“येता संकट बालकावरी 1098 मदत करी”
* बालकांसाठी चाइल्ड हेल्पलाइन सेवा 1098
गौरव प्रकाशन
Marathi News अमरावती, (प्रतिनिधी) : आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, याकरिता कोठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो.
अशा संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीकरिता भारत सरकार महिला व बालविकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी/संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाइल्ड हेल्पलाइन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेतंर्गत संकटग्रस्त बालकांना 24 x 7 हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. या निवेदनाद्वारे 1098 या टोल फ्री क्रमांकवर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.