‘पोळा जपला डोळ्यात’ विस्मरणाच्या टप्प्यावरच्या नोंदी
(तुम्ही आम्ही पाहिलेला, जगलेला, जपलेला पोळा, जो आज हरवला आहे… पोळ्याच्या बैलासारखा अभावाने दिसत नाही…. नक्की वाचा… चार क्षण मन मागे फिरले की ह्या लेखनाचे सार्थक झालं असं समजता येईल.)
महाराष्ट्राच्या मातीत पोळा या सणाला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. वर्षभर राब राबणाऱ्या बळीराजाच्या जीवाचा सखा सोबती म्हणजे वृषभ राजा, होय बैलाला पर्यायी शब्द वृषभ आहे बरं. या वृषभ राजास शेतीच्या कामातून एक दिवसाचा आराम मिळाला पाहिजे, त्याने उपसलेल्या कष्टाचे आपण ऋण मानले पाहिजे, त्याचे गोडवे गायले पाहिजे त्याची पूजा केली पाहिजे या उदात्त भावनेतून कृषक संस्कृतीमध्ये बैलाची पूजा करून त्याचा गौरव वाढवण्याची संस्कृती कृषक संस्कृतीचा उगम झाल्यापासून अस्तित्वात असावी असे वाटते. अगदी मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीमध्येही बैलाचे चित्र आपल्याला सापडते यावरून त्या काळातही बैलाचे महत्त्व असेल असा अर्थ काढता येतो. साधारण इंग्रजांच्या राजवटी पर्यंत तरी यंत्रांनी माणसाला गुलाम केले नव्हते त्यामुळे बैलाचे अस्तित्व शेतीसाठी आणि पर्यायाने जीवनासाठी महत्त्वाची ठरत गेले. नंतरच्या काळात मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून यंत्र युगाचा उदय झाला आणि घोडा हत्ती उंट आणि अगदी गाढव सुद्धा हे प्रवासाची साधने असलेले प्राणी पाहता पाहता शोभेची वस्तू होऊन बसले. बैलाच्या नशिबात मात्र अगदी मागच्या दहा पंधरा वर्षांपूर्वी पर्यंत कष्टाळू प्राणी म्हणून एक गौरवी बिरुद लाभलेले होते. रंगबेरंगी झूल अंगावर घेऊन शिंगे रंगवलेले हजारो बैल एक साथ मेहकरच्या लोणार वेशीवर जमा होत, आम्ही लहान मुले बाबांची बोट करून त्या पोळ्यात फिरत असू, माकडाचा आकार दिलेला फुगा, किंवा शोले चित्रपटातील अमिताभ वाजवतो तसा माऊथ ऑर्गन, किंवा हिरो चित्रपटातील जॅकी श्रॉफ वाजवतो तशी बासरी रुपया दोन रुपयात विकत घेऊन संपूर्ण सृष्टीचे मालक आपणच आहोत ही भावना त्या काळात फारच सुखावणारी असे, मात्र चित्रपटात वाजतात तशी ती वाद्य आपल्याला कधीच वाजवता येत नाहीत हे कुणी सांगितले तरी समजत नसे. पुढे आम्ही मोठे झालो आली पंधरा-वीस वर्षांपूर्वी आपल्या चिमुकल्या लेकरांना लाकडाची भाले तलवारी घेऊन देण्यात जो आनंद असतो तोही प्रचंड दिलासादायक असतो याची अनुभूती येऊ लागली. या काळापर्यंत रुबाबदार बैल पाहणे, त्याच्या राजबिंडे रूपाकडे पाहिल्यावर मनास लाभणारी प्रसन्नता या सर्व बाबींचे अप्रूप अगदी काल-परवापर्यंत टिकून होते असे वाटते, मात्र पाहता पाहता ट्रॅक्टर हार्वेस्टर अशा वेगवेगळ्या यंत्रानी बैलाचे अस्तित्व अडचणीत आणले. शहरांमध्ये तर बैल दिसला की फोटो काढून ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते. अशात ग्रामीण भागातून शहरात गेलेल्या जुन्या परंपरा जपणाऱ्या माणसाची होणारि कुचंबना आणि बैलासारख्या राजस प्राण्याचे नेस्तानाबूत होत जाणाऱ्या अस्तित्वाबाबत विचार केल्यास एक बेचैनी मनात दाटून येते.
