घरीच बनवा, घरीच विसर्जन करा.!
संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो. हा सण 10 दिवस साजरा केला जातो. यावेळी भाविक आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात आणि विधीनुसार तिची पूजा करतात. तसेच, गणपतीचे विसर्जन 10 व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते.
दरवर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. यावेळी शनिवार, 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. यावेळी भाविक मोठ्या भक्तिभावाने घरोघरी गणेशाची स्थापना करतात. मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे शुभ मानले जात जाते.
श्री गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहात तयारी करत आहेत.बाजारात गणेशाच्या मूर्ती मोठया प्रमाणावर विकायला आल्या आहेत.विक्रीला उपलब्ध असलेल्या अनेक मूर्ती या प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या आहेत.पीओपीच्या मूर्ती नदी आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) नद्या आणि पर्यावरण प्रदूषित करते. मातीच्या मूर्ती शास्त्रावर आधारित आहेत. आपल्या वैदिक संस्कृतीतही मातीच्या मूर्तीची पूजा करण्याची पद्धत सांगितली आहे.पीओपी मूर्तींचा वापर वाढल्यानं जलप्रदुषण वाढलंय. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यानं समुद्रातील जैवविविधतेला धोका पोहचतोय. या मूर्ती आपण नदी, समुद्र किंवा तलावात विसर्जीत करतो. मात्र, या मूर्ती आहे तशाच राहतात. त्यामुळं पूरस्थिती देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळं संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा.
प्लास्टिक ऑफ पॅरिसची मूर्ती विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी मातीची गणेशजीची मूर्ती बनवावी.
गणपतीची पूजा करण्यासाठी घरच्या घरी मातीची मूर्ती तयार करणे उत्तम. गणपतीची छोटी मूर्ती बनवली तर बरे होईल. विधीनुसार त्याची पूजा करता येईल आणि नंतर घरी स्वच्छ पाण्यात विसर्जित देखील करता येईल आणि हे पाणी झाडांना आणि वनस्पतींना द्या. त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषणही होणार नाही. लोक मोठ्या आणि सजावटीच्या मूर्ती विकत घेतात आणि त्या नदीत किंवा साचलेल्या पाण्यात विसर्जित करतात, जेथे पाणी स्वच्छ नाही. यामुळे पर्यावरण प्रदूषित होते.गेल्या वर्षी मुंबई आणि लुधियाना येथे भाविकांनी चॉकलेटच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली होती. नंतर भाविकांनी मूर्तीचे दुधात विसर्जन करून गरिबांमध्ये वाटप केले होते.
सनातन धर्मात, प्रत्येक तरी सण पर्यावरणाशी आणि निसर्गाशी जोडलेला आहे. गणेश चतुर्थी, या उत्सवाचा खरा आनंद मिळवण्यासाठी त्याचे मूळ समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. ‘गण’ म्हणजे समूह असा अर्थ घेतला आणि ‘गणपती’ म्हणजे लोकांना एकत्र आणणारा. यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ -विद्वान, कलाकार, खेळाडू, व्यापारी, मजूर इत्यादी सगळेच. अर्थात, हा सण मानवी समाजाला जोडतो. हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सणाचं निसर्गाशी नातं आहे. प्राचीनकाळी लोक नद्यांमध्ये स्नान करायचे. पावसाळ्यात, नद्यांचे पाणी ताजे आणि स्वच्छ असते आणि नदीचे किनारे नवीन जमा झालेल्या सुपीक मातीने समृद्ध असतात. लोक याच मातीचा गोल घेऊन, त्याची मूर्ती बनवून श्रद्धेने पूजा करायचे आणि नंतर त्याच पाण्यात विसर्जनदेखील केले जायचे. याच पद्धतीचा अवलंब आता देखील सहज पद्धतीने करता येतो.नदीच्या काठावर आढळणारी नैसर्गिक माती मूर्ती बनवण्यासाठी वापरता येते. ते पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत.
घरगुती गणपतींपासून ते अगदी सार्वजनिक गणपती मूर्तीही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या असतात. मूर्ती आणि देखाव्यांची रंगरंगोटी सजावटीसाठी वापरलेले प्लास्टिक आणि थर्मोकॉलयुक्त वस्तूंचा सर्रास वापर पाहायला मिळतो. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात खर्या तसेच कृत्रिम फुलांचा ही वापर केला जातो. या सजावटीच्या वाढत चाललेल्या हव्यासापोटी प्रदूषणाचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढले आहे. या वाढलेल्या प्रदूषणाचे गंभीर परिणाम केवळ मानवी जीवनावरच नाही, तर समुद्रातील इतर जीवांवर ही होत आहेत. ’पीओपी’ म्हणजेच ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’मध्ये असलेले कॅल्शियम सल्फेट हेमिहैड्रेतचे नैसर्गिक विघटन व्हायला, तर अनेक वर्षं लागतात. यासारखी इतर रसायानेदेखील, जलचरांना भयंकर हानी पोहोचवतात. कारण, त्यामुळे पाण्यातील प्राणवायू कमी होतो आणि हा प्राणवायू कमी झाल्याने अनेक जलचर, मासे मृत्युमुखी पडतात व त्या परिसरातील अन्नसाखळी विस्कळीत होते. न विराघळणार्या या मूर्त्यांमधील घटक, तलावात, तिथून नद्यांमध्ये व तिथून समुद्रात प्रवेश करतात आणि त्यांच्या मार्गात, केवळ आणि केवळ विनाश पेरत जातात. काही भव्य मूर्त्यांमुळे मोठा परिणाम दिसून येतो. अंदाजे १०० वर्षांहून अधिक काळासाठी, या मूर्त्यांमूळे प्रदूषण होऊ शकते.
जितकी रंगीबेरंगी आणि चमकदार मूर्ती, तितका विषारी आणि हानिकारक पदार्थांचा वापर! रंगांमधील, शीष, पर, कॅडमियमसारखे धातू जैवविस्तृतीकरण आणि जैवसंचय या नैसर्गिक प्रक्रियांद्वारे भयंकर विनाश करतात. अशा रसायनांनी पाण्याची आम्लता वाढते, आणि यामुळे कठीण कवच असलेले प्राणी जसे की खेकडे, चिंबोर्या आणि पगोळीसारखे प्राणी तर अक्षरशः अतिआम्ल पाण्यात विरघळतात.
पुढे या प्रदूषणाने, जलजन्य रोगांचे प्रमाण वाढते. तसेच त्वचेच्या रोगांचेदेखील प्रमाण वाढते, असे संशोधनातून आढळले आहे. त्याचबरोबर प्लास्टिक, धातू आणि सिंथेटिक गोष्टींच्या प्रदूषणाबद्दल वेगळे काही सांगायची गरज आहे? खर्या आणि खोट्या फुलांच्या निर्माल्यातून पाण्यात कीटकनाशक, रासायनिक खत आणि अशा अनेक गोष्टी पोहोचतात. प्रदूषित तसेच अनैसर्गिक आणि सडलेल्या-कुजलेल्या गोष्टी संपूर्ण प्रणालींना धोका निर्माण करतात.म्हणून पर्यावरणाला पूरक अशा मातीची गणेश मूर्ती घरीच बनवून ,घरीच विसर्जन केले तर पर्यावरणाचे रक्षण होईल..
– प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६