निरागस विद्यार्थी अन् हैवान शिक्षक !
शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोट्य़ा-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते.मात्र आज शिक्षकांच्या वाढत्या अश्लील हरकतीमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होत आहे. शिक्षकांच्या वाढत्या लैंगिक विकृतीमुळे शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आला आहे.
कोणतीही शाळा असो आपल्याकडे गुरुंना सर्वात मोठे स्थान दिले गेले आहे. यामुळे पालक आपली मुलगी शाळेत असताना निर्धास्त असतात. मुलगी शाळेत सुरक्षित आहे, ही खात्री त्यांना असते.
अलिकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकच आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींचे विनयभंग केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. असे संतापजनक प्रकार उघडकीस येत आहे. शिक्षण क्षेत्रात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महाराष्ट्रात मुली आता खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. पण याच महाराष्ट्रातील मुलींसाठी शाळा कितपित सुरक्षित आहेत? हा गंभीर प्रश्न आहे. बदलापुरातील संतापजनक घटना ताजी असताना आता अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाचा चीड आणणारा प्रताप समोर आला आहे. त्यामुळे या विकृत मानसिकतेचं काय करायचं? त्यांची अशी कृत्य फोफावू नये म्हणून त्यांना कठोरात कठोर काही कारवाई केली जाणार आहे की नाही? विशेष म्हणजे असे प्रकार कितीवेळा महाराष्ट्राच्या लेकींनी सहन करायचे? असे प्रश्न आता महाराष्ट्रातील जनसामान्यांमधून उपस्थित होत आहेत.
बदलापुरातील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना आता अकोल्यात पुन्हा एकदा अतिशय संतापजनक घटना घडली आहे. अकोल्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. शिक्षकांना आपण गुरु मानतो. शिक्षकांना आपण देवाचा दर्जा देतो. पण अकोल्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. विकृत शिक्षकाने शाळेतील 6 विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवत विनयभंग केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शाळा, ज्ञान मंदिरात मुली शिक्षण घेण्यासाठी जातात. पण आता अशा ज्ञान मंदिरातच मुली सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. शिक्षकच विद्यार्थिनींचा विनयभंग करत असेल तर त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्याची आशा कशी करायची? आता हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालयांमध्येच मुली सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुलींना सुरक्षित वातावरण कसं निर्माण होईल? असा प्रश्न उपस्थित होतोय.
बदलापूर व अकोल्यातील प्रकरण ताजे असतानाच संगमेश्वर तालुक्यात संतापजनक तसेच गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकच भक्षक बनल्याने तालुकाभरात संताप व्यक्त होत आहे. वर्तमानपत्रात विनयभंगाच्या अनेक घटना घडत असल्याच्या बातम्या दररोज येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलींना रूमवर बोलावून त्यांचा विनयभंग केला. वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षकांनी अल्पवयीन मुलीला रूमवर बोलावले तिथे मुलीचा विनयभंग केला.आईने व्याजाचे पैसे देत नसल्याने शिक्षकाने भर शाळेत मुलीचा विनयभंग केल्याची घटना जळगाव येथे घडली असून शिक्षकासह चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिरोडा तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या मोबाईलवर अश्लील फोटो व मेसेज करून शिक्षकांनी विनयभंग केला. २२ऑगस्ट रोजी मुलीच्या मोबाईलवर आलेल्या व्हाट्सअप मेसेज मुळे हा प्रकार उघडतील आला.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे पवित्र आहे. आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र, याच पवित्र नात्याला काळीमा फसल्या जात आहे. समाज शिक्षकाकडे आदराने पाहत असतो विद्यार्थी घडवण्याचे सेवाभावी कार्य करण्याची संधी शिक्षकांना मिळालेली असते मात्र शिक्षकच गैर कृत्य करू लागले बेभान होऊन विभिचार करू लागले मुलींचे शोषण करू लागले तर त्यांच्याकडून कोणता आदर्श घ्यावा ? हे चित्र विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम करेल? संबंधित विभागाकडून अशांवर कारवाई झाली तरी आपण विद्यार्थ्यांना नजर तरी कशी मिळवणार असा प्रश्न त्या शिक्षकांच्या मनात येईल का याविषयी शंकाच आहे. कारण जे मुक्तपणे आक्षपार्ह कृत्य करू शकतात ते किती निष्काळी विचारसरणीचे,है लक्षात येते. कोणत्या गोष्टीचे सोयर सुतक असणार ? शिक्षकांनी या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६