहत होता.वनमाला आणि गंभीरा आपल्या मुलांचं लग्न थाटामाटात करतात.
आजकाल साध्या पद्धतीने लग्न लावायला सहसा लोक तयार होत नाही आहे.लग्नाला लोकोत्सव मिळू लागला आहे.नोंदणी पध्दतीने, सामुदायिक विवाह सोहळे पार पडणे काळाची गरज आहे.हुंड्याशिवाय लग्न लागणं काळाची गरज असताना पंधरा-वीस लाख रूपये हुंडा घेतला जात आहे.मुलींच्या वडीलाकडून हुंड्याची रक्कम साखरपुड्यातच घेतली जाते.आणखी मुलीच्या घरच्यांनी लग्नाचं संपूर्ण खर्च सारायचं.खरच आम्ही सुसंस्कृत झालो आहोत का? याचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.आमची सुन आम्हाला बरोबर पाहत नाही असं सासरकडील मंडळी जेव्हा बोलतात तेव्हा त्यामागचं गौडबंगाल काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
लग्न होऊन एक महिनाही झालं नाही.गंभीरा आजारी पडला.मुखेडला दवाखान्यात दाखवून नांदेडला आणण्याची तयारी चालू होती.मात्र गंभिराने डोळे मिटले ते कायमचेच. गंभिरा गेल्याची वार्ता वाऱ्यासारखी बार्हाळी परिसरात पसरली होती.गंभिराचा गोड जेवणाचा कार्यक्रम होईपर्यंत जीवन घरी थांबला. आजकाल काही लोक कर्ज काढून तेरवी करत आहेत.मेल्यानंतर मृत्यूभोजन देण्याऐवजी हाच पैसा घर संसारात,शिक्षण आणि शेतीसाठी वापरले तर सावकारांचे पाय पडण्याची वेळ येणार नाही.जिवंतपणी जमेल तेवढी चांगली सेवा मायबापाची करणं गरजेचं आहे.
मुलांना घडविण्यासाठी आई वडीलांची भूमिका फार महत्वाची असते.कधी कधी अस म्हटलं जाते की,नवरा कितीही वाईट असला तरी पत्नी तरी समजदार असणं गरजेचं असते.घरची बाई चांगली असली की ती कितीही कष्ट सहन करेल;पण मुलाबाळांना चांगल्याप्रकारे घडवू शकते.संसाराची गाडी राबराब करून कडेला नेऊ शकते याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे वनमाला होय.म्हणूनच म्हणतात,”जिचे हाती पाळण्याची दोरी,ती जगाला उध्दारी.” वचपा कादंबरी केवळ वाचन करून ठेवून देण्यासाठी लिहिली गेली नाही आहे.किशोरवयातील आपल्या मुलांना यी कादंबरी प्रत्येक पालकांनी वाचायला दिली पाहिजे.आपला मुलगा वाईट मुलांच्या नादी लागून बिगडू नये म्हणून पालकांनी एकदा तरी ही कादंबरी आपल्या पाल्याला वाचायला दिली पाहिजे.संगत चांगली भेटली तर ठीक नाही तर कुसंगतीमुळे पूर्ण जीवन उध्वस्त होते याची जाणीव ही कादंबरी वाचल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही.
माझी तर प्रमाणिक इच्छा आहे की,ही कादंबरी प्रत्येक शिक्षित महिलांनी एकदा तरी वाचली पाहिजे.आजकालच्या मुली, महिला दुरचित्रवाणीवरील मालिका पाहण्यात एवढ्या गर्क झालेल्या आहेत की,वाचन करावं लागतं हेच त्या विसरल्या आहेत की काय वाटू लागले आहे.वाचनाचे खूप फायदे आहेत.एखाद्या पुस्तकामुळे जीवनाला कलाटणी मिळू शकते.वाचनामुळे मनाला आनंद होतो.आत्मिक समाधान मिळते.
चोरी करणे वाईटच आहे यात शंका नाही.चोर चोरच असतो; परंतु चोराला पाठिशी घालणारे त्याहून मोठे महाचोर असतात.एखाद्या व्यक्तीच्या अज्ञानाचा आणि मजबुरीचा फायदा उचलणे यापेक्षा निच्चपणा दुसरा कोणताच नाही. केवळ शेळ्या,मेंढ्या,कोंबडी,बैल चोरणे एवढीच चोरी नाही आहे.एखाद्या वर्गाला वर्षोनुवर्षे मुख्य प्रवाहात येऊ न देणे,खाद्य वस्तूत भेसळ करून विकणे,देवा धर्माच्या नावाखाली गोर गरीबांना लुटणे ही सर्वात मोठी चोरी आहे.
लोक चोरी का करतात याचं बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे.जोपर्यंत लोकांच्या हाताला काम मिळणार नाही तोपर्यंत लोक परावलंबी बणत राहणार आहे.विमुक्त जमातींना 31 ऑगस्ट 1952 रोजी कायद्याने विमुक्त केले;परंतु त्यांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी काय केले हा महत्त्वाचा मुद्दा आहे.विमुक्त जमाती हा प्रवर्ग संविधानिक सवलतीपासून वंचित राहिलेला एक मोठा समूह हलाकिच जीवन जगत आहे.भारतीय राज्यघटना लागू झाली,देश स्वतंत्र झाला तेव्हा हा घटक जेलमध्येच गुलाम म्हणून बंदिस्त होता.
अनुसूचित जाती जमातीची आरक्षणाची यादी 1950 मध्ये तयार झाली.विमुक्त जमातीचे लोक सेटलमेंटमध्ये बंदिस्त असल्यामुळे त्यांना एससी,एसटी प्रमाणे संविधानिक सवलती मिळाल्या नाहीत.पुढे भाषावार प्रांतरचनेमुळे मध्य प्रदेश, विदर्भ आणि आंध्रातील काही जिल्हे महाराष्ट्रात सहभागी झाले.त्यामुळे बणजारा,वडार,कैकाडी समाजाना त्या त्या राज्यात मिळणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या सोयी सवलतीपासून वंचित राहावे लागले. मुळ विमुक्त जमातींना अनुसूचित जमातीच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत असी शिफारस असताना देखील आतापर्यंत महाराष्ट्रात विमुक्त जमातींना आदिवासी आरक्षणाच्या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.अस्पृश्य जाती तयार होणे जसं जाती व्यवस्थेचं दोष आहे तसं विमुक्त जमातींचे जातीत रूपांतर करुन त्यांना संविधानिक सवलतीपासून वंचित ठेवणे याला कोणाचं दोष मानायचे ?
– बी.सुग्रीव
9834182823
पुस्तक मिळण्याचं ठिकाण: मोतीराम रूपसिंग राठोड विष्णुपूरी,नांदेड-6 मोबाईल-9922652407 स्वागत मूल्य -200
पृष्ठसंख्या-213