गोरमाटी गणाला अस्वस्थ करणारी कादंबरी ‘वचपा’
जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या गटशिक्षणाधिकारी तथा गोर साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिक मोतीराम राठोड संराची ‘वचपा’ ही दुसरी कादंबरी. ‘आठवणीच गाठोड’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीनंतर आलेली ‘वचपा’ ही वेगळ्या विषयावरची आणि गोरमाटी गणाला अस्वस्थ करणारी वेगळ्या धाटणीची ही कादंबरी. त्यांचे “आठवणीच गाठोड” आणि “गोरमाटी लोकजीवन काल आणि आज” ही दोन पुस्तक मराठी साहित्यामध्ये प्रचंड गाजली. त्यांना या पुस्तकामुळे राज्यस्तरावरील जवळपास पाच साहित्य पुरस्कार मिळाले. लेखक मोतीराम राठोड सरांनी विविध नियतकालिकातून व वृत्तपत्रातून भरपूर लेखन केलेले आहे. त्यांची आगामी कादंबरी येत आहे “एक गाव बारा भानगडी” !
“वचपा” या कादंबरीचे कथानक गंभीरा नावाच्या गुन्हेगाराभोवती फिरतं . गंभीरा हा गुन्हेगार परंतु तो हळव्या मनाचा आहे. चोरी करून आणलेला माल तो गरिबांना वाटून टाकायचा. गरिबा विषयी त्याला तळमळ होती. गंभीराचा जीवन संघर्ष या कादंबरीतील घटना, पात्रे गोर गणाला अस्वस्थ करणारी आहेत. लेखक मोतीराम राठोड हे आत्मकथन लिहिण्यासाठी असलेले वस्ताद यांनी गंभीराला जवळून पाहिलं. त्यांचा जीवन संघर्ष अनुभवलं आणि त्यातून गंभीरा यांच्या जिवनावर ‘वचपा’ नावाची कादंबरी साकारली आहे .ही कादंबरी प्रकाशकांनी काल्पनिक असल्याचे टिपण पहिल्याच पानावर दिलं जरी असलं. तरी कादंबरी वाचताना ही काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे असेच पानोपानी वाटते. कादंबरीची मांडणी लेखकांनी अतिशय चपखलपणे मांडलेली असून कादंबरी वाचताना आपण त्या संपूर्ण घटनेसोबत आणि कांदबरीच्या पात्रासोबत सहवासातच होतो असेच वाटत राहते. कादंबरीमध्ये लेखक राठोड सरांनी देगलूर आणि उदगीरच्या परिसरातील बोलीभाषा आणि रुढी, परंपरा विशेष नमूद करून बंजारा संस्कृतीला उजाळा दिलेला आहे. या कादंबरीतला गंभीरा जरी गुन्हेगार असला तरी त्यांच्या कुटुंबातली माणसे प्रामाणिक आहेत. या सर्व माणसांच्या जीवनसंघर्षाची कहाणी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या कादंबरीतला नायक गंभीरा हा अतिशय गरीब कुटुंबातला व्यक्ती पण तो मोठ्या मोठ्या श्रीमंतांनाही घाम फोडणारा त्याची धिप्पाड शरीरयष्टी आणि त्यांच्या अंगी असलेली हिम्मत ही कोणालाही घाबरून सोडणारी होती. परंतु गंभीराची बायको वनमाला मात्र ती कधीही गंभीराला घाबरली नाही. आणि घाबरायची नाही सत्त्यावर चालणारी ती एक गोर हरपणीच होती. गंभीरा हा खतरनाक गुन्हेगार चोरी करताना माणूस असो की बाई त्याची पर्वा त्यांनी कधीही केली नाही. परंतु वनमाला त्याला संत सेवाभायाच्या अनमोल वचनाची आठवण करून देणारी एक हिम्मतवान महिला आहे. गुन्हेगार गंभीराचा वडील भीमला, आई भुरी, बायको वनमाला यांच्या भोवती ही कादंबरी फिरते. गंभीरा चोरी करताना बाईचे मंगळसूत्र सुद्धा सोडत नाही त्यामुळे गंभीराच्या चोरी करून आणलेल्या सामानावर गंभीराचा वडील भीमला आई भुरी