कादरीचा पिंपळ
नारळ फोडले, प्रसाद वाटला, दुकानाचे उद्घाटन झाले, उद्घाटक होते परमपूज्य ब्रह्मानंद स्वामीजी महाराज आणि दुकानाचे नावही त्यांचे दिले होते ते म्हणजे ” श्री ब्रह्मानंद स्वामी जनरल स्टोअर्स” दुकानाचे मालक होते जगन्नाथ भिवाजी वाघ, पण त्यांना दोडी गावांमध्ये टोपण नावाने जास्त ओळखले जाते ते म्हणजे ‘कादरी’.
सुरुवातीला त्यांचा टेलरिंग व्यवसाय होता त्यातून त्यांचं जगणं शिवत गेलं कधी उसवतही गेलं, फाटलेल्या आयुष्याला ठिगळं लावणं आणि ठिगळं लावत आयुष्य जगणं हेच तर टेलरचं खरं आयुष्य असतं, त्यातच मंडपाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला, हळूहळू व्यवसाय मोठा होत गेला, गावोगाव मंडप जाऊ लागला, नाव मोठं होत गेले, त्याकाळी मंडप व्यवसायात जिल्ह्यात मोठे नाव होते ते म्हणजे नाशिक येथील कादरी यांचा मंडप, आता दोडी गावात जगन्नाथ वाघ यांना त्यांचे नाव न घेता कादरीचा मंडप असे बोलले जाऊ लागले.
बत्तीस वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे 1992 च्या काळात त्यांनी दोडी गावात जनरल स्टोअर्स समोर एक पिंपळाचे रोपटे लावले, त्याला रोज थोडं पाणी टाकले आणि आज हा पिंपळ मोठा झालाय , सावली देतोय शुद्ध ऑक्सीजन देतोय, त्याच सावलीत गावातील लोक बसताय, शेजारीच ब्रह्मानंद स्वामी महाराज यांनी सतःहा वटवृक्ष वड लावलेला आहे, ह्या वडाची आणि पिंपळाची सुंदर अशी सावली आहे.
बत्तीस वर्षांपूर्वी कादरीने लावलेला पिंपळ आज मोठा झाला आहे, असं प्रत्येकाने एक वड एक पिंपळ जर लावला तर पर्यावरणाचे संवर्धन नक्कीच होईल, कादरीचा पिंपळ हा सर्वांनाच सावली देतोय व कादरी देखील शाळेतील गोरगरीब मुलांना सावली देणारे आहेत कारण काही मुलांकडे पेन पेन्सिल वही यासाठी जर पैसे नसेल तर तसेच ते त्यांना पैसे न घेता कितीतरी वेळा देऊन टाकतात, कादरीचा मंडपही सावली देत होता, आता जनरल स्टोअर्स समोरचा पिंपळही सावली देतोय, समाजात काही लोक असे असतात ते नेहमीच समाजाला कोणत्या ना कोणत्या रूपात सावली देत असतात, आणि या छत्रछायेची खूप गरज असतेच, कादरी हे फक्त एक प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण झाले, असे अनेक जण आहेत त्यांनी अश्या सावल्या निर्माण केल्या आहेत आताही आपण नवीन सावल्या निर्माण करूया ज्यांना नाही नवीन सावल्या निर्माण करता आल्या तर निदान त्यांनी आहे त्या सावल्या तरी तोडू नका, सावली निर्माण करणाऱ्या हातांची खूप गरज आहे.
ज्यांचे बालपणातच छाया छत्र हरवले जाते त्यांना खऱ्या अर्थाने सावलीची किंमत कळते, जशी भर उन्हात या पिंपळाच्या वडाच्या सावलीची किंमत माणसाला कळते. प्रत्येकाने एक वड एक पिंपळ लावा, आपण निसर्गाचे कर्जदार आहोत ते कर्ज झाडे लावून फेडूया जीवनाचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात घेऊया.
– वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर.
(दोडी बू ll)
(७०२०३०३७३८)