सुगंध पेरणारी आजची कविता–काजळपाणी
नाशिकच्या कवयित्री, गझलकारा मा अलका कुलकर्णी यांचा “काजळपाणी” हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण कवितांनी गुंफलेल्या या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ मला अतिशय भावले. श्रीकृष्णावर नितांत श्रद्धा ठेवून कवयित्रीने आपल्या श्रीकृष्ण भक्तीचे दर्शन या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील संदर्भातून दाखवले आहे. सौ.रूपिका अनिकेत पाटील यांनी आपल्या कल्पकतेने या मुखपृष्ठाला सजवून काव्यजगतात या कलाकृतीला एक वेगळे स्थान दिले आहे. एक वेगळी उंची दिली आहे. आज आपण या मुखपृष्ठावरील संदर्भ उलगडून पाहणार आहोत.
“काजळपाणी” या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर प्रभू श्रीकृष्णाचा चेहरा दाखवला आहे, हा चेहरा समोर डोंगरातून वाहणाऱ्या निळ्याशार नदीच्या पाण्याकडे पहात आहे, तसेच यावर उभी केलेली श्रीकृष्णाचे आवडते वाद्य बासरी दाखवली असून या बासरीला सहा स्वररंध्रे (छिद्रे) आणि एक मुखरंध्र (छिद्र) असून शेजारी मोराचे पंख दाखवले आहे. तसेच “काजळपाणी” हे शीर्षक दाखवले असून पाणी या शब्दातील णी ची वेलांटी मोठ्या कडीसारखी दाखवली आहे. अतिशय अर्थपूर्ण असलेल्या या मुखपृष्ठाला पाहून यावर दोन ओळी लिहावे वाटले. या मुखपृष्ठाचा आणि मानवी जीवनाचा संदर्भ यातून मला जाणवला आहे आपण याचा विचार करणार आहोत.
“काजळपाणी” या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर प्रभू श्रीकृष्णाचा चेहरा दाखवला असून हा चेहरा समोर डोंगरातून वाहणाऱ्या निळ्याशार नदीच्या पाण्याकडे पहात आहे, याचा अर्थ असा की – श्रीकृष्णाला सर्वव्यापक , निराकार, निर्गुण, अशी रूपके दिली आहेत. ज्याचा अंत लागणार नाही असा या गहन अर्थाने या मुखपृष्ठावर श्रीकृष्णाचा चेहरा दाखवला आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण व्यापक आहे त्याप्रमाणे या संग्रहातील कविता व्यापक अंगाने आल्या आहेत. तसेच श्रीकृष्ण ज्या नदीकडे पहात आहेत ती नदी महाभारतातील पुराणात अयोध्येतून वाहणा-या यमुना नदीत श्रीकृष्णाने कालियामर्दन केल्याने ही नदी कालिंदी नावाने आली आहे. ही कालिंदी नदी श्रीकृष्णाच्या व्यापकतेला सामावून घेणारी आहे, ही व्यापकता निळ्याशार डोहात पसरली असल्याने तो रंग या कालिंदी नदीच्या पाण्यावर दाखवला आहे असा अर्थ मला येथे जाणवला आहे.
“काजळपाणी” या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर सात रंध्रे असलेली श्रीकृष्णाचे आवडते वाद्य बासरी दाखवली आहे या संदर्भाचाही एक अतिशय गर्भित अर्थ आहे. या बासरीला सहा स्वररंध्रे( छिद्रे) आहेत तर एक मुखरंध्र(छिद्र) अशी एकूण सात रंध्रे( छिद्रे) आहेत , बासरीवरील हे जरी सात रंध्रे शास्रीय संगीतातील सा, रे , ग, म, प, ध, नी अशी असली तरी याला मानवी जीवनाचा संदर्भ जोडला गेला आहे. आध्यात्मिक अर्थाने ही बासरी म्हणेज मानवी काया आहे जी एका अद्भुत शक्तीने तिच्यात स्वर, प्राण ओतले आहेत ज्याला आपण परमेश्वर म्हणतो या परमेश्वराने ही बासरी निर्माण केली आहे. या बासरीवरील सहा स्वररंध्रे( छिद्रे) म्हणजे मानवाच्या मनातील काम, क्रोध, मोह, माया, मत्सर, राग असे षड:रिपू आहेत तर एक मुखरंध्र(छिद्र) आहे ते आनंद आहे असे सात रंध्रे आहेत. माणसाने नेहमी आनंदी रहावे, आपल्या मुखातून निघालेली वाणी, वाचा इतरांना बाधक ठरू नये. मुखरंध्रातून सतत आनंदाचे स्वर फुंकले गेले पाहिजे तरच इतर सहा स्वररंध्रे( छिद्रे) नाहीसे होतील. मानवाच्या मनातील काम, क्रोध, मोह, माया, मत्सर, राग असे षड:रिपू आहेत ते मनातून काढायचे असतील तर आनंदाच्या मुखरंध्रातून फुंकर घालून ही काया सुमधुर आवाज देणारी बासरी झाली पाहिजे या गर्भित अर्थाने मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय कल्पकतेने हे मुखपृष्ठ सजवले आहे. आणि म्हणूनच या काव्यसंग्रहातील कविता मानवी मनातील षड:रिपू घालविणाऱ्या आहेत.
“काजळपाणी” या काव्यसंग्रहात एकूण १०२ कवितांचा समावेश केला आहे, यातील शीर्षक कविता आपल्याला आध्यात्मिकतेकडे घेऊन जाणारी आहे. आपल्या आयुष्याचे गोकुळ व्हावे इतका सुंदर विचार या कवितेतून मांडला आहे. युगांयुगापासून हे विश्व सुंदरतेने नटलेले आहे, यासारखे सुंदर दुसरे काहीच नाही, श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोकुळासारखे मानवाचे आयुष्य सुंदर व्हावे असा समस्त मानव समाजाला लागू असलेला विचार शीर्षक कवितेतून मांडला आहे. या कवितेत कवयित्री म्हणतात की – “अद्वैतच हे युगायुगाचे, गोकुळ व्हावे, आयुष्याचे.”
कवयित्री अलका कुलकर्णी यांच्या “काजळपाणी” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रकाशक व्ही पोतदार , वैशाली प्रकाशन पुणे यांनी केले असून या कलाकृतीचे मुखपृष्ठ सौ. रूपिका अनिकेत पाटील यांनी आपल्या कल्पकतेने सजवले आहे. जयसिंगपूरच्या प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संपादिका, बालसाहित्यिका मा. नीलम माणगावे यांनी या काव्यसंग्रहासाठी “सुगंध पेरणारी आजची कविता” अशा कौतुकाच्या शब्दांनी पाठराखण केली आहे. हा संग्रह सर्वानीच वाचावा आणि संग्रही ठेवावा असा काळजातून आलेला काजळपाणी संग्रह आहे. कवयित्री अलका कुलकर्णी यांना पुढील संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा.
परीक्षण :
– प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृतीचा परीचय :
कलाकृतीचे नाव : काजळपाणी
साहित्य प्रकार : काव्यसंग्रह
कवयित्री :
– अलका कुलकर्णी,
नाशिक
कवयित्रीचा संपर्क क्र.९८५०२५३३५१
प्रकाशक : व्ही पोतदार
प्रकाशन : वैशाली प्रकाशन,पुणे
मुखपृष्ठचित्रकार : सौ. रुपिता अनिकेत पाटील