आणि बायको वनमाला हे प्रचंड नाराजी दाखवतात. अशाच एका प्रसंगांमध्ये गंभीराचा वडील भीमला तो गंभीराला म्हणतो अरे गंभीरा तू जे काही करतोस ते अगदी चुकीच आहे. याचे परिणाम तुला भोगावे लागतील. उद्या होणार तुझं लेकरू उघडं पडेल. तेव्हा गंभीरा म्हणतो तुम्ही सगळेजण उगीच काळजी करता. मला काहीही होणार नाही आणि तुम्ही काहीही सांगितलं तरी मी माझा धंदा सोडणार नाही. तेव्हा त्याची बायको वनमाला जोऱ्याने ओरडते अरे तू बाईच्या अंगावर हात टाकलास, तिचे दागिने लूटलेस, तिचं मंगळसूत्र तोडून घेतलंच तर ती बाई तुला शाप देईल? तेंव्हा गंभीरा म्हणतो हे फोकणीची उगीच मला ग्यान देऊ नको. चोराला सर्व सारखेच असतात. माझ्या तावडीत जो सापडला त्याला मी सोडणार नाही गं! तेव्हा वनमाला म्हणते तू चुकलास, तू रानटी झालास, आता आमचं कोणाचेही तू ऐकत नाहीस पण मी तुझ्याकडे एक भीक मागते. त्या भिकेत मला एक दान देतोस का? तेव्हा गंभीरा म्हणतो ते सांग लवकर तु जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. तू माझा जीव की प्राण आहेस. सांग लवकर सांग. तेव्हा वनमाला म्हणते असं सांगणार नाही. तू माझ्या हातात हात दे! तेव्हा गंभीरा चिडून म्हणतो हात तुझ्या आईला… एवढाच हाय काय हे घे माझा हात हातात.
हातात हात घेऊन वनमाला गंभीराला म्हणते नीट विचार करून वचन दे. वचन हे पाळण्यासाठी असतात, मोडण्यासाठी नाही! हा संवाद सुरू असताना बरीच रात्र झालेली असते. गंभीराचा बाप भीमला बाजूला झोपला होता आणि आई भुरी अंगावर पांघरून घेऊन झोपेचे सोंग घेऊन आडवी पडली होती. वनमाला पुढे म्हणाली मला तूम्ही आता एक वचन देणार आहात तर पुन्हा विचार करा गंभीराला राग येते आणि गंभीरा जोऱ्याने वनमालावर ओरडतो, वनमाला माझं डोकं खाऊ नकोस काय तुझं वचन आहे ते लवकर सांग मी दिलेलं वचन आणि तू मागितलेलं वचन नक्की पाळणार आहे. तेव्हा वनमाला गंभीऱ्याला काकुळतीला येऊन म्हणते तू कोणाच्याही घरात चोरी कर; पण त्या घरातील बायांना हात लावू नकोस. दिले तेवढे दागिने तू गुमान घे पण तिच्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही असे सांगताना वनमालाचे डोळे डबडबतात. घाबरून एखाद्या बाईनं मंगळसूत्र जरी काढून दिल तर तिला ते बहीण समजून परत कर.
*एक ध्यानात ठेव लुटून खाईल त्यांच्या सात पिढ्या नरकात जातील असं संत सेवालाल महाराजांनी सांगून ठेवलंय*. याची तू आठवण ठेव आणि वनमाला रडायला लागते. रडत असलेल्या वनमालाला गंभीरा समजावून सांगतो हात तिच्या एवढचं तुझं मागणं आहे. मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो यापुढे मी चोरी करताना कोणत्याच बाईला हात लावणार नाही. त्यांना माझी आई- बहीण समजेन आणि त्यांनी त्यांच्या हाताने काढून दिलेले दागिनेस तेवढे घेईन मंगळसूत्र दिले तरी मी ते घेणार नाहीत .