अशीच एकदा लोकनाथ यशवंत यांची बैल ही कविता वाचल्यावर त्याचे पडसाद मनावर खूप दिवस उमटत राहिले. लोककवी विठ्ठल वाघांचे वृषभसूक्त हा निव्वळ बैलाला समर्पित असलेला संग्रह वाचूनही अस्वस्थता वाढतच जाते. अशात बैल या कवितेवर आधारित बायोपिक येऊन गेल्यावर या संदर्भात अनेक चर्चा झाल्या. त्या अनुषंगाने शबरी या कवितेमुळे माझ्याशी जोडल्या गेलेल्या अमेरिकेतल्या काही साहित्य प्रेमी वृद्धांशी माझे बोलणे झाले त्यावेळी त्यापैकी एका आजोबांनी त्यांचा मुलगा इंजिनिअर असताना जेव्हा पुण्याला राहत होता तेव्हा किमान मातीची बैलाची मूर्ती आणून पोळा साजरा केल्याचा आनंद मिळत होता आता अमेरिकेत तेही होतं नाही असे दुःख व्यक्त केले. पुणे मुंबई सारख्याच नव्हे तर आज अगदी तालुका स्थळ असलेल्या गावातही नोकरीच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले ग्रामीण कुटुंब बैला शिवाय पोळा कसा साजरा करत असेल? असा प्रश्न मला पडला आणि माझी नोकरी 25 पेक्षा जास्त वर्ष ग्रामीण भागात झाल्यामुळे ग्रामीण संस्कृती, राहणे तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदार संस्कृती, आणि बहुतांश नातेवाईकांचा वावर मुंबईला असल्यामुळे मुंबईची संस्कृती या सर्वांचा एकत्रित विचार करून पोळा याविषयीच्या काही ओळी माझ्या मनात निर्माण झाल्या,
पोळ्याच्या सणासाठी, “नक्कोय बैल मातीचा”
खऱ्याखुऱ्या नंदीसाठी, हट्ट होता त्या नातीचा.
पोळ्याच्या दिवशी माझ्या दारातही बैल यावा अशी संधी उपलब्ध नाही मात्र अगदी सुरुवातीपासून घरी दूध देणारे दूधवाले आवर्जून बैल पूजनासाठी पोळा फुटल्यावर घरी येतात. ते पाहिल्यावर माझ्या तीन-चार वर्षाच्या चिमुकल्या छकुलीला होणारा आनंद आणि तिने आनंदाने पिटलेल्या टाळ्या यामुळे घरात एक प्रसन्नता दरवळत असे. मात्र एक वर्ष खूप उशिरापर्यंत बैल दारात आला नाही त्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि बैलाची वाट पाहू लागली त्यावेळी तिला रंजवण्यासाठी घरात पूजेसाठी आणलेल्या मातीचे रंगीत बैल तिला खेळायला दिले त्यावेळी ‘मला नक्कोत मातीचे बैल, खरे खरे बैल पाहिजेत’ असा हट्ट तिने भरला होता. सातबारा कोरा असलेल्या आमच्या घरात माझे वडील मी किंवा माझे भाऊ सर्वजण तिच्यासाठी खरा बैल आणण्यासाठी अक्षम होतो तेवढ्यात माझ्या मधल्या विनोद नावाच्या समोरच्या गल्लीत लव्हाळे नावाच्या कुटुंबात येणाऱ्या बैलाला आमच्या घरी घेऊन येऊन तिचा हट्ट पुरवला आणि तिच्या डोळ्यात जमा होणाऱ्या आसवांच्या ऐवजी गालावर हसू फुलवले होते. या प्रसंगातूनच वरील ओळींची पेरणी माझ्या मनात साधारण 2003-04 मध्येच झाली होती ती शब्दरूपात वरील प्रमाणे आकारास आली.
