गोपाया शिंपी
प्रत्येक गावात एखादी तरी वल्ली असतेच. माझ्याही गावात एक अशीच वल्ली होती . तिचे नाव गोपाळराव तल्हार . पण गावातील सारेच त्यांना गोपाया शिपी म्हणूनच ओळखायचे. म्हणजे गोपाळा शिंपी. ह्यांच्या विषयी बऱ्याच दंतकथा लोक सांगत. कधी गोपाळराव स्वत:च सांगत असत . एकदा म्हणे ते पेट्रोमॅक्स घेऊन प्रातर्विधीसाठी गेले होते. तर कधी शंभराच्या नोटांच्या जाळावर चहा करुन प्याल्याचेही अनेकजण सांगत . मांसाहारी जेवणात लिंबू नसले तर तटावरून उठून तसेच चारपाच कोसावर ते लिंबू आणायला जात . अशा एक ना अनेक दंतकथा. खरंतर त्यांचे वडील त्याकाळात शिक्षक होते म्हणतात. घरची परिस्थितीही उत्तम. पण गोपाळराव निघाले दिवटे. उधळे आणि बांड. साहजिकच बापासोबत खटके उडू लागले. आणि मग एका काळ्यारात्री त्यांनी सरळ बापाचे तुकडे केले व पोत्यात भरून दूर गावाबाहेर नेऊन टाकले. दुसऱ्या दिवशी गावात हलकल्लोळ. बरं ही सत्यघटना मी स्वत: त्यांच्याकडूनच ऐकली. माझे वडील आणि गावातील लोकही हेच सांगायचे. मला प्रश्न पडला एवढे होऊनही गोपाळराव सहीसलामत कसे ? त्यांना अटक कशी झाली नाही , खटला पण कुणी भरला नसेल का ? मात्र ह्याची उत्तरे कुणीच दिली नाहीत. अगदी गोपाळरावांनी सुद्धा. त्यांची कथनशैली खूप आकर्षक होती. ऐकणाऱ्याला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. आंखो देखा हाल अशा पद्धतीने ते गोष्ट सांगत. सगळ्याप्रकारचे लोक त्यांच्या भोवताली असत. अगदी आमच्यासारख्या लहान मुलांनाही ते घेऊन बसायचे. पांढरे शुभ्र धोतर. वर पांढरेच नेहरू शर्ट. काळ्याशार केसांचा उलटा भांग. किंचित सुरमा घातल्यासारखे डोळे. राहणी टापटीप. एकूण दिसायला स्मार्ट म्हणावे असेच. आमच्या घराच्या बाजूला एक मोठ्ठे जीर्ण मंदिर होते. त्याला मठ म्हणत. देवनाथ महाराजांचा मठ. खूप प्रशस्त, ऐसपैस असे ते मंदिर होते . आत रामसीतेच्या मुर्त्या होत्या . पण हे मंदिर पडीक आणि उपेक्षित होते. तिथे फारसे कुणी जात येत नव्हते किंवा पूजाअर्चाही होत नव्हती. फक्त त्याचे मालक वारकरी असलेले मुरारी डहाके मात्र दिवसातून जेवढयावेळा त्या रस्त्याने जात तितक्यांदा बाहेरून नमस्कार करीत, स्वत:भोवती प्रदक्षिणा घालीत. पाच मिनिट प्रशस्त ओट्यावर बसून मगच पुढे जात. एक दिवस भर उन्हाळ्यात दुपारी कानठळ्या बसविणारा प्रचंड आवाज झाला. मंदिराचा फार मोठा भाग धड धड कोसळला. लोक घराबाहेर आलेत. कोणतीही जीवितहानी झाली नाही म्हणून प्रत्येकाला हायसे वाटले. अश्या ह्या पुरातन भीतीदायक मठात गोपाळराव आपल्या आईसह राहत असत. ( लग्न झाले होते पण बायको नांदली नाही. लवकरच सोडून गेली असे उडत उडत ऐकले होते. ह्या अती खाजगी विषयावर त्यांच्याशी कोण बोलणार ? ) आई वृद्ध. कुणाशीच फारसं न बोलणारी, गतवैभवाचे दिवस आठवत दिवस मोजणारी. पण कधी कधी कुणापाशी मुलाविषयी सावधपणे तक्रार करायची. गोपाळराव तिला क्वचित मारायचे सुद्धा. त्यांनी तिचा अखेरपर्यंत कसा का होईना मात्र सांभाळ केला. त्यांनी त्यांचा एक भाचा शिक्षणासाठी दोनतीन वर्ष स्वत:जवळ ठेवला होता. त्याचे आईवडील नागपूरला राहत. रमेश पिहुलकर त्याचे नाव. अतिशय स्मार्ट होता. अभ्यासातही हुशार होता. एकोणविसशे पासष्ट साली आम्ही दोघेही पाचव्या वर्गात होतो. तो घरी अभ्यासाला यायचा. त्याने आपल्या मामाविषयी कोणतीच कधी तक्रार केल्याचे मला आठवत नाही. आम्ही सारे गोपाळरावांना तात्या म्हणायचो. शेतीवाडीचे किंवा अंगमेंतीचे काम त्यांनी क्वचितच केले असेल. दिवसभर चौकात गप्पा छाटत बसून असायचे. ते चरितार्थ कसे चालवायचे हे एक कोडेच होते. ते हरहुन्नरी आणि कलासक्त होते एवढे मात्र खरे ! नंतरच्या काळात ते इमारतींना रंग देण्याचे काम करीत. सिझनल. पुढे मग आराम. त्यांच्यात एक