ते जरूर तुझ्या वचनाप्रमाणे परत करीन तेव्हा ढसाढसा रडत असलेली वनमाला म्हणते मला लय भीती वाटते तुमचं काही बरं वाईट झालं तर माझं कसं होईल? मी कोणाच्या भरोशावर जगणार आणि गंभीरा रडत असलेल्या वनमालाला मिठीत घेत तिला समजावतो. वनमला तू घाबरू नकोस, मला काही बी होणार नाही मी समोर कोणीही येऊ दे माझ्यात एवढी ताकद आहे की, मी कोणाचाही मुडदा पाडेल. हे एकुन वनमाला शांत होते आणि ती आपल्या भूतकाळात परत जाते. हे प्रसंग वाचताना लेखकांनी अतिशय अभ्यासपूर्ण संत सेवालाल महाराजांच्या अनमोल विचाराची एका गुन्हेगाराच्या धर्मपत्नीच्या तोंडामध्ये हे विचार पेरून त्यांनी कादंबरीच्या रूपाने समाजातील चोरी करणाऱ्या आणि वाईट प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना सावध करण्याचा एक प्रकारचा इशारा दिलेला आहे. यावरून लेखकाचा अभ्यास आणि गोरबंजाराविषयी असलेली तळमळ ही दिसून येते. लेखक ज्या तांड्यांमध्ये वाढला, ज्या रुढी-परंपरा त्यांनी बघितल्या त्याच्याशी आजही लेखकाची नाळ जोडलेली आहे. लेखक मोतीराम राठोड हे नांदेडमध्ये शरीराने जरी असले तरी मनाने ते आजही तांड्यामध्ये आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये रुळलेले आहेत. मराठी साहित्यात अनेक कादंबरी प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु त्यामध्ये संतांच्या वचनांची आठवण होताना दिसत नाही. परंतु ‘वचपा’ या कादंबरीमध्ये गुन्हेगाराच्या संघर्षकहाणी मध्ये क्रांतीसुर्य संत सेवालाल महाराजांच्या अनमोल वचनाची आठवण एका गुन्हेगाराच्या पत्नीकडून व्हावी हीच या कादंबरीची फार मोठी जमेची बाजू आहे. कादंबरी वाचताना पानोपानी अंगावर काटे येतात. वनस्ट्रोक मध्ये कादंबरी वाचल्याशिवाय माणूस सोडत नाही. प्रचंड ताकतीने या कादंबरीतले पात्र स्वीकारलेली आहेत. गंभीरा हा आपल्या गरीब परिस्थितीने गुन्हेगार झाला. परंतु त्याच्या घरातली जी माणस आहेत बायको वनमाला, आई भुरी, वडील भीमला हे गरिबीत खितपत पडलेली माणसं. सायंकाळच्या जेवणाची सोय नाही तरी मनांने फार मोठी, श्रीमंत वाटतात.
रात्र झाली की गंभीरा हा चोरी करायला बाहेर निघतो. तेव्हा त्यांच्या मनातली घालमेल लेखकाने अतिशय सुंदर तऱ्हेने कादंबरीत शब्दबद्ध केलेली आहे. कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी वाटते. इतकी सुंदर आणि मनाला अस्वस्थ करणारी कादंबरी लेखक मोतीराम राठोडसरांनी साकारलेली असून गोर साहित्यामध्ये ती प्रचंड गाजेल असा मला विश्वास आहे. कादंबरीतील प्रत्येक घटना मनाला अस्वस्थ करणारी आहेत. गंभीरा, बाब्या,शिवला हे तिघे मिळून बापसेटवाडीला म्हशीची चोरी करतात. पाटलाजवळ येतात. विकलेल्या म्हशीचे २०००० रुपये देतात त्यातून पाटील ५००० रूपये आपल्याजवळ ठेवतो कमिशन म्हणून आणि उरलेले १५००० गंभीराजवळ देतो. ‘कादंबरी वाचताना या ठिकाणी प्रश्न पडतो की गोरबंजारा समाजात कधीही कोणी चोरी करत नाही.परंतु या ठिकाणी गंभीराला चोरी करण्यासाठी गावाच्या पाटलानेच भाग पाडलेला आहे. गंभीराला चोरी करायला लावायचे आणि मलिदा आपण लाटायचा अशीच त्यावेळी गावातील पाटलाची परिस्थिती असल्याचे कादंबरी वाचताना दिसते. गोरमाटी गणातला कोणताही माणूस तो कधी चोरी करत नाही आणि भीकही मागत नाही. परंतु इथल्या विषमतावादी व्यवस्थेने त्याला चोरी करण्यास भाग पाडले असेच म्हणता येईल!’