गावाकडे असलेल्या जमिनीचे, बैलाचे आणि कृषी वैभवाचा ज्याला अभिमान आहे, ज्याचा बैल मारुतीच्या तोरणाखालून अग्रक्रमाने निघायचा. मानाचा बैल म्हणून मिरवायचा अशा एका जवळच्या कुटुंबाने आपले सहा बैल विकून ट्रॅक्टर घेतला असे जेव्हा मला अभिमानाने सांगितले तेव्हा त्यांच्या घरातील म्हाताऱ्याच्या डोळ्यातील व्याकुळता मी जवळून न्याहाळली होती. ती आठवण येताच
ऐकून बोल अश्रू आले आजोबांच्या डोळ्यात,
सर्जाराजा होते त्यांच्या गावाकडच्या पोळ्यात.
या ओळी आकारास आल्या. सर्जा राजा हे शब्द विठ्ठल वाघांच्या काळ्या मातीत मातीत या गाण्यातील सर्जा राजा या बैलाच्या नावावरून मी माझ्या कवितेत वापरले, त्यात वावगे असे काही नव्हते कारण पाखऱ्या, सर्जा राजा, ढवळ्या पवळ्या अशीच बैलांची नावे आम्ही सुद्धा पाहत होतो. फार क्वचित वेळी पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावरची झूल पाहताना त्या झुलीवर जी बैलांची नावे असायची त्यात एखादे वेगळे नाव सापडायचे.
कधीतरी आम्ही एखाद्या लग्नकार्यासाठी गाव खेड्यात गेल्यावर जे खेडे डोळ्यांना पाहायचं त्या खेड्यातील प्रत्येक अंगणात गाय म्हैस बैल बकरी असा कोणता ना कोणता प्राणी बांधून ठेवण्यासाठी खुंटे असायचे. शहरात तो खुलता दिसत नाही, खुंटाही नाही आणि बैलही नाही या जाणीव सोबत शबरी कवितेतील नातवाला शोधणारी आजी, आणि त्या निमित्ताने आजोबा आजीचे आणि नातवांचे परस्परांशी असलेले नाते, प्रसंगी घरातील वृद्धाशी सून आणि मुलगा बोलत नाही मात्र त्याचे नातवंडे नक्कीच बोलतात. ही नटसम्राट चित्रपटातील प्रसंग पेरणी ताजी असताना मनामध्ये कवितेच्या पुढील ओळी उमटल्या,
येथे अंगणी नाही खुंटा, बैलही नाही खुंट्याशी,
बोलायलाही म्हणे फक्त सोनूलीच येते बुढ्याशी.
आजोबा एकाकी झालेत शहराच्या धाकाखाली,
अन खुंटा मोडून पडलाय ट्रॅक्टरच्या चाकाखाली.
एकाकी वृद्ध लोक, त्यांची मानसिकता यातून अनेकदा मी गावाकडे एकटा राहतो पण शहरात मुलाकडे जात नाही असे सांगणारे म्हातारे लोक शहरातील गर्दी पेक्षा घरातील एकाकीपणाला जास्त घाबरतात हे समजून घेणे गरजेचे आहे.
खेडी ओस पडत आहेत, खेड्यामध्ये बोटावर मोजता येथील इतके लोक उरले आहेत आणि शहरात मात्र खुराड्यात कोंबल्याप्रमाणे माणसे गर्दी करत आहे. असे चित्र पाहिले की कधीकाळी खेड्याकडे चला असा नारा एका महापुरुषाने दिला होता तो भारत हाच का? असा प्रश्न पडण्याची वेळ आलेली आहे. माणसाचा सातबारा कोरा होत आहे, मध्यमवर्गीय जीवनमानात एखादी छोटी मोठी नोकरी लागली की लवकरच गावाकडचे शेत विकून शहरातच फ्लॅट घेणे, शेतीवाडी विकून कार किंवा एखादे वाहन घेणे अशी संस्कृती वाढीस लागली आहे. त्यातच माझ्या गावाच्या जवळून समृद्धी महामार्गात ज्यांची शेती गेली त्या लोकां पैकी फार मोजक्या लोकांनी इतरत्र शेतजमिनी घेतल्या मात्र मोठ्या प्रमाणात जे सी बी, ट्रॅक्टर, स्कॉर्पिओ गाड्या, बुलेट आणि मोबाईलची खरेदी ह्यात पैसा घातला असे लक्षात येऊ लागले. सृजनशील जमीन विकून यंत्राच्या गुलाम झालेल्या ह्या अवस्था पाहून पुढील ओळी अतिशय अस्वस्थपणे जन्मास आल्या.