खोल पुरून टाकलेला पेंटर, चित्रकार असावा असे मला नेहमीच वाटायचे. रंगीत कागदांचे फार सुरेख कातरकाम ते करायचे. गणेशोत्सवात त्यांचा माहोल असायचा. सजावटीची कामे हमखास त्यांच्याकडेच. गावात गणेशविसर्जनाच्या दिवशी बांबूच्या कमच्या आणि रंगीत ताव यांचा एक मोठ्ठा बलून तयार करुन तो आकाशात सोडत असत. हे बलून तयार करणे आणि तो आकाशात सोडणे हे काम गोपाळरावांचेच . मोठया उत्साहाने आणि तन्मयतेने ते सगळं करीत. त्यात त्यांना पैसे किती मिळायचेत की मिळायचेच नाहीत , ठाऊक नाही . पैशांसाठी किंवा श्रद्धेपोटी ते नक्कीच हे काम करीत नसणार. तो त्यांच्या आनंदाचा विरंगुळ्याचाच भाग असणार. त्यांना संगीताची सुद्धा आवड होती. रस्त्याने जाणाऱ्या कुणाही गाणे गाऊ शकणाऱ्या माणसाला ते थांबवायचे आणि अभंग, लावणी, भारुड किंवा भावगीत म्हणायला लावायचे. तो माणूसही त्यांच्या विनंतीला मान देऊन मन लावून गायचा. झाडं आणि फुलांचीही त्यांना खूप आवड होती. मंदिराच्या बाजूला थोडी अस्ताव्यस्त , ओबडधोबड जागा होती, त्यांनी त्या जागेचा कायापालट करुन टाकला. अनेक प्रकारचे देशी – विदेशी झाडं, फुलझाडं त्यांनी लावले, फुलवले. जाता येता बघत राहावा असा तो तुकडा होता. तीनचार हजार लोकवस्तीच्या खेडयात त्याकाळात तो कुतूहलाचाच विषय होता. पण हे सारे चारपाच वर्षेच टिकले. त्यांचा उत्साह मावळला नसेल मात्र चंचल स्वभावधर्मानुसार त्यांनी दुसऱ्या कोणत्या गोष्टीकडे मोर्चा वळविला असणार. खाण्यापिण्याच्या बाबतीतही ते रसिक होते. पावसाळ्यात पाहिला पूर येऊन गेल्यावर पोटात अंडी असलेली मासे विकायला येतात . खूप चविष्ट असतात ते. गोपाळराव असे मासे भरपूर विकत घायचे. कधी आमच्या घरी तर कधी दुसऱ्या एखादया मित्राकडे घेऊन जायचे. मग भरपेट जेवण. ते दारू प्यायचे की नाही माहित नाही. बहुतेक नाहीच. खरं तर हा शिक्षक बापाचा वाया गेलेला मुलगा. सारीच व्यसनं असायला पाहिजे होती. पण असे नव्हते. मला अजून एक गोष्ट आठवते ती म्हणजे आमच्या अंगणात एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. मृगाचा पाहिला पाऊस पडून गेल्यानंतर हे गोपाळराव ह्या कडुलिंबाची कोवळी पाने तोडून, त्यात तिखट, मीठ, मसाला घालून तव्यावर अशी खास भाजी बनवत . मग ज्याला आवडेल त्याला अशा पाचसात लोकांना खाऊ घालत. मी पण ही भाजी अनेकदा खाल्ली आहे . त्यांचे क्वचित कुणाशी कधी भांडणही व्हायचे मात्र शत्रुत्व असे कुणासोबत नव्हते. पत्नी सोडून गेलेली असूनही त्यांचे चारित्र्य व्यवस्थित होते. मी शुद्ध म्हणत नाही. माझ्यामते चारित्र्य हे शुद्ध अशुद्ध वगैरे असे काही नसते. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पुढे लिहिणारच आहे मी ह्या विषयावर. एकोणविसशे सत्यांशी नंतर मी गाव सोडले. दोनतीन वर्षातून कधीतरी गावी जाणे होते. असाच एकदा गावी गेलो. मुद्दाम गोपाळरावांना भेटलो. आता पेहराव बदलला होता. मळकट पायजामा , वर तशीच मळकट बांडीस ( म्हणजे बंडी ) डोक्यावर गुरुदेवछाप भगवी टोपी. डोळ्यावर शिबिरात मिळालेला फुकट चष्मा. शेजारी किशोर गाडगेची आई माझ्या वडिलांची मानलेली मुलगी ती त्यांना खाऊपिऊ घालायची. आमचे दादा महादेवराव गाडगे यांनी अण्णासाहेब ठाकूर यांच्या वाड्यातील गोठ्यात त्यांची राहण्याची सोय करुन दिलेली. तटपुंज्या सरकारी मदतीवर ते कसेतरी तगून होते. नुकतेच ते दोन वर्षांपूर्वी गेल्याचे कळले. स्वत: शिक्षक असूनही त्यांच्या वडिलांना मुलाचा कल , आवडनिवड ओळखता आली नसावी. त्याच्यातील टॅलेंट शोधता आले नसावे. व्यवहारी जगात तो एक व्यवहारचतुर गृहस्थी व्हावा म्हणून ते धडपडत राहिले असतील. आणि गोपाळा आयुष्याची परवड सोसत राहिला… निमूट, बिनतक्रार…..
– अशोक थोरात
भ्रमणध्वनी- ९९६००४८८७८
(छाया : संग्रहित)