त्या पैशाची ते वाटणी करतात आणि आपल्या घरी येतात. आपल्या घरात गंभीराला वनमाला दिसत नाही. तेव्हा गंभीरा आपली आई भुरीला विचारतो तुझी सून कुठे आहे? तेव्हा तिची भुरी आई म्हणते अरे गंभीरा आज आम्ही दादा -दादी झालो आणि झुमकी आणि गोप्या नाना- नानी झाले. आणि वनमालाला मुलगा झालाय तो अत्यंत गोड आणि सुंदर आहे. तेव्हा गंभीरा म्हणतो कुठे आहे तुझी सून, तिची तब्येत चांगली आहे की नाही आणि घरात जातो गंभीराला आई म्हणते तू बाहेरून आलास, मुलाला बाहेरचं होईल त्यामुळे तू जवळ जाऊ नकोस! तेवढ्यात गंभीराचे वडील गंभीराला म्हणतो अरे आता तरी चांगलं वाघ? तुला मुलगा झालाय, त्याचा विचार कर, वनमालाचा विचार कर, घरची शेती आहे. त्याच्यामध्ये काम धंदा कर , चोरी सोडून दे! नाही सोडलास तर तुला देव माफ करणार नाही. तुझा शेवट वाईट होईल. गंभीरा ऐकतो पण त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया देत नाही. गंभीराची आई भुरी, सासू झुमकी यांनीही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण गंभीरा कोणालाही उत्तर देत नाही. गंभीराचे वडील भीमला मात्र त्याला समजावत असतात पण गंभीर ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. शेवटी गंभीरा ८००० रुपये काढतो आणि वडिलांच्या हातात देण्याचा प्रयत्न करतात. पैसे घेतल्याबरोबर गंभीराचे वडील भीमला ते आठहजार रुपये फेकून देतात. तुझ्या पापाचे पैसे मला नको. तुझ्या पैशाला मी कधीच हात लावणार नाही. ते तुलाच लखलाभ आहे. तुझ्या पापाचा वाटेकरी मी होणार नाही असा खडसावून सांगतो. गंभीरा त्याच्यावर काहीच बोलत नाही. मिशावरून हात फिरवत गंभीरा फेकलेले पैसे उचलतो आणि आपल्या भिमला बापाला म्हणतो राहू दे तुला घ्यायचे नाही तर घेऊ नको. काम करण माझा धंदा आहे. त्याला उगीच तू पाप म्हणत राहतो. अरे चोरी करणं माझं काम आहे असे सांगून भीमला आपली आई भुरी जवळ पैसे देण्यासाठी पुढे होतो. तेव्हा भुरी सुद्धा पैसे घेण्यासाठी तयार होत नाही. ती गंभीराला खडसावून सांगते तू गरिबाला लुटलास, तुझ्या पापाचे पैसे नको ज्याला लुटलास त्यांच्या बायको पोराचे शाप आम्हाला लागेल! तुझी बायको घेत असेल तर देऊन टाक त्याला अशी जोऱ्याने ओरडते. गंभीरा थोडा वेळ गोंधळतो. आपले आई-वडील काय बोलत आहे याचा विचार करू लागतो आणि थोड्याच वेळात त्याच्या वाईट मनाचा कौल घेत विचार करत करत चोरीला तो धंदा समजतो आणि स्वतःच्या मनाची समजूत काढून गंभीरा पैसे देण्यासाठी वनमालाकडे पुढे होतो. पण वनमला तिच्याकडे पाहून आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तिला प्रचंड राग येते आणि वनमाला म्हणते तुझे चोरी करून आणलेले पैसे मला नको. राहू दे तुझ्याकडेच! तेव्हा गंभीरा म्हणतो या घरात आता माझं कोणीच नाही मी वाल्या कोळी झालो आहो. अरे पण आज आपल्या घरामध्ये खायला दाळदाणा नाही तरी तुम्ही चोरी करून आणलेले पैसे घेत नाही . तेव्हा वनमाला रागात म्हणते तुझ्या पापाची सावली माझ्या लेकरावर पडू देऊ नको. मी कष्ट करीन, माझ्या मुलाला मोठा करीन पण तुझ्यासारखा चोर गुन्हेगार होऊ देणार नाही. जा तिकडे माझ्या मुलावर तुझी पापी सावली पडू देऊ नको. गंभीरा काहीच बोलत नाही तो तसाच वनमाला जवळ बसतो.