खेड्याकडे जाण्याचा कसा सारेच विसरले नारा,
कोराच झाला येथे यंत्रामुळे जीवनाचा सातबारा.
सिमेंटच्या कबरीत कशी गडप झाली काळीमाय?
खुंट्याविना मोकाट रस्त्यावर हिंडतेय पहा गाय!
रस्त्यापासून मैदानापर्यत सर्व काळी माती आज सिमेंट आणि गट्टू ह्याखाली दाबली जात असून ह्या देशाने जिला मातेचा दर्जा दिला ती गाय आज मोकाट रस्त्यावर हिंडताना दिसत आहे ह्या भावनेसह संपूर्ण आयुष्यच आज फसव्या रंगाने रंगले आहे, पोळ्याच्या बैलांची शिंगे रंगवावी अशी परिस्थिती आणि उत्साह आज पार माळवून गेला आहे. आपल्या जीवनातून बैलचं हद्दपार झाल्यामुळे पोळ्याची सजावट तरी कशी करावी असा प्रश्न आज घरातील वृद्ध व्यक्तींना पडत असेल अश्या भावनांना शब्दात मांडत असतांना खरे तर माझं स्वतःच मन माझ्या बालपणात फिरून येत होतं आणि एक प्रचंड अस्वस्थता मनात घर घालत होती.
आयुष्याला लाभला कसा हा फसवा बेगडी रंग
बैल हरवला सोनूले, आता रंगवावे कोणाचे शिंग ?
विसरून गेलोय आपण, जर हा गंध रानमातीचा,
बैलही पोळ्यासाठी होऊन आलाय बघ मातीचा..!
आज आपण रानमातीचा गंध विसरून गेला आहे, पावसातल्या पहिल्या भिजण्यापासून कोवळ्या उन्हात बसणे, गाय बैल या कृषक संस्कृतीच्या प्रतीकांचा आपल्याला आज विसर पडला आहे. आज नव्या पिढीला आपल्याला आपले सण उत्सव सांगायचे असले तर आपल्याला जसे आठवते तसे त्यांना सांगावे लागतील, आणि आपण जसे सांगू तसेच त्यांना ते मान्य करावे लागतील अशी आजची परिस्थिती आहे. म्हणूनच एखादे आजोबा आपल्या नातीला आपल्या नजरेने पोळा पाहण्याचे सांगत असतील, कुठेतरी कधीतरी चुलीवर केलेल्या पुरणपोळीची चव त्यांना आठवत असेल ते सर्व ते आवर्जून आपल्या भावी पिढीला सांगत असतील आणि ते सांगण्याचे शब्द बहुदा पुढील प्रमाणे असतील
माझिया नजरेने पहा पोळा, मी जपलाय डोळ्यात
आजीच्या हाताची चवही शोधू चल पुरणपोळ्यात
आज कृषक संस्कृती, ग्रामीण संस्कृती, बैल पोळा या सर्व बाबी कमी कमी होत असल्या तरी मंदिरांची संख्या वाढत आहे, या मंदिरात महादेवाचे मंदिर असले तर त्या मंदिरा बाहेर आवर्जून नंदीच्या स्वरूपात बैल उभा दिसतो. आज मंदिराची संख्या पाहिली असता एखादेवेळी मंदिरात मूर्ती होऊन उभे राहिलेल्या बैलांची संख्या वास्तवातील बैलांच्या संख्येपेक्षा जास्त भरू नये या एकाच अपेक्षासह घरातील आजोबा आपल्या नातवंडांना म्हणत असतील
नंदी होऊन उभा राहिला जरी तो मंदिराच्या पुढे..
सांग सोनूले खराखुरा बैल तुला मी दाखवू कुठे?
हा प्रश्न आज किमान तालुका स्थळ असलेल्या गावात किंवा खेडे विभागात फार जास्त अस्वस्थ करणारा नसला तरी आपली वाटचाल मात्र त्याच दिशेने चालू आहे असे तुमच्या गावात एखादा ट्रॅक्टरचा पोळा भरला तर तुम्हालाही नक्कीच वाटेल, नाही का?
-किरण शिवहर डोंगरदिवे
वार्ड नं 7 समता नगर मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301
मोबा 7588565576