“ सुपरफास्ट..!”
भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर मधु केव्हाचा उभा होता. सारख्या इकडून तिकडं रेल्वे गाड्या सुटायच्या त्याला तिथून जळगावला जायचं होतं. आज तो काहीतरी वेगळ्याच तंद्रीत होता. एक्सप्रेस गाडीनं गेलं म्हणजे वेळ वाचेल असं त्याच्या डोक्यात होतं. असंच मागच्या आठवड्यात तो इथूनच पॅसेंजरने बसला होता पण अर्ध्या तासाचा प्रवास त्याला एक सव्वा तास गेला. मागून येणारी एक्सप्रेस किंवा सुपरफास्टगाडी पुढं जाऊन द्यायची तोपर्यंत पॅसेंजरला असंच साईट पटरीवर ताटकळत थांबावं लागायचं! मागची गाडी जेव्हा पुढे निघून जायची तेव्हा गाडीतला प्रत्येक जण मनात स्वतःशीच खिन्न होऊन गाडीच्या खिडकीतून बघत बसायचा. आज म्हणूनच मधुनं एक्सप्रेसमध्ये बसायचं निर्णय घेतला होता.
सुट्टीचा दिवस असल्यानं स्टेशनवर येणारा जाणाऱ्यांची आज खूपच गर्दी होती. गाडी आली म्हणजे लगेच उतरणाऱ्या प्रवाशांचा लोंढाच्या लोंढा दादरवरून खाली यायचा. तिथून प्रवासाला जाणाऱ्यांची सुद्धा संख्या जास्तच होती. मोठं जंक्शन असल्यानं अशी गर्दी रोजचीच असायची. चहा , पाणी , वडे विकणाऱ्या फेरीवाल्यांची सुद्धा इथं काही कमी नव्हती. मधु केव्हाचा याच गर्दीत हरवून गेला होता. कानात हेडफोन लावून बराच वेळ तो गाणे ऐकत असावा. उगाच इकडे तिकडे कुणाशी डोकं लावण्यापेक्षा त्याला हेच बरं वाटलं असावं. बऱ्याच जणांना अशा सार्वजनिक ठिकाणी उगाच समाजहिताच्या गप्पा गोष्टी करण्याचा मोह आवरत नाही. घरी किंवा गावात कवडीचीही किंमत नसलेला पण अशा अनोळखी ठिकाणी कुणाला भेटला तर त्यानं आपली फुशारकी मिरवत मिरवत शेवटी त्यांचा प्रवास संपतो तरी काही भाकड गप्पागोष्टी आटोपत नाहीत.
मधुला मुळात असं दुसऱ्या कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकं खूपसायाचं यात अजिबात रस नव्हता. बरेच दिवसांपूर्वी त्याचा एक प्रेमभंग झाल्यापासून त्याचं वागणं तिरसट व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्या प्रेमप्रकरणाची गावभर बरीच चर्चा झाली. नोकरी नसल्यामुळे मधुला तेव्हा बरेच पाहुण्यारावळ्यांनी खूप नावं ठेवली. त्यामुळे आता त्याचा एककल्लीपणा आणखी वाढला होता. छोट्या छोट्या कारणांवरून तो कोणाशीही भांडण सुरू करायचा. आयटीआय झालेला होता म्हणून त्याला भुसावळच्या एका कंपनीत घेतलं म्हणून त्याचे थोडे दिवस पालटले! पुढं त्याचं कसंबसं जुळवण्यात घरचे यशस्वी झाले परंतु त्याला अधून मधून ते जुनंच आठवायचं…! त्याची बायको जयाशी पण तो एवढा मिळून मिसळून वागत नव्हता. दर रविवारी सुट्टीच्या दिवशी तो जळगावला काही ना काही काम काढून जायचाचं तसा आजही तो तिकडं निघाला होता.
गाणे ऐकता ऐकता तो पूर्ण त्यात दंग होऊन गेला होता. आता जी कोणती एक्सप्रेस येईल यावर त्याचं लक्ष लागलेलं होतं. पाच दहा मिनिटांपूर्वी तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पॅसेंजर गाडी केव्हाची लागली होती परंतु एक्सप्रेसच्या नादात त्यानं त्या पॅसेंजरकडं ढुंकून देखील पाहिलं नव्हतं. तेवढ्यात तो ज्या प्लॅटफॉर्मवर उभा होता तिथं गीतांजली एक्सप्रेस आली. खूपच सुपरफास्ट गाडी होती ती! हावडा ते मुंबई असा प्रवास करायची ती. गाडी थांबल्या थांबल्या मधु जनरल डब्याच्या दरवाजाजवळ गेला तर आत पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती…! त्याचं डोकं भनकून गेलं. एकतर सनपट डोक्याचा अन् त्यात आणखी इथं बसायला जागा नाही “अर्धाच तास तर प्रवास आहे आपला.” असं म्हणत तो तसंच मागच्या स्लीपर कोच डब्यात चढला. टीसीनं जर हटकलच तर पुढचं पुढं बघू असं पण तो विचार करत असावा तेवढ्यात गाडी सुटली. डब्यातून बाहेर बघत गाडी वेगात सुटल्यानं पॅसेंजर गाडीत न बसल्याचा त्याला आतून आनंद होत होता. वाचलेला वेळ तो जळगावच्या त्याच्या पुढच्या कामासाठी वापरू असं त्याच्या डोक्यात चाललेलं असावं. बाहेरचं वातावरण चांगलंच गरम झालं होतं. गाडी जसजशी पुढं जाऊ लागली तसतसं आत येणाऱ्या हवेने मधुला थोडं बरं वाटू लागलं. थोड्याच वेळात जळगाव येईल म्हणून तो केव्हाचा दरवाजाजवळच उभा राहून गाणे ऐकत होता.
दरवाजाबाहेर त्यानं नजर टाकली तर त्याला लांबूनच जळगाव चमकायला लागलं. आता तो थोडा सावरून उभा राहिला. स्टेशन जवळ येत होतं पण गाडीचा वेळ काही कमी होतोय असं जाणवत नव्हतं. गाडी आणखी सुसाट निघाली होती! काय भानगड झाली असावी?! या विचारांनी त्यानं तडकाफडकी कानातले हेडफोन बाजूला काढून टाकले पण तोपर्यंत स्टेशन येऊन गेलं होतं. त्याच्या डोळ्यासमोरूच जळगाव स्टेशन सपसप मागे पळताना त्याला नवल वाटलं. त्याला इथं उतरायचं असूनही गाडी थांबली नव्हती! तो पूर्ण गोंधळून गेला पण करणार काय? तेवढ्यात तिकीट तपासायला आलेल्या टीसीनं मधुला तिकीट मागितलं….,! तर तो घाम पुसत म्हणाला,“ जनरलचं आहे साहेब , …. चुकून ह्या डब्यात शिरलो…! आता कसं…? मला तर जळगावलाच …..?” टीसीनं तिकीट चांगलं न्याहाळलं अन् परत देताना त्यासोबत पावती पण दिली…! अन् म्हणले,“ आता काय सांगून फायदा? थेट दीडशे किलोमीटरवर मनमाडला गाडी थांबणार!!!! मध्ये कुठंच नाही सुपरफास्ट गाडी आहे भाऊसाहेब हि…! घ्या ही पावती…” मधुला काहीच सुचत नव्हतं. टीसीनं दिलेली पावती बघत त्यानं दंड भरायला गुपचूप पैसे काढले. त्याला हा फुकटातला प्रवास खूपच महाग पडणार होता एका बाजूला त्याला दंड बसला होता तर दुसऱ्या बाजूला त्याचा दिवससुद्धा वाया गेला होता……काही गरज नसतांना त्याला एक्सप्रेस धरायची हाव सुटली होती. लवकर पोहोचायच्या नादात मधु बिनातिकिटाचा सुपरफास्ट प्रवास करत कुठल्या कुठे जाऊन पोहोचला होता…?!
– निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री
जि. छत्रपती संभाजीनगर
9423180393