‘गोरमाटी चोर नव्हते गावातील स्वतःला प्रतिष्ठित समजणारे लोक त्यांच्या स्वभावाचा व गरिबीचा फायदा घेत होते म्हणून गंभीराला चोरी करण्याची सवय लागली होती!’ लग्नापूर्वी हरणासारखी वाटणारी वनमाला आता वाघीण झाली होती याची प्रचिती गंभीराला दिवसेंदिवस येत होती. गंभीरा काही न बोलता आपली पेटी उघडतो आणि त्याच्यामध्ये पैसे ठेवतो आणि वनमाला पासून दूर जाऊन बसतो. त्यावेळी वनमाला म्हणते मायबापाचा ऐक तुझं चांगलं होईल!. आपण दोघं मिळून कष्ट करू, त्यातून जे काही मिळेल त्याच्यामध्ये आपण आनंदी राहू. तु जे काही करत आहे ते अजिबात चांगलं नाही. आता आपल्या बाळाकडे पहा त्याचा विचार करा, माझा विचार केला नाही तर केला नाही पण बाळाचा विचार करा. हा प्रसंग वाचताना अंगावर काटे येतात. घरामध्ये सायंकाळची सोय नसताना सुद्धा प्रचंड मोठ्या मनाची गरीब माणसं संत सेवालाल महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन आपला जीवन प्रवास नेटाने चालवतात आणि गरिबीतही प्रामाणिकपणा दाखवणारी ही माणसं अत्यंत चांगल्या तऱ्हेने लेखक मोतीराम राठोड यांनी रेखाटलेली आहे. लेखक मोतीराम राठोड यांची भाषा ही वाचकाच्या मनाला ठाव घेणारी आहे. ‘वचपा’ कादंबरी वाचताना वाटतं की जे काही प्रसंग, घटना यामध्ये घडत असतात त्यामध्ये आपण स्वतः त्या ठिकाणी उपस्थितच आहो असेच वाटायला लागते. गंभीरा, भीमला, भुरी, वनमाला, बाब्या, शिवला, झुमकी, गोप्या , हुशार मुलगा जीवन या व अशा अनेक पात्रांनी पुढे सरकत जाणारी ही कादंबरी लेखक मोतीराम राठोड यांनी मोठ्या ताकतीने साकारल्याचे दिसते. त्यामुळे लेखकाचे अभिनंदन करतो.
‘वचपा’ कादंबरीचा नायक गंभीरा हा भुरी आणि भीमला यांचा मुलगा. घरी शेतीवाडी असताना सुद्धा गंभीराला चोरी करण्याचा छंद जडतो. तो केवळ गावातल्या पाटलामुळे ! पण गंभीराची आई भुरी आणि वडील भीमला हे मात्र गंभीराच्या चोरी व्यवसायाला कधीच साथ देत नाही. एवढेच नव्हे तर गंभीराची बायको वनमाला सुद्धा आपले गरिबीतले अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना सुद्धा ती गंभीरांनी आणलेल्या चोरीच्या पैशाला हात लावत नाही. अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटुंबामध्ये संत सेवालाल महाराजांच्या अनमोल विचारसरणीवर हे चालणार कुटुंब. गंभीरांचा चोरी करण्याचा धंदा जरी असला तरी त्यांच्या कुटुंबातल्या माणसाची वैचारिक जडणघडण ही मात्र प्रामाणिकपणाची दिसून येते. गंभीराला चोरी करणे हे पाप वाटत नाही. त्याला तो धंदा वाटतो, काम करणं काही पाप आहे का असा तो वारंवार आपला बाप भीमला आणि आई भुरीला सांगतो. परंतु थकलेला बाप भिमला आणि अठराविश्व दारिद्र्यात जगत असलेली याडी भुरी मात्र त्याच्या पैशाला हात लावत नाही. यावरून गंभीराच्या घरच्या वातावरणाची कल्पना येते. चोरी करून आणलेले पैसे ते कधीच स्वीकारत नाही. वडील भीमला, आई भुरी, बायको वनमाला हे गंभीराला नेहमी समजावतात परंतु गंभीरा समजून घ्यायला तयार नसतो. चोरी करणारा गंभीरा एकीकडे आणि प्रामाणिक असलेला भीमला, भुरी ,वनमाला दुसरीकडे हे या कादंबरीचा महत्त्वाचा भाग आणि आत्मा आहे. पण कादंबरीचा यापेक्षा खूप मोठा आवाका आहे. गंभीराचे विचार, गंभीराची चोर गुन्हेगार वृत्ती, भीमला,भुरी आणि वनमाला यांच्या मनातील घालमेल यामधून उभे राहणारे प्रामाणिकपणाचे दावे कादंबरीत येत राहतात. या कादंबरीतील भाषा अत्यंत गोड असून वाचताना ती आवडते. एका गरीब पण स्वाभिमानी कुटुंबाच्या कहाणीचे सविस्तर विवेचन या कादंबरीत आलेला आहे आणि ही कादंबरी लेखकाला शिकवणाऱ्या आपल्या आई वडील आणि दादा वहिनीला लेखकांनी अर्पण केलेली आहे. लेखक मोतीराम रूपसिंग राठोड हे हिरानगरचे जरी असले तरी सध्या त्यांचा मुक्काम काळेश्वरनगर विष्णुपुरी नांदेड मध्ये आहे. त्यांच्या जीवनाची सुरुवात माध्यमिक शिक्षणापासून झाली. एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून त्यांची सर्वदूर खाती होती आणि आहे. ज्ञान ज्ञानाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक मुले घडवली. आज त्यापैकी बरीच मुले मोठ मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. त्यामधीलच त्यांचा एक विद्यार्थी डॉ. सौरभ जाधव यांनी सायास पब्लिकेशन सुरू करून पुस्तक प्रकाशन मध्ये फार मोठे नाव कमावलेलं आहे आणि त्याच डॉ. सौरभ जाधव यांनी लेखकाची ही ‘वचपा’ कादंबरी प्रकाशित केलेली आहे. लेखक जरी नांदेड येथील असले तरी त्यांनी देगलूर आणि उदगीर भागातल्या मराठीचा लहेजा त्यांनी लेखनात छान उतरवलेला आहे.
“सांगताव का नायी. सांगायला काय होऊलालय. त्याला काय पैसा पडूलालय की काय?” “देशमुखाच्या शेतातून आणलाव मनालेत.”अशी अनेक वाक्य कादंबरीमध्ये येतात. चोरी करणाऱ्या गंभीराची बायको वनमाला ही आपल्या मुलाला स्वतःच्या कष्टाने वकील बनवते. आणि गंभीरा मी पापी माणूस आहे म्हणत मरण पावतो. गंभीराचा मुलगा जीवन हा अभ्यासात हुशार असतो आणि हुशारीच्या बळावर तो पुढे न्यायाधीश होतो. यावरून एकाच कुटुंबात गंभीरा आणि इतर माणसांमध्ये दोन विचारधारा दिसून येतात. ही नियतीची दोन रुपये म्हणावी लागेल. खरं तर हा तिचाच वचपा आहे. गंभीराच्या गुन्हेगारी आणि लूटमारीच्या दृष्टिकोनामुळे त्यांच्या आई-वडिलांची होणारी कुचुंबना अशी अनेक विवेचन कांदबरीत लेखकाने अत्यंत सुंदर तऱ्हेने मांडलेली आहेत. ही कादंबरी आहे की एखादा सिनेमा पट अशी वाचताना मनाची घालमेल होत राहते. एखाद्या सुपर डुपर सिनेमाच्या स्टोरी सारखी या कादंबरीचे वाचन पुढे सरकत जातं. गुढ आणि रहस्यमय पुस्तक वाचणाऱ्या वाचकांना कादंबरी नक्कीच आवडेल असे माझे प्रामाणिक मत आहे. ज्ञानदानाच्या शैक्षणिक सेवेत आपली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करून लेखकांनी ‘वचपा’ नावाची कादंबरी लिहिणे हे कौतुकास्पद आहे. लेखकांनी आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटनांचा अभ्यास करून ‘वचपा’ नावाची कादंबरी लिहिलेली असल्याचे दिसून येते. ही ‘वचपा’ नावाची कादंबरी निश्चितच एखाद्या विद्यापीठाला अभ्यासली जावी अशीच ही अभ्यासपूर्ण कादंबरी आहे. त्यामुळे लेखकाचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. !!
* कादंबरी- “वचपा“
लेखक -राठोड मोतीराम रुपसिंग
सायास पब्लिकेशन- नांदेड
पेज- २१३
किंमत -३१० रुपये.
सवलतीत- २०० रुपये.
समीक्षक-
-याडीकार पंजाबराव चव्हाण
पुसद-
94 21 